वेष्टन उद्योग म्हणजे उत्पादनाला वेष्टनबंद करणे. छोटीशी पिन असो की एखादी मोठी वस्तू, प्रत्येक वस्तूला योग्य प्रकारे वेष्टनबंद करणे गरजेचे असते. व्यवस्थित आणि आकर्षकपणे गुंडाळलेल्या वस्तूंकडे ग्राहकही आकर्षित होतात. वेष्टन तंत्रज्ञानात प्रशिक्षित व्यावसायिकांना सध्या प्रचंड मागणी आहे, कारण वेष्टनामुळे उत्पादनाला केवळ संरक्षणच मिळते असे नव्हे, तर असे वेष्टन हे ‘मूक विक्रेत्या’ची भूमिकाही बजावीत असते.
जागतिक स्तरावर करिअरसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत नवे पर्याय आणि नव्या संधी मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत आहेत. वेष्टन उद्योग (पॅकेजिंग) हा अशा नव्या क्षेत्रांपैकी एक असून हमखास यश आणि उत्कृष्ट आर्थिक लाभ यातून मिळू शकतात.
वेष्टन उद्योगात करिअर करण्यासाठी सरकारच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग’ म्हणजेच ‘आयआयपी’तर्फे विविध अभ्यासक्रम सुरू केले जातात. वेष्टन तंत्रज्ञान क्षेत्रात दोन वर्षे कालावधीच्या पदव्युत्तर डिप्लोमाधारकांना नोकरी देण्याची १०० टक्के हमी ही संस्था देते.
पूर्वी आयआयपीने आपल्या विद्यार्थ्यांना जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग’चे संचालक डॉ. एन. सी. साहा म्हणाले, ‘‘जगभरात या उद्योगाची वार्षिक उलाढाल अंदाजे ७७१ अब्ज अमेरिकी डॉलर असून त्यापैकी भारतीय उद्योगाचा वाटा सुमारे २४.६ अब्ज अमेरिकी डॉलर इतका आहे. भारतातील वेष्टन उद्योग अतिशय वेगाने वाढत चालला आहे. भारतातील वेष्टन उद्योगाचा विकास वार्षिक १५ टक्के दराने होत असून जागतिक स्तरावर हा विकासदर केवळ ५-६ टक्के इतकाच आहे. खाद्यपदार्थ किंवा ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातील प्रत्येक उद्योगाला आपल्या उत्पादनांसाठी वेष्टनाची गरज भासतेच आणि या उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचे काम आयआयपी ही संस्था करते.’’
वेष्टन उद्योग म्हणजे उत्पादनाला वेष्टनबंद करणे. छोटीशी पिन असो की एखादी मोठी वस्तू, प्रत्येक वस्तूला योग्य प्रकारे वेष्टनबंद करणे गरजेचे असते. व्यवस्थित आणि आकर्षकपणे गुंडाळलेल्या वस्तूंकडे ग्राहकही आकर्षित होतात आणि त्यामुळे उद्योगाला चालना मिळते. वेष्टन तंत्रज्ञानात प्रशिक्षित व्यावसायिकांना सध्या प्रचंड मागणी आहे, कारण वेष्टनामुळे उत्पादनाला केवळ संरक्षणच मिळते असे नव्हे, तर असे वेष्टन हे ‘मूक विक्रेत्या’ची भूमिकाही बजावीत असते.
‘‘गेल्या अनेक वर्षांत वेष्टन उद्योगाच्या झालेल्या वेगवान विकासामुळे भारतातील वेष्टन उद्योगात प्रशिक्षित व्यावसायिकांसाठीही मोठी मागणी निर्माण झाली आहे. किंबहुना भारतीय उत्पादनांचा दर्जा राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम राखण्यासाठी वेष्टन प्रशिक्षण आणि शिक्षण ही आजच्या काळाची गरज बनली आहे,’’ असे डॉ. साहा म्हणाले.
अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाने १९५२ मध्ये जगातील पहिली पॅकेजिंग संस्था स्थापन केली होती. पण त्यानंतर पॅकेजिंग संस्था स्थापन करणारा जगात भारत हा केवळ दुसरा देश आहे. भारतातील ही संस्थाही १९५२ मध्येच स्थापन करण्यात आली.
विद्यार्थ्यांना योग्य आणि आपल्या आवडीचा अभ्यासक्रम निवडता यावा, यासाठी या संस्थेत विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. आयआयपी संस्थेतर्फे दोन वर्षे मुदतीचे पूर्ण वेळेचे वेष्टन उद्योगात पदव्युत्तर डिप्लोमा (पीजीडीपी) अभ्यासक्रम घेतले जातात. हे अभ्यासक्रम विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रातील पदवीधरांसाठी उपलब्ध आहेत. संस्थेचे स्वत:चे अध्यापक तसेच पाहुण्या अध्यापकांमार्फत घेण्यात येणारे वर्ग आणि या उद्योगातील वेष्टनबंद प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यांची प्रत्यक्ष ओळख होण्यासाठी मोठय़ा उत्पादन प्रकल्पांना दिलेल्या भेटी यांचा या अभ्यासक्रमात समावेश होतो.
आयआयपीचा वेष्टन उद्योगातील पदव्युत्तर डिप्लोमा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि संलग्न विषयांतील पदवीधरांसाठी खुला आहे. त्यात प्रवेश मिळविण्यासाठी दर वर्षी जूनमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा सर्व प्रमुख शहरांमध्ये घेतली जाते. मे महिन्यापासून प्रवेश अर्ज उपलब्ध असतात. आयआयपीचा दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा अभ्यासक्रम ऑगस्टपासून सुरू होईल.
आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत हा अभ्यासक्रम घेऊन १२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सर्वच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्येच नोकऱ्यांचे होकार आले होते. हे अभ्यासक्रम मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि हैदराबाद या चार प्रमुख शहरांमधून घेतले जातात.
आयआयपीमध्ये इतर कमी मुदतीचे अभ्यासक्रम आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत; उदाहरणार्थ तीन महिन्यांचा पूर्ण लांबीचा सर्टिफिकेट कोर्स इन पॅकेजिंग (आयटीसी) आणि डिप्लोमा अंडर डिस्टन्स एज्युकेशन प्रोग्रॅम इन पॅकेजिंग (डीईपी) हा १८ महिन्यांचा दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम हे वार्षिक तत्तवावर घेतले जातात. नोकरी करणाऱ्या व अन्य विषयांत पदवीधर असणाऱ्या आणि व्यवसायाच्या गरजेपोटी पॅकेजिंग उद्योगाची माहिती आवश्यक असणाऱ्या व्यवस्थापकांसाठी १८ महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. एशियन पॅकेजिंग फेडरेशनने या डिप्लोमा अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे.
‘‘पॅकेजिंग उद्योगात प्रामुख्याने प्रशिक्षण आणि शिक्षण व संशोधन आणि विकास या क्षेत्रात ‘आयआयपी’ कार्यरत असून नावीन्यपूर्ण पॅकेजिंग डिझाइन आणि विकास याद्वारा निर्यात बाजारपेठेला ती प्रोत्साहन देते. शिवाय पॅकेजिंग सामग्री व पॅकेजची चाचणी आणि मूल्यमापन करणे, सल्लासेवा उपलब्ध करणे आणि पॅकेजिंगशी संबंधित संशोधन आणि विकास करणे यांसारख्या कार्यातही ती गुंतलेली आहे. याशिवाय पॅकेजिंग क्षेत्रात प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यातही ही संस्था गुंतलेली आहे’’, असेही साहा यांनी सांगितले.
आयआयपी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव देते, ज्यामुळे व्यवहारात काम कसे चालते, त्याची माहिती विद्यार्थ्यांना होते.