30 May 2020

News Flash

गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे!

योगायोगाने या महिन्यात पन्नास चित्रपट गीते लिहून पूर्ण केली.

योगायोगाने या महिन्यात पन्नास चित्रपट गीते लिहून पूर्ण केली. त्या निमित्ताने वाटलं, आजचा कॉलम लेखक म्हणून न लिहिता गीतकार म्हणून लिहावा. कारण गाणं लिहिणं ही जगातल्या सर्वात जास्त ‘फॅसिनेटिंग’ गोष्टींपैकी एक वाटते मला. लेखक असण्याचं भाग्य हे की तुम्हाला नवनवीन माणसं जन्माला घालता येतात आणि गीतकार असण्याचं, तुम्हाला गाणी जन्माला घालता येतात. गाणी जी लोकांच्या ओठांवर रुळतात, मनात घर करतात, त्यांचे ‘स्टेटस’च नाही तर ‘वे ऑफ एक्सप्रेशन बनतात.’ पण गाणी लिहिणं हे तितकंसं सोपं काम नाही, आणि याची जाणीव मला माझ्या पहिल्या वहिल्या गाण्याला झाली.

पुण्यातून अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीची नोकरी सोडून मी मुंबईमध्ये आलो आणि नाटकाचं काम सुरू केलं. त्या नाटकाचं गाणं मला सुचलं तसं मी लिहिलं, त्या आधी मी जिंगल्स, थीम साँग्स लिहायचो, पण त्याला एक स्पेसिफिक मुद्दा, ब्रीफ असायचं. नाटकाचं लिहिलेलं गाणं आवडल्यानंतर हृषीकेश कामरेकर या माझ्या मित्रानं मला गाणं लिहिशील का असं पहिल्यांदा विचारलं. मी आनंदानं होकार दिला (खरं तर उडय़ा मारत!) त्यानं मला सांगितलं मी तुला चाल पाठवतो त्यावर लिहायचंय. झालं! ते गाणं माझ्याकडे आलं आणि ‘ना ना ना’ ‘ल ल ला’ 16-music-lpयांच्या पलीकडे मला त्यातलं काहीच कळेना. कॉन्फिडन्स फुग्यातल्या हवेसारखा फुस्स झाला, दोन चार ‘फॉल्स अटेम्प्टस्’ पण केले पण काही जमेना. त्याच्या घरी जायला ट्रेनमध्ये बसलो आणि ठरवलं सांगून टाकायचं आपल्याला हे जमत नाही.

तोवर मनातल्या मनात नावं ठेवलेल्या हजारो गीतकारांची (याला काय अक्कल लागतेय? हे तर मीही लिहू शकतो!) माफी मागितली आणि त्याला भेटलो. त्याच्या घरी पोहोचलो. त्याने समजावलं आणि का कुणास ठाऊक वाटलं, नाही, करून बघावं. त्यांनीसुद्धा ही माझ्या टॅलेंटची परीक्षा नसून एकत्र चांगलं काम करण्याची संधी आहे हे मला सांगितलं, आणि लहान मुलाला बोटाला धरून सांगतात तशा मला गोष्टी सांगितल्या. सुमारे दहा-पंधरा दिवसांनंतर कधी तरी त्याचे शब्द सापडले आणि ते दिलेल्या चालीत नीट बसलेसुद्धा!

त्या दिवशी दोन गोष्टी लक्षात आल्या. गाणं लिहिणं हा झगडा आहे. आणि तो आयुष्यभर करत राहिला पाहिजे. गाणं लिहायला लागणारं संवेदनशील मन, चांगली शब्दसंपदा, व्याकरणाचा अभ्यास, भाषेवरचं प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यातलं काव्य या सगळ्याला सातत्याने घासून पुसून पाहण्याची, आणि त्यातनं काही तरी ‘मॅजिकल’ तयार करण्याची सुंदर संधी दुसरीकडे कुठे मिळणार?

या काळात इतर मराठी गाणी लिहिणाऱ्या गीतकारांबद्दल माझा आदर फारच वाढला, कारण हिंदी गाणी लिहिणं मराठीच्या तुलनेत सोपं आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं. (श्रीरंग गोडबोले आणि गुरू ठाकूर यांचा मी मोठा फॅन आहे!) दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे गाणं लिहिताना तुम्ही वेगळं पात्र बनू शकता. कधी सूत्रधार, कधी गर्दीत नाचणारा कार्यकर्ता, कधी पंधरा वर्षांची मुलगी, कधी रॉकस्टार! अशी व्यक्ती, जी प्रत्यक्ष आयुष्यात तुम्हाला होणं कधीच शक्य होणार नाही. ती व्यक्ती काही काळापुरतं बनण्याचं अलौकिक समाधान एका गीतकाराला गाणं देतं.

