रोहिणी हट्टंगडी hattangadyrohini@gmail.com

एकाच चित्रपटात वा नाटकात डबल रोल करायला मिळणं हे नेहमीच आव्हानात्मक. अलीकडेच असा डबल रोल करायला मिळाला तो एका मराठी चित्रपटात; परंतु चाळीस वर्षांपूर्वी कमलाकर सारंग यांच्या ‘रथचक्र’ या नाटकात अशा दोन भूमिका करायला मिळाल्या होत्या.. दुहेरी भूमिके चं आव्हान मोठं असतंच; परंतु ते पेललं की मिळणारं समाधान अवर्णनीयच.. 

salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

कलाकाराला काही वेगळं करण्याची संधी मिळाली की तो ती कधी वाया घालवत नाही. वेगळं म्हणजे अगदीच वेगळं! मी चक्क पुरुषाची भूमिका केली एका मराठी चित्रपटामध्ये. पुरुष वेश घेतलेली बाई नव्हे, खरोखरच पुरुषाची भूमिका! आणि तेही एकाच चित्रपटात ‘डबल रोल’. एक महाराणी आणि दुसरे आजोबा! ‘वन्समोअर’ या मराठी चित्रपटात. तर झालं असं..

पाच-सहा वर्षांपूर्वी श्वेता आणि नरेश बिडकर माझ्याकडे आले. श्वेता माझी मैत्रीण. ती लिहिते आणि नरेश- तिचा नवरा, तो दिग्दर्शक. ‘‘आम्ही एक चित्रपट करतोय. त्यासाठी तुम्ही आम्हाला हव्या आहात.’’ मग चित्रपटाची कथा वगैरे सांगितली. वर्तमानातलं एक तरुण जोडपं. त्यांच्यात खूप भांडणं, वादविवाद होताहेत. बायकोला खोटं बोलण्याविषयी चीड आहे आणि नवऱ्याला कातडी वाचवण्यासाठी खोटंच बोलायला भाग पडतंय! आणि अचानक कथा भूतकाळात जाते. राजेरजवाडय़ांचा काळ. तिथे ती तरुणी राजकन्या आहे आणि तो शेजारच्या देशाचा राजकुमार- जो कपट-कारस्थानानं महाराणी आणि राजकन्येचं राज्य बळकावतो. वर्तमानातली सगळी पात्रं भूतकाळातही त्याच नात्यात आहेत- म्हणजे तसे तर सगळ्यांचेच डबल रोल. म्हणजे आताचा डॉक्टर- भूतकाळातला सेनापती- वगैरे. फक्त भूतकाळात जी महाराणी आहे, ती वर्तमानात आजोबा आहे! म्हटलं, ‘‘यात माझ्यासाठी फक्त महाराणीचीच भूमिका दिसतेय.’’ श्वेता, नरेश हसले आणि म्हणाले, ‘‘नाही. आजोबाही तुम्हीच!’’ मी स्तब्ध झाले, बघतच राहिले. शांतता! शेवटी विचारलं, ‘‘म्हणजे?..’’ ‘‘म्हणूनच तुमच्याकडे आलोय. तुम्हीच डोळ्यासमोर आलात या    भूमिके साठी!’’ परत दोन मिनिटांची शांतता. ‘‘माझी करण्याची आहे तयारी; पण अवघड आहे. नीट नाही जमलं तर तोंडघशी पडू; पण जमलं तर हिस्ट्री!’’ असं ‘चॅलेंज’. ‘‘अ‍ॅक्सेप्टेड!’’ पूर्ण तयारीनिशी आले होते दोघं. ‘प्रोस्थेटिक्स’साठी रमेश मोहंतींना विचारलं होतं त्यांनी. ऋषी कपूरचा असाच मेकअप त्यांनी केला होता. खर्चाचीही तयारी दिसली. म्हटलं, ‘‘ठीक आहे.. पण ‘प्लॅन बी’ची तयारी असायला हवी.’’ होकार दिला. विचार के ला, आजोबाच्या ‘लुक टेस्ट’ला काय होतंय बघू! आणि मग मी माझ्या इतर कामात गुंतले.

