संपदा वागळे

‘समाजाचा सर्वागीण विकास साधायचा असेल तर घराघरांत वेद-उपनिषदे पोहोचली पाहिजेत. त्यासाठी तू चारही वेदांचा अर्थ मराठीत लिहून तो प्रसिद्ध कर.’ ही गुरुआज्ञा पूर्ण करण्यासाठी डॉ. कुलकर्णी आजही दिवसातले आठ तास लिखाण करतात. ऋग्वेद व यजुर्वेद यांच्या अनुवादानंतर येत्या फेब्रुवारीत ९८ व्या वर्षांत पदार्पण करत असताना त्यांचं सामवेद व अथर्ववेदाच्या अनुवादाचं कामही पूर्ण होत आहे. वयाच्या या टप्प्यावर एकटय़ाने स्वावलंबी आयुष्य जगणाऱ्या डॉ. भीमराव कुलकर्णी यांच्याविषयी.

Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
Loksatta anvyarth Muslim students beaten up in Savitribai Phule University Pune
अन्वयार्थ: विद्यापीठांतला राजकीय हेका
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

तत्त्वज्ञ आणि उदासीन

बहुश्रुत आणि सज्जन

मंत्री आणि सगुण

नीतिवंत॥

समर्थ रामदास म्हणतात, ‘वेदांमधील सर्व तत्त्वं आणि महावाक्यं यांचा सम्यक अभ्यास असूनही ते मिरवण्याची हौस नाही. विविध विषयांची जाण आहे; परंतु त्याचा अजिबात गर्व नाही, असा महंत सज्जन मानावा.’ ही व्याख्या डोंबिवलीतील डॉ. भीमराव कुलकर्णी या ९७ वर्षीय साधकाला तंतोतंत लागू पडते.

जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयात ४६ र्वषे शिकवून निवृत्त झाल्यावर त्यांनी गेली ३३ र्वषे वेदांच्या मराठी अनुवादाच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे. यातील ऋग्वेदाच्या १०५४० ऋचांचे ५ खंड २००८-०९ मध्ये तर यजुर्वेदाच्या २५०० ऋचांचे २ खंड २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेत. येत्या फेब्रुवारीत डॉ. कुलकर्णी ९८ व्या वर्षांत पदार्पण करतील. त्याआधीच त्यांचं उर्वरित वेदांच्या (सामवेद व अथर्ववेद) अनुवादाचं काम पूर्ण होईल.

डॉ. कुलकर्णी आजही दिवसातले आठ तास लिखाण करतात. हस्ताक्षर म्हणजे मोत्याचे दाणे. अनुवाद करताना प्रथम वेदातील ऋचा देऊन त्याखाली त्यातील संस्कृत शब्दांच्या अर्थासह भाषांतर व शेवटी आजच्या परिस्थितीनुरूप त्यावर भाष्य या त्यांच्या सूत्रामुळे वाचकांना र्सवकष ज्ञान मिळतं. त्यांची पत्नी सहा वर्षांपूर्वी निवर्तली. दोन्ही मुलं सुविद्य व सुस्थितीत असूनही त्यांच्या आग्रहाला बळी न पडता ते डोंबिवलीतील आपल्या घरी एकटे राहतात. कारण त्यांना मनन- चिंतन- लेखन करण्यासाठी एकांत हवा असतो. सकाळी चार वाजता गजर न लावता त्यांना जाग येते. तेव्हापासून रात्री साडेनऊला अंथरुणाला पाठ टेकेपर्यंत ते त्यांच्या कामात व्यग्र असतात. जेवणासाठी डबा येतो. एखादा दिवस तो आला नाही तरी त्यांचे काहीही अडत नाही. कारण पोळी-भाकरीपासून सगळा स्वयंपाक ते आजही करू शकतात. तसंच दूध आणण्यापासून बिलं भरण्यापर्यंत कोणत्याही कामात त्यांना दुसऱ्याची मदत लागत नाही.

डॉ. भीमराव कुलकर्णी यांना वेदांच्या वाटेकडे वळवण्याचं श्रेय त्यांचे वाईच्या शाळेतील संस्कृतचे गुरुजी लक्ष्मण विष्णू गोटिखडीकर यांचं. अकरावीच्या परीक्षेत त्यांना संस्कृतमध्ये शंभरपैकी नव्याण्णव गुण मिळाले तेव्हा गुरुजी म्हणाले, ‘‘मनाशी एक खूणगाठ बांधून ठेव.. समाजाचा सर्वागीण विकास साधायचा असेल तर घराघरांत वेद-उपनिषदे पोहोचली पाहिजेत. त्यासाठी तू चारही वेदांचा अर्थ मराठीत लिहून तो प्रसिद्ध कर. तुला ते नक्की जमेल..’’ ही गुरुआज्ञा त्यांच्या मनावर एखाद्या वज्रलेपाप्रमाणे उमटली. त्यानुसार निवृत्तीनंतरचं आयुष्य याच कार्यासाठी समर्पित केल्यावर आता लवकरच ते गुरुवचनातून मुक्त होतील.

