आशा भोसले

‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का..’ हे गाणं म्हणताना कदाचित मनाच्या या खोल गूढतेचा अर्थ माझ्याही मनाला कळून गेला असावा. म्हणूनच मला जर नकारात्मकतेने घेरलंच तर मी माझं मन दुसरीकडे रमवते. संध्याकाळ झाली की मनावर असे काळे ढग दाटून येतात. मग मी अशा त्रासाच्या आठवणी, कोणी गेलेल्याच्या आठवणी एका काळ्या गाठोडय़ात बांधते आणि एका काळ्या कपाटात टाकून देते. ठरवते, की हे कपाट कधीच उघडायचं नाही. कारण गेलेली माणसं, गेलेला क्षण आपण कधीच परत आणू शकत नाही; पण त्याच्या आठवणींनी आपण येणारा क्षण मात्र दु:खात घालवत असतो. त्यामुळे आजच्या क्षणात आपल्या भोवतालच्या माणसांना आपण सुख देऊ शकतो, ते सुख आपण त्यांना भरभरून द्यावं.. बाकी हे जीवन

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
budh planet will make neechbhang rajyog these zodiac sign could be lucky
बुध ग्रहामुळे ५० वर्षांनंतर तयार होणार ‘नीचभंग राजयोग’; ‘या’ ३ राशींच्या लोकांना अचानक होऊ शकतो धनलाभ

सुंदर आहेच, म्हणूनच मी म्हणते, ‘या सुखांनो या..’

गाणं ही अशी गोष्ट आहे, जी आपल्या जगण्याला अर्थ देते, आधार देते. आयुष्यात येणाऱ्या सुखदु:खाच्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जायला शिकवते. म्हणूनच आज वयाच्या ८५ व्या वर्षीही मी आयुष्य भरभरून जगते आहे. आजही गाण्याच्या साथीने, रेकॉìडग्जमध्ये, मुलांच्या, नातवंडांच्या संगतीत माझा वेळ फार आनंदात जातोय. मी सतत गातच आलेय. या गाण्यांमुळेच माझ्या आयुष्यातल्या भल्याबुऱ्या प्रसंगांवर मात करू शकलेय. एवढं नक्की, की प्रत्येक अनुभवातून बाहेर पडताना मी नवा जन्म घेतला, नवं आयुष्य जगत राहिले.. आणि म्हणूनच आज माझं आयुष्य सुखाचं झालं आहे.

आज माझा मुलगा नंदू (आनंद), सून अनुजा, नातवंडं जानाई, रणजय आणि हेमंतची मुलं सगळी माझ्याबरोबर आहेत. त्यांच्यातच माझं विश्व आहे. आजही मी गात असते, रेकॉìडग चालू असतं. काही बंगाली, हिंदी भाषेतलीही गाणी असतात. माझा दिवस चांगला जातो. आजही माझे वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबईबरोबरच अगदी भारताबाहेरदेखील कार्यक्रम सुरू असतात आणि यात मला सगळ्यात आनंदाची किंवा समाधानाची गोष्ट वाटते ती म्हणजे सगळे कार्यक्रम ‘हाऊसफुल्ल’ होतात. एवढं प्रेम मला रसिकांकडून मिळतं जे मला नेहमी समाधानी ठेवतं. मला नेहमी वाटतं, जो दिवस येतो तो आपण जगावा. आपण जिवंत आहोत यासाठी देवाचे आभार मानावे आणि एवढीच प्रार्थना करावी की, ‘देवा, माझा आजचा दिवस तू आनंदात घालव आणि माझ्यामुळे इतरांना आनंद मिळू दे.’

माझी नातवंडं सध्या जीनिव्हाला शिकतायत. नात जानाई, आमच्या साताऱ्यातल्या ग्रामदेवतेच्या नावावरून तिचं नाव ठेवलंय; ती फार सुंदर गाते. पाच प्रकारची नृत्येही शिकते आहे. ती जेव्हा इंग्लिशमध्ये गाणं म्हणते तेव्हा ती त्या स्टाइलने गाते, मात्र आपलं शास्त्रीय संगीत म्हणताना ती अगदी आपल्या पद्धतीने गाते. मला या गोष्टीचं खूप कौतुक वाटतं. नुकताच माझा एक कार्यक्रम लंडनमध्ये झाला, तीही तिथे माझ्याबरोबर गायली; पण तिला या क्षेत्रात करिअर करायचं नाही. एक छंद म्हणून ती या कला जोपासते आहे. ती अर्थशास्त्र शिकत्येय आणि तिला त्यातच काही तरी करायचं आहे. नातवाला मात्र वकील व्हायचंय.

