श्रीकांत जाधव

आजच्या लेखामध्ये आपण ‘भारतीय कला आणि संस्कृती’ या घटकाची पूर्वपरीक्षेसाठी तयारी कशी करावी, या विषयी चर्चा करणार आहोत. २०११ ते २०२१ वर्षांदरम्यान या घटकावर एकूण ५५ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हा घटक परीक्षेचा विचार करता अधिकच महत्त्वपूर्ण होत चाललेला आहे, कारण या विषयाची तयारी फक्त पूर्वपरीक्षेसाठी मर्यादित नसून मुख्य परीक्षेलाही करावी लागते, त्यामुळे या विषयाची सर्वंकष तयारी करणे गरजेचे आहे.

Loksatta UPSC Key
यूपीएससी सूत्र : भारतातील वणव्यांची समस्या अन् रस्त्यांवरचे खड्डे भरणारे ‘सेल्फ हीलिंग’ तंत्रज्ञान, वाचा सविस्तर…
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
world's oldest and first curry was made with brinjal
वांग्याची भाजी… तब्बल चार हजार वर्षे जुनी, ‘इथे’ सापडला पुरावा, संशोधकांचे शिक्कामोर्तब!

या घटकाची तयारी करताना प्राचीन भारतातील कला आणि संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे भारतात अस्तित्वात असणाऱ्या विविध कला आणि संस्कृतींचा उगम कसा झालेला आहे, याची ऐतिहासिक पार्श्वभूमी  आपल्याला लक्षात घेता येते. स्थापत्यकला व शिल्पकला, भारतीय संगीत, नाटय़ व नृत्य, चित्रकला, साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञान या घटकाविषयी अधिक सखोल आणि सर्वागीण माहिती अभ्यासणे गरजेचे आहे. प्राचीन भारतातील सिंधू संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर  कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड अशा प्रकारे कालखंडनिहाय वर्गीकरण करून संबंधित कालखंडातील स्थापत्यकला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य आणि तत्त्वज्ञान याच्याशी संबंधित विविध संकल्पना, कलेचे प्रकार आणि वैशिष्टय़ तसेच याच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळे व नेमकी ही स्थळे कोणत्या कालखंडात निर्माण करण्यात आलेली होती, ही स्थळे कोणत्या धर्माची होती आणि कोणत्या व्यक्तीने अथवा राजाने ती निर्माण केली होती, इत्यादी पैलूंविषयी मूलभूत माहितीचा अभ्यास सर्वप्रथम करावा लागतो, ज्यामुळे या विषयाची परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी तयारी आपणाला करता येते. मध्ययुगीन भारतातील कला व संस्कृतीचा अभ्यास करताना उपरोक्त पद्धतीनेच करावा, कारण प्राचीन भारतातील विविध कलांचे परिपक्व स्वरूप आपणाला या कालखंडात पहावयास मिळते. उदा. स्थापत्यकला, चित्रकला आणि साहित्य याच बरोबर आपणाला या कालखंडात बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माव्यतिरिक्त इस्लाम धर्माशी संबंधित इंडो-इस्लामिक स्थापत्य कलेचा उदय झालेला पाहावयास मिळतो. तसेच चित्रकलेमध्ये भित्ती चित्रकला सोबतच लघु चित्रकलेचा उदय झालेला दिसून येतो.  याच्या जोडीला आपणाला धर्मनिरपेक्ष साहित्य, स्थापत्यकला आणि प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

मागील परीक्षांतील प्रश्न

  • २०२१ मध्ये मुरैनाजवळ स्थित असणाऱ्या चौसष्ट योगिनी मंदिर, तसेच संत फ्रान्सिस झेवियर यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०२० मध्ये बौद्ध धर्मातील महायान संप्रदाय, प्राचीन भारतातील पाणिनी कालिदास अमरसिंह हे विद्वान इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१९ मध्ये कल्याण मंडप ही रचना कोणत्या राज्याच्या मंदिर शैलीतील एक महत्त्वाचे वैशिष्टय़ होते, याचबरोबर संत निम्बार्क आणि संत कबीर या भक्ती चळवळीसंबंधित व्यक्ती, मुघलकालीन चित्रकला इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१८ मध्ये मुघल स्थापत्यकला, ईशान्य भारतातील नृत्य, भारतीय हस्तकला, त्यागराज (व्यक्तिविशेष), राजस्थानी चित्रकला इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१७ मध्ये जैन धर्म, चित्रकला, भारतातील विविध जमातीद्वारे साजरे केले जाणारे उत्सव, सण, तसेच सूर्य मंदिरे यासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाणे यावर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
  • २०१६ मध्ये बौद्ध धर्मातील ‘बोधिसत्त्व’ या संकल्पनेशी संबंधित प्रश्न विचारण्यात आलेला होता.
  • २०१५ मध्ये कलमकारी चित्रकला काय निर्देशित करते?, असा प्रश्न विचारलेला होता आणि याच वर्षी अलीकडेच खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे, हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
  • २०१४ मध्ये भारताच्या सांस्कृतिक इतिहासासंदर्भात पंचायतन संज्ञा कशाशी संबंधित आहे? याचवर्षी भारताच्या संस्कृती आणि परंपरासंदर्भात  कलरिपयाट्टू (Kalaripayattu) काय आहे ? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
  • २०१३ मध्ये बौद्ध धर्माशी संबंधित शैलशिल्प, लेणी, चैत्य आणि इतर विहारे असे संबोधले जातात, या दोन्हीमध्ये काय फरक आहे?
  • २०१२ च्या परीक्षेत भूमिस्पर्श मुद्रा या हस्त मुद्रेतील भगवान बुद्धाची प्रतिमा काय दर्शविते? हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
  • २०११ मध्ये जैन तत्त्वज्ञानानुसार जगाची निर्मिती व संचालन कशामार्फत होते? व यासाठी वैश्विक कायदा, वैश्विक सत्य, वैश्विक श्रद्धा आणि वैश्विक आत्मा हे चार पर्याय दिलेले होते.

या व्यतिरिक्त भारतीय षड्दर्शने, त्रिभंगा आणि सत्तारीया नृत्य, मूर्तीशिल्प, मंदिर शैली, अभिजात भाषा, यावरही प्रश्न विचारण्यात आलेले होते. या विषयावर आलेल्या प्रश्नांचे  योग्य आकलन केल्यास असे दिसून येते की, प्रश्नांचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ आणि विश्लेषणात्मक या दोन्ही प्रकारात मोडणारे आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यास या घटकाच्या मूलभूत माहितीसह विश्लेषणात्मक बाजू विचारात घेऊन करावा लागतो, असे उपरोक्त प्रश्नाच्या विश्लेषणावरून दिसून येते आणि बहुतांश प्रश्न हे संकल्पनांवर आधारित विचारण्यात आलेले असल्यामुळे या घटकाशी संबंधित संकल्पना, त्यांचा अर्थ, उगम व वैशिष्टय़ इत्यादीची माहिती असणे गरजेचे आहे.

या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकाचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता ११ वीचे An Introduction to Indian Art Part –I हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच याच्या जोडीला १२ वीचे Themes in Indian History part- I आणि II व प्राचीन आणि मध्ययुगीन भारतावरील जुन्या एनसीईआरटीच्या पुस्तकातील भारतीय कला आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा आणि स्वत:च्या नोट्स तयार कराव्यात, जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये या विषयाची तयारी आपण करू शकतो.