पैसा आहे परंतु सोबत नाही, अशी अनेक वयोवृद्धांची अवस्था झालेली आहे. त्या गरजू आजी-आजोबांसाठी पुण्यात ‘आस्था’ने सशुल्क पंचतारांकित सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. आज अनेक आजी-आजोबांचं उत्तरायण त्यामुळे सुसहय़ होतं आहे.
रात्री-अपरात्री फोन वाजतो. तसे दामलेकाका धडपडत उठून फोन घेतात. पाठोपाठ दामलेकाकूही हजर होतात. एव्हाना फोनच्या रिंगवरून दोघांनी ओळखलेलं असतं, हा फोन नितीनचा! अमेरिकेहून! फोनवर नितीनशी बोलता बोलता दामलेकाकांचा चेहरा आनंदाने उजळतो. त्यांच्या लेकाला मुलगा झाल्याची गोड बातमी समजते आणि काका-काकूंच्या आनंदाला पारावार उरत नाही, पण नितीनच्या पुढच्या वाक्याने ते भानावर येतात. नितीन सांगत असतो, ‘सोनालीची आई बाळंतपण करायला येणार होती, पण त्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्या एवढय़ा लांबचा प्रवास करू शकत नाहीत. तेव्हा तुम्हीच दोघं आता सोनालीच्या बाळंतपणासाठी इथे या!’
क्षणभर दोघेही आनंदाने हुरळतात, पण पुढच्याच क्षणी अनेक प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात. गेली पाच वर्षे नितीन आग्रह करतोय. पण आजवर ते शक्य झालेलं नाही. कारण नव्वदीचे दामलेकाकांचे वडील आणि पंचाऐंशीची त्यांची आई त्यांच्याकडेच राहतात. या वयात त्यांना एकटं सोडून जाणं अथवा केअरटेकरवर सोपवणं अशक्य! आता काय करायचं? अचानक त्यांना ‘अथश्री’च्या जवळच असलेल्या ‘आस्था’ प्रकल्पाची माहिती कळते आणि त्यांची पावलं तिथे वळतात..
‘आस्था’मधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची सुविधा म्हणजे परांजपे स्कीम्सच्या ‘अथश्री’ त्या प्रकल्पाचाच पुढचा टप्पा आहे. ‘आस्था’च्या स्थापनेविषयी परांजपे उद्योग समूहाच्या मालक मीनल परांजपे सांगतात, ‘गेली बारा वर्षे पुण्यात आम्ही ‘अथश्री’ हा ज्येष्ठ नागरिकांसाठी निवासी सोय असलेला प्रकल्प चालवत आहोत. त्याला खूपच प्रसिद्धी व यश मिळालं. ‘अथश्री’मध्ये ज्येष्ठ स्वत:च्या घरात राहतात, पण घर चालवण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी आणि सेवा आम्ही त्यांना पुरवतो. ते हिंडते-फिरते असतात. त्यामुळे ते बाहेर जाऊ शकतात. स्वतंत्र राहत असतानाही समवयस्कांमध्ये रमतात, पण वय वाढत जातं आणि हालचाली मंदावतात. बाहेर जाणं, एकटय़ाने राहणं कठीण होऊ लागतं. एक वेळ अशी येते की, त्यांना रोजच्या दैनंदिन कामांसाठीसुद्धा मदतीची गरज भासू लागते. वेळेवर औषध देणं, जेवण भरवणं, त्यांना रोजच्या दैनंदिन कामांसाठीसुद्धा मदतीची गरज भासू लागते. वेळेवर औषध देणं, जेवण भरवणं, त्यांना टॉयलेटला नेणं या कामांसाठी पूर्ण वेळच्या मदतनीसाची गरज लागते. त्यांची ही गरज लक्षात आली तेव्हाच आमच्या मनात त्यांना निरंतर सेवा पुरवणाऱ्या निवासी व्यवस्थेची कल्पना सुचली आणि ‘आस्था’चा प्रकल्प आकाराला आला. ‘अथश्री’मधील ज्येष्ठांचा विचार करून सुरू झालेल्या या निवासी व्यवस्थेचा फायदा मग सर्वानाच होऊ लागला. या निवासात स्वच्छ, हवेशीर व पुरेशा मोठय़ा अशा बेचाळीस खोल्या आहेत.  त्यामध्ये काय हवं असल्यास ज्येष्ठ एकटे अथवा शेअिरगमध्ये राहू शकतात. इथल्या वास्तव्याचा कालावधी ३ महिने ते १ वर्षांपर्यंत आहे.
