राजन गवस

नोकऱ्याच नसतील, असलेल्या वशिल्याशिवाय मिळतच नसतील, तर शिकायचं कशाला, अशी मानसिकता तयार होत असतानाच यूपीएससी, एमपीएससीची लष्करअळी कोणीतरी गावात आणून सोडली. जागा कमी, परीक्षा देणाऱ्यांची संख्या कैक लाखांत. एक परीक्षा, दोन परीक्षा करत करत तिशी उंबऱ्यावर येऊन ठेपली आणि समोर सगळा अंधारच दिसायला लागला.. आईबाप कंगाल झाले. उमेदीची वर्षे मातीत गेली. या भयंकर साथीच्या अळीनं त्यांची आयुष्यंच बरबाद केली. याला जबाबदार कोण? हजारात एक होत असेल अधिकारी पण या नऊशे नव्याण्णवांचे काय?

ipl 2024 quiz in marathi
IPL 2024 QUIZ : आयपीएलचा प्रत्येक सामना आवडीने बघताय? मग क्विझमधील ‘या’ १० प्रश्नांची अचूक उत्तर द्या अन् बक्षीस जिंका
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
transgender police recruitment marathi news
एमपीएससी: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवारांसाठीचे नियम निश्चित
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश

‘भारत हा खेडय़ांचा देश आहे.’ हे वाक्य उच्चारलं, की प्रत्येकाला आपापले गाव डोळय़ासमोर येते. काहीजण स्मरणरंजनात गुंतून पडतात तर काहींना गाव कसं शोषणाचं केंद्र होतं, हे आठवू लागतं. महानगरातल्या, नगरातल्या म्हणण्यापेक्षा भारतात जन्मलेल्या प्रत्येकाला एक गाव असतंच. पाचपन्नास पिढय़ा शहरात गेलेल्या माणसालाही एका पिढीने दुसऱ्या पिढीला सांगितलेल्या आठवणींतून, तर कधी सातबाराच्या नोंदीतून, जोडलेलंच असतं गावाला. गाव जागेवरच असतं. माणसं देश-परदेश फिरत असतात मनात एक गाव घेऊन. गाव म्हणजे फक्त पांढरीवरची वस्ती नसते. माणसानं शेतीभाती, झाडंझुडपं, पशूपक्षी, कीडामुंगी, प्राणी, नदीनाले, डोंगरदऱ्या, देवदेवळं, भूतंखेतं, देवदेवस्की या साऱ्यात आपल्या पिढय़ान्पिढय़ांच्या अस्तित्वाचा अंश पसरून उभं केलेलं अगम्य असं काही तरी असतं.

माणसं येतात जातात. येताना काही घेऊन येतात. जाताना काही ठेवून, घेऊन जातात. तिथं जगताना-वावरताना काही तरी जुनं नष्ट करतात, नवं निर्माण करतात. काहीच करता नाही आलं तर जसं चालत आलं होतं तसंच सारं चालू ठेवतात. पाऊसपाण्यात, ऊनवाऱ्यात स्वत:ला तगवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. या साऱ्यात गाव उसासतं, धपापतं. कधी कात टाकतं, कधी संभ्रमित, संमोहित होऊन तळामुळातून बदलतं. तरीही ते आपलं गावपण सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. असं गाव अलीकडच्या काळात शोषकांची प्रयोगशाळा बनलं आहे. प्रत्येकाला या गावाचा लचका तोडायचा असतो. लुटायचं असतं. कोणाला सुधारायचं असतं. कोणाला सुधारण्याचा बुरखा पांघरून गुंडाळायचं असतं. पूर्वी बहुरूपी बिचारे मागतकरी म्हणून यायचे. पोटासाठी गावगल्लीचं मनोरंजन करून पसामूठ घेऊन जायचे. आताचे हे नवे बहुरूपी गावाचं रक्त कसं पिता येईल याच्या वाटा हरप्रकारे शोधत असतात. सापडलीच नाही वाट तर थेट हल्ला चढवून गावाला गलितगात्र करत असतात. कोण गावात नवी शेतीची यंत्रं घेऊन येतं. त्यातली अनेक यंत्रं फक्त गावात भूलभुलय्या निर्माण करणारी. शेतकऱ्याच्या दारात आली, की मान टाकून तिथंच संपून जाणारी. त्याच्या दुरुस्ती खर्चातच शेतकऱ्याचं कंबरडं मोडून जातं. कोण नवनवी बियाणं घेऊन येतो. पेरली की शेतंच्या शेतं ओस पडत जातात. तक्रार करायला जायचं कोणाकडं? शेती खातंच खातं. तीच स्थिती कीटकनाशक विक्रेत्यांची. रासायनिक खतवाल्यांचे तर दर सहा महिन्याला नवे फंडे. अमुक खत तमुक खत, ही कंपनी ती कंपनी. त्यांचे त्यांचे तरबेज एजंट. दलालांची साखळी. भेसळीशिवाय खत मिळणंच शक्य नाही. त्यात खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती. पशुखाद्याच्या कंपन्यांनी तर गावाला नागवण्याचा विडाच उचललेला. त्यात निसर्गाने मांडलेला उच्छाद वेगळाच.

