कनकदास विद्वान दार्शनिक व्यासरायांचा शिष्य होता. त्यानं पदरचनेप्रमाणेच ग्रंथरचनाही केली आहे. कनकदासांची पदं जनसामान्यांमध्ये रुजलेली आहेत. समाजाच्या अगदी तळापर्यंत झिरपलेली आहेत किंवा खरंतर असं म्हटलं पाहिजे, की त्या तळातूनच ती वर आलेली आहेत.

कशासाठी, कशासाठी टिचभर पोटासाठी
धडुतं नि भाकरीच्या कोरभर घासासाठी
हातामधे एकतारी, गोड वाजे तानपुरा
वारवधूसारखेच नाचणे हे पोटासाठी
जटाधारी साधू, जोगी, जंगम हे, संन्यासी
नाना वेश घेतलेले पोटासाठी, पोटासाठी

ही अशी पदं लिहिणारा कनकदास हा कर्नाटकातला एक प्रसिद्ध भक्तकवी. पुरंदरदासासारखीच फार मधुर आहेत त्याची पदं. जनसामान्यांमध्ये रुजलेली आहेत. समाजाच्या अगदी तळापर्यंत झिरपलेली आहेत किंवा खरंतर असं म्हटलं पाहिजे, की त्या तळातूनच ती वर आलेली आहेत.

बारावं शतक ते सतरावं शतक. सहाशे वर्षांच्या या काळात भारतभर झालेला वेगवेगळय़ा संतांचा, भक्तांचा आणि भक्तिसंप्रदायांचा उदय हा एक चमत्कारच होता. अस्थिरता, असुरक्षितता आणि अज्ञान यांच्या गलबल्यातून स्थिरतेकडे, सुरक्षिततेकडे आणि खऱ्या ज्ञानाकडे जाण्याच्या वाटा ‘दाखवणारे’ या काळात चहू दिशांनी पुढे आले. समाजाच्या तळातून वर आले. आपापल्या समूहाची बोली बोलत पुढे आले. अगदी मोजके पंडित होते, विद्वान होते, ग्रंथवाचन, लेखन करणारे होते, पण बाकी बहुतेक जण रूढार्थानं अशिक्षितच होते. भाषा वेगळी, प्रदेश वेगळे, काळ वेगळा आणि व्यक्तिगत आयुष्यही वेगवेगळे.

त्या सगळय़ांमध्ये समान होतं ते जातिभेद-धर्मभेदांच्या पलीकडे जाणारं माणसाविषयीचं प्रेम आणि देशभाषांमधलं कळकळीचं बोलणं- गाणं. समान होती सहृदयता, साधेपण आणि समान होतं जगण्यातून वर आलेलं तत्त्वज्ञान. भक्तीच्या एका सूत्रात समाज बांधण्याचे त्यांचे उमाळे नैसर्गिक होते. समाजातल्या प्रत्येक विपरीताविषयीची, अनिष्टाविषयीची त्यांची चीड स्वाभाविक होती आणि सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाची त्यांना वाटणारी तळमळ अकृत्रिम होती.
ईश्वरभक्तीची साधी-सोपी रीत या संतांनी लोकांना सांगितली. नामस्मरण, कीर्तन आणि गाणं! कितीएक संत तर गात गातच ईश्वराला मिळाले. सूरदास आणि त्यागराज, मीरा आणि आंदाळ, कबीर आणि दादू-कनकदास त्यांच्यापैकीच एक होता.
म्हणतात, की कनकदास धनगरांमधून आला होता. पण कोळी आणि कुरूबही त्याच्यावर हक्क सांगतात. कनकदासाच्या आयुष्याचं हे सार्थकच म्हणायचं का? पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात त्याचा जन्म झाला असं मानलं जातं. तो शंभर वर्षांहून अधिक जगला, असंही मानलं जातं. तो मोठय़ा घरातला मुलगा होता. त्याचे वडील बीरप्पा हे विजयनगरच्या राज्यात सेनानायक म्हणून मोठय़ा अधिकारपदावर होते. अठ्ठय़ाहत्तर खेडी त्यांच्या अधिपत्याखाली होती. त्यांचं गाव होतं धारवाडजवळचं बाड नावाचं गाव. कनकदास हा वेंकटेश्वराच्या कृपेनं त्यांना झालेला मुलगा. त्याचं मूळचं नाव थिम्मप्पा. मोठय़ा लाडाकोडात वाढला तो. त्याला वीरोचित असं युद्धशास्त्राचं शिक्षण मिळालं. साहित्य आणि इतर कला आणि शास्त्रं तो शिकला. कन्नडबरोबरच संस्कृतही त्याला उत्तम अवगत झालं.

