डॉ. अनिल काकोडकर

निवृत्ती स्वीकारल्यावर मी तीन क्षेत्रे निवडली व त्यात कार्य करण्याचं निश्चित केलं- पहिलं म्हणजे ऊर्जा क्षेत्र, दुसरं शिक्षण क्षेत्र व तिसरं विज्ञाननिष्ठ समाजविकासाचं क्षेत्र. ही तिन्ही क्षेत्रं, राष्ट्राच्या प्रगतीची साधनं आहेत असं मला वाटतं. मी सेवा करत असताना जेवढा कार्यरत होतो, त्यापेक्षा अधिक प्रमाणात आता कार्यरत आहे. आपल्या सभोवतालानं आपल्याला खूप काही दिलं आहे, या सभोवतालाला परत काही देणं महत्त्वाचं आहेच.

जवळपास पंचेचाळीस वर्षे आवडीचे काम करून मी २००९ मध्ये सेवानिवृत्त झालो, तेव्हा माझं वय होतं सहासष्ट वर्षांचं. तसं सरकारी नोकरीत निवृत्तीचं वय असतं ६० वर्षे. पण, मी सहासष्टाव्या वर्षांपर्यंत काम करू शकलो, हा समाधानाचा भाग आहे. शास्त्रज्ञ आणि डॉक्टर लोकांना बासष्टाव्या वर्षांपर्यंत मुदतवाढ मिळते. अपवादात्मक परिस्थितीत सरकार चौसष्ट पूर्ण होईपर्यंत काम करण्याची संधी देतं. माधवन नायर आणि मला मात्र सहासष्टाव्या वर्षांपर्यंत देशसेवा करता आली.

मी नेहमीच संशोधन आणि विकासात लक्ष घातलं होतं. प्रत्येक वेळी नव्या कल्पना, नव्या विचारांना मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करत होतो. पुनरावृत्तीपर कार्य करण्याचा मला नेहमीच कंटाळा येतो. प्रत्येक वेळी एखादी नवी कल्पना स्वीकारणं, तिला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करणं, ते साकारल्यावर पुन्हा एकदा नव्या कल्पनेवर काम करणं हेच मला आवडतं. अर्थात हे करत असताना तो खटाटोप एकटय़ा दुकटय़ाचा नसतो, त्यामागे व त्यासोबत एकाच झपाटलेल्या वृत्तीने काम करणारे अनेक हात, अनेक मनं असावी लागतात. अशा झपाटलेल्या मनांबरोबर काम करत असताना मजा येत असे, आनंद मिळत असे. हा आनंद मला पुरेपूर मिळाला.

निवृत्ती स्वीकारल्यावर मी तीन क्षेत्रे निवडली व त्यात कार्य करण्याचं निश्चित केलं- पहिलं म्हणजे ऊर्जा क्षेत्र, दुसरं शिक्षण क्षेत्र व तिसरं विज्ञाननिष्ठ समाजविकासाचं क्षेत्र. ही तिन्ही क्षेत्रं, राष्ट्राच्या प्रगतीची साधनं आहेत असं मला वाटतं. त्यामुळे, कोणी मला विचारलं की, ‘एखाद्या संस्थेचा सभासद हो’, ‘मार्गदर्शक हो’ किंवा त्या ‘संस्थेचा सहप्रवासी हो’, तर त्या संस्था ही तीन क्षेत्रं डोळ्यांसमोर ठेऊ न कार्य करत आहेत की नाहीत ते मी तपासून बघतो व मगच त्यांच्या कार्यात सहभागी होण्याविषयी निर्णय घेतो. परिणामी ज्या संस्थांशी मी संलग्न आहे, त्या संस्था विभिन्न क्षेत्रांत कार्यरत जरी असल्या तरी व्यापक दृष्टिकोनातून पाहता त्यांच्यात साधम्र्य आहे, त्यांच्यात सक्षम समाजनिर्मितीचा समान धागा आहे. मी सेवा करत असताना जेवढा कार्यरत होतो, त्यापेक्षा अधिक प्रमाणात आता कार्यरत आहे.

