महेश भागवत, सुप्रिया देवस्थळी
या लेखमालेमध्ये आम्ही प्रामुख्याने नागरी सेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्त्व चाचणीबद्दल मार्गदर्शन करत असलो तरी यातील माहितीचा उपयोग कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीसाठी होऊ शकतो. गेल्या काही लेखांमधून आपण वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिले. आजच्या लेखामध्ये आपण इतर काही शारीरिक अॅक्टिव्हिटीजबद्दल काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पाहणार आहोत. अनेक उमेदवारांच्या डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्ममध्ये चालणे, धावणे, जॉगिंग, मॅरेथॉनमध्ये धावणे, जिमिंग करणे या आवडींचा उल्लेख असतो. या अनुषंगाने उमेदवारांनी काय तयारी करावी आणि या विषयांवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहूया.
चालणे, जॉगिंग आणि धावणे यामध्ये काय फरक आहे हा साधा आणि सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रत्येक प्रकारामुळे आपल्याला काय फायदे होऊ शकतात हे माहिती असले पाहिजे. कोणत्याही व्यायाम प्रकारात आपल्या शरीरातले ठरावीक स्नायू वापरले जात असतात. धावणे आणि जॉगिंग यामध्ये कोणत्या व्यायामाचा वजन कमी करण्यासाठी आणि तग धरण्याची क्षमता (स्टॅमिना) वाढवण्यासाठी उपयोग होऊ शकतो हे उमेदवाराला माहीत असले पाहिजे. यातल्या प्रत्येक व्यायाम प्रकाराचा हृदयाच्या गतीवर किंवा हृदयाच्या ठोक्यांवर काय परिणाम होतो हे उमेदवाराने व्यवस्थित माहीत करून घेणे आवश्यक आहे. धावताना आणि जॉगिंग करताना पाऊल जमिनीवर पूर्ण टेकवावे की टेकवू नये? पाऊल टेकवण्याचा किंवा न टेकवण्याचा गतीवर काय परिणाम होऊ शकतो? चालणे, जॉगिंग आणि धावणे या तीन वेगवेगळ्या शारीरिक हालचालींसाठी वेगवेगळे शूज वापरावे लागतात का? चप्पल किंवा सॅंडल घालून जॉगिंग किंवा रनिंग करता येईल का? ट्रेड मिलवर चालणे, धावणे आणि रस्त्यावर चालणे आणि धावणे यात काय फरक आहे?
एखाद्या उमेदवाराने चालणे हा छंद लिहिला असेल तर तुम्ही जॉगिंग किंवा रनिंग का करत नाही? किती किलोमीटर रोज चालता आणि केव्हा चालता? सरळ रस्त्यावर चालणे आणि दरी डोंगरात चालणे यात काय फरक आहे? चालणे हा आळशी माणसाचा छंद आहे या मताशी तुम्ही सहमत आहात का? आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धेत किती अंतर चालण्याचे इव्हेंट आहेत आणि त्यात भारतीय स्पर्धकांनी काही विक्रम केले आहेत वा मेडल्स मिळवली आहेत का? चालण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत? टाइप २ मधुमेह कमी करण्यासाठी नियमित चालण्याचा व्यायाम करावा का? असे प्रश्न विचारले जातात. जॉगिंग हा छंद असणाऱ्या उमेदवारांना विचारतात की तुम्ही रनिंग का करत नाही? दररोज किती अंतर जॉगिंग करता? सॅन्ड किंवा वाळूत जॉगिंग करण्याचे काय फायदे आहेत?
रनिंग किंवा धावणे हा छंद असणाऱ्या उमेदवारांना विचारले जाऊ शकते की – सर्वप्रथम तुम्ही स्प्रटिं रनर आहात की मॅरेथॉन रनर आणि दोन्ही प्रकारच्या रनिंग मध्ये काय फरक आहे ? १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत जागतिक विक्रम कोणाच्या नावावर आहे आणि तो किती सेकंदांचा आहे? ४ × ४०० मीटर धावण्याच्या रिले स्पर्धेत कोणत्या गोष्टीची गरज असते?
मॅरेथॉन जगात केव्हा सुरू झाली आणि या स्पर्धेला मॅरेथॉन नाव कसे मिळाले?
मॅरेथॉन मध्ये किती अंतर धावावं लागते? तुम्ही पूर्ण मॅरेथॉन धावता की हाफ आणि तुमचे टायमिंग काय आहे? मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी धावपटूंना कोणती काळजी घ्यावी लागते? भारतात आणि जागतिक पातळीवर होणाऱ्या महत्त्वाच्या मॅरेथॉन स्पर्धांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मॅरेथॉन धावण्यापूर्वी काय तयारी करावी लागते? मॅरेथॉनसाठी कोणते वेगवेगळे व्यायाम करावे लागतात?
या पूर्वीच्या लेखांमध्ये आम्ही लिहिल्याप्रमाणे, याही विषयांवर प्रॅक्टिकल स्वरूपाचे प्रश्न सदस्य विचारू शकतात. उदाहरणार्थ, आम्हाला तुम्ही चालणे, जॉगिंग आणि धावणे यापैकी कोणता व्यायाम प्रकार सुचवाल? जर आम्ही चालायचं ठरवलं तर दररोज किती मिनिटे चालणे हे आमच्यासाठी योग्य राहील? आम्हाला समजा १० किमी मॅरेथॉन धावायची असेल तर आम्हाला किती महिने आधीपासून तयारी करावी लागेल? मॅरेथॉन धावताना काय काळजी घ्यावी लागेल? या अशा प्रकारच्या प्रश्नांमधून उमेदवाराला सर्व गोष्टींचा विचार करून सल्ला, सूचना देता येतात का हे सदस्यांकडून आजमावले जाते.
जिमिंग हासुद्धा अनेक उमेदवारांचा छंद असतो. जिममध्ये (व्यायामशाळेत) जाऊन तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यायाम करता? जिममध्ये वेगवेगळ्या यंत्रांवर व्यायाम केला जातो, हा यंत्रांवर केला जाणारा व्यायाम अचानक बंद झाला तर त्याचे काय तोटे होऊ शकतात? जिममध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? सिक्स पॅक्स बॉडी म्हणजे काय? वजन कमी करण्यासाठी जिममध्ये कोणकोणते व्यायाम केले पाहिजे? वजन वाढवायचे असेल तर जिममध्ये जाऊन उपयोग होऊ शकतो का? बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) म्हणजे काय आणि तो कसा मोजतात? बीएमआयची मोजणी करण्याच्या प्रक्रियेत एव्हाना कोणता बदल झाला आहे? ३० पेक्षा अधिक बीएमआय हे स्थूलपणाचे लक्षण आहे का?
कोणत्याही शारीरिक क्रियांबद्दल त्याचे शरीराला होणारे फायदे तोटे, ती किती प्रमाणात करावी, कोणी ती करू नये याविषयीची माहिती उमेदवाराला असावीच लागते. व्यायामाबरोबरच आहारालाही तेवढेच महत्त्व आहे. तुम्ही किती खाता यापेक्षा तुम्ही कोणता आहार घेता आणि तो केव्हा घेता याला अधिक महत्त्व आहे. सध्या एकूणच शारीरिक स्वास्थ्य हा सर्वांसाठीच महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे या सर्व क्रियांचा त्या व्यापक संदर्भात विचार उमेदवारांनी केला पाहिजे. शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यही तेव्हढेच महत्त्वाचे आहे हे विसरता कामा नये.
mmbips@gmail.com, supsdk@gmail.com