‘‘लग्न झाल्यावरही जागेमुळे आम्ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी राहात होतो. आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी दिवसभर आपापली कामं करून संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये भेटायचो आणि दिवसभराच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करायचो. सहजीवनाची जणू वेगळी संकल्पनाच आम्ही रुजवत होतो. मला नेहमी असं वाटतं, सहजीवनात जे नैसर्गिकपणे दोघांचं (नवरा-बायकोचं) असतं ते दोघांचं असतंच, पण सगळंच आपल्या दोघांचं असा हट्ट असण्यापेक्षा सगळ्यांचं मिळून झालं तर ते सहजीवन अधिक सुंदर, निरोगी, समृद्ध आणि अनेकरंगी होऊ शकतं.’’ सांगताहेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आपले लेखक, नाटककार पती प्रशांत दळवी यांच्याबरोबरच्या     २४ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
जावेद अख्तरांचं एक वाक्य मला फार आवडतं. शबाना आणि तुमच्यातलं नवरा-बायकोचं नातं नेमकं कसं आहे, हे विचारल्यावर ते म्हणाले होते, ‘‘हम दोनो एक-दुसरे के बहुत अच्छे दोस्त हैं और हमारी दोस्ती को हमारी शादी भी बिगाड नही सकी।’’  हेच वाक्य जसंच्या तसं मला आणि प्रशांतला लागू पडतं. प्रशांतची आणि माझी ओळख झाल्यापासून आजपर्यंत आमच्यात पहिलं नातं जर कोणतं असेल तर ते मैत्रीचं. आणि मग त्यानंतर नवरा-बायकोचं! आणि या मैत्रीला आता इतकी र्वष झाली आहेत की त्याच्याआधी मी कशी होते, काय करत होते हे मला नीटसं आठवतही नाही.
चंदू (चंद्रकांत कुलकर्णी) आमचा, आमचा म्हणजे माझा आणि माझी बहीण प्रतिमाचा पहिल्यांदा मित्र! त्याच्यानंतर मग बघता बघता नाटक, चित्रपट, साहित्य असा कॉमन इंटरेस्ट असणाऱ्यांचा, आमचा ‘जिगीषा’ ग्रुप स्थापन झाला. अनेकांबरोबर मैत्री होत असतानाच काही जणांबरोबर आपले ‘विशेष’ सूर जुळतात. तसं प्रशांतच्या बाबतीत कधी घडत गेलं ते कळलंच नाही. त्याची त्याही वयातली परिपक्वता, समोरच्याला समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची हातोटी, स्वभावातली मृदुता.. अशा अनेक गोष्टी मला मनापासून आवडल्या होत्या. मला आठवतं, आमच्या ‘जिगीषा’चा कोणताही कार्यक्रम असला की क्रार्यक्रमाच्या संकल्पनेत पूर्णपणे डोकं लावणारा तो, प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या वेळी मात्र पडद्यामागे राहून इतरांना नेहमी पुढे येण्यासाठी उत्तेजन देई. ही परिपक्वता बहुतेक त्याच्यात जन्मजातच असावी.
 माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ७ वर्षांचं अंतर! माझ्या जडणघडणीच्या काळात, जाणिवा विकसित होण्याच्या काळातच तो मला भेटल्यामुळे माझ्यावर किंबहुना आमच्या सगळ्यांच्याच घडण्यावर प्रशांतचा कळत-नकळत ठसा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरू नये, चांगले चित्रपट बघायला शिकवणारा, काय आवडलं त्याचं योग्य शब्दात विश्लेषण करायला लावणारा, काही चुकलं तर स्पष्ट शब्दांत खडसावणारा आणि अगदी छोटय़ातल्या छोटय़ा गोष्टीचंही मनापासून कौतुक करणारा असा आमच्या ग्रुपचा लीडर असणारा प्रशांत, मी कधी माझ्या जीवनाचा साथीदार म्हणून निवडला, किंबहुना आम्ही कधी एकमेकांना निवडलं ते आमचं आम्हालाच कळलं नाही. आम्ही दोघांनी जेव्हा एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा प्रश्न फक्त आमच्या दोघांपुरता मर्यादित नव्हता तर पूर्ण ग्रुपचा होता. त्यावेळी आम्ही १२ जणी आमच्या ग्रुपतर्फे ‘स्त्री’ नावाची एकांकिका करत होतो. त्याचे संध्याकाळी रात्री, बाहेरगावी असे प्रयोग असायचे. तो काळ वेगळा होता- अशा वेळी  आमच्या मैत्रिणींपैकी कोणाच्याही घरी आमच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळलं असतं तर त्यांनी आपल्या मुलींना या ग्रुपमध्ये पाठवलंच नसतं- ही भीती लक्षात घेऊन आम्ही दोघांनी स्वत:वर खूप बंधनं घालून घेतली होती, आम्ही एकमेकांना फारसे भेटतही नसू. त्यामुळे लग्न ठरवतानाच एक समजूतदारपणाची भूमिका आम्हाला घ्यावी लागली होती ती पुढच्या सहजीवनात कायम आम्हाला साथ देत राहिली.
  एकमेकांना फक्त दोघंच असताना समजून घेण्यापेक्षा प्रशांतचे त्याच्या आई-वडिलांशी, मित्र-मैत्रिणींशी असलेले संबंध आणि माझं माझ्या जवळच्या व्यक्तींशी असलेलं नातं, यातून आम्ही एकमेकांना जास्त समजून घेत गेलो. इतरांशी असलेल्या संबंधांतूनच माणूस म्हणून खरी ओळख पटत गेली आणि एकमेकांशी नातं जोडलं गेलं ते कायमचं!
 आज कपडे बदलावे तितक्या सहजतेने बॉय फ्रेण्ड, गर्ल फ्रेन्ड बदलण्याच्या काळाकडे बघताना वाटतं, आपण निर्माण केलेलं नातं क्षुल्लक कारणावरून क्षणात मोडून टाकण्यापेक्षा ते छान पद्धतीने जोडण्याकडेच आमचा जास्त कल होता. हे विधान कोणाला कदाचित प्रतिगामी वाटेल, पण मला हा नात्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाटतो. आमच्या दोघांच्या करिअरमध्ये आणि पर्यायाने आमच्या सहजीवनामध्ये महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रशांतचा औरंगाबादहून मुंबईला येण्याचा निर्णय! त्याच्या या निर्णयाकडे मागे वळून जेव्हा मी बघते, तेव्हा खरंच माझा मित्र, माझा नवरा. एक व्यक्ती म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो. आजुबाजूला एवढं कौतुकाचं (आम्ही तिथे जी नाटकं करत असू त्यांचं खूप कौतुक होत असे.) सुरक्षित वातावरण असताना, आपला ‘कम्फर्ट झोन’ सोडून केवळ स्वत:ला आजमावण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय, तोही फक्त एकटय़ाचा नाही तर पूर्ण ग्रुपने स्थलांतर करण्याचा त्याचा निर्णय मला आजही तितकाच चकित करतो!
लग्न होऊन जेव्हा आमचं सहजीवन आणि कलाजीवन मुंबईत सुरू झालं तेव्हा सुरुवातीला जागेचा प्रश्न होता. आम्ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी राहात होतो. आमचं सहजीवन ‘टिपिकल’ किंवा नेहमीच्या साच्यातलं असणार नाही याची जणू ती झलकच होती. आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी दिवसभर आपापली कामं करून संध्याकाळी शिवाजी पार्कमध्ये भेटायचो आणि दिवसभराच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करायचो. सहजीवनाची जणू वेगळी संकल्पनाच आम्ही रुजवत होतो. मला नेहमी असं वाटतं सहजीवनात जे नैसर्गिकपणे दोघांचं (नवरा-बायकोचं) असतं ते दोघांचं असतंच, पण सगळंच आपल्या दोघांचं असा हट्ट असण्यापेक्षा सगळ्यांचं मिळून झालं तर ते सहजीवन अधिक सुंदर, निरोगी, समृद्ध आणि अनेकरंगी होऊ शकतं- अर्थात हे माझं वैयक्तिक मत!