तो थिम्मप्पाचा कनकदास कसा झाला याची कथा मोठी रोचक आहे. त्याला त्यांच्या शेतात जमिनीत पुरलेले सोन्यानं भरलेले सात हंडे सापडले. एवढं सोनं मिळालं. लोकांमध्ये लगेच ही वार्ता पसरली. लोक त्याला कनकदास म्हणू लागले. पण कनकदास हे नाव त्याला शोभलं नाही. तो त्या कनकाचा दास होण्याइतका लोभी नव्हताच. त्यानं ते सगळं सोनं लोकोपयोगी कामांमध्येच कारणी लावलं. शिवाय कानिगेले नावाच्या बाडजवळच्याच गावी त्यानं बाडच्या अधिष्ठात्या देवाचं- आदिकेशवाचं देखणं मंदिर उभारलं. तो कनकदास न ठरता कनकनायक ठरला.

मात्र या कनकनायकाचं आयुष्य पुढं कनकाच्या संगतीत सुखानं काही गेलं नाही. त्याचे वडील गेले, आई गेली, प्रिय अशी पत्नीही गेली. मन संसारातून मोकळं झालं. एका युद्धात त्यानं भाग घेतला आणि तो प्राणांतिक जखमी झाला. तेव्हापासून ऐहिकापासून दूर होत तो त्याच्या आदिकेशवाकडे हळूहळू सर्वार्थानं वळला.
आदिकेशवाची मुद्रा त्यानं आपल्या पदांमध्ये सगळीकडे वापरली आहे. तो त्याचा परम देव होता. त्याची सर्व रूपं त्याला प्रिय होती. त्याला आळवण्यासाठी शेकडो पदं त्यानं रचली. कन्नड साहित्यात त्यांना स्वतंत्र स्थान मिळालं.
कन्नड साहित्याच्या हजार वर्षांच्या इतिहासात दोन मोठे प्रवाह दिसतात. एक बाराव्या शतकात निर्माण झालेल्या वीरशैवांच्या वचनसाहित्याचा आणि दुसरा पंधराव्या शतकात निर्माण होऊन पुढे पाच शतकं गाजत राहिलेला हरिदासांच्या दाससाहित्याचा. विजयनगरचं वैभवशाली साम्राज्य नष्ट झाल्यावर निराशेची एक छाया जनमनावर दाटून आली. धर्म मठ-मंदिरांमध्ये बंदिस्त, उच्चवर्णीयांकडे ज्ञानाची मिरास आणि सर्वसामान्य प्रजा संभ्रमित, अगतिक आणि हताश. अशा वेळी संतांनी कर्नाटक भूमीवर भक्तीच्या क्षेत्रात नवं आंदोलन घडवलं. शंकराचार्य, रामानुजाचार्य आणि मध्वाचार्य हे या आंदोलनातले तीन प्रमुख दिशादर्शक होते.