माझं माझ्या नातवंडांशी एक प्रेमळ, गमतीदार नातं आहे. भारतात आल्यानंतर माझ्या नातीला खरेदीला जायचं असतं आणि नातवाला जेवायला कुठल्या तरी नवीन जागी जाण्यात रस असतो. मी त्यांच्याबरोबर अगदी सिनेमालादेखील जाते. एक मात्र खरं, माझ्या दोन्ही नातवंडांना घरची ओढ आहे. ते नेहमी म्हणतात, ‘‘आम्ही जरी परदेशी शिकलो, मोठे झालो तरी आपल्या देशात येऊन नक्की राहणार.’’ आपण नेहमी बघतो, की आपल्या देशातले किती तरी तरुण शिक्षणासाठी म्हणून परदेशी जातात; पण एकदा तिथे गेल्यावर, तिथलं राहणीमान अनुभवल्यावर ही मुलं तिथेच स्थायिक होतात. अशा समाजात मोठं होऊनही माझ्या नातवंडांना आपल्या देशाची ओढ आहे, यात मला खरंच त्यांचा अभिमान वाटतो. कारण शेवटी त्यांच्यात आपले संस्कार भिनलेले आहेत हेच यातून सिद्ध होतं. हे सगळे संस्कार त्यांच्या लहानपणी त्यांना सांगितलेल्या गोष्टींतही होते. लहान असताना रात्री हे दोघेही झोपायचेच नाहीत, मग मी त्यांना गोष्टी सांगायचे. फक्त आपण पूर्वीपासून ऐकत आलेल्याच गोष्टी नव्हे तर मी त्यांना नवीन गोष्टी तयार करून सांगायचे. त्यांच्या वयाप्रमाणे मी त्यांना कधी रामाची, कृष्णाची, सिंदबादची अशा भरपूर गोष्टी सांगायचे. सून अनुजा मला गमतीने म्हणायचीसुद्धा, की आई, तुम्ही गोष्टींचं पुस्तकच का नाही लिहीत? मी तर त्यांना माझ्या सासूने मला सांगितलेल्या गोष्टीसुद्धा सांगत असे.

माझ्या सासूचं आणि माझं नातंही खूप प्रेमाचं होतं. तिचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी आहेत. मला असं वाटतं, की आपण जर चांगलं वागलो ना, तर सगळी नाती आपोआप प्रेमाची होतात. सासू-सुनेचंसुद्धा. माझं आणि माझ्या सुनेचं नातंही असंच आहे. म्हणजे आपल्याकडे सुनांसाठी वागण्याच्या काही गोष्टी ठरवून दिलेल्या असतात; पण मी माझ्या सुनेला स्वयंपाकघरात जबरदस्तीने  पाठवलं नाही. कारण मी सगळं करत होतेच. शिवाय घरात माणसं आहेतच कामं करायला. त्याऐवजी मी सुनेला म्हटलं, ‘‘तू बिझनेस बघ.’’ तिला स्वत:चा बिझनेस करायला मी मदत केली. खरं तर मी नशीबवान आहे की, मला सूनसुद्धा समजूतदार आणि एका समंजस कुटुंबात वाढलेली मिळाली. त्यामुळे ती समजून वागते. म्हणजे जर एखादवेळी माझी मन:स्थिती चांगली नसेल, तर ती गोष्ट लक्षात घेऊन ती माझ्याशी बोलते. आमचं नातं हे सासू-सून, आई-मुलगी याच्यापेक्षाही मत्रिणींचं आहे. मी सगळ्या गोष्टी तिला सांगते. मत्रीचं नातं हे अगदी निर्मळ असतं. आपण मत्रिणीवर रागावू शकतो, आपली चूक झाली तर माफी मागू शकतो, एकमेकांवर आपला विश्वास असतो. त्यामुळे असं हे मत्रीचं आमचं नातं मला खूप आवडतं. रोज सकाळी मी आणि अनुजा एकत्र चहा पितो, तेव्हा ती मला पेपर वाचून दाखवते. मग तिची कामं आटोपून ती संध्याकाळी घरी येते. परत आमच्या दिवसभराच्या गप्पा होतात आणि रात्री एकत्र जेवून आमचा दिवस संपतो.