आता गाणं जन्माला घालण्याविषयी. एक रिकामा कागद. किंवा वर्डच एक रिकामं पेज. हातात असलेली चाल. आणि कल्पनांनी भरलेलं मन. तो मोजका काळ सगळं शांत, निरभ्र असतं. मोकळं. स्वच्छ. कॅनव्हाससारखं. चाल ऐकायला लागलो की दुसऱ्याच क्षणी एखाद्या प्रदेशात शिरल्यासारखं वाटतं. शब्दांच्या प्रदेशात म्हणू या हवं तर. एखादी चाल गोठवून टाकते तुम्हाला, एखादी तजेला देते, एखादी चाल वैराण वाळवंटात भटकून आणते तर एखादी धबधब्यासारखी कोसळते. एखादा सुंदर साप झरकन झुडुपात जावा तशी एखादी सुंदर लकेर झरकन निघून जाते. एखादा पक्षी जसा फांद्यावरून येत येत पाण्यावर अलगद उतरतो तसं गाणंही क्रॉसमधून येत येत पुन्हा मुखडय़ावर येतं. इंद्रधनुष्यासारखा व्यापून टाकणारा आलाप गाण्याला अप्रतिम सौंदर्य देतो. त्या चालीतच लपलेले शब्द हळूहळू डोकवायला लागतात.

मग चालीचं वजन कळायला लागतं, पोत कळायला लागतो. भावना कळायला लागते. मग हुंदडताना फुलपाखरं दिसावीत तसे मधनंच शब्द दिसायला लागतात. मन लहान मूल होऊन जातं. गाणं मग ते कसलंही असो, गीतकार हा त्याचा पहिला प्रियकर असतो. त्याचा गाण्याशी रोमान्स जितका सुंदर, गाणं तितकं सुंदर. मग कधी तरी वीज चमकावी तशी एखादी कल्पना लख्ख चमकते आणि अक्षरश: ती वीज संचारल्याप्रमाणं शब्द कागदावर येतात. कधी कधी हे सगळं व्हायला तीन मिनिटं पुरतात, कधी कधी तीन महिनेही अपुरे! पण या सगळ्यात जेव्हा त्या रिकाम्या चालीवर शब्द सुचतात, ते त्यात अलगद बसतात आणि याची तुम्हाला जाणीव होते तो क्षण, तो एक क्षण, जगातल्या कुठल्याही प्रशंसा, पुरस्कारापेक्षा हजारो पटींनी मोठा असतो.

रोज नव्या नव्या चालींवर शब्द लिहायचे किंवा नवी नवी गाणी लिहायची या दोन्ही गोष्टी गीतकारांसाठी पर्वणीही असतात आणि धडकीही! कारण प्रत्येक गाणं सुचेलच असं नाही, हवे ते शब्द मिळतीलच असं नाही. त्यासाठी परत न जाण्याची, त्यातच राहण्याची तयारी पाहिजे. गाणं सुचेपर्यंतचा सगळा एकटेपणा, कल्पनांची तडफड, विचारांची कालवाकालव, शब्दांची जुळवाजुळव हे सगळं बाहेरच्या जगाला न कळता आत चालू असलं पाहिजे. हे सदर लिहिताना तसंही ते चालू आहेच.

पुढचा लेख येईपर्यंत तुम्हाला फक्त एकच सांगणं आहे, तुमच्या आजूबाजूला नॉर्मल वातावरणात एखादा गीतकार मधूनच ‘येस्स!’ किंवा ‘व्वा!’ किंवा ‘धमाल’ असं वेडय़ासारखा म्हणाला तर त्याला आपलं म्हणा. समजून घ्या, माणूस ‘गाण्यात’ आहे!

(पूर्वार्ध)
क्षितिज पटवर्धन – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2016 1:31 am

Web Title: my music 2
Next Stories
1 पोलीस नावाची शोकांतिका!
2 कुठून आणायची तुझ्यासारखी माणसं?
3 स्वचित्र
Just Now!
X