‘लुक टेस्ट’साठी दिवस ठरला. आधीच रमेशदादा चेहऱ्याची मापं घेऊन गेले होते. रमेशदादांकडे माझा फोटो आणि आजोबाच्या लुकचा ‘सॅम्पल फोटो’ होता. टक्कल, समोर तुरळक केस, मागे केसांचा अर्धचंद्र. डोळ्यांखाली, नाकावर लॅटेक्सचं पॅडिंग.. चेहरा बदलायला लागला. पायजमा, टी-शर्ट आणि स्कार्फ असा पोशाख करून कॅमेऱ्यासमोर उभी राहिले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते; पण नरेश मात्र खूश दिसला. फोटो झाले. नरेशनं दोन वाक्यं दिली. (हं.. आवाजावर काम करायला हवं! हे मनातल्या मनात घोळवलं.) त्याचं चित्रीकरण   के लं. नरेश नंतर म्हणाला, ‘‘त्या दिवशी कॅमेरामन विचारत होते, ‘ये कौन साहब हैं? देखा नही कभी इनको..’ फोटो बघितले. जमलंय. आता कॉस्च्युम. चैत्राली डोंगरे कॉस्च्युम्स करत होती. तिनं महाराणीचा पोशाख दाखवला. साडी न देता आसामी ‘मेखला चादर’सारखी वेशभूषा होती आणि लांब दुपट्टा खांद्यावरून दुसऱ्या हातावर. मुकुटाऐवजी पगडी. कपाळावर डिझाईन देऊन करून घेतलेलं ‘नाम’! आता आजोबा. बाई पुरुषाच्या वेशात म्हणजे ‘फिजिक’ लपवणं भागच होतं. मला आमचं जपानी नाटक आठवलं. तुम्ही नीट पाहिलं, तर आपल्याकडे असलेली स्त्रीची अंगकाठी किमोनो घातलेल्या जपानी बाईसारखी नसते.  किमोनो घालताना कंबरेला लांब कपडा गुंडाळतात. आम्ही टॉवेल गुंडाळायचो आणि मग किमोनो. म्हटलं, तसं करू. कं बर सरळ दिसेल. चालताना पोट पुढे काढून चालायचं! पायजमा, टी शर्ट आणि मफलर. मफलर मला हवाच होता. महाराणीच्या दुपट्टय़ाला समांतर. आणि त्याचा बराच उपयोगही करता येईल म्हणून.

महाराणीच्या सीन्सचं शूटिंग झालं. तिथेही वेगळंच. ‘व्हीएफएक्स’नं राजवाडा, दालनं वगैरे दाखवायची होती. (म्हणजे कॉम्प्युटरनं नंतर पार्श्वभूमी तयार करायची) म्हणून पूर्ण स्टुडिओला हिरवा पडदा आणि त्यावर पांढऱ्या फुल्या. मराठीत प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर ‘व्हीएफएक्स’ चित्रपटात वापरलं आहे; पण आजोबांचे सीन्स करताना दिग्दर्शकाची आणि माझी परीक्षाच होती. या भागाचं चित्रीकरण गोव्यात होतं. मला मेकअपला चार तास लागायचे. सकाळी ६ वाजता मेकअप सुरू केला, की १० वाजता पहिला शॉट व्हायचा. बरं, मेकअपमध्ये लॅटेक्सचं नाक, पॅड आणि टक्कल, दाढीचा समावेश असल्यामुळे घाम यायचा. चेहऱ्यावर सुरकुत्यासुद्धा लॅटेक्स लिक्विडच्या. चार तासांपेक्षा जास्त वेळ मेकअप टिकायचा नाही. घाम चेहऱ्यावर जमा व्हायला लागला की मिळेल तिथून बाहेर पडायचा. दुरुस्त करणं मुश्कील. म्हणून सीनमधले माझे सगळे ‘क्लोजअप’आधी करायचे आणि नंतर बाकी शॉट्स; पण या चित्रीकरणात मजा आली. मी नरेशला सांगूनच ठेवलं होतं, की जरा जरी बायकी हालचाल वाटली तर मला हटकायचं; मला वाईट नाही वाटणार. शेवटी दिग्दर्शक हाच कर्ताधर्ता ना! ‘डबिंग’च्या वेळी त्यानं माझा हट्ट पुरवण्यासाठी मला आजोबांचं डबिंग करू दिलं; पण चित्रपटात वापरलं नाही. माझा आवाज ओळखता येईल म्हणून. आजोबांचा आवाज संजय मोनेनं दिला. आजोबांचे सीन्स पाहिल्यावर संजयनं विचारलं म्हणे, ‘‘हे गृहस्थ गोव्याचेच का?’’ तर हा आमचा चित्रपट तयार झाला आणि प्रदर्शितही झाला; पण दोन वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीमध्ये आणि नंतरच्या करोनामुळे  मोठय़ा पडद्यावर नाही आला. ‘इरॉस नाऊ’ या ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मवर तो उपलब्ध आहे.