अपारंपरिक ऊर्जास्रोत हा माझ्या विशेष चिंतनाचा भाग आहे. सौरऊर्जा व अणुऊर्जा अधिक प्रमाणात वापरली जावी याविषयी मी काम करतो आहे. मी आण्विक शक्तीवर काम करत असतानाही सौरऊर्जेचा अभ्यास करत होतो. त्यामागे एक छोटीशी कथा आहे. ‘ओएन्जीसी’चे प्रवर्तक डॉ. एन. बी. प्रसाद हे त्यावेळी बीएआरसीमध्ये होते. डॉ. भाभांनंतर त्यांचं नाव होतं. अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजमध्ये माझा व त्यांचा परिचय झाला होता. त्यांनी मला एकदा विचारलं, ‘‘तू सौरऊर्जेवर का काम करत नाहीस? ’’ मी उत्तर दिलं, ‘‘सर, मी एक डिझाइन व त्याचा प्रस्ताव तयार करून त्या खात्याकडे पाठवला, पण त्यांचं उत्तर आलं नाही. मग तो विषय मनाआड केला.’’ प्रसाद म्हणाले, ‘‘ते खर्च करत नाहीत, तर मग आपण करू या.’’ ‘‘सर, ते कसं शक्य आहे. ते त्यांचं काम आहे, त्यांनाच खर्च करू द्या.’’ ते हसले, ‘‘असं वाटायचं काही कारण नाही, अनिल, सौरऊर्जा हे अणुऊर्जेचं एक रूप आहे.’’ हवामान बदलाच्या प्रश्नांची तीव्रता लक्षात आल्यानंतर जगभरातील संशोधकांचं लक्ष सौरऊर्जेकडे वळलं. हा विषय पुढे नेताना माझं ठाम मत इथं व्यक्त करतो, की जर भारतानं सौरऊर्जा व अणुऊर्जा यांचा व्यवस्थित ताळमेळ घातला व योग्य ती खबरदारी घेतली तर भारताच्या ऊर्जेसंबंधीच्या गरजा पूर्ण होतील. याचं कारण, हे दोन्ही साठे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत व परस्परांना पूरकही आहेत. सध्या या गोष्टीवर मी अधिक लक्ष केंद्रित केलं आहे.

जर आपण ग्रामीण भागात शिक्षण पाझरवू शकलो व त्यातून विज्ञाननिष्ठ समाजाची उभारणी करू शकलो तर आपला देश मोठय़ा प्रमाणात प्रगती करू शकतो, यावर माझा विश्वास आहे. जेव्हा मी काही उद्देश ठेवून गावोगाव फिरतो, तेव्हा मला या गोष्टीची निकड जाणवते. तरुण मनांशी संवाद साधायला मला आवडतं, तो मी साधतोही.

माझा दिवस दररोज सकाळी साडेसहा-सातच्या दरम्यान सुरू होतो व रात्री अकरा-साडेअकरापावेतो चालत राहतो. सकाळी उठल्यावर पहिला विचार मनात येतो, तो म्हणजे आज दिवसभरात जी कामं करण्याचं म्हणून आपण योजलं आहे त्यांचा मनात आढावा घेऊन नियोजन करणं, सर्व आवरून, आलेल्या ई-मेलना आवश्यकतेनुसार उत्तरं देणं; देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वरील तिन्ही क्षेत्रांत कार्यरत असणारे विविध गट आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी पाठवलेले अहवाल वाचून प्रतिक्रिया देणं; समित्यांच्या अहवालांवर भाष्य करणं अशी कामं दिवसाच्या पहिल्या टप्प्यात मी करतो. नंतर दिवस नीट पार पडतो. दिवसातला प्रत्येक क्षण हा उपयोगी पडावा या हेतूने आम्ही काम करतो.

आमचं काम उद्दिष्टांनुसार चालतं. संशोधन व व्यवस्थापन हातात हात घालून चालणं आवश्यक असतं. मी या दोन्ही घटकांना समान महत्त्व दिलं आहे. ध्रुव रिअ‍ॅक्टर उभा करणं, पोखरण अणुचाचण्या घडवणं आदी कार्य करत असताना हे सारं सांभाळण्याचा आम्ही प्रयत्न केला. व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहेच. माणसांच्या वृत्तीचंही व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. तुम्ही एखादं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन काम करायला प्रारंभ करता, त्यावेळी सर्वच माणसं तुमच्याशी सहमत असतात असं नसतं. जे असहमत असतात, त्यांचाही तुमच्यासारखा काही एक विचार असतो, त्यामागे कारणं असतात हे एकदा मान्य केलं की, मग त्यांच्या असहमतीचा त्रास होत नाही, उलट त्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन तुम्हाला मिळतो. मग मनाला निराशा शिवतही नाही. जेव्हा नोकरी करत होतो, तेव्हा आणि आताही हा विचार मला प्रेरक ठरतो.

माझं शिक्षण संपवून मी इंजिनीअर होऊन बाहेर पडलो, तेव्हा मला कुठेही सहजपणे नोकरी मिळाली असती, पण मी ‘बीएआरसी’त जाण्याचं ठरवलं, याचं कारण मला पुनरावृत्तीच्या कामात रस नव्हता, आव्हानं शोधायला व ती पेलायला आवडतं. ‘बीएआरसी’त संशोधन सुरू झालं, अणुऊर्जानिर्मितीचं क्षेत्र निवडलं, त्यात रिअ‍ॅक्टरनिर्मितीवर काम करू लागलो, यातून वीजनिर्मितीच्या क्षेत्रातील काम सुरू झालं.

प्रत्येक नवसंशोधनात आनंद मिळत गेला, पण पहिला प्रयोग केला त्यावेळी झालेला आनंद काही वेगळाच होता. त