योगेश शेजवलकर

yogeshshejwalkar@gmail.com

Devendra Fadnavis, Ajit Pawar & Eknath Shinde Astrology
शिंदे, पवार, फडणवीसांना ‘या’ अंकाचा धागा ठेवतो जोडून; २०२४ मध्ये मात्र येईल ‘हा’ अडथळा, ज्योतिषी काय सांगतात?
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

आज अवतीभोवती अपयशाने खचून जाण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दिवसागणिक होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण वाढते आहे, नैराश्य सर्व वयोगटांत पोचलेलं आहे, ताटात अन्नापेक्षा जास्त औषधाच्या गोळ्या दिसत आहेत. सामाजिक स्वास्थ्य वेगानं कुरतडलं जात आहे. हे टाळायचं असेल तर येणाऱ्या अपयशाला पूर्ण ताकदीनं भिडावं लागेल..  शांतचित्ताने आणि काहीशा त्रयस्थपणे अपयशाचा मागोवा घेऊन.. कसं ते सांगणारं, नर्मविनोदाचा शिडकावा करत गंभीर विषयाला तोंड फोडणारं गोष्टीरूपातलं हे सदर दर पंधरवडय़ाने..

आयुष्य म्हणजे काय? या प्रश्नाच्या उत्तराची व्याख्या जशी व्यक्तीनुरूप बदलते, तसंच यश म्हणजे काय? आणि अपयश म्हणजे काय? या प्रश्नांच्या उत्तरांचं असायला हवं. कारण यशापयशाचे संदर्भ, त्यासाठी केलेली धडपड, ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. ‘केलेल्या प्रयत्नाचं उत्तर मनासारखं मिळालं की नाही?’ एवढय़ा एकाच निकषावर त्या संपूर्ण प्रयत्नाचं, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं यश किंवा अपयश ठरत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. तेव्हा प्रयत्नांचा, त्यासाठी घेतलेल्या मेहनतीचा विचार केला तर ‘ऑल वेल इफ एंड इज वेल’ हे एकमेव सत्य नाही. उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जो काही प्रवास केला जातो, त्या संपूर्ण प्रवासाचा ताळेबंद हा अंतिम निर्णयाइतकाच महत्त्वाचा असतो.

मुळात सर्वात महत्त्वाची गोष्ट ही असते, की हा संपूर्ण प्रवास आपल्या स्वत:चा असतो. त्याचे बारकावे आणि आपण खरोखर किती मेहनत घेतली आहे, हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. तेव्हा अनेकदा अंतिम निर्णय मनासारखा झाला नाही तरीही तो प्रवास कमालीचं समाधान देऊन जातो. बरेचदा नवं काही तरी शिकवून जातो किंवा झणझणीत अंजन तरी डोळ्यात घालतो. यातलं जे काही होतं ते पूर्णपणे आपल्यासाठी असतं. इतर कोणाच्याही मताची किंवा प्रमाणपत्राची त्याला गरज नसते. तेव्हा एखादं अपयश इतरांना ज्या तीव्रतेनं जाणवतं.. तितक्या तीव्रतेनं आपल्याला ते जाणवेलच असं नसतं किंवा याच्या बरोबर उलटही होतं. कदाचित अशा अनेक दडलेल्या पलूंमुळे ‘अपयश’ हा माझा स्वत:चा अत्यंत आवडता विषय आहे.

मुळात अपयशाचा मला दांडगा अनुभव आहे आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या वळणांवर अपयश अनपेक्षितपणे प्रकट होऊन कधीही ‘धप्पा’ देऊ शकतं, हे मी मोकळ्या मनाने मान्यही केलेलं आहे. अर्थात, असं असलं तरी अपयशाशी गळाभेट झाल्यावर होणारी मानसिक आंदोलनं मीसुद्धा अनुभवतो. भावनांचा बांध कधी-कधी अनावरही होतो; पण तरीही थोडय़ाच कालावधीत शांतचित्ताने आणि काहीशा त्रयस्थपणे त्या अपयशाचा मागोवा घेऊन, बरंच काही शिकता येतं. अर्थात, त्यासाठी त्या अपयशाला पूर्ण ताकदीने भिडावं लागतं, हे मात्र नक्की; पण आज अवतीभोवती पाहताना अपयशाने खचून जाण्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. दिवसागणिक होणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण खूपच जास्त आहे, नैराश्य सर्व वयोगटांत पोचलेलं आहे, ऐन तिशीत हृदयरोगानं तरुणांना खिंडीत गाठलं आहे, ताटात अन्नापेक्षा जास्त औषधाच्या गोळ्या दिसत आहेत. यांसारख्या अनेक गोष्टी सामाजिक स्वास्थ्य वेगानं कुरतडत आहेत.