या मोकळय़ा, प्रशस्त खोल्यांमधून ज्येष्ठांनी आपला संसार थाटला आहे. अर्थात मात्र ही सर्व व्यवस्था सशुल्क आहे.  त्यांची औषधांची मांडणी, कपडय़ांचं कपाट, फ्रिझ, टीव्ही, कॉम्प्युटर या सर्व अद्ययावत उपकरणांची सोय प्रत्येक खोलीत आहे. प्रत्येक खोलीत इंटरनेट कनेक्शन दिलेलं आहे. त्यांना स्थानिक अथवा परदेशांतील मुलांशी, नातलगांशी बोलायची इच्छा झाली तर ‘कनेक्शन’ दिलेलं आहे. त्यांना स्थानिक अथवा परदेशांतील मुलांशी, नातलगांशी बोलायची इच्छा झाली तर त्याचा उपयोग होतो. इथे जवळपास प्रत्येक वृद्धासाठी एका कर्मचाऱ्याची सोय आहे. अतिवृद्ध व परावलंबी ज्येष्ठांसाठी स्वतंत्र केअरटेकर दिला जातो.
ज्येष्ठांचा ‘आस्था’तील दिवस कॉरिडॉरमध्ये बसवलेल्या म्युझिक सिस्टीममधील सुरेल सनईवादनाने सुरू होतो. सकाळच्या बेड टीनंतर कोणी कॉरिडॉरमध्ये मॉर्निग वॉक घेतात तर कोणी हलका व्यायाम करतात. प्रत्येक खोलीत स्वतंत्र बाथरूम आहे. शिवाय प्रत्येक मजल्यावर एक प्रशस्त बाथरूम आहे. अतिवृद्ध किंवा बिछान्याला खिळलेले वृद्ध यांना केअरटेकर स्ट्रेचरवरून किंवा व्हीलचेअरवरून तिथे आणतात व आंघोळ घालतात. त्यानंतर ज्येष्ठ स्वत:च्या मनाप्रमाणे वेळ घालवतात. एकमेकांशी गप्पा मारायला जातात. लायब्ररीत जाऊन वाचन करतात. पत्ते, कॅरम खेळतात भजनं म्हणतात. प्रोजेक्टरवर चित्रपट बघतात किंवा टीव्हीवरील कार्यक्रम बघतात. काही ज्येष्ठांसाठी फिजिओथेरपिस्ट येऊन त्यांचे रोजचे व्यायाम करून घेतात. नर्सेस प्रत्येकाला ठरलेल्या वेळी त्यांची औषधं देतात. दुपारचं जेवण, वामकुक्षी झाली की संध्याकाळी पुन्हा चहा व हलका नाश्ता होतो. त्यानंतर ज्येष्ठांना वेध लागतात गच्चीवरील मोकळय़ा हवेत फिरण्याचे! इथली संपूर्ण फरशी अ‍ॅन्टिस्कीड आहे. कॉरिडॉरमध्ये तळाला फ्लोअर लाइट्स आहेत आणि वर कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे एकटय़ा फिरणाऱ्या ज्येष्ठांवरही स्टाफची काळजीपूर्वक नजर असते. गच्चीवर जाण्यासाठी साध्या लिफ्ट आहेत. तशाच स्ट्रेचर लिफ्टसुद्धा आहेत, त्यामुळे सर्वच ज्येष्ठ या संध्याकाळी गच्चीवर रंगणाऱ्या मैफलीची वाट पाहत असतात. रात्री प्रत्येक ज्येष्ठ आपल्या इच्छेनुसार सूप, फळं, दूध किंवा पूर्ण जेवण घेतात.