टी.व्ही.वरच्या मालिकाही मी पाहते. त्यातल्या त्यात मी ‘सीआयडी’, ‘मेरे साई’, ‘म मायके चली जाऊंगी’, ‘पटीयाला बेब’, ‘लेडीज स्पेशल’ अशा काही मालिका आवर्जून  बघते. मजा म्हणजे कधी मी गावाला गेले, की माझ्या घरातल्या काम करणाऱ्या मुलींना सांगून जाते. मग मुली मालिका बघतात आणि मी परत आल्यावर त्यात काय घडलं ते मला सांगतात. या मुलींचं आणि माझं नातंही खूप मजेशीर आहे. मी त्यांना खूप रागावते, खूप बोलते; पण मी बोलल्यानंतर त्या हसत राहतात. एकमेकींना सांगतात, ‘काही मनावर घेऊ नकोस, राग निवळला की त्या लगेच येतील आपल्याशी बोलायला.’ म्हणजे त्यांचासुद्धा माझ्यावर इतका जीव आहे, की माझ्या रागावण्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होत नाही. कधी कधी मी त्यांना घराच्या बाहेरही काढते तेव्हा त्या हसत-हसत सांगतात, ‘हो चाललो आम्ही.’ माझ्या घरी तीन बायका आहेत कामाला, त्या नेहमी म्हणतात, ‘आमचं इथे छान चाललंय. इथे आम्हाला जितका आपलेपणा वाटतो तितका दुसरीकडे वाटत नाही.’ माझाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर आपण त्यांना आपल्या घरातल्यासारखं वागवलं, विश्वास ठेवला तर तीही चांगलीच वागतात. आपण कसे बोलतो त्यावर सगळं अवलंबून असतं. माझ्या आईवडिलांपासूनची ही शिकवण आहे. ती आजही मी पाळते.

साधारण ५-७ वर्षांपूर्वीपर्यंत मी खूपच बिझी असायचे. वयाच्या ८०  व्या वर्षांपर्यंत मी खूप काम केलं. तेव्हाही ‘प्रभुकुंज’मध्ये आणि मुलगा नंदूकडे असं दोन्हीकडे राहणं व्हायचं. तेव्हा दोन्ही घरं सांभाळा, गाण्याचे कार्यक्रम, रेकॉìडग या सगळ्यात माझा वेळ जायचा. आता मात्र मी आनंदकडेच राहते. काही थोडी रेकॉìडग असतात, कार्यक्रमही असतात; पण आयुष्याच्या या टप्प्यावर आता थोडा वेळ मिळतोय तो मी घरातल्यांबरोबर घालवते.

आजही मी अगदी नीटनेटकी राहते. खरेदी करायलाही मला खूप आवडतं. मनात येईल तेव्हा फिरायला, खरेदी करायला, सिनेमा बघायलाही जाते. छान साडय़ा, दागिने मला आजही घालायला आवडतात. मला वाटतं की, प्रत्येक माणसाने अगदी नेहमी प्रेझेंटेबल असावं. वय तर सगळ्यांचंच होतं; पण स्वत:ला सांभाळून आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं, काही काम असेल तर ते करत राहिलं, तर आपलं आयुष्य नक्कीच सुखकर होतं. तसं पाहिलं तर ‘सत्तरी-पंचाहत्तरीनंतर आरोग्याची काळजी घ्या,’ असं डॉक्टरांकडून नेहमी सांगितलं जातं; पण पहिल्यापासून दूध, तूप, दही, ताक या गोष्टी पुरेशा खाल्ल्यामुळे आज तब्येतीची तशी फारशी तक्रार नसते.

