16 January 2019

News Flash

विद्यापीठ विश्व : अव्वल मानांकित हैदराबाद विद्यापीठ

प्रत्येकी १३ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे गुणोत्तर जाणीवपूर्वक जपणारे हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत सातत्याने प्रगतिपथावर राहिले आहे.

संस्थेची ओळख

देशात दक्षिणेकडील राज्यांमधील चर्चेतील विद्यापीठ म्हणून हैदराबाद विद्यापीठ ओळखले जाते. केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा असणारे हे विद्यापीठ नॅशनल इन्स्टिटय़ुशनल रँकिंग फ्रेमवर्कनुसार (एनआयआरएफ) विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये देशामध्ये पाचवे, तर एकंदर शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये देशात अकराव्या स्थानी आहे. २ ऑक्टोबर, १९७४ रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठाला नॅकने ‘ए’ ग्रेडने सन्मानित केले आहे. नॅककडून सर्वोच्च मानांकन मिळविणाऱ्या विद्यापीठांमध्येही या केंद्रीय विद्यापीठाचा समावेश होतो. संशोधनाच्या बाबतीत ‘नॅशनल इन्फर्मेशन सिस्टिम फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी’कडून (एनआयएसएसटी) ‘हाय आउटपुट- हाय इम्पॅक्ट’ असा शिक्का मिळविणारी ही देशातील पहिल्या पन्नास संस्थांमधील एकमेव संस्था म्हणूनही तेलंगणा राज्यामधील या विद्यापीठाचा विचार केला जातो. प्रत्येकी १३ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे गुणोत्तर जाणीवपूर्वक जपणारे हे विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत सातत्याने प्रगतिपथावर राहिले आहे.

विभाग

विद्यापीठाच्या  http://www.uohyd.ac.in या संकेतस्थळावरून विद्यापीठाने आपल्या सर्व विभागांची, अभ्यासक्रमांची आणि सोयी-सुविधांची माहिती सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. या विद्यापीठामध्ये एकूण बारा स्कूल्सच्या माध्यमातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रम चालविले जातात. या बारा स्कूल्सपैकी मॅथेमेटिक्स अँड स्टॅटेस्टिक्स, कम्प्युटर अँड इन्फर्मेशन सायन्सेस, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मॅनेजमेंट स्टडीज, इंजिनीअरिंग सायन्सेस अँड टेक्नोलॉजी विषयांशी संबंधित स्कूल्समध्ये इतर विषयांना वाहिलेल्या केंद्रांचा समावेश नाही. मात्र, फिजिक्स, लाइफ सायन्सेस, ह्य़ुमॅनिटीज, सोशल सायन्सेस, सरोजिनी नायडू स्कूल ऑफ आर्ट्स अँड कम्युनिकेशन, मेडिकल सायन्सेस विषयांना वाहिलेल्या स्कूल्समध्ये स्वतंत्र विषयांवर काम करणाऱ्या केंद्रांचाही समावेश आहे. स्कूल ऑफ फिजिक्समध्ये तीन स्वतंत्र केंद्रांमधून अध्यापन आणि संशोधन चालते. त्यामध्ये सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज इन इलेक्ट्रॉनिक्स सायन्स अँड टेक्नोलॉजी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर रिसर्च इन हाय एनर्जी मटेरिअल्स (एसीआरएचईएम) आणि सेंटर फॉर अर्थ, ओशिअन अँड अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्सेस या तीन केंद्रांचा समावेश होतो. स्कूल ऑफ लाइफ सायन्सेसअंतर्गत बायोकेमिस्ट्री, प्लँट सायन्स, बायोटेक्नोलॉजी आणि बायोइन्फर्मेटिक्स या तीन स्वतंत्र विभागांसह सेंटर फॉर सिस्टिम बायोलॉजी या केंद्राचाही समावेश आहे. स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये सेंटर फॉर हेल्थ सायकॉलॉजी आणि सेंटर फॉर न्युरल अँड कॉग्नेटिव्ह सायन्सेस ही दोन केंद्रे चालतात. स्कूल ऑफ ह्य़ुमॅनिटीजअंतर्गत एकूण १३ विभाग आणि केंद्र चालतात. त्यामध्ये ‘सेंटर फॉर इनडेंजर्ड लँग्वेजेस अँड मदरटंग स्टडीज’ या वेगळ्या केंद्राचाही समावेश आहे. या केंद्राच्या माध्यमातून धोक्यात आलेल्या भाषा आणि मातृभाषांच्या अभ्यासाचे विशेष प्रयत्न केले जात आहेत. स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या अंतर्गत एकूण १३ विभाग आणि केंद्र चालतात. त्यामध्ये सेंटर फॉर रिजनल स्टडीज, सेंटर फॉर फोक कल्चर स्टडीज, सेंटर फॉर द स्टडी ऑफ इंडियन डाएस्पोरा यांचाही समावेश होतो. सरोजिनी नायडू स्कूल ऑफ आर्ट्स अँड कम्युनिकेशमध्ये डान्स, थिएटर आर्ट्स, फाइन आर्ट्स आणि कम्युनिकेशन या चार विषयांना वाहिलेले चार स्वतंत्र विभाग आहेत. या सर्व विभागांमधून आणि केंद्रांमधून चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. कॉलेज फॉर इंटिग्रेटेड स्टडीज, सेंटर फॉर मॉडेलिंग सिम्युलेशन अँड डिझाइन, सेंटर फॉर डिस्टन्स अँड व्हच्र्युअल लर्निग आणि मनुष्यबळ विकास केंद्र ही स्वतंत्र केंद्रेही या विद्यापीठामध्ये चालतात. विद्यापीठाच्या या सर्वच विभागांमधून आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनातून शिक्षण आणि अध्यापनावर विशेष भर दिला जातो.

