महेश काळेंना कोण ओळखत नाही? गायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार तर त्यांनी मिळवलेलाच आहे, पण अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनाचेही धडे त्यांनी गिरवलेले आहेत. त्यांच्या करिअरची ही सुरेल कथा..

जुन्या पिढीतील नाटय़रसिकांच्या ‘मर्मबंधातील ठेव’ असलेले नाटक म्हणजे ‘कटय़ार काळजात घुसली’. याच नाटकावर याच नावाचा एक चित्रपट बनला आणि महेश काळे हे नाव लोकांच्या तोंडी झाले. चित्रपटातील महेश काळे यांनी गायलेली ‘घेई छंद मकरंद’, ‘अरुणी किरणी’, ‘सुरत पिया की छिन बिसराए’ ही गाणी अमाप लोकप्रिय झाली. या चित्रपटामुळे युवा पिढीत  नाटय़संगीत आणि शास्त्रीय संगीताविषयी कुतूहल आणि आवड निर्माण झाली.

वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून महेशनी गाण्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. गाण्यातील त्यांच्या पहिल्या गुरू त्यांची आई मीनल काळे. त्या स्वत: जुन्या जमान्यातील प्रसिद्ध गायिका. गायनाची बाराखडी त्यांनी महेशला शिकविली. पुरुषोत्तम गांगुर्डे यांच्याकडेही ते गाणे शिकले. भारतीय शास्त्रीय आणि नाटय़संगीतातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व असलेले पं. जीतेंद्र अभिषेकी यांच्याकडे गाणे शिकण्याची सुवर्णसंधी महेश यांना मिळाली आणि तो त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला. शास्त्रीय संगीतासह नाटय़संगीताचे धडे त्यांनी पं. अभिषेकींकडून आत्मसात केले. पुढे पं. अभिषेकी यांचे सुपुत्र शौनक अभिषेकी यांच्याकडूनही त्यांनी मार्गदर्शन घेतले.

महेशचे शालेय शिक्षण पुण्यातील अभिनव विद्यालयातून  झाले. फग्र्युसन महाविद्यालयातून बारावी झाल्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये ‘बी.ई’.(इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग) पदवी मिळविली. त्यानंतर  सुमारे दीड वर्षे ‘वेब डिझायनर’ आणि नंतर ‘प्रोजेक्ट कन्सल्टंट’ म्हणून नोकरीही केली. पुढे  कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी ‘मास्टर ऑफ सायन्स इन मल्टीडिया इंजिनीअरिंग’ (संगीत, आर्ट स्टुडिओ, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयात)चे पदव्युत्तर शिक्षण घेतले.  २००५ मध्ये ‘अभियांत्रिकी व्यवस्थापना’तही  दुसरी ‘मास्टर्स’ पदवी मिळविली.

‘मास्टर्स’च्या दुसऱ्या पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गाण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. अभियांत्रिकी शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले असले तरी महेश यांचा खरा ओढा गाण्याकडेच होता. ‘मास्टर्स’ची दुसरी पदवी मिळविल्यानंतर ‘सिलिकॉन व्हॅली’मध्येच गलेलठ्ठ पगाराची नोकरी करायची आणि उरलेल्या वेळात गाणे करायचे किंवा सगळ्या पदव्या बाजूला ठेवून फक्त गाण्यातच करिअर करायचे, असे दोन पर्याय त्यांच्यापुढे होते. पण ‘गाणे’ ही फावल्या वेळेत करण्याची गोष्ट नाही तर त्यासाठी भरपूर वेळ दिला पाहिजे हेही त्यांच्या मनाशी पक्के होते. त्यामुळे इतर गोष्टी बाजूला सारून त्यांनी गाण्याची निवड केली. या निर्णयाला त्यांची पत्नी, घरचे सर्व आणि अभिषेकी कुटुंबानेही पाठिंबा दिला.  महेशचा हा निर्णय इतरांसाठी मात्र धक्कादायक होता. पूर्णवेळ गाणे करून यश मिळेल की नाही, याची कोणतीही शाश्वती त्या वेळी नव्हती. पण तरीही त्यांनी पूर्णवेळ गाणे करण्याचा निर्णय घेतला.

‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये वास्तव्यास असलेले महेश काळे वर्षांतून तीन किंवा चार वेळा संगीत मैफली आणि अन्य काही कार्यक्रमांच्या निमित्ताने भारतात येतात. नाटय़संगीत, शास्त्रीय संगीत, अभंग गायनाचे कार्यक्रम ते करतात. नव्या पिढीला आपलासा वाटेल अशा नव्या स्वरूपात सादर झालेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’च्या नाटय़प्रयोगात सुबोध भावे, राहुल देशपांडे यांच्यासह त्यांनी अभिनयही केला होता. अशा वेगळ्या प्रयोगांमुळे नाटय़संगीत आणि शास्त्रीय संगीताविषयी सर्वसामान्य व्यक्ती आणि युवा पिढी, विद्यार्थ्यांच्या मनात असलेला बागुलबुवा सध्या कमी झाला आहे, असे महेशना वाटते. देश-विदेशासह महाराष्ट्राच्या विविध भागांत महेश काळे यांचे गाण्याचे कार्यक्रम झाले असून गाण्याच्या कार्यशाळाही ते घेतात. कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीना ‘व्हॉट्स अ‍ॅप’ समूहावर ‘गृहपाठ’ही देतात आणि तो करवून घेतात. गाण्याची कार्यशाळा, कार्यक्रम यातून ते शास्त्रीय संगीतातील विविध राग, बंदिशी, आलाप यांची सहजपणे ओळख करून देतात. शास्त्रीय संगीत म्हणजे ‘कोणीतरी गायचे आणि आपण ते ऐकायचे’ हा समज त्यांनी दूर करून गायक आणि प्रेक्षक यांच्यातील भिंत मोडण्याचा प्रयत्न ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून केला आहे. या कार्यक्रमाचा आता १००वा प्रयोग सादर होणार आहे. ‘महेश काळे स्कूल ऑफ म्यूझिक’च्या माध्यमातूनही गेली काही वर्षे परदेशात ते गाण्याचे शिकवणी वर्ग घेत आहेत.  आजवरच्या आयुष्यात गाण्याने काय दिले? असे विचारले असता ते म्हणाले,  रसिकांचे प्रेम, यश, प्रसिद्धी तर मिळालीच. पण केवळ गाण्यावर आपण चरितार्थ चालवू शकतो, हा आत्मविश्वासही मिळाला.  गाण्याने वेळेचे व्यवस्थापन, एकाग्रता, प्रामाणिकता, रियाजाच्या वेळेची नियमितता आणि निव्र्याज प्रेम दिले, गाणे हेच माझे सर्वस्व आहे, गाणे माझा श्वास आहे..!

प्रत्येकाची यशाची परिभाषा  वेगवेगळी असते.  माझ्या दृष्टीने केवळ गाणे हेच यश, आनंद आणि समाधान होते. त्यामुळे गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि अलिशान जीवनशैली सोडून  पूर्णवेळ गाण्यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.

महेश काळे

shekhar.joshi@expressindia.com