आपण कितीही सरळ मार्गाने वागलो, गोष्टींचं नियोजन केलं, ‘रिस्क आयडेंटिफिकेशन’ केलं, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा आटापिटा केला, तरी बरेचदा अपयशाला हमखास ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्री मिळते आणि नको त्या क्षणी पायात पाय घालून ते आपल्याला तोंडावर पाडतं. हे आपल्या सर्वानाच चांगलं माहिती आहे. ‘यशाचे अनेक बाप असतात.’ तर ‘अपयश हे नेहमी पोरकं असतं.’ याचीही आपल्याला कल्पना असते. मात्र तरीही आपण आपल्याच अपयशाला आपलं का म्हणत नाही? हा खरा प्रश्न आहे. ‘कळतं पण वळत नाही.’ या म्हणीचं या इतकं दुसरं उत्तम उदाहरण नाही.

अपयशाचं पालकत्व घेणं तर सोडाच; पण त्याला झिडकारण्यासाठी.. त्याच्यापासून दूर पळण्यासाठी आटापिटा केला जातो. तसं करण्यामागे ‘लोक काय म्हणतील?’ हा ‘क्लासिक मेंटल ब्लॉक’ही असतोच. असं पळाल्यानेच सगळा घोळ सुरू होतो. अनेकदा परिस्थिती गंभीर होण्यामागे बरीच कारणं असली, तरी त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे, ‘अपयश सहन करण्याची, त्यात दडलेले अर्थ समजून घेण्याची, मिळणारा धडा शिकण्याची तयारी नसणं’ हेच असतं.

दर वेळी अपयशासाठी पूर्णपणे आपणच जबाबदार असतो किंवा फक्त इतर गोष्टीच जबाबदार असतात, असं नसतं. बऱ्याच गोष्टींच्या गुंतागुंतीचा तो एकत्र परिणाम असतो. एकदा ते जर उमगलं, की मग आलेल्या अपयशामुळे खचून न जाता दुप्पट मेहनत घेऊन हातून काही तरी असामान्य आणि दीर्घकाळ टिकणारी गोष्ट घडू शकते. अनेक यशस्वी आणि प्रस्थापित लोकांचा जीवनप्रवास हीच गोष्ट अधोरिखित करतो. कित्येकदा पहिल्याच फटक्यात देदीप्यमान यश मिळालं तर ते यश गृहीत धरलं जातं आणि मग पुढचं यश मिळवताना नाकी नऊ येतात, अशीही अनेक उदाहरणं आहेत. अर्थात, म्हणून पहिल्या फटक्यात यश मिळवूच नये, असं नाही; पण अपयश आलं, तरी काही बिघडत नाही, हे निश्चित.

आय.टी. अर्थात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना किंवा लिखाणाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतल्या लोकांशी भेटीगाठी होत असतात. तेव्हा ‘फक्त आणि फक्त सक्सेस’ मिळवण्याची अनेकांची तीव्र इच्छा अस्वस्थ करते. सर्व बाजूंनी असलेल्या ‘परफॉर्मन्स प्रेशर’मुळेही अनेक जण आपल्या मूळ स्वभावाविरुद्ध वागतात, हेसुद्धा आहेच; पण ‘जे जे चांगलं.. ते माझं’ आणि ‘जे जे फसलेलं.. ते इतरांचं’ या वृत्तीने काम करणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. अनेक टॅलेंटेड वा गुणवान लोक अपयश सहन करू न शकल्याने किंवा त्याच्या भीतीने भरकटलेले मी जवळून पाहिलेले आहेत. प्रामाणिकपणे मान्य करायचं, तर मी स्वत:ही अनेकदा भरकटलेलो आहे आणि नंतर विचार केल्यावर पश्चात्तापाची वेळ माझ्यावरही अनेकदा आलेली आहे.