मध्वाचार्याच्या द्वैती तत्त्वविचार परंपरेत स्वर्णवर्णतीर्थ, श्रीपादराज, व्यासराय असे तीन यती होऊन गेले. हे यती संस्कृतविद्येत पारंगत होते. संस्कृतात ग्रंथरचना करणारे होते. या यतींसारख्या विद्वानांची परंपरा ती व्यासकूट परंपरा म्हणून ओळखली जाते आणि पुरंदरदास, कनकदासांसारखे जे लोकभाषेत रचना करणारे होते, मठाधीश नव्हते, विद्वान किंवा संन्यासी नव्हते, ते दासकूट परंपरेतले म्हणून ओळखले जातात.
कनकदास दासकुटांपैकी एक होता. तो विद्वान दार्शनिक व्यासरायांचा शिष्य होता. संगीताचं त्याला उत्तम ज्ञान होतं आणि त्यानं पदरचनेप्रमाणेच ग्रंथरचनाही केली आहे. मोहनतरंगिणी, नलदमयंती आख्यान, हरिभक्तिदास अशा त्याच्या ग्रंथांना त्याच्या शेकडो संकीर्तनांप्रमाणेच प्रसिद्धी मिळाली आहे, पण कनकदासाची खरी भावाभिव्यक्ती विचारांचा हात धरून ज्या रचनेच्या रूपानं झाली आहे ती रचना म्हणजे ‘रामधान्य चरित्र!’

रामकथा सांगता सांगता कनकदासानं एक अपूर्व प्रसंग रामकथेत नव्यानं निर्माण केला आहे. रावणवधानंतर अयोध्येला परतताना राम जेव्हा गौतमऋषींच्या आश्रमात आला आणि जेव्हा ऋषींनी त्याच्या भोजनाची व्यवस्था केली, त्या वेळी त्यांनी विविध धान्यांची स्तुतीही केली. ‘माडुआ’ म्हणजे नाचणीची त्यांनी केलेली स्तुती ऐकून ‘धाना’ला राग आला. मात्र अखेर राघवाने नाचणीचीच निवड केली. तेव्हापासून माडुआ किंवा नाचणी हे धान्य राघवाची म्हणून ‘रागी’ या नावानं ओळखलं जाऊ लागलं.
नाचणी हे गरिबांचं धान्य. बहुजनांचं धान्य. ‘धाना’ला प्रतिष्ठा उच्चवर्णीय समाजानं दिली. या दोन धान्यांचा प्रतीकात्मक संघर्ष कनकदासानं उभा केला आणि शेवटी राघवानं रागीलाच न्याय दिला. आपलं म्हटलं. तेव्हा एक प्रकारे त्यानं उपेक्षितांना, वंचितांनाच न्याय दिला, असं म्हटलं पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रत्यक्ष आयुष्यातही कनकदासाच्या देवानं त्यालाच न्याय देऊन आपलं म्हटल्याची एक गोड कथा आहे. कथा अशी आहे, की तो उडपीच्या श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला गेला तेव्हा त्याच्या जातीला अनुसरून मंदिरप्रवेश नाकारला गेला. कनकदास अतीव व्याकूळ झाला आणि देवमंदिराच्या मागच्या बाजूला भिंतीत असलेल्या लहानशा फटीपाशी उभं राहून भावव्याकूळ असा गात राहिला. देवाला दर्शन देण्यासाठी विनवत राहिला. आश्चर्य असं, की पूर्वेला महाद्वाराकडे तोंड करून उभा असलेला कृष्ण त्याच्यासाठी पाठीकडे वळला आणि पश्चिमाभिमुख झाला. तो चमत्कार सर्वत्र पसरला. कनकदासाच्या भक्तीला प्रत्यक्ष ईश्वरानंच प्रतिसाद दिला.
आजही उडपीच्या कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या मागच्या भिंतीत एक लहानसा झरोका-कनकनकिंडी तिथं आहे. संपूर्ण भारतीय साहित्यात बहुजन समाजाच्या भक्तांनी देवाला अभिमुख केल्याचं आणि नवं दार, नवी खिडकी उघडून धरल्याचं ते प्रतीक आहे, असंच म्हणायला हवं.
aruna.dhere@gmail.com