 आज माझा ग्रुपच माझं कुटुंब आहे. चंदू, प्रतिमा, अभय, जितू, श्रीपाद, समीर हे तर आमचे मित्र आहेतच, पण त्यांच्या बायकाही दीपाली, आरती, कल्याणी, भाग्यश्री आमच्यात छान मिसळून गेल्या आहेत. गंमत म्हणजे आज माझी बहीण प्रतिमा ही मैत्रीणच अधिक आहे. आज आमच्या दोघांपैकी कोणी चुकीचं वागलं तर आम्ही फक्त एकमेकांनाच नाहीतर आमच्या सगळ्या मित्र-मैत्रिणींना तेवढेच ‘अ‍ॅन्सरेबल’ आहोत. व्यक्तिवादी आणि स्वकेंद्री झालेल्या आपल्या सध्याच्या आयुष्यात असं असणं मला खूप महत्त्वाचं वाटतं!
  करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात प्रशांतने ‘लोकसत्ता’मधली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तोही अशा वेळी जेव्हा आमच्या दोघांपैकी कोणाचंही या क्षेत्रात फारसं बस्तान बसलं नव्हतं- क्षणभर बिचकायला झालं होतं, पण त्याचा हा निर्णय धाडसी असला तरी तो भाबडा नव्हता. विचारपूर्वक घेतलेला होता याची मला पुरेपूर जाणीव होती- आणि म्हणूनच आज तो लेखनाच्या क्षेत्रात स्वतंत्र प्रतिभेचा लेखक म्हणून स्वत:चं स्थान निर्माण करू शकला.
 सुरुवातीला आम्हाला अनेक जण विचारायचे ‘तुमच्यात कधी ‘अभिमान’ परिस्थिती निर्माण झाली नाही का?’ मला या प्रश्नाचं फार हसायला यायचं. माझ्यासारखी अभ्यासात टॉपर असणारी मुलगी मुळात या क्षेत्रात प्रशांत, चंदूमुळे आली. त्यामुळे माझं चांगलं करिअर व्हावं ही माझ्यापेक्षाही प्रशांतची इच्छा! आणि मला मनापासून असं वाटतं एकमेकांच्या कामाबद्दल आदर, प्रेम, आस्था आणि स्पेस या गोष्टींचा जर योग्य बॅलन्स राखता आला तर ही परिस्थिती उद्भवण्याचा कधी प्रश्नच येत नाही.
 आज एक अभिनेत्री म्हणून मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका मिळाव्यात, असं वाटत असलं तरी प्रशांतच्या प्रत्येक नाटकात, चित्रपटात मी असेनच किंवा ‘जिगीषा’च्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मी असेनच, असा आग्रह मी कधी नाही धरला. त्यामुळेच ते (प्रशांत, चंदू आणि जिगीषा) वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर काम करू शकले आणि मीही वेगवेगळ्या लेखक, दिग्दर्शकांबरोबर काम करू शकले! आमच्यातलं हे समजून घेणं कधीही न बोलताच ठरलेलं होतं. आमच्यातलं नातं विश्वासाचं, परिपक्व असल्याचं आणि आमचं सहजीवनही समाधानी असल्याचंच हे लक्षण आहे, असं मला मनापासून वाटतं!
