डॉ.श्रीराम गीत

आज एका वेगळय़ाच विषयावर म्हणजे ‘स्पर्धेत कधीच न धावलेल्या’, व्यक्तींबद्दल काही लिहावेसे वाटले. निमित्त झाले ते ‘माणूस असा का वागतो?’, या पुस्तकाच्या प्रकाशनाचे. महिनाभराने ऐंशी वर्ष पूर्ण करत असलेले या पुस्तकाचे ‘राजहंसी’ प्रकाशक दिलीप माजगावकर सभागृहात दुसऱ्या रांगेत प्रेक्षकात निवांत बसले होते. तर पहिल्या रांगेमध्ये पुस्तकावर भाष्य करण्यासाठी म्हणून बोलावलेल्या ‘काव्‍‌र्हर’च्या लेखिका वीणाताई गवाणकर होत्या. कार्यक्रम सुरू होताना वीणाताईंना स्टेजवर येण्याची सूत्रधाराने विनंती केली ते शब्द असे होते, ‘‘१९४३ चा जन्म असलेल्या वीणाताई ४३ वर्षांच्याच वाटतात.’’

Maninee De on Aishwarya Rai and Sushmita Sen rivalry
ऐश्वर्या राय व सुश्मिता सेनमध्ये वैर होतं? मिस इंडियातील त्यांची सह-स्पर्धक म्हणाली, “त्या दोघीही खूप…”
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले

एका अनवट विषयावरचे पुस्तक आपण प्रकाशित करत आहोत. आणि तरीही त्यावरचे अन्य मान्यवरांचे विचार ऐकायला प्रकाशक सभागृहात निवांत दुसऱ्या रांगेत बसले आहेत असा प्रसंग विरळा.

याच दिवशी सकाळी वृत्तपत्रात अशीच एक वेगळी बातमी छापून आली होती. फक्त ८५ वर्षांच्या सई परांजपे स्व-लिखित नवीन नाटक दिग्दर्शित करत आहेत. दोनच दिवसाआधी सह्याद्री वाहिनीवर शंभरी पूर्ण केलेल्या एका प्रकाशन संस्थेचे संचालक रामदास भटकळ वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांच्या मनातील नवनवीन कल्पना व राहिलेले छंद याविषयी मुलाखत देताना पाहिले होते. दोनच दिवसांनी शहेनशहा अमिताभ ८१ नंतरचे अजून एक वर्ष पार करतील. त्यांचे समोर केबीसीत बसण्याचे भाग्य मिळालेला प्रत्येक जण मोहोरून व गहिवरून जातो. त्याला सावरताना, त्याच्या पाठीवर हात ठेवत घरातीलच एक असल्याप्रमाणे ते वावरतात तेव्हा थक्क व्हायला होते. याच महिन्यात दुबईमध्ये आशाताईंनी स्टेजवरून गाण्याचा व त्यावर थिरकण्याचा जागतिक विक्रम वयाच्या नव्वदीत करून दाखवला. शास्त्रोक्त संगीतातील मानदंड डॉ. प्रभा अत्रे यांनी नव्वदी पार केली आहे हे त्यांचे गाण्यातून समजतही नाही. लेखक आणि नटवर्य दिलीप प्रभावळकर ऐंशीपार केल्यानंतरही रंगमंचावर सहजतेने वावरताना दिसतात. माझे नाव वहिदा रहमान हेच राहील. वाटले तर काम द्या. नाहीतर मी परत जाईन असे वयाच्या सोळाव्या वर्षी गुरुदत्तला ठणकावून सांगणारी अनेकांच्या मनातली आदर्श बनलेली वयाच्या ८५ मध्ये कार्य मग्न आहे. असेच एक अपरिचित नाव म्हणजे चेन्नईच्या स्नेहलता दातार. नव्वदी पार केलेल्या स्नेहलताबाईंचे तिशीपर्यंतचे सारे आयुष्य महाराष्ट्रात गेले. गेली साठ वर्षे त्या चेन्नई स्थित आहेत. सुप्रसिद्ध विधीज्ञ अरिवद दातार यांच्या त्या मातोश्री. एकेकाळी नामवंत मुक्त पत्रकार म्हणून गाजलेल्या असून आजही नवीन किमान चार ओळी, नवीन चार माणसांना कशा पाठवायच्या याचे सुभग लेखन त्यांचे हातून चालू असते. महाराष्ट्रातील समकालीन नामवंत आणि चेन्नईतील सांस्कृतिक पर्यावरणाबद्दल अद्ययावत माहितीचा खजिना त्यांच्याकडे सहज उपलब्ध असतो.

अशी ही मोजकी, मला सहज आठवलेली ही सारी मंडळी पाहत असताना एक विचार मनात आला. जेमतेम ५५ व्या वर्षी निवृत्तीचे वेध लागणारी जुनी पिढी, तर धाव धाव धावून सारे काही मिळवून वयाच्या ४५ व्या वर्षी निवृत्तीचे स्वप्न पाहणारी सध्याची पिढी, तर पासष्ठी ओलांडलेली गुड मॉर्निग, गुड नाईट आणि सुखी वृद्धत्व कसे घालवावे याचे मेसेजेस एकमेकांना फॉरवर्ड करणारी लोकसंख्येच्या सात टक्क्यामध्ये बसणारी ज्येष्ठ मंडळी यात फरक तो काय?

यांना स्पर्धा नव्हतीच का? वर उल्लेख केलेल्या कोणत्याच श्रेष्ठ व्यक्तीने स्पर्धेत भाग घेतलेला नाही. स्पर्धा स्वत:शीच आहे. ती जीवनमूल्याधारित आहे. नावीन्यपूर्ण, सकस, वेगळे असे काही. मात्र, सातत्याने उत्तमतेचा ध्यास घेत या साऱ्यांची वाटचाल झाली आहे. आयुष्यात खडतर प्रसंग यांना आले का? अर्थातच आले. त्यांना त्यांनी तोंड कसे दिले? याची चिकित्सा येथे करण्याची गरज नाही. मात्र सतत नावीन्याचा ध्यास घेऊन वय हा केवळ आकडा ठरवण्यात ते यशस्वी झाले. आरोग्याची साथ त्यांना मिळाली हे तर खरेच. याउलट सध्याची रॅट रेस खूप आहे, लवकर तयारी करणे खूप गरजेचे आहे, त्यासाठी क्लास कोणाचा लावायचा? स्पर्धेत कसे धावायचे? त्याची साधने कुठे विकत मिळतील? अशा चिंतेत गढलेल्या पालक व विद्यार्थ्यांसाठी ही काही उदाहरणे कायमच दीपस्तंभासारखी ठरावीत.