पालघर तालुका कुप्रसिद्ध झाला होता, कुपोषणासाठी. याच जिल्ह्य़ातील दुर्गम गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कुपोषण होऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहेत, प्रल्हाद काठोले हे एक प्रयोगशील शिक्षक. पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील बालिवली शाळेत ते सध्या कार्यरत आहेत. अपूर्णाक शिकवण्याच्या विविध पद्धतींवर ते काम करत आहेत.

पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यातील बालिवली या शाळेत गेली ४ वर्ष प्रल्हाद काठोले शिकवत आहेत. जानेवारी २००३ पासून ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा देत आहेत. प्रल्हाद सांगतात, ‘माझी पहिली शाळा होती वाडा तालुक्यातील उज्जनी-घायपातपाडा या एका लहानशा गावामध्ये. जिथे जाण्यायेण्यातच सगळा दिवस संपून जायचा आणि उत्साहसुद्धा. शिवाय येथील बऱ्याच मुलांसाठी त्यांची पिढी ही शाळेत येणारी पहिलीच पिढी. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे, शाळेविषयी विशेष जवळीक निर्माण करणे हे काही जमत नव्हते. त्यामुळे या शाळेमध्ये ४ वर्षांमध्ये शैक्षणिक असे काही उत्तम काम हातून झाले नाही.’ पण इथे त्यांनी एक वेगळे काम केले. त्यांच्या शेजारच्या माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचा रोज खेळाचा तास घेतला आणि त्या विद्यार्थ्यांचा कबड्डीचा संघच तयार केला. हा संघ इतका उत्तम खेळला की अनेक स्पर्धामध्ये त्यांनी नाव कमावले.

यानंतर प्रल्हादना मिळाली घाटाळपाडा ही शाळा. ही शाळा त्यांच्या घरापासून जवळ होती आणि तुलनेने कमी दुर्गम होती. त्यामुळेच इथे गेल्यावर ‘आपण मास्तर झालो ते फक्त पाटय़ा टाकण्यासाठी नाही, विद्यार्थ्यांना काहीतरी खरोखर देण्यासाठी. त्यामुळे त्यासाठी काही करायला हवे,’ असे प्रल्हादच्या मनात येऊ लागले.  लवकरच तशी संधी आली, क्वेस्ट या संस्थेच्या अनुषंगाने. या संस्थेकडून मिळणारी शैक्षणिक उपकरणे, साधने त्यांच्याकडून मिळणारी वेगळी दिशा, नीलेश निमकर या क्वेस्टच्या प्रमुखांचे मार्गदर्शन या साऱ्यामुळे प्रल्हादमधला कृतिशील शिक्षक आकार घेऊ लागला. अर्थात, उत्साहाच्या भरात त्यांनी काही गमतीजमतीही केल्याच म्हणजे त्यांनी त्या खेडय़ातल्या मुलांचं श्रमसंस्कार शिबीर घेतलं होतं. त्याबद्दल प्रल्हाद म्हणतात, ‘ते शिबीर घेणे, केवढा वेडेपणा होता हे ते झाल्यानंतर उमगले. कारण ही बिचारी खेडय़ातली पोरं तर आईबापांबरोबर शेतात राबतातच. त्यांना आम्ही काय श्रमसंस्कार शिकवणार होतो?’ पण आपले शिक्षक आपल्यासाठी मनापासून काही करू पाहत आहेत, ही भाबडी तळमळ बहुधा विद्यार्थ्यांनाही समजली असावी. त्यामुळेच या शिबिराला आणि प्रल्हादच्या विविध शैक्षणिक प्रयोगांना विद्यार्थ्यांनी कायमच साथ दिली.

डिसेंबर २००८मध्ये प्रल्हादने क्वेस्ट या संस्थेच्या मदतीने अभ्यास मंडळात जायला सुरुवात केली. यामध्ये काही करू पाहणारे होतकरू शिक्षक दर महिन्याला भेटत आणि आपापल्या कल्पना एकमेकांसमोर मांडत. त्या त्या क्षेत्रातील निरनिराळी नवनवीन संशोधनांची माहिती एकमेकांना देत. या निमित्ताने प्रल्हाद यांनी परदेशातील गणित शिक्षकांनी गणिताच्या निरनिराळ्या पद्धतींवर केलेले संशोधन प्रबंध वाचले. शिक्षकमित्रांशी ते शेअर करण्याच्या निमित्ताने त्यांचा अभ्यासही झाला. पुढे २००९ मध्ये पदवी मिळवल्यानंतर प्रल्हादनी टिस या संस्थेत शिक्षणविषयक अधिक विस्ताराने ज्ञान देणारा अभ्यासक्रम केला.  याच दरम्यान जानेवारी २०१३मध्ये एपिस्टेमी-५ ही गणितशिक्षणाविषयक आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. त्यामध्ये प्रल्हादने लिहिलेला संशोधन प्रबंधही निवडला गेला. या साऱ्यामुळेच शिक्षणविषयक नव्या प्रयोगांसाठी एक हुरूप आला.