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्सनी तर गावातल्या माणसाला मरायचीही सोय ठेवलेली नाही. त्यात रोज गावात घुसणारी नवी दुकानदारी. कोण कसा खिसा कापतोय हे कळणंही केवळ अशक्य. जीवघेणा सासुरवास. अशा सगळय़ात गावगन्ना फाळकुट पुढाऱ्यांचा हैदोस ही स्वतंत्रच गोष्ट. गावाचा चोहोबाजूंनी कोंडमारा. मेटाकुटीला आलंय गाव..

अशा गावातल्या सामान्य माणसाच्या सगळय़ा आशा-आकांक्षा एकवटलेल्या असतात त्या घरातल्या शिकणाऱ्या पोरापोरींवर. पोरं शिकली तर घराचं पांग फिटंल. या नागवलेल्या संसाराला आधार मिळंल. म्हातारपण सुखाचं नसेना, पण किंचित समाधानाचं तरी असंल. यासाठी पोरांना शिकविण्याचा जीवघेणा खटाटोप. हा क्लास तो क्लास. त्यांची वारेमाप फी. कर्ज काढा, उपास-तापास करा, पण पोराला शिक्षणासाठी पसा कमी पडू द्यायचा नाही. एकच ध्यास, पोरानं शिकलं पाहिजे.

गावातली पोरं शिकायला लागली आणि नोकऱ्याच संपून गेल्या सगळीकडच्या. शिकलेल्या पोरांच्या फौजाच्या फौजा गावात. बोगस नोकरभरतीची आमिषं दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्यांच्या भुरटय़ा टोळय़ा गावोगाव सक्रिय झाल्या. आधीच उघडे पडलेले संसार पुन्हा गत्रेत सापडले. बुडत्याचा पाय खोलात. विश्वास तरी कोणावर ठेवायचा? अशात तरणंताठं पोरगं पदवी घेऊन घरात हतबल होऊन लोळागोळा झालेलं. हताश झालेला सामान्य माणूस. कुठंच आशेचा किरण नाही. जगायची इच्छाच संपून जावी असं विदारक वर्तमान.

नोकऱ्याच नसतील, असलेल्या वशिल्याशिवाय मिळतच नसतील, तर शिकायचं कशाला? त्यापेक्षा कुणाच्या तरी बांधावर मोलमजुरी केलेली काय वाईट? अशी मानसिकता तयार होत असतानाच यूपीएससी, एमपीएससीची लष्करअळी कोणीतरी गावात आणून सोडली. अभ्यास केला, चांगला क्लास लावला तर वशिल्याशिवाय, पशाशिवाय नोकरी. तीही भरपूर पसा खायला संधी असणारी. शिवाय पीएसआय झालं, तहसीलदार झालं, डेप्युटी कलेक्टर झालं, की घरात पसाच पसा. कोण तरी बातमी आणायचं, ‘अमुक गावचं पोरगं डेप्युटी कलेक्टर झालं. तमुक गावचं पोरगं तहसीलदार झालं.’ रस्त्यारस्त्याला पोस्टर. तालुक्याला पोस्टर. त्यातच कोणी तरी सांगत यायचं, ‘अमक्याचं पोरगं मामलेदार झालं.’ दोन वर्षांत चार बंगले, पंचवीस एकर जमीन घेतली. दारात चार गाडय़ा. अख्ख्या तालुक्यात एखादाच, पण याची सगळय़ा तालुक्यात चर्चा. त्यातच मराठी शाळेत, हायस्कुलात मास्तर उदाहरणं देऊन सांगायला लागलेत, ‘‘पोरांनो, आता करायचं तर एमपीएसी, यूपीएससीच!’’ गावागावात, चौकाचौकात तीच चर्चा. पण ही पापाची कमाईसुद्धा असू शकते. अशी कमाई करण्यासाठी अधिकारी होणं हेही पापच. ‘गैरमार्गाने पैसे कमावण्यासाठी अधिकारी होण्यापेक्षा शेतात राबून खाल्लेलं बरं.’ असं कोणाच्या मनातही आलं नाही.