  याचा अर्थ आमच्यात सगळं आलबेल आहे, आमच्यात कधी भांडणं होत नाहीत असं अजिबात नाही. कुठल्याही नात्याचा भांडणं हा अगदी स्वाभाविक भाग असल्याने आमच्यातही ती होतात, पण नवरा-बायकोची ‘उगाचंच भांडणं’ या सदराखाली मोडणारी भांडणं आमच्यात फार कमी वेळा होतात. अनेक मुद्दय़ांवर वाद होतात, चर्चा होतात, भांडणं होतात, पण लॉजिकशी कधी फारकत घेतली जात नाही आणि जो कोणी घेतो तो पुढच्या वेळी स्वत:ला ‘करेक्ट’ करतो. एकमेकांच्या चुकांवर आम्ही मनमुराद हसतो आणि त्या सुधारण्यासाठी एकमेकांना मदतही करतो. त्यामुळे त्या चुकांचं कधी गंडांमध्ये रूपांतर होत नाही. मुळात जीवन जगण्याविषयीची तत्त्व, मूल्य या गोष्टींवर एकमत असल्याने बाकीच्या गोष्टी खूप क्षुल्लक ठरतात.
  माझ्या एका मैत्रिणीने मला विचारलं होतं, ‘‘तुझा नवरा स्त्रीवादी लेखक असल्याने तुमच्याकडे कामाची एकदम बरोबर विभागणी होत असेल ना?’’ मला तिच्या या कल्पनेचंच हसायला आलं होतं. आमच्याकडे अशी अजिबातच विभागणी नाही. ज्याला वेळ असेल त्याने ते काम करावं- मग ते घरातलं असो किंवा बाहेरचं! आमचं लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा माझे आई-बाबा आणि प्रशांतचे आई-बाबा आमच्याकडे आले होते तेव्हा अचानक माझ्या चित्रपटाचं कोल्हापूरला शूटिंग निघालं, त्यामुळे मला जावं लागलं होतं. पण प्रशांतने कुशलतेने सगळं घर सांभाळलं होतं आणि मुख्य म्हणजे मी असं काही करतोय.. हा आवही नव्हता. प्रत्येक वेळी त्याच्यावर जबाबदारी पडेलच असं नाही, पण जेव्हा पडते तेव्हा तो अतिशय मनापासून व्यवस्थितपणे आणि आनंदाने ती पार पाडतो. ‘आदरातिथ्य’ हा तर प्रशांतचा विशेष गुणच म्हणायला हवा.  आमच्याकडे जेव्हा पार्टी असते तेव्हा पहिल्यांदा मी ७-८ पदार्थाचा छान मेन्यू ठरवते. पण जेव्हा प्रशांतला मी तो मेन्यू सांगते तेव्हा प्रशांत हमखास त्याच्यात आणखी २-३ पदार्थाचा समावेश करतोच! त्याच्याशिवाय त्याचं समाधानच होत नाही. इतरांना भरभरून द्यायला तो नेहमीच पुढे असतो. दुसऱ्यांसाठी कितीही केलं तरी कमीच आहे, या त्याच्या भावनेशी कसं डील करावं हा कधी-कधी माझ्यापुढे मोठा प्रश्नच असतो.
 आमच्या सहजीवनात मूल होण्याला खूप दिवस स्थान नव्हतं. म्हणजे मुलं आवडत नाहीत असं नाही, इतरांची मुलंही आम्ही अतिशय प्रेमाने सांभाळली होती. पण एक मूल वाढवणं हे फार मोठं जबाबदारीचं, जिकिरीचं काम आहे आणि त्यासाठी तेवढा पोषक वेळ देऊ शकू की नाही असं वाटायचं- पण जेव्हा मूल हवंसं वाटलं तेव्हा ते अतिशय आसुसून! आणि म्हणूनच ‘रुंजी’चा जन्म झाला. आज तर तिला सांभाळताना, मोठं करताना दोघांचीही स्वत:शी आणि एकमेकांशी नव्याने ओळख होतेय. रुंजीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मी शूटिंग करत असताना मला रुंजीची नेहमी काळजी वाटायची. ती नीट जेवली असेल का? झोपली असेल का? असं सारखं वाटत राहायचं. अशा वेळी प्रशांत मला ती नीट जेवत असतानाचे, ती बागेत खेळतानाचे, शांत झोपल्याचे फोटो मेल करायचा. ते बघून मी मनोमन निर्धास्त व्हायचे. म्हणजे माझ्या अनुपस्थितीत तिची काळजी घेणं वेगळं, पण समोरच्याला आश्वस्त करणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे! आणि त्यामुळेच मी कामावर छान पद्धतीनं लक्ष केंद्रित करू शकले. माझी आई आणि माझ्या सासूबाई यांच्या प्रेमळ देखरेखीखाली ती वाढत असताना जबाबदारी, उत्सुकता, आनंद, भीती अशा सगळ्या भावनांचा एक वेगळाच संयोग मनात दाटून येतो!