आजही सकाळी उठल्यानंतर मी रोज रियाज करते आणि तो अगदी कितीही तास चालतो. त्यामुळेच माझा आवाज टिकून आहे. कधी कधी तर रात्री १२ वाजताही वाटलं, झोप येत नाहीये तर मी तंबोरा लावून रियाजाला बसते, अगदी झोप येईपर्यंत. शिवाय घरातल्या कामातही माझं मन छान रमतं. मी आजही स्वयंपाक करते. रोजच्या स्वयंपाकातसुद्धा मी रोज नवीन काही तरी करत असते. मी बनवलेली खास कमी मसाल्याची बिर्याणी मुलांना खूप आवडते. शाही कबाब आवडतात. दोन-तीन प्रकारचं चिकन, माशाची बिर्याणी, कोळंबीचा रस्सा, मटणाचं लोणचं असे बरेच पदार्थ मी करते आणि त्यांना ते आवडतात. साधारणपणे सात दिवस सात प्रकार होतातच आमच्याकडे. त्यामुळे मुलांना जेवणात आजही वैविध्य मिळतं. मी केलेल्या पदार्थावरून प्रेरणा घेऊनच दुबईमध्ये ‘आशाज’ हे हॉटेल सुरू केल्याचं माझा मुलगा नेहमी म्हणतो. हॉटेल सुरू झाल्यावर मी तिथे जाऊन माझे कबाब, बिर्याणी असे पदार्थ तिथल्या शेफना शिकवले. आता त्याची १७ हॉटेल्स झाली आहेत. या वर्षी तो  अठरावं हॉटेल सुरू करतोय. नंदूच्या या    प्रगतीकडे  पाहूनही वेगळंच समाधान मिळतं.

माझं किती नाव आहे हे मला माहीत नाही; पण नंदू मात्र मला याची सतत जाणीव करून देत असतो, ‘आई, तू खूप मोठी आहेस.’ मी एकदा आजारी असताना वाकून-वाकून चालत होते तेव्हा त्यानं मला सांगितलं होतं, ‘‘आई, मी तुला पाहतोय तेव्हापासून तू अशी एकदम समर्थ, कडक बाई आहेस, ताठ मानेने चालणारी. आता तू अशी वाकलेली जर मला दिसशील तर मी घर सोडून जाईन. तू ताठच चालली पाहिजे.’’ कधीकधी आजारी असताना त्याच्या धाकानेच मी आजारातून उभी राहते. माझी तब्येत बरी नसेल तर मी त्याची फार चर्चा करत बसत नाही. गोळी घेते नि मोकळी होते. वय आहे म्हटल्यावर कधी तरी आजारपण येणारच. त्याचा फार बाऊ करत नाही मी!

एका गोष्टीचं समाधान वाटतं, की या वयात अनेक बायका उठून काही करू शकत नाहीत, पण मी माझं काम उत्तम करू शकतेय, गाऊ शकतेय. याचा आनंद वेगळाच आहे. आजही किचनमध्ये काम करताना, एकटी बसलेली असताना, एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेले असताना मी अनेक गाणी गुणगुणत असते. ‘केंव्हा तरी पहाटे..’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘गेले द्यायचे राहुनी’ किंवा ‘चांदण्यात फिरताना’ अशी माझी गाणी तर असतातच; पण कधी हेमंत कुमार, पंचम, मदनमोहन यांचीही गाणी गुणगुणते. हेमंत कुमार यांचं ‘ये नयन डरे डरे’ हे गाणं तर मला खूपच आवडतं. आजही कुणी भेटायला येतं तेव्हा जुन्या सगळ्या आठवणी, जुनी माणसं, सगळे गायक-संगीतकार, त्या गाण्यांच्या आठवणी निघतात तेव्हा खूप बरं वाटतं. एक समाधान निश्चितच वाटतं. १९४३ मध्ये मी गायला सुरुवात केली. चित्रपट क्षेत्रातच मला येऊन ७५ वर्षे झाली. वयाच्या दहाव्या वर्षांपासून मी गायला लागले. सगळ्या भाषांत मिळून जवळजवळ १३,००० गाणी मी गायले. अर्थात, ‘मी हे सगळं केलं’ असं मी म्हणत नाही. ‘माझ्या हातून घडलं’ असं मला वाटतं. त्यामुळे स्वत:चा मोठेपणा मी कधी मिरवला नाही. मला फक्त एवढं माहीत आहे, की मी चांगली बाई आहे. मी कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचे पैसे बुडवले नाहीत, कोणाला दुखावलं नाही आणि जर दुखावलं असेल तर मी लगेच माफी मागते. म्हणजे माझ्यापेक्षा लहान असलेल्या कोणाला जरी मी रागाच्या भरात काही बोलले तर मी लगेच ‘सॉरी’ म्हणते. माझं मन साफ असल्यामुळे ज्या चुकीच्या गोष्टी घडून गेल्या त्याचं वाईट वाटत नाही. माझ्या नशिबात जे होतं ते घडलं. नशिबाचे अनेक फटकेदेखील मला बसले आहेत. दोन मुलं गेल्याचं दु:ख आहे, पण तिसरा मुलगा अगदी जीव लावणारा आहे. मी आज उभी आहे तर फक्त त्याच्यामुळे. माझंच गाणं आहे, ‘देव जरी मज कधी भेटला’ हे गाणं माझ्या मुलांसाठी मलाही म्हणावंसं वाटतं.

