माझ वय २४ आहे. शिक्षण २०२३ मध्ये इतिहास मधून बीए झाले आहे. मी केंद्र व राज्य सेवा परीक्षा देतो आहे. मला वडील नसल्यामुळे घरची जबाबदारी आहे. सोन्याच्या दुकानामध्ये पुण्यात सेल्समन म्हणून काम करतोय, कामाची वेळ 12 तास आहे. मला अभ्यासाला वेळ मिळत नाही. तर कसे मॅनेज करायचंय? प्लॅन बी म्हणून एल.एल.बी. करावी का? बीए नंतर काय करायला पाहिजे मला नोकरीची गरज आहे. – यज्ञेश्वर खंडेराव तुरनर

२४ व्या वर्षी इतिहास घेऊन बीए झालेल्या मुलाला सोन्याच्या दुकानात नोकरी मिळाली आहे हाच एक मोठा दिलासा आहे. वडील नसल्यामुळे कमावण्याची जबाबदारी व स्वत: पायावर उभा राहण्याची गरज लक्षात घ्यावी. राज्यसेवा किंवा केंद्र सेवा यांच्या अभ्यासात वेळ न घालवता सोने विक्रीच्या सगळय़ा अंगांवर लक्ष केंद्रित करावे. इंग्रजीवर व हिंदी वरती प्रभुत्व मिळवणे गरजेचे. कारण गिऱ्हाईकाशी संवाद साधण्यासाठी सेल्समनने त्रिभाषिक असणे गरजेचे आहे. दोन-तीन वर्षे याच कामात राहिल्यानंतर मार्केटिंग या विषयातील एखादी पदव्युत्तर पदविका मिळवली तर ती खूप उपयुक्त राहील. कायदा पदवीचा उपयोग नाही. राज्यसेवा स्पर्धा परीक्षांसाठी यानंतर प्रयत्न करावासा वाटला तर वय २८ ते ३२ या दरम्यान ते शक्य आहे. बारा तास काम केल्यानंतर कोणालाही अभ्यास करणे शक्य होईल असे मला वाटत नाही. स्पर्धा परीक्षा आपण का द्यायची म्हणत आहोत यावर सलग दोन महिने विचार केल्यानंतर, आहे ती नोकरी चिकाटीने पुढे नेणे, त्यात प्रगती करायचे का हातचे सोडून पळत्याच्या मागे लागायचे यावर निर्णय तुलाच घ्यायचा आहे.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta carrier mantra b a study ll b job amy
First published on: 18-04-2024 at 03:55 IST