 आज आमच्या सहजीवनाकडे जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा वाटतं, आम्ही ते सुरू करण्यापूर्वी कोणत्याच गोष्टींविषयी एकमेकांना नियमावली दिली नव्हती, ठरवलं होतं ते फक्त इतकंच की आपण एकमेकांबरोबर असणार आहोत आणि आपल्याबरोबर सगळे असणार आहेत- बस्स! नवऱ्यानं बायकोच्या शेजारीच बसलं पाहिजे (म्हणजे बसलं तरी हरकत नाही, पण बसलंच मधला ‘च’ मला धोकादायक वाटतो. कारण प्रेमापेक्षा तो हक्क आणि अधिकार दर्शवतो.) काहीही करताना मला (बायकोला) विचारूनच केलं पाहिजे, वर्षांतून एकदा ‘फिरायला’ गेलंच पाहिजे, एकमेकांना सरप्राईज गिफ्टस् दिल्याच पाहिजेत असा कोणताच ‘सिलॅबस’ आम्ही ठरवलेला नाही. मनापासून वाटलं तेव्हा आम्ही ते ते केलंच आहे. आत्ताच माझं नवीन नाटक ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ रंगभूमीवर आलं, तेव्हा मी खूप तणावाखाली होते. जवळ जवळ १२ वर्षांनी मी नाटक करत होते. त्याचा पहिला प्रयोग झाल्यावर प्रशांतने मला एक छान ड्रेस गिफ्ट दिला. मला वाटतं एकमेकांबद्दल वाटण्याचे काही मोजकेच प्रामाणिक क्षण असतात. त्यांच्याशी मात्र आम्ही इमान राखतो. आजपर्यंत ‘माझी बायको खूप चांगली अभिनेत्री आहे’ असं प्रशांतने किंवा मी, ‘प्रशांत खूप सशक्त लेखक आहे’ असं एकमेकांचं चारचौघांत कौतुक केल्याचं मला कधी स्मरत नाही. कधी त्याची गरजच वाटली नाही. एकमेकांच्या मनात एकमेकांचं काय स्थान आहे, हे चांगलं जाणतो आम्ही.
एकमेकांकडून ओरबाडून घेण्याच्या हक्काच्या नावाखाली वर्चस्व गाजवण्याच्या आणि व्यक्तिगत आयुष्याच्या नावाखाली अत्यंत संकुचित वृत्ती बाळगण्याच्या काळात मला तरी समजूतदारपणा, विश्वास आणि विनाशर्त प्रेम याच गोष्टी आमच्या आनंदी आणि समाधानी सहजीवनाचा पाया वाटतात.

Nagpur Central Jail, Inmates Meet Their Children, Inmates Meet Their Parents, Heartwarming Gathering Program, Nagpur Central Jail Inmates Meet Children, police, inmates, Nagpur news, marathi news,
रुसवे, फुगवे अन गोडवे! कारागृहातील कैद्यांनी घेतली मुलांची गळाभेट
shani dev vakri in kumbha rashi
शनिदेव कुंभ राशीत वक्री होताच ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या, कोणत्या राशींचे नशीब पालटणार?
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?