माझा देवावर आणि नशिबावर खूप विश्वास आहे. जे व्हायचं असतं ते त्या-त्या वेळी होतंच असं मला वाटतं. माझ्या आयुष्यात एक फार वाईट प्रसंग आला होता. मी सिंगापूरला एका कार्यक्रमाला गेले होते आणि अचानक वर्षां गेल्याची बातमी आली. मी ताबडतोब निघून आले. त्या वेळी मी खूप दु:खात होते, त्रासात होते. माझी मन:स्थिती खूप बिघडली होती. त्या काळात मी माझ्याकडचं ‘गीतासार’ समोर ठेवलं आणि ते वाचायला लागले. त्यात लिहिलं होतं-

‘तू क्या लेके आया था और क्या लेके जायेगा, बिते हुए कल का अफसोस मत कर,

आने वाले कल की चिंता मत कर,

जो कुछ भी है आज का दिन तुम्हारे हाथ में है

वो भी तू मुझ पे छोड दे’

हे कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहेच. तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. अचानक एखादा २२ वर्षांचा मुलगा हार्टअ‍ॅटॅकने जातो. आपल्याला आश्चर्य वाटतं, की तो दारू पीत नव्हता, त्याला काही व्यसनं नव्हती तरीसुद्धा असं झालं; पण त्याची वेळ तेवढीच होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यालाही असंच जायचं आहे. कसं आणि कधी जायचं ते माहीत नाही, पण जायचं आहे हे पक्कं आपल्या मनात बसलं, की मग आपल्याला मरणाचीसुद्धा भीती वाटत नाही; पण असं वाटतं की, जेवढी संकटं आली ती आता पुरे. यापुढे आपल्या घरावर काही संकटं येऊ नयेत. आपल्या मनावर होणारे हे जे आघात असतात त्यातून आपल्याला स्वत:लाच सावरायचं असतं.

नशिबाचे हे आघात सहन करत असताना कधी कधी नराश्य येतं आणि नराश्य आल्याने काय होतं हे मी अगदी जवळून बघितलं आहे. माझ्या मुलीला आलेलं नराश्य मी पाहिलं होतं. म्हणून मी अशा विचारांना जवळ येऊच देत नाही. ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का..’ हे गाणं म्हणताना कदाचित मनाच्या या खोल गूढतेचा अर्थ माझ्याही मनाला कळून गेला असावा. म्हणूनच मला जर नकारात्मकतेने घेरलंच, तर मी माझं मन दुसरीकडे रमवते. मग मी खरेदीला जाते किंवा कोणाला तरी भेटते, पण या विचारांपासून लांब राहते. बऱ्याचदा संध्याकाळ झाली की मनावर असे काळे ढग दाटून येतात. मला ते कळायला लागतं. मग मी अशा त्रासाच्या आठवणी, कोणी गेलेल्याच्या आठवणी एका काळ्या गाठोडय़ात बांधते आणि एका काळ्या कपाटात टाकून देते.

मनाशी ठरवते, की हे कपाट कधीच उघडायचं नाही. तरीही जर आपण त्याच्याकडे खेचले जात आहोत असं वाटलं तर लगेच दूर जायचं. कारण गेलेली माणसं, गेलेला क्षण आपण कधीच परत आणू शकत नाही; पण त्याच्या आठवणींनी आपण येणारा क्षण मात्र दु:खात घालवत असतो. त्यामुळे आजच्या क्षणात आपल्या भोवतालच्या माणसांना आपण सुख देऊ शकतो, ते सुख आपण त्यांना भरभरून द्यावं. मी दु:खी झाले, रडले की माझी सून, मुलगा, नातवंडं सगळीच गंभीर होणार आणि आजूबाजूचं वातावरण त्यामुळे बिघडणार. म्हणून आलेला क्षण जगत जावं, असं मी मनाशी पक्कं ठरवलं आहे.