घाटाळपाडय़ानंतर निहाळी गावात त्यांची बदली झाली आणि गेली ४ वर्ष ते बालिवली शाळेमध्ये स्थिर आहेत. गणितासंबंधी जागतिक पातळीवर झालेले काम, संशोधन प्रबंध या सगळ्याचा विचार करून प्रल्हादने अपूर्णाक शिकवण्यासाठी वेगळ्या पद्धतींवर काम केले. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेऊन त्याचा अभ्यासक्रमामध्येही समावेश करण्यात आला आहे. २०१३ मध्ये ते आठवी-नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसोबत काम करत होते. त्यांच्यासोबत कृतीयुक्त अभ्यासाचा प्रयोग करताना त्यांनी चक्क मेथीचे वाफे लावले. त्यामध्ये रोपांची मांडणी करताना परिमिती, क्षेत्रफळ, काटकोन, चौकोनांचे प्रकार अशा विविध संज्ञांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. बी पेरताना प्रत्येक बियाणाचा आकार, त्याची लांबी, रुंदी मोजणे, सरासरी, घनता याचे गणित मांडणे अशा गमतीजमती त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या. बी रुजल्यावर वाढीच्या नोंदी व त्याच्या मदतीने आलेख काढणे, शिकवले.  या अनोख्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गणिताशी मैत्री जुळलीच, पण मातीतली नाळही अधिक घट्ट झाली.

या वाफ्याच्या प्रयोगाबद्दल प्रल्हाद म्हणतात, या निमित्ताने गणिताचा व्यावहारिक जगातील उपयोग विद्यार्थ्यांना समजला, शिवाय एखादी माहिती मिळवणे, त्याचे विश्लेषण करणे, त्यापासून निष्कर्ष काढणे, गृहीतकं मांडणे हे सगळे काही विद्यार्थ्यांना शिकवता आले. अशा पद्धतीने शिकवण्यामुळे प्रल्हादच्या शाळेतील दहावीचा निकालही आता अधिक चांगला येऊ लागला आहे.

प्रल्हादचा भर शिकवण्यापेक्षा मुलांना शिकू देण्यावर आहे. ते म्हणतात, मी कधीही गणिताच्या तासाची सुरुवात एखाद्या कठीण गणिताने करतो. विद्यार्थ्यांना काही दिवस त्याचे उत्तर स्वत:च शोधू देतो. त्यांना त्या गणितीय पायऱ्यांशी झगडू देतो नि मगच ते शिकवतो. यातून निरनिराळ्या पद्धतीने गणित सोडवण्याची, कल्पनाशक्ती लढवण्याची कसोटी लागते. आवड रुजते. यामुळेच अनेकदा विविध गणितीय प्रमेय, सूत्र विद्यार्थी आपल्या पद्धतीने सिद्ध करतात. सूत्रांच्या निरनिराळ्या जोडय़ा तयार करतात. स्वत: शोधली असल्यानेच ही सूत्र कायमची लक्षात राहतात. आपण मांडलेल्या पद्धती कशा बरोबर आहेत, हे विद्यार्थी पटवून देतात त्यातून तार्किक  युक्तिवाद करण्याची क्षमता वाढते.

इतके दिवस विशेषत्वाने माध्यमिकच्या वर्गाना शिकवणाऱ्या प्रल्हादनी मुद्दामच प्राथमिकचे वर्ग घेतले आहेत. यंदा त्यांच्याकडे पहिली-दुसरी आहेत. अजून त्यांच्या विद्यार्थ्यांनी गणिताच्या अभ्यासासाठी पाटीला हातही लावलेला नाही, पण अंक आणि गणिती क्रिया तोंडी करण्यात मात्र ते पटाईत झाले आहेत. विविध अभ्यासपत्र, शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून पाटीवरचं गणितही त्यांच्या मनात लवकरच स्थान पटकावेल, असा विश्वास प्रल्हादला आहे. आजवरच्या कामातूनच तो आला आहे, यात शंका नाही.

swati.pandit@expressindia.com