बोर्डाच्या परीक्षेत त्यांची ‘जगन्नाथ शंकरशेट’ स्कॉलरशिप एका गुणाने हुकली. पण ही कसर पुढे त्यांच्या नातवाने- कौस्तुभने भरून काढली. कौस्तुभ आज अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डल्लास येथे एका रुग्णालयाचा डीन आहे. डॉक्टरांची सर्वच नातवंडं उच्चशिक्षित आहेत, त्याबरोबर संस्कृतप्रेमीही आहेत.

ऋग्वेद व यजुर्वेद यांच्या अनुवादाचे सात खंड डॉ. कुलकर्णी यांनी स्वखर्चाने प्रकाशित केले. त्या ग्रंथांना एवढा प्रतिसाद मिळाला की, आज त्यांची एकही प्रत शिल्लक नाही. खर्च वजा करून उरलेले पैसे त्यांनी गरजूंना दान केले. हे काम सुरू असतानाच डोंबिवलीतील ‘विवेकानंद केंद्रा’च्या मराठी प्रकाशन विभागाने ‘नित्यपाठाची वैदिक सूक्ते’ हे संस्थेने आधीच प्रकाशित केलेलं पुस्तक सुधारून ते अर्थासहित पुन्हा लिहून देण्यासाठी गळ घातली. ते कामही डॉ. भीमराव यांनी आनंदाने व अर्थातच विनामोबदला केलं. मात्र आता राहिलेल्या वेद अनुवादांच्या प्रकाशनाची जबाबदारी दाजीशास्त्री पणशीकर यांनी स्वीकारल्याने ते निश्चिंत आहेत. हे काम हातावेगळं झाल्यावर पुढची दिशाही ठरलेली आहे. ‘दोन आरण्यकं’ (गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमात गेल्यावर दिनचर्या कशी असावी याचं मार्गदर्शन) व ‘दोन ब्राह्मणं’ (ज्ञानाच्या उपासकाने इतरांशी कसं वागावं) यांचा अनुवाद करणार आहेत.

२००४ ते २०१० ही सात वर्ष ते डोंबिवलीतील गणेश मंदिरात, पूजा-पाठ सांगणाऱ्या ब्राह्मणांना विविध विधींसाठी म्हटल्या जाणाऱ्या सूक्तांचा अर्थ शिकवायला जात होते. या विनामूल्य मार्गदर्शनाचा लाभ दीडशे ते दोनशे ब्राह्मणांनी घेतला आहे. डॉक्टरांच्या रक्तात संस्कृतभक्ती असली तरी त्यांच्या उदरनिर्वाहाचा विषय औषधशास्त्र होता. प्राध्यापैकी करतानाच त्यांची या शास्त्रातील दोन पुस्तकं प्रकाशित झाली. त्यातील ‘के.ई.एम. हॉस्पिटल फार्माकोपिया’ या औषधविषयक ज्ञानकोशाच्या आजवर आठ आवृत्त्या निघाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ सन्मानासह अन्य ३५ पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलंय. संस्कृतशी त्यांची नाळ जोडलेली असली तरी आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलेलं राहण्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या देखभालीचा डिप्लोमा घेतला. त्यामुळे टीव्ही, मोबाइलसह सर्व घरगुती उपकरणांची दुरुस्ती ते स्वत: करतात. शाळेत असताना सुतारकाम हा विषय अभ्यासाला असल्याने या आवडीतून घरातली पुस्तकांची लाकडी कपाटं त्यांनी स्वत: बनवलीत. वयाच्या नव्वद-ब्याण्णवाव्या वर्षांपर्यंत ते एका वेळेला ५० बठका व तितकेच जोर काढत होते. आता ते जमत नाही, पण वाईला धाकटय़ा भावाकडे गेल्यावर सायकलने गावात भटकणं आणि कृष्णेच्या पाण्यात पोहणं झाल्याशिवाय त्यांचा पाय आजही निघत नाही. त्यांना प्रवासाचीही आवड आहे. त्यासाठी कुठल्याही वाहनाने जाणं त्यांना आवडतं आणि झेपतं. आज शतकपूर्तीला तीन वर्ष उरली असताना त्यांच्या मनात कृतकृत्यतेची भावना आहे. गुरुवचनासाठी केलेल्या ज्ञानयज्ञाची आता सांगता होत आहे, यापेक्षा आनंद तो कोणता?

(सदर समाप्त)

शब्दांकन – संपदा वागळे

waglesampada@gmail.com

chaturang@expressindia.com