एआयच्या वादळाला सामोरं जाण्यासाठी आपण फक्त आपल्या वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणं पुरेसं नसून संस्था आणि कंपन्या यांनीसुद्धा यासंबंधीची रूपरेषा आखली पाहिजे; हे आपण गेल्या आठवड्यात बघितलं. त्यामध्ये या संदर्भातल्या दोन उपाययोजनांचं विवेचन झालं होतं. आता आपण हाच मुद्दा पूर्णत्वाला नेण्याच्या दृष्टीनं एआय आणि त्याला सामोरं जाऊ पाहत असलेल्या कंपन्या यांच्या बाबतीतले पुढचे मुद्दे बघू.
एआय जवळपास सगळ्याच प्रकारची कामं करू शकत असल्याचं आता स्पष्ट होतं आहे. अशा वेळी माणसासाठी नेमकी कोणती कामं शिल्लक राहतील; असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. हाच प्रश्न जरा टोकदार करून ‘माणसाला करण्यासारखं असं काही काम तरी राहील का?’ असंही म्हणता येईल. खरोखरच हा प्रश्न चुकीचा आहे; असं आपण म्हणू शकणार नाही. याचं कारण एआयचा आवाका आणि त्यात सातत्यानं होत असलेल्या सुधारणा बघता एआयच्या कवेत सामावू शकणार नाही असं काही शिल्लक उरेल असं दिसतच नाही. नेमक्या याच मुद्द्याकडे जरा बारकाईनं बघितलं तर गेली काही वर्षं मानसशास्त्र, वर्तनशास्त्र, बुद्धिमत्तेचं मूल्यमापन करणं अशा प्रकारच्या शाखांमध्ये नेहमी चर्चेला येत असलेल्या एका गोष्टीकडे प्रकर्षानं लक्ष जातं: बुद्ध्यांक (आयक्यू) आणि भावनांक (इक्यू) यांच्यामधला फरक. एआयच्या संदर्भात हा फरक महत्त्वाचा ठरण्याची दाट शक्यता आहे.
बुद्ध्यांकाच्या लढाईत एआयनं माणसाचा अत्यंत निर्णायक आणि जोरदार पराभव केलेला आहे, हे आता अगदी लख्ख प्रकाशासारखं दिसतं आहे. कुठल्याही सर्वसामान्य ते क्लिष्ट प्रकारचा प्रश्न सोडवण्याची एआयची क्षमता मानवी क्षमतेपेक्षा आता कैकपटींनी जास्त असल्याचं अगदी स्पष्टपणे आढळतं. अर्थातच एआयचा वेगही माणसाच्या वेगापेक्षा खूप जास्त असल्यामुळे बुद्ध्यांकाशी संबंधित असलेल्या लढाईमध्ये माणसानं एआयसमोर टिकाव धरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे आता खुलं मैदान फक्त भावनांकाशी संबंधित असलेल्या लढाईसाठीच शिल्लक राहिलेलं आहे. तिथेही माणसाच्या ‘सॉफ्ट स्किल्स’ची हुबेहूब नक्कल करून एआय बाजी मारण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. मात्र अखेर माणसाचे खरीखुरी ‘आतली’ भावना, सजगता, दयाळूपणा, सहानुभूती, सामाजिक जाणीव, इतर कुठल्याही माणसाला समजून घेणं हे गुण संगणकामध्ये कसे येणार? भावना जाणणारे आणि कृत्रिमरित्या भावनिक असणारे संगणक काही काळानंतर कदाचित अवतरतीलही; पण तरीही मानवी मनाची तरलता त्यात पूर्णपणे उतरणं आज तरी अशक्य वाटतं. काहीही झालं तरी एआययुक्त संगणकांचं वागणं ‘मानवी आभासासारखं’च असणार.
सारांश म्हणजे एआयकडून काम करून घेण्याची क्षमता कर्मचारी वर्गामध्ये असणं तर अत्यंत गरजेचं असेलच; पण अत्यंत निर्बुद्धपणे किंवा यांत्रिकपणे हे काम करून घेऊन तेच उत्तर म्हणजे ब्रह्मवाक्य; असा सूर अजिबात आळवता कामा नये. उलट आपला कर्मचारी वर्ग आणखी कुशल होण्याच्या दृष्टीनं त्याच्यामध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी कंपन्यांना झटावं लागेल. एआयकडून योग्य प्रकारे काम करून घेणं, त्या कामामधल्या त्रुटी ओळखणं आणि त्या भरणं, त्याला गरज असेल तिथे ‘मानवी’ छटा देणं अशा गोष्टी कर्मचारी वर्गाकडून करून घ्याव्या लागतील. साहजिकच त्यांना हे भान देणं हे आता कंपन्यांचं कर्तव्य बनेल. याचं सोपं उदाहरण म्हणजे चॅटबॉटकडून ग्राहकांना ग्राहकसेवा पुरवून दर वेळी ग्राहकांच्या शंकांचं समाधान होईलच; याची खात्री देता येणार नाही. कित्येकदा चॅटबॉटनं प्रामाणिकपणे दिलेलं उत्तर ग्राहकाच्या समस्येचं निरसन करणारं नसेल याची जाणीव ग्राहकसेवा विभागातल्या कर्मचारी वर्गाला असली पाहिजे. चॅटबॉट जे करू शकणार नाही, ते काम आपल्याला करावं लागेल याची जाणीव त्यांच्यामध्ये विकसित करावी लागेल. तसंच यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे, हे ओळखून त्या दृष्टीनं त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. या कर्मचारी मंडळींनासुद्धा पारंपरिक प्रकारच्या कामांमध्ये अडकून न पडता या जास्त महत्त्वाच्या कामामध्ये लक्ष घालण्यासाठी प्रोत्साहित करावं लागेल. उदाहरणार्थ ग्राहकानं आपल्याला विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपणच चॅट जीपीटीमधून मिळवून ग्राहकाला देण्यामुळे ग्राहक आपल्यापासून दुरावू शकतो याची जाणीव या कर्मचारी वर्गाला हवी. याचं कारण म्हणजे मुळात चॅटबॉटमधून मिळालेल्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळेच ग्राहक आता आपल्याशी म्हणजे माणसाशी संपर्क साधत असल्याचं भान त्यांना हवं. आपणही यांत्रिकी पद्धतीनंच वागायला लागलो तर एआयनं आपल्यावर मात केलीच, समजा!
akahate@gmail.com