या सगळ्या अनुभवात ‘भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगिले की मज हसावे लागले’ हे मात्र मी माझ्या मनाला पक्कं समजावलं. वर्षां गेली तेव्हा घरातलं ते सगळं वातावरण अनुभवणं माझ्यासाठी अशक्य गोष्ट होती. त्या दिवशी मी रात्रभर त्या घरी थांबले आणि सकाळी माझ्या दुसऱ्या घरी आले. तिथे माझी नात माझ्या खोलीत आली आणि तिने मला विचारलं, ‘‘तू रडत्येयस का?’’ मी म्हटलं, ‘‘नाही बाळा..’’ तर ती म्हणाली, ‘‘अगं, आत्या नसली तरी काय झालं.. मी आहे ना तुला. मी आहे ना तुझी वर्षां..!’’ तो क्षण वेगळाच होता. तेव्हा मला वाटलं, ‘जुनी पानं गळतात आणि नवी पानं येतात आणि आपण त्यांचं कौतुक केलंच पाहिजे.’ मी त्यांना कधीच जाणवू दिलं नाही की घरात काही झालंय. मी अक्षरश: बाथरूममध्ये जाऊन रडत असे.. पण बाहेर आल्यावर त्यांना कळूसुद्धा देत नसे. आपल्यामुळे घरातलं वातावरण बिघडू नये याची काळजी मी नेहमी घेते. सगळ्या प्रसंगांतून वाट काढत मी नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जे काही घडतं त्यामागे देवाचा काही तरी विचार असतो, असं मी मानते. माझ्या संघर्षांच्या दिवसांत असंही झालंय, की काहींनी मला गाण्यासाठी बोलावलं नाही; पण आजही माझा त्यांच्यावर राग नाही. माझ्यासाठी एक दरवाजा बंद झाला तरी दुसरा उघडायचा.

माझे वडील म्हणायचे, ‘‘निकलते  हुए  सूरजकी लोग पूजा करते है. जब वही सूरज बीचमें आए तो कडी धूप से हा हा करते है और जब सूरज ढलने लगता है तो कहते है, अच्छा हुआ धूप कम हो गयी.’’ आयुष्यातही हे असंच असतं. प्रत्येकाचे दिवस असतात; पण आजही लोकांचं तेवढंच प्रेम मला मिळतंय याचं निश्चितच समाधान आहे.

नवीन गायक, खूप गुणी कलाकार येतायत. त्यांना आशीर्वाद , शुभेच्छा द्यायला मला नेहमीच आवडतं. मला जमेल तेव्हा टीव्हीवरचे गाण्याचे कार्यक्रमही मी बघते. फक्त या सगळ्याच गायकांनी आपली विद्यार्थ्यांची भूमिका सोडू नये. आता रिमिक्स केलं जातं त्यांना सांगावसं वाटतं की, ‘तुम्ही मूळ गाण्याची चाल बदलू नका. नवीन काळानुसार तुम्ही ताल बदला, वाद्य बदला, पण जी मेलडी आहे त्याला हात लावू नका.  लता मंगेशकरांची गाणी जेव्हा तुम्ही गाता त्या वेळेला तुम्ही विचार करा की, कुठल्या जमिनीवर पाय ठेवता आहात. एक जमीन असते तिथे देवसुद्धा पाय ठेवायला घाबरतात, पण मूर्ख माणूस त्या जमिनीवर उडी मारून उभा राहतो. आणि धडपडतो, तसं लता मंगेशकरची गाणी गाताना स्वत: किंवा त्यांचे रिमिक्स करताना विचार करा, की आपण काय करत आहोत. अर्थात नवीन चांगल्या गोष्टींचं अर्थातच नेहमी स्वागतच आहे. ते संगीताच्या क्षेत्रातही नक्कीच यावं.’

बाकी हे जीवन सुंदर आहेच, कारण मी नेहमीच ‘या सुखांनो या..’ असंच म्हटलंय. त्यामुळे माझ्या आनंदाच्या ‘स्वीट होम’मध्ये संध्याकाळच्या वेळी ‘स्वर उमटावे शुभंकरोती’ असंच वातावरण असतं. आज माझी सगळी माणसं, माझे संगीतकार, माझे सहगायक

आणि महत्त्वाचं म्हणजे माझे श्रोते यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे,  ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी..’

शब्दांकन : उत्तरा मोने

uttaramone18@gmail.com

chaturang@expressindia.com