या चित्रपटातला ‘डबल रोल’ मी चार-पाच वर्षांपूर्वी के ला असला, तरी नाटकात जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी मी डबल रोल केला होता; ‘गांधी’ चित्रपट व्हायच्याही आधी. ‘कस्तुरीमृग’ या माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकानंतर चार-पाचच नाटकं झाली होती. एक दिवस कमलाकर सारंगांकडून निरोप आला, ‘भेटायला ये.’ म्हणाले, ‘‘श्री. ना. पेंडसेंचं नाटक करतो आहे; त्यांच्या ‘रथचक्र’ कादंबरीवर. तू काम करशील का?’’ पुढे तेच म्हणाले, ‘‘ खरं तर ‘ती’ची भूमिका सोडली,(जी लालनताई- (लालन सारंग) करणार होती) तर इतर भूमिका छोटय़ाच आहेत. तुला ‘थोरली’साठी (थोरली म्हणजे ‘ती’ची ऐंशी वर्षांची थोरली जाऊ) विचारतोय; पण माझी अशी एक कल्पना आहे, की तू दोन भूमिका कराव्यास. दुसऱ्या अंकात ‘कृष्णाबाई’ नावाची खाणावळवालीची भूमिका आहे, तीसुद्धा करावीस. तुला आवडेल का?’’ खरं सांगते, फक्त ‘थोरली’ असती तर मला फार उत्साह वाटला नसता; पण कृष्णाबाईची भूमिका ऐकून माझे कान टवकारले. त्यांनी अशा धाडसी प्रयोगासाठी मला निवडावं? तसं बघायला गेले तर मी नवीनच होते. माझं पहिलं व्यावसायिक नाटक ‘कस्तुरीमृग’ येऊन दोनच वर्ष झाली होती; पण खूप बरं वाटलं.

तालमी चालू झाल्या. लालनताई, ताराबाई पाटकर, बाळ कर्वे, धनंजय भावे, राजा नाईक, मधु वगळ अशी मंडळी होती. ‘ती’च्या मुलांच्या भूमिकांपैकी एका मुलासाठी विराज चिटणीस ठरला होता. दुसरा हवा होता. त्या वेळी आमच्या ‘खंडोबाचं लगीन’चेही प्रयोग चालू होते. दुसऱ्या मुलासाठी विजय कदमचं नाव सुचवलं आणि तोही सामील झाला. नाटकाचं वाचन चालू असताना थोरलीसाठी वय लक्षात घेऊन मी खर्जात बोलायला सुरुवात केली, पण मजाच येईना. संथगतीत खर्ज! कसं जमायचं? किती बोअरिंग वाटत होतं ते! काय आणि कसं करावं कळेना. उभं राहून तालमी चालू झाल्या. आता हालचालींवर काम करायचं होतं. म्हाताऱ्यासारखं जमिनीला रेटा देऊन उठणं-बसणं चालू केलं. हातवारे, चालणं यावर लक्ष देत होते. दुसऱ्या अंकातली कृष्णाबाई करायची होती. फरक ठेवायलाच हवा. तरी आवाजाचं काय करावं कळत नव्हतं. एक दिवस अचानक सापडलं. दूरदर्शनवर ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ कार्यक्रम चालू होता. कोणाची आठवत नाही पण मुलाखत चालू होती. वयस्क होते ते; पण त्यांचा बोलण्याचा सूर वरचा वाटत होता. ऐकता ऐकता सुचलं, आपण थोरलीसाठी खर्जाऐवजी वरच्या पट्टीतला जरा चिरका आवाज लावला तर? सारंगांना सांगितलं. म्हणाले, ‘‘बघ करून.’’ आणि ठरलं. थोरलीसाठी असा चिरका आवाज आणि कृष्णाबाईसाठी स्वत:चा. पहिला अंक हातात आला होता. अगदी पाठांतरासहित तयार झाला; पण सारंग दुसरा अंक सुरूच करत नव्हते. चार-पाच दिवस वाट पाहिली. शेवटी ठरवलं, विचारूच! एक दिवस तालमीच्या ब्रेकमध्ये त्यांना हळूच विचारलं, ‘‘दुसरा अंक कधी चालू करणार?’’ पाच सेकंद शांतता. मग ते म्हणाले, ‘‘अगं, थोरली आणि कृष्णाबाईमध्ये पुरेसा फरक दिसेल ना, याबद्दल शंका वाटते आहे. पेंडसेंना खात्री वाटत नाहीए या बाबतीत.’’ ते ऐकून पुरता हिरमोड झाला माझा. मग हिंमत करून म्हटलं, ‘‘तुमचीच आयडिया होती ना? मग करून तर बघू ना! मी तशा तऱ्हेनेच वर्कआऊट करते आहे. मला विश्वास आहे. एक संधी द्या मला. नाही जमलं तर नको!’’ सारंगांनी नुसती मान डोलावली.

