मुलांनी काही आगळं वेगळं करायचं ठरवलं की, अनेक कंगोरे एकदम टोकदारपणे समोर येतात. हे कंगोरे खरे किती, का खोटे याच वास्तव दाखवण्याचा हा ‘आरसा’. नृत्याचा छंद जोपासणाऱ्या नुपूरच्या मदतीला नृत्यापेक्षा आले ते गणित आणि संस्कृत. त्यामुळे नृत्यापेक्षा अभ्यासाला महत्त्व देणाऱ्या तिच्या बाबांना हे ठेचा खाऊन शहाणपण वाटले.
माझ्या अनेक मित्रांच्या बायकांच्या डोक्यात काय काय भरलेले असते ते मित्रांच्या गप्पात ऐकून मला पाठ झाले होते. मुलगा असेल तर त्याला पाचव्या किंवा सहाव्या वर्षीच ज्युडो, कराटे किंवा तायकोंदोच्या क्लासला घालणे किंवा मुलगी असेल तर तिला कथक, भरतनाट्यमच्या क्लासला घालणे ही आईची प्राथमिक जबाबदारी असल्यासारखे वातावरण होते. मग माझ्या घरात ताराने नुपूरला नृत्याच्या क्लासला घालून वेगळे काही केले आहे अस माझ्या मनातही आले नाही.
सकाळी घर सोडल्यापासून रात्री परत येईपर्यंत सुट्टीचा दिवस सोडला तर नुपूर मला सहसा दिसत पण नसे. ती लहानपणापासून बऱ्यापैकी हुशार आहे हे माझ्या लक्षात आले होते. आवडत्या विषयांत पैकीच्या पैकी मार्क मिळवणे हा तिचा हातखंडा होता. एखाद्या बापाला याहून अजून काय पाहिजे असते? मित्रांच्या मुलांना दुसरी तिसरी पासून शिकवणी वर्गाला पाठवणे सुरू झाल्याचेही मी ऐकत होतो. तर उरलेल्या वेळात छंद म्हणून नुपूर काहीतरी करत आहे यात मलाही आनंद होता. ती सहावीत असताना तिच्या स्कूल गॅदरिंगला एकदा दोघेजण गेलो होतो. एका समूह नृत्यात ती प्रमुख नृत्यांगना म्हणून वेगळ्याच ड्रेस मध्ये खुलून दिसत होती. ते पाहून तारा खूप आनंदित झाली होती. नंतरचे तीन-चार दिवस तोच विषय ती सतत माझ्याशी बोलत असताना मी एकदा तिला थांबवले आणि नुपूरच्या अभ्यासाचे कौतुक सुरू केले. त्यावेळचे ताराचे एक वाक्य मला चक्रावून गेले.
हेही वाचा >>> शिक्षणाची संधी : मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमधील संधी
‘‘नृत्यात तिची इतकी सुंदर प्रगती असताना, ती अभ्यासपण छान सांभाळून करत आहे. याचे तुम्हाला कौतुक नाही काय?’’
माझ्या दृष्टीने अभ्यास प्रथम प्राधान्यावर होता. इतर गोष्टी दुय्यम. पण वाद वाढायला नको म्हणून मी तो विषय तिथेच थांबवला.
