बेरोजगारीचा आकडा वाढत असताना आपण बेरोजगार आहोत की रोजगारक्षम नाही, हे युवावर्गाने जाणून घेणे गरजेचे आहे. कौशल्यांची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी लवकरात लवकर भरून निघणे अत्यावश्यक ठरते.
एखाद्या युवकाने संपादित केलेली कौशल्ये लक्षात घेत त्याच्या अर्हतेनुसार त्याला साजेशी ठरेल अशा नोकरीची शिफारस करण्याचे ‘द नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कौन्सिल’ने निश्चित केले आहे.
बेरोजगारी हे केवळ देशाच्याच नाही, तर जागतिक अर्थकारणापुढील एक महत्त्वाचे आव्हान आहे. आपल्या देशासंबंधित आकडेवारीनुसार, देशातील १५-२९ वयोगटातील १३.३ टक्के युवावर्ग बेरोजगार आहे. एकीकडे हा आकडा अधिकाधिक फुगत असताना दुसरीकडे मात्र प्रत्येक उद्योग क्षेत्र मग ते उत्पादन, तंत्रज्ञान, आदरातिथ्य अथवा कॉर्पोरेट यांतील कुठलेही असो, प्रत्येक क्षेत्रात कुशल कामगारांची वानवा भासत आहे. या संदर्भातील अनेक संशोधन अहवाल नमूद करतात की, खरी समस्या आहे ती म्हणजे कामासाठी सुयोग्य उमेदवार सापडण्याची.
बेरोजगार असणे आणि रोजगारक्षम नसणे हे दोन वेगळे मुद्दे आहेत. रोजगारक्षम नसणे म्हणजे त्या उमेदवाराकडे तांत्रिकदृष्टय़ा आवश्यक ठरणारी पदवी अथवा अर्हता असली तरी काम करताना आवश्यक ठरणारी सॉफ्ट स्किल्स अर्थात कामासंदर्भात आवश्यक असलेली कौशल्ये मात्र त्या उमेदवाराकडे नसतात किंवा कामाला आवश्यक ठरणाऱ्या विशिष्ट क्षमता उमेदवारापाशी नसतात.
अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अनेक अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे की, सुमारे ४७ टक्के भारतीय पदवीधारक हे कुठल्याही उद्योग क्षेत्रात काम करण्यास उपयुक्त ठरत नाहीत. आणखी एका अहवालात तर आपल्या देशातील ७० टक्के अभियंते हे अनएम्प्लॉयेबल अर्थात रोजगारक्षम नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे. आपल्या देशातील बेरोजगारीविषयीची स्थिती जशी अधिकारीवर्गात आढळते तशी कुशल कामगारांबाबतही आढळते. याला जबाबदार अनेक कारणे आहेत. समाजातील असमानता, अपुऱ्या शैक्षणिक पायाभूत सुविधा, दर्जाहीन शिक्षण, कौशल्यांची परिणामकारक चाचणी घेण्याची अक्षमता अशा अनेक कारणांमुळे आपल्या देशातील बहुतांश कामकरी वर्ग हा आवश्यक ते काम करण्यास सक्षम नसतो. त्यासाठी दर्जेदार शिक्षण, सॉफ्ट स्किल्सचा अंतर्भाव आणि आजच्या स्पर्धात्मक वातावरणात तरण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या क्षमता या गोष्टी आवश्यक ठरतात. अनेक पदवीधर विद्यार्थ्यांची सर्वसामान्यपणे तक्रार असते ती म्हणजे प्रशिक्षणाची संधी अथवा इंटर्नशिपची संधी उपलब्ध होईपर्यंत त्यांचा जीवनकौशल्यांशी परिचय झालेला नसतो. आणि म्हणून काम करताना जी कौशल्ये अत्यावश्यक ठरतात, त्यासाठी हे विद्यार्थी तयारच नसतात.
कुशल कामगारांसाठी रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कौन्सिल’ने पुढील १० वर्षांत तब्बल अडीच कोटी युवक-युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. प्रशिक्षणानंतर हा युवावर्ग प्लेसमेन्टसाठी पात्र ठरेल, अशा पद्धतीची योजना आखण्यात आली आहे. कुशल कामगारवर्गासाठीच्या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीची परीक्षा ठेवण्यात आली असून अशाच पद्धतीची परीक्षा कॉर्पोरेट जगतासाठीही ठेवण्यात आली आहे. ‘एनएसडीटी’च्या व्यासपीठावर उमेदवारांच्या क्षमतेची चाचणी घेतली जाईल आणि त्यानंतर उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार नोकरीची शिफारस केली जाईल. ऑनलाइन परीक्षापद्धतीमुळे या व्यवस्थेला एकप्रकारे पारदर्शीपणाही येतो आणि प्रमाणपत्राला एकप्रकारे महत्त्वही प्राप्त होते.
ऑनलाइन परीक्षेद्वारे उमेदवारांच्या परिणामकारकतेची चाचणी होते. यात समस्या निवारण क्षमता, सामान्य ज्ञान, माहितीचे उपयोजन आणि आवश्यक जीवनकौशल्यांविषयीची चाचणी होते. बेरोजगारीची समस्या नियंत्रणाच्या पलीकडे पोहोचण्याआधी आणि भारतीय पदवीधारकांचे भविष्य अधांतरी लटकू नये यासाठी कौशल्याची मागणी आणि पुरवठा याबाबतची दरी लवकरात लवकर भरून काढणे आवश्यक ठरते.
आज युवावर्गाने स्वत:ला प्रश्न विचारायला हवा; तो असा की, आपण बेरोजगार आहोत की रोजगारक्षम नाही? आपल्याला हवी आहे तशी नोकरी खरंच उपलब्ध आहे का? किंवा नोकरीसाठी आवश्यक ठरणारी कौशल्ये आपण विकसित केली आहेत का? यावर या दोहोंचा समतोल साधणे इतकाच उपाय नसून नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचे परिणामकारक तजवीज शिक्षणपद्धतीत तजवीज करायला हवी.
उद्योगक्षेत्राला हवे ते महाविद्यालयीन शिक्षणात उपलब्ध होणे आणि महाविद्यालयांत उद्योगक्षेत्राने लॅब्ज विकसित करणे हा यावरील दीर्घकालीन उपाय आहे.