दोन दिवसांनी सारंगांनी दुसरा अंक सुरू केला. माझा जीव भांडय़ात पडला; पण आता मात्र विचारपूर्वक सर्व करायला हवं. थोरली अलवणात असणार होती. म्हणजे विकेशा; पण अलवण पांढरं असावं असं ठरलं. बंद गळ्याचा लांब पांढरा ब्लाऊज, नऊवारी, डोक्यावरून घट्ट पदर, हातात जपमाळ. विकेशा म्हणजे टक्कल आलंच. केस बांधून कापडीच टक्कल लावायचं ठरलं, कारण तिसऱ्या अंकात परत दहा मिनिटांत ‘थोरली’ बनायचं होतं ना! हळूहळू थोरली आकार घ्यायला लागली. चिरका आवाज, अधू दृष्टीमुळे डोळे किलकिले करून पाहाणारी, पांढऱ्या अलवणातली. कृष्णाबाईसाठी साधी काठापदराची रंगीत साडी. केसांचा अंबाडा, मोठं कुंकू, दागिने. जाड दिसण्यासाठी पुढे आणि पाठीमागे पॅडिंग. ‘ती’चा धाकटा मुलगा पंधरा वर्षांचा. त्याला जवळ बसवून घेत त्याच्या पाठीवरूनच हात फिरव, मांडीवरच हात ठेव असं जरा जास्तच सलगीनं कृष्णाबाई त्याच्याशी वागत असते. विराज तसा लहानच. त्याच्यासाठी, म्हणजे त्याला संकोच वाटू नये म्हणून त्या प्रसंगाच्या सुरुवातीच्या तालमी सारंगांनी स्वत:च्या घरी घेतल्या. फक्त विराज, सारंग आणि मी. मलाही सांगितलं, की जरा सांभाळून घे. साहजिकच होतं हो! तो कंफर्टेबल झाल्यावर, त्याची तयारी झाल्यावरच आम्ही तो प्रसंग तालमीच्या जागी करू लागलो. तिसरा अंक खूप छोटा होता. वीस मिनिटांचा. दुसऱ्या अंकानंतर जेव्हा ‘कास्ट क्रेडिट’ची घोषणा व्हायची तेव्हा लोकांना कळायचं की, थोरलीही मीच आहे. मग प्रेक्षकांत कुजबुज.. टाळ्या मिळाल्यासारखं वाटायचं!

लालन आणि कमलाकर सारंग हे रंगमंचाला वाहून घेतलेलं जोडपं. दिलदार! नेहमी मदत करायला तयार. ‘रथचक्र’चे प्रयोग जोरात चालू असतानाच मला ‘गांधी’ चित्रपटाच्या ‘स्क्रीन टेस्ट’साठी जावं लागलं. तेव्हा सारंगांनी स्वत:हून प्रयोग रद्द केले. ‘जाऊन ये’ म्हणाले. माझी त्या चित्रपटात अंतिम निवड होण्याच्या आधी दिग्दर्शक सर रिचर्ड अ‍ॅटनबरो ‘दीनानाथ’ला ‘रथचक्र’चा प्रयोग बघायला अर्धा तास थांबले होते. निवड झाल्यावर ‘रथचक्र ’ सोडावं लागलं. तेव्हा माझी निवड झाल्याचं जयदेवनंतर (जयदेव हट्टंगडी) खासगीमध्ये कळणारे लालनताई आणि कमलाकर होते. नंतर या नाटकाचे प्रयोग चालूच राहिले, पण थोरली आणि कृष्णाबाईसाठी दोन वेगवेगळ्या नटय़ा घेतल्या गेल्या!

माझ्यासाठी मात्र या दोन्ही भूमिका यादगार!