नृत्य का अभ्यास
या दोनात प्राधान्य कशाला याबद्दल शंका बाळगणारा मी तर नव्हतोच. अभ्यास कशाचा करायचा? कोणत्या विषयाचा करायचा? पदवी कशात घ्यायची? यावर कदाचित मतभेद होऊ शकतात. पण नृत्य या विषयातून स्वत:चे आयुष्य घडवणारी व्यक्ती आज सहज सापडत नाही. ही सूर्य प्रकाशा इतकी स्पष्ट गोष्ट ताराला कळू नये? निदान धाकट्या बहिणीच्या अनुभवातून ताराने थोडीफार अक्कल शिकावी का नाही? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात फार नसतो. मार्केटिंगच्या क्षेत्रात आयुष्यभर काम करताना जाहिरातीमधे दिसणाऱ्या स्त्रिया सुंदरच का हा प्रश्न मला कायम सतावत असे. तीच गोष्ट साऱ्या नृत्यांगना सुंदरच का निवडल्या जातात? या प्रश्नाच्या उत्तरात होती. शाळेच्या गॅदरिंगच्या प्रसंगा नंतर मी जरी नुपूरला डान्स बद्दल प्रोत्साहन देणे थांबवले असले तरी तिची ‘नुपूरालय’, मधली मानसिक गुंतवणूक वाढत आहे हे लक्षात येत होते. ती नववीत गेली तेव्हा अभ्यासही छान चालू आहे याचे मला खूप समाधान होते. आम्ही बाणेरला राहात होतो. तिथे पुण्या बाहेरून आलेली कुटुंबांची संख्या खूपच जास्त होती. आमच्या सोसायटीमध्ये तर बहुतांश मंडळी अ-मराठी होती.
एका दिवाळीला सोशल इव्हेंट म्हणून डान्स कॉम्पिटिशन ठेवली गेली. खूप मोठी सोसायटी असल्याने सहा ते वीस वयोगटातील सुमारे ७०-८० मुला-मुलींनी त्यात भाग घेतला होता. या साऱ्यांमध्ये उठून दिसला तो नुपूरचा सोलो पाच मिनिटांचा भरत नाट्यम् परफॉर्मन्स. सोसायटीच्या सोशल इव्हेंटमध्ये बेस्ट सोलो डान्सर म्हणून तिला ट्रॉफी मिळाली. एका रात्रीमध्ये नुपूरचा बाबा म्हणून माझी ओळख पक्की झाली. या साऱ्याचा नक्की मला आनंद होतोय, का त्रास होतोय? हेही मला फारसे कळत नव्हते. कोणाच्या कौतुकाने वाहवत जाण्याचा माझा स्वभाव नाही. पण हे कौतुक माझ्याकडे चालत आले होते. त्यात माझा काहीच भाग नव्हता. पण हे काही घरात बोलण्याची सोय राहिली नव्हती हे मात्र तितकेच खरे. लेकीची नववी संपली. माझ्या हातात तिचे प्रगती पुस्तक आले. आधीच्या वर्षातील सारे प्रसंग समोर असल्यामुळे क्षणभर डोळे मिटून मी बसलो व मगच ते उघडले. मार्क वाचून समोर पाहिले तर नुपूर विजयी नजरेने माझ्या डोळ्यात डोळे घालून हसत होती. त्यानंतर ज्याज्या वेळी तिच्या व माझ्यात तिखट शाब्दिक देवाणघेवाण होत असे, तेव्हा असेच हसू तिच्या ओठावर येत असे.
‘‘तुम्हाला जे हवं ते करून दाखवलं की नाही मी?’’
या अर्थाचे ते हसू मला कायमच वाकुल्या दाखवत राही.
यानंतर मी काही सांगून ती ऐकेल अशी स्थिती राहिलीच नाही. मी सांगितलेले हवेत विरून जायचे व तिला हवे ते ती करत राहायची हा नंतरची सात आठ वर्षे नित्य नियमच झाला होता. कधीतरी एखादा मोठा कार्यक्रम झाला की ‘नुपूरालयाच्या नुपूरचे’ नाव छोट्या टाईपात खाली असे. ते वाचून सोसायटी मधील परिचित मंडळी माझे कौतुक करत. तोंड देखले हसून आभार मानणे या पलीकडे मी काहीच करू शकत नसे. ठेचा खाऊन शहाणपण येते असे मराठीत म्हणतात. तसेच काहीसे आमच्या घरात घडले. कसे का असेना, नववी दहावीच्या अभ्यासातील संस्कृत व गणित नुपूरच्या कामी आले. उशिरा का होईना पण नृत्याचा फायदा मिळून माझ्या लेकीला छानसा जोडीदारही मिळाला. सामान्य बापाला अजून काय हवे?