अशातच गावातला उत्साही पण पोरांच्या भवितव्याची काळजी असणारा कोणी तरी जिल्ह्य़ात कोण्या एमपीएससी झालेल्या व्यक्तीला गाठायचा. त्याच्या हातापाया पडून आपल्या गावात सत्कार आयोजित करायचा. हेतू एवढाच, की आपल्या पोरांनी प्रेरणा घ्यावी. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अभ्यास करावा. मुलांच्यासमोर सत्कार आयोजित करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा घाट घालायचा. भ्रष्ट माणसाचा सत्कार आपण करतोय याची खंत वाटली नाही. अर्थात्, सगळेच अधिकारी असेच असतात असं नक्कीच नाही. ‘आपली मुलं चांगले अधिकारीच होतील,’ असेही त्याला वाटले असेल. हळूहळू मुलांच्या आशा पल्लवित व्हायला लागल्या. बऱ्या घरातलं पोरगं पुण्याच्या गाडीत बसलं. ते बघून गोरगरिबालाही वाटू लागलं, आपलंही पोरगं होऊ शकतं कलेक्टर. त्यात, गावात कोणी तरी झालंच त्यातली एखादी परीक्षा पास, तर गावात जल्लोष. दहा गावात पुन्हा चर्चा. पुण्याला जाणाऱ्यांची संख्या आपोआपच वाढायला लागली.

बेरक्या लोकांनी गावात पसरत जाणाऱ्या या साथीच्या रोगाची लक्षणं बरोबर हेरली. त्यांना पसा कमावण्याचा उत्तम मार्ग सापडला. गावोगाव फक्त ‘स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन मेळावे’ घ्यायला सुरुवात केली. भाडोत्री वक्ते आपोआपच तयार झाले. स्पर्धापरीक्षेतून कोणत्या संधी आहेत, अभ्यास कसा करायचा, पुण्यात क्लास कोणता लावायचा, याचे मार्गदर्शन. फक्त स्वप्नं पेरत जायचं आणि नगद रक्कम गोळा करत सुटायचं. हुकमी मिळकतीचा मार्ग अनेकांना सापडला. जागा किती आणि भरती कधी होते, स्पर्धा कशी असते, हे मात्र सांगितलेच नाही कुणी. गावोगावचे लोंढे पुण्यात येऊन धडकायला सुरुवात झाली. स्पर्धापरीक्षेचे क्लास ओसंडून वाहायला लागले. आपोआपच क्लासचे दर वधारले. विद्यापीठाच्या परिसरात भेटेल तो मुलगा आपली ओळख सांगायला लागला, ‘स्पर्धा परीक्षा देतोय.’ त्यांच्याकडं बघण्याची समोरच्याची दृष्टी बदलली. झालाच अधिकारी तर येईल कामाला. असा प्रत्येकाचा दृष्टिकोन. यातून हळूहळू पदव्युत्तर विभागाचे वर्गच ओस पडायला सुरुवात झाली. क्लासच्या मिळकतीची चर्चा सर्वदूर पसरली. व्यापारी शिक्षणसंस्था चालकांच्या नजरेतून ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी सुटली तर नवलच. प्रत्येक महाविद्यालयात स्पर्धापरीक्षेची केंद्रं सुरू होऊ लागली. ‘महाविद्यालय तिथं स्पर्धापरीक्षा केंद्र,’ अशी साथ सर्वदूर पसरली. आपमतलबी पैसेवाले रट्टे सारून उतरले या धंद्यात. त्यांनी तालुक्यातालुक्यात सुरू केली स्पर्धापरीक्षेची दुकानदारी.

इतकी मुलं स्पर्धापरीक्षा देत आहेत हे बघून व्यावसायिक प्रकाशकांनी या क्षेत्रात उडी घेतली. ठोकळेच्या ठोकळे प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. पुस्तकाची जाहिरातच ‘आमचा ठोकळा, यशाचा मार्ग मोकळा!’ वारेमाप पुस्तकंच पुस्तकं. गावोगावच्या महाविद्यालयात, सार्वजनिक ग्रंथालयात फक्त स्पर्धापरीक्षेची पुस्तकं. ‘या पुस्तकांचा दर्जा काय? त्यातील मजकुराची अधिकृतता काय?’ असा प्रश्न कोणाच्याही मनात येणं केवळ अशक्य झालं. फक्त मुखपृष्ठावर ‘स्पर्धापरीक्षा’ हे दोन शब्द दिसले की उचललेच पुस्तक, असा आंधळा कारभार सुरू झाला.