 ज्येष्ठांना या वयात सर्वाधिक गरज असते. ती वैद्यकीय सोयी-सुविधांची! तातडीच्या औषधोपचारांची. ती इथे पटकन मिळते. ‘आस्था’कडे स्वत:ची रुग्णवाहिका आहे. त्यांचे ज्या हॉस्पिटलशी संपर्क आहेत तिथे ज्येष्ठांना हलवलं जातं. रोज दोन वेळा डॉक्टर व गरज पडल्यास स्पेशालिस्ट, फिजिओथेरपिस्ट हजर होतात.
‘आस्था’मध्ये पंचतारांकित सुविधा दिल्या जातात, मात्र त्याच प्रमाणात त्याचे शुल्कही आकारले जाते. ‘आस्था’मधील स्टाफ त्यांची देखभाल करतो. ते म्हणतात, ‘आमचं हे कुटुंबच झालं आहे. त्यांनी आम्हाला नातवंडं मानलंय आणि आम्हीही त्यांना आजी-आजोबाच म्हणतो. एका आजीला ऐकू येत नाही तर केवळ ओठांच्या हालचालीतून ती आमच्याशी छान गप्पा मारते. त्यांचे वय ऐंशी-नव्वद असले तरी बुद्धी तल्लख असते. आम्हाला लांबून पाहूनसुद्धा हात करून बोलावून घेतात. आम्हाला जुन्या आठवणी सांगत बसतात. फ्रिजरमधून किंवा कपाटातून गोळय़ा, चॉकलेट, पेढे काढून आठवणीने आमच्या हातांवर ठेवतात. आम्ही इथे सर्वाचे वाढदिवस, सणवार साजरे करतो. दहीहंडीसुद्धा फोडतो!’
 मीनल परांजपे सांगतात, ‘ज्येष्ठ कितीही चांगले वागले तरी प्रत्येकाचा वयानुसार हटवादीपणा असतोच. स्टाफला अनेकदा डोकं थंड ठेवून काम करावं लागतं. यासाठी तसंच ज्येष्ठांच्या अवस्था व व्याधीनुसार नीट सेवा व्हावी यासाठी सतत त्यांना प्रशिक्षण देतो. त्यांनाही मोकळं वाटावं यासाठी रांगोळी चित्रकला स्पर्धा घेतो. त्यांना बोअर होऊ नये म्हणून चित्रपट बघायला पाठवतो. बरेच वेळा एखादीशी आजी-आजोबांचं इतकं छान नातं जमतं की मग ते त्याच मुलीसाठी हट्ट धरून बसतात. यासाठी आम्ही त्यांच्या कामाचे मजले बदलतो. प्रत्येक ज्येष्ठांची शारीरिक अवस्था पाहून, त्यांचे वैद्यकीय अहवाल तपासून त्यांना कशा प्रकारे सांभाळावं याचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देतो. उदा. एखाद्या आजीला फ्रीझन शोल्डरचा विकार असेल तर तिची वेणी घालणं, तिला साबण लावणं, कपडे चढवणं यालाही मदत करतो. आम्ही ज्येष्ठांसाठी आमच्यापरीने सर्व सुखसोयी देत असलो तरी आम्ही त्यांच्या मुलांची जागा नाही भरून काढू शकत. त्यामुळे मुलं त्यांना भेटायला आली नाहीत तर त्यांना त्रास होतो. तेव्हा मुलांनी ज्येष्ठांना केवळ पंचतारांकित सुविधा न देता त्यांना थोडा वेळ देणं अत्यावश्यक आहे, असं मला वाटतं.’    

अथश्री ‘आस्था’
सव्‍‌र्हे नं. १३२/२
पाषाण बाणेर िलक रोड,
पाषाण, पुणे- ४११०२१
डॉ. विजय. आस्था कार्यालय
०२०-२ ५८६११३२
http://www.PSCL.in

Why MHADA will not build houses in high income group
म्हाडाकडून यापुढे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती नाही?
A 16 year old girl was raped by five people Nagpur
नागपूर: १६ वर्षीय मुलीवर पाच जणांचा बलात्कार
should i file income tax
विश्लेषण : लगेचच आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नये?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा