01 June 2020

News Flash

मनातलं कागदावर : खांद्यावरचा पदर आणि पर्सही

एकेकाळी कचरावेचक असलेली माया जिद्दीने शिक्षण घेऊन अंगणवाडी सेविका झाली. बचतगटाच्या कामातही सक्रिय झाली

(संग्रहित छायाचित्र)

अलकनंदा पाध्ये

एकेकाळी कचरावेचक असलेली माया जिद्दीने शिक्षण घेऊन अंगणवाडी सेविका झाली. बचतगटाच्या कामातही सक्रिय झाली. बचतगटाचे व्यवहार, बैठकांचे व्यवस्थापन, हिशेबाचे व्यवहार बघू लागली. वस्तीतील गैरमार्गाकडे, व्यसनांकडे वळणाऱ्या रिकामटेकडय़ा मुलांचा गट बनवून त्यांच्यासाठी तिने काम सुरू केले. बैठकीत माझ्याकडे येत थोडं लाजतच तिनं विचारलं, ‘‘ताई मला तुमच्यासारखी साडीला खांद्यावर पिन लावून द्याल का?’’

मी पिन लावून दिली. तो लांबलचक खांद्यावरून न हलणारा पदर मजेत खेळवणाऱ्या आणि खांद्याला पर्स लावून कार्यमग्न झालेल्या मायाविषयी कौतुकच दाटून आलं.

अलीकडेच माया बचतगटाच्या कामासाठी आमच्या केंद्रामध्ये आली होती. खांद्यावरच्या पर्समधून हिशेबाचे कागद काढून ती तपशीलवार हिशेब समजावून देत होती. तिच्याकडे पाहताना माझ्या नजरेसमोर एकेकाळची पदराआड तोंड झाकून, शब्द जुळवून, घाबरत बोलणारी माया आली..

वस्तीतल्या कचरावेचक स्त्रियांना बचतगटाचे महत्त्व सांगायला आम्ही तिथे गेलो, की हमखास त्या गायब झालेल्या असत. तिथली आमची कार्यकर्ती त्यांना कुठूनतरी शोधून आमच्या समोर आणून बसवत असे. मारूनमुटकून आलेल्या त्या बायकांच्या चेहऱ्यावरचा कंटाळा स्पष्ट दिसत असे. आम्ही त्यांना कर्ज घेताना काटेवाल्याकडून होणारी त्यांची फसवणूक, बचतीचे महत्त्व, वगैरे नेटाने सांगण्याचा प्रयत्न चालू ठेवायचो. पण मुळात दिवसभराच्या मेहनतीनंतर हाती आलेले पैसे रोजच्या खाण्यात खर्च झाल्यावर शिल्लक ठेवायला पैसेच नाहीत तर बचत काय कपाळाची करणार हा त्यांचा प्रश्नही बिनतोड असायचा. माया त्यातलीच एक होती.

परंतु हळूहळू आमच्या प्रयत्नाला थोडे यश येऊ लागले. त्या वस्तीत दोन बचतगट तयार झाले. एकदा त्यांच्या प्रशिक्षणाच्या वर्गात ‘तुम्हाला आयुष्यात काय व्हायला आवडले असते? किंवा काय व्हायचे होते.’ असा प्रश्न विचारल्याक्षणी, ‘‘मला मास्तरीण होऊन शाळेत शिकवायचे होते,’’ असे मायाने सर्वप्रथम हात उंचावून उत्तर दिले. मी चमकून तिच्याकडे पाहिले. ‘होय ताई मला हे काम कधीच करायचे नव्हते.’ तिचे ठाम उत्तर. खूप कौतुक वाटले तिचे मला. वर्ग संपल्यावर मायाशी एकटीशी बोलताना समजले, की तिच्या लहानपणी, ती सातवीत असताना पडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी मायाचे कुटुंब गावातून मुंबईत स्थलांतरित झाले. जगण्याच्या धडपडीत खाणारे एक तोंड कमी करण्याच्या हेतूनेही असेल कदाचित पण आल्या आल्या समाजातल्याच एका बांधकाम मजुराबरोबर तिचा पाटही लावला गेला. संसाराची सुरुवात झाली आणि शिक्षणाला पूर्णविराम मिळाला. पुढे अचानक नवऱ्याचा बांधकामाच्या जागी अपघाती मृत्यू झाल्यावर म्हातारी सासू आणि दोन मुलांची जबाबदारीही तिच्यावरच अक्षरश: कोसळली. हातावर पोट असणाऱ्या त्या कुटुंबाची, खास करून पोरांची उपासमार होऊ लागली. तेव्हा मात्र अर्धशिक्षित मायाला हातपाय हलवण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

एके दिवशी माया मनाचा हिय्या करून शेजारणीबरोबर नव्या मुंबईत कचराकुंडीवर कचरा वेचायला पहाटे घराबाहेर पडली. आयुष्यात नवऱ्याच्या सोबतीशिवाय केलेला लोकलमधला प्रवास, बाहेरच्या जगाचे दर्शन, पशांचा हिशोब, सारे सारे तिला नवीन, भांबावून टाकणारे. कचराकुंडीवरची दरुगधी, त्यामुळे होणारी डोकेदुखी, कचरा चिवडताना त्यातील पत्र्यामुळे, काचांमुळे हाताला होणाऱ्या जखमा, तासनतास ओणवून काम केल्याने पाठीला लागलेली रग. सगळंच यातनादायी. अनेक वेळा तिथून दूर पळून जाण्याची अनावर इच्छा होई, परंतु मुलांचे भुकेजले चेहरे डोळ्यासमोर येत आणि हात मुकाटय़ाने कचरा वेचू लागत. नाही म्हणायला या काळ्या ढगालाही एक रूपेरी किनार होती. बकाल वस्तीत राहूनही मुले अभ्यासू होती आणि सुनेच्या कष्टाची जाण ठेवणारी सासू मुलांकडे, घराकडे व्यवस्थित लक्ष देत होती. माया कधी फुरसतीच्या क्षणी मुलांच्या पुस्तकातील धडे जमतील तसे वाचायचा प्रयत्न करी. कितीतरी कविता तिला तोंडपाठ होत्या. त्या म्हणताना ती मनाने गावातल्या शाळेत पोचायची. कितीतरी वेळ त्या पुस्तकांवरून नुसतीच हात फिरवत रहायची.

मायाची कथा ऐकल्यावर तिची शिक्षणाबद्दलची असोशी पाहून आम्ही तिला बाहेरून दहावीची परीक्षा द्यायला सुचवले. शिवाय पास झाल्यास तिला अंगणवाडी सेविका होता येईल वगैरे संधी सुचवल्यावर तिच्या कानावर तिचा विश्वासच बसेना. परीक्षेसाठी फॉर्म वगैरे भरायला, तसंच पुस्तकांची, थोडय़ा मार्गदर्शनाची सोय संस्थेने देऊ केल्यावर जिद्दी मायाने ते आव्हान स्वीकारलेच. सकाळी कचरा वेचण्याचे काम आणि त्यानंतर घरी परतल्यावर नेटाने मायलेकरांची अभ्यासाला सुरुवात होई. कारण तिचा मोठा मुलगाही त्याच वर्षी दहावीला होता. दिवसभराच्या कष्टानंतर वस्तीतल्या लाऊडस्पीकरच्या, भांडणतंटय़ांच्या कर्णकर्कश्श पाश्र्वसंगीतातच अभ्यास करून माया आपल्या लेकासोबत यशस्वी झाली. लेकाने महाविद्यालयासाठी अर्ज भरला आणि मायाने अंगणवाडी सेविकेच्या भरतीसाठी रीतसर अर्ज केला. मात्र बाहेरून दहावी झालेल्या मायाची प्रमाणपत्रं अवैध ठरवून मुलाखतीमध्ये तिला नाकारले गेले. आयुष्यभर अडथळ्यांच्या शर्यतीत धावणाऱ्या मायाने तेही आव्हान स्वीकारले. आपल्या प्रमाणपत्रांच्या वैधतेसाठी थेट मंत्रालयात जाऊन दाद मागितली आणि झगडून न्यायही मिळवला. मास्तरीण बनण्याचे मायाचे स्वप्न पूर्ण झाले आणि कचरा वेचण्याचे तिचे काम बंद झाले.

आयुष्यातल्या त्या कलाटणीनंतर तिच्या कर्तृत्वाला अक्षरश: धुमारे फुटू लागले. एकेकाळी बचतगटाच्या बैठका टाळणारी माया सकाळी अंगणवाडीचे काम संपल्यानंतर दुपारी बचतगटाच्या कामात सक्रिय झाली. अतिशय सराईतपणे ती बैठकांचे व्यवस्थापन, हिशेबाचे व्यवहार बघू लागली. आजकाल वस्तीतील गैरमार्गाकडे, व्यसनांकडे वळणाऱ्या रिकामटेकडय़ा मुलांचा गट बनवून त्यांना रोजगार देण्यासाठी, त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी, त्यांना पुन्हा परीक्षेला बसवण्यासाठी, स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिने काही काम सुरू केलेय, असे माझ्या ऐकण्यात आले होते. वस्तीतल्या लोकांना आता या ‘मायाताईं’चा आधार वाटतो.

मायाच्या चढत्या आलेखाच्या विचारात असतानाच तिच्या ‘‘ताई’’ या हाकेने मी विचारांतून बाहेर आले.

‘‘काय गं?’’ त्यावर थोडं लाजतच मायानं विचारलं, ‘‘ताई थोडी मदत करता..? मला ना तुमच्यासारखी साडीला खांद्यावर पिन लावून द्याल का? अजून तुमच्यासारखं नीट जमत नाही साडी नेसायला.’’ त्यासरशी मी उठून तिचा पदर व्यवस्थित लावून पिन लावून दिली. तो लांबलचक खांद्यावरून न हलणारा पदर कौतुकाने वारंवार खेळवताना ती स्वत:शीच खुदुखुदु हसत होती. न राहवून अखेर  विचारलं, ‘‘काय मायाबाई, आज भलत्याच खूश दिसताय? काय विशेष?’’

‘‘ताई, मी जेव्हा डोक्यावर गोणी लावून कचरा वेचायची ना, तेव्हा खांद्यावर पर्स लटकावून पदराचा पट्टा फडकावत जाणाऱ्या तुमच्यासारख्या बायकांकडे पाहून माझ्या वेडपट अवताराची मला खूप लाज वाटायची. मी माझ्या परिस्थितीवर खूप चरफडायची. चिडून माझा हात डोक्यावरची गोणी हिसकवायलापण जायचा. मग दुसऱ्या घडीला डोकं थाऱ्यावर आणि पाय जमिनीवर यायचे. कदाचित तुम्ही हसाल ताई, पण साडीच्या पदराचा मोठा पट्टा काढायचा आणि खांद्यावर पर्स घेऊन फिरायची माझी लयी इच्छा होती. तुमच्या सर्वाच्या मदतीमुळे, आपल्या संस्थेमुळे पूर्ण झाली. त्याचा हा आनंद आहे. शिवाय आत्ता मला आमच्या विभागाच्या नगरसेवकांनी भेटायला बोलावलंय. ते कसल्याशा पुरस्कारासाठी माझी निवड करणार असं ऐकलंय. नक्की समजल्यावर सांगायला येईनच.’’ म्हणत खांद्याला पर्स लावून पदराला झटका देत माया आमचा निरोप घेऊन बाहेर पडलीसुद्धा.

खांद्यावर पर्स लटकावून आत्मविश्वासाने चालणाऱ्या पाठमोऱ्या मायाकडे पाहताना तिचा वाऱ्यावर फडफडणारा पदर मला तिच्या आयुष्यात जिंकलेल्या लढाईचा जणू यशोध्वजच वाटला!

alaknanda263@yahoo.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 12:15 am

Web Title: article on womens morden life abn 97
Next Stories
1 सूक्ष्म अन्नघटक : फॉस्फरस जीवनाचे ‘फ्लायव्हील’
2 विचित्र निर्मिती : हुबेहूब
3 ‘मी’ची गोष्ट : मी, एक राजहंस!
Just Now!
X