ही नामी परिस्थिती हिकमती प्रसिद्धीलोलुप लोकांच्या नजरेतून सुटण्याची सुतराम शक्यता नव्हती. काहींनी स्पर्धापरीक्षेच्या मुलांसाठी खास व्याख्यानांची प्रभावी चौकट बनवली. त्यात काही यशस्वी अधिकारीही सामील झाले. (ते सगळेच बाजारू आहेत असं आपलं मत नाही.) गावोगाव व्याख्यानांचा सपाटा. पाच दहा हजार विद्यार्थी-पालक म्हटल्यावर वक्त्यांच्या भाषणाला पारावारच उरला नाही. ‘मी असा अभ्यास केला. माझी इतकी गरिबी होती. अमुक आणि तमुक..’ फक्त भावनांचा कल्लोळ आणि भंपक शब्दांचे बेफिकीर बुडबुडे. ऐकणाऱ्याच्या अंगात आपोआपच लाडलक्ष्मी घुमायला सुरुवात. ‘काहीही झालं तरी करायची ती स्पर्धापरीक्षाच! व्हायचं तर अधिकारीच!’ पण या वक्त्यांनी या स्पर्धा परीक्षेतील धोके कधी सांगितलेच नाहीत.

यातून गावागावातला आधीच कर्जबाजारी असलेला सामान्य माणूस अधिक कर्जबाजारी झालाय. आहे ती अर्धा एकर जमीन विकायला लागली तरी चालेल, पण मुलाला स्पर्धा परीक्षेला पाठवायचं. ‘झाला अधिकारी तर अशी छपन्न एकर घेईल,’ या धारणेतून होती ती वडिलोपार्जति जमीन कर्जात घालू लागलाय. शाळा-महाविद्यालयातल्या अध्ययन-अध्यापनाचा पुरता खेळखंडोबा झालाय. ग्रंथालयातून कचराच कचरा ओसंडून वाहायला लागलाय. चांगल्या संदर्भग्रंथांना आता जागाच उरली नाही, असा उलटा व्यवहार सुरू झालाय. याहीपेक्षा भयाण स्थितीत सापडलाय तो स्पर्धापरीक्षा करणारा विद्यार्थी. जागा कमी, परीक्षा देणाऱ्यांची संख्या कैक लाखांत. एक परीक्षा, दोन परीक्षा, करत करत तिशी उंबऱ्यावर येऊन ठेपते आणि समोर सगळा अंधारच दिसायला लागतो.

आईबाप कंगाल झाले. उमेदीची वर्षे मातीत गेली. आता करायचं काय? अशी मुलं वय उलटल्यावर हातात बॅग घेऊन स्टेशनकडं जाऊ लागतात तेव्हा ती जिवंत राहतील याची खात्रीच नाही देता येत. या भयंकर साथीच्या अळीनं त्यांची आयुष्यंच बरबाद केली. याला जबाबदार कोण? हजारात एक होत असेल अधिकारी पण या नऊशे नव्याण्णवांचे काय?

कोणीच का विचार करत नाही? ‘स्पर्धापरीक्षा हे सर्वस्व न मानता जगण्याचा एक कमाईचा मार्ग आधीच तयार कर मग हव्या तितक्या स्पर्धा कर,’ असं सांगणारा कोणीच का भेटत नाही? कर्जबाजारी होणाऱ्या आईबापाला ‘त्याच्या त्याच्या मिळकतीवर त्याला स्पर्धापरीक्षा करायला सांगा,’ असा सल्ला का देत नाही? गोरगरिबांच्या मुलांसाठी मोफत स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन करणारे स्पर्धापरीक्षा केंद्र का दिसत नाही आपल्याला? खेडय़ापाडय़ातील पोरं अधिकारी झाली, पण त्यांनाही या रोगाची भयंकर लक्षणं का त्रस्त करून गेली नाहीत? अशा अनेक प्रश्नांची गुंतवळ.

याचा वेळीच विचार केला नाही तर आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चर्चा करतोय. उद्या या सामान्यांच्या पोरांच्या आत्महत्या थांबता थांबवता येणार नाहीत. उद्याच्या या संकटाला टाळायचं असेल तर नव्या प्रबोधनाची, चळवळीची गरज आहे. नाही तर ही स्पर्धापरीक्षेची लष्करअळी गावंच्या गावं नेस्तनाबूत करणार आहे. धोक्याची घंटा वाजते आहे. इलाज शोधायलाच हवा!

chaturang@expressindia.com