अभ्यासक्रम

या विद्यापीठामध्ये चालविले जाणारे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम हे एक वेगळे वैशिष्टय़ ठरते. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम, पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रम अशा दोन वेगवेगळ्या गटांमधून हे अभ्यासक्रम चालविले जातात. मॅथेमेटिकल सायन्सेस, फिजिक्स, केमिकल सायन्सेस, सिस्टिम बायोलॉजी, हेल्थ सायकॉलॉजी या विषयांमध्ये ‘आयएमएससी’ हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम. एस्सी.चा अभ्यासक्रम या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे. तसेच, हिंदी, तेलुगू, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी आणि अँथ्रोपोलॉजी या विषयांमध्ये पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम. ए. अर्थात ‘आयएमए’चा अभ्यासक्रम या विद्यापीठामध्ये शिकता येतो. याशिवाय बिझनेस अ‍ॅनालिटिक्स, हेल्थ केअर अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट विषयामधील एमबीए, अप्लाइड लिंग्विस्टिक्स, कम्पॅरेटिव्ह लिंग्विस्टिक्स, इंग्लिश लँग्वेज स्टडीज, फायनान्शिअल इकॉनॉमिक्स या विषयांमधील एमए,  कुचिपुडी आणि भरतनाटय़म या विषयांमधील एमपीए डान्स ही पदव्युत्तर पदवी, तसेच थिएटर आर्ट्समधील एमपीए, आर्ट हिस्ट्री अँड व्हिज्युअल स्टडीज या विषयामधील एम. एफ. ए. हे अभ्यासक्रम या विद्यापीठातील वेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये मोडतात. त्याशिवाय पीजी डिप्लोमा इन संस्कृत कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रमही विद्यापीठामध्ये चालविला जातो. कॉम्प्युटर सायन्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बायोइन्फर्मेटिक्स या विषयांमधील एम. टेक आणि कॉम्प्युटर सायन्स विषयामधील बारावीनंतर पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम. टेक. कॉम्प्युटर सायन्स हा अभ्यासक्रमही या विद्यापीठाचे वेगळेपण म्हणूनच विचारात घेतला जातो. याशिवाय संशोधनाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना बायोकेमिस्ट्री आणि मोलेक्युलर बायोलॉजी या विषयांमध्ये इंटिग्रेटेड एमएससी, पीएचडी करण्याची सुविधाही विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे.

सुविधा

निवासी विद्यापीठ अशी ओळख असलेल्या या विद्यापीठामध्ये हैदराबाद परिसराच्या बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून एकूण २१ वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाचे इंदिरा गांधी स्मृती ग्रंथालयही (आयजीएमएल) विद्यार्थ्यांसाठी अध्ययनासाठीचे एक महत्त्वाचे केंद्र ठरते आहे. या ग्रंथालयामार्फत चालणारा पीजी डिप्लोमा इन लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्किंग हा अभ्यासक्रमही विद्यापीठाचे एक वेगळेपणच ठरते.

borateys@gmail.com

First Published on May 22, 2018 2:08 am

Web Title: top rated hyderabad university