तेव्हा अपयशाशी निगडित असलेले अनेक दुर्लक्षित पलू आपल्या सगळ्यांबरोबर ‘शेअर’ करावेत यासाठीचा हा लेखनप्रपंच आहे. अर्थात, यात कोणाचंही ‘बौद्धिक’ घेण्याचा किंवा शाळा घेण्याचा हेतू नाही किंवा कोणता डोसही मला द्यायचा नाही. शिवाय ‘सायकॉलॉजी’ हा माझ्या अभ्यासाचा विषय नसल्याने त्या अनुषंगाने कोणतीही शास्त्रीय गोष्टही मला सांगता येणार नाही; पण असं असलं तरी मला काही तरी मांडायचं आहे, प्रामाणिकपणे काही तरी सांगायचं आहे. आपल्यापर्यंत पोचवायचं आहे. हे सगळं मांडताना माझा असा अजिबात दावा नाही की, मला जे काही म्हणायचं आहे, ते एखाद्या हमखास उत्तरासारखं किंवा गाइडसारखं असेल; पण मला जे काही अवतीभवती दिसलं, मी स्वत: ज्याचा अनुभव घेतला, अनेक अपयशांतून माझं जे शिक्षण झालं, ते कुठे तरी सगळ्यांबरोबर शेअर करावं, यासाठीचा हा लेखनप्रपंच आहे.

तेव्हा लेखाची मांडणी ही बहुतेक वेळा गोष्ट स्वरूपात असेल. काही ठिकाणी प्रसंगानुरूप, परिस्थितीचे भान राखून, कल्पनाविस्ताराचीही जोड दिलेली असेल. अवतीभवती घडणारे किंवा आपल्याच घरात अनुभवलेले काही प्रसंग कदाचित या गोष्टीतून आपल्यासमोर येतील. त्या प्रसंगात एक प्रश्न असेल. अपयशाची भीती त्यातून जाणवत राहील, मात्र उत्तर शोधण्याची गरजही त्यातून लक्षात येईल. सरतेशेवटी उत्तराबरोबरच अपयशाशी निगडित असलेला एखादा सकारात्मक पलूही समोर येईल आणि त्यातूनच कदाचित अपयशाला भिडण्याची गरजही वाटून जाईल..

योगेश शेजवलकर यांना आय.टी. अर्थात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशा-परदेशात काम करण्याचा जवळजवळ पंधरा वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते ‘सॉफ्टवेअर टेस्टिंग’च्या विषयांसाठी आणि सर्टिफिकेशनसाठी ट्रेनर म्हणून काम करत आहेत. सवाई करंडक स्पर्धा, तसेच राज्यस्तरीय दीर्घाक व एकांकिका स्पर्धेत लेखन व दिग्दर्शनाची बक्षिसे त्यांना मिळाली आहेत. त्याचबरोबर त्यांची नाटय़संहितांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांनी विविध ‘अ‍ॅड एजन्सीज’बरोबर ‘फ्रीलान्स रायटर’ म्हणूनही काम केले आहे. त्या माध्यमातून लिहिलेल्या सुमारे दोनशेपेक्षा जास्त जाहिराती वर्तमानपत्रात प्रकाशित झाल्यात. तसेच अनेक कॉर्पोरेट फिल्म्सचे लिखाण त्यांनी केले आहे. यासह अ‍ॅनिमेशन सीरिज आणि डिजिटल मार्केटिंगसाठीही लिखाण केले आहे. त्यांनी ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटासाठी ‘लँग्वेज कन्सल्टंट’ म्हणून काम केले असून ‘स्टोरीटेल’ या ऑडिओबुक्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी काही ‘ओरिजिनल सीरिज’चे लिखाण सुरू आहे. सोबतच त्यांनी लिहिलेल्या पहिल्या कादंबरीची निर्मिती प्रक्रियासुद्धा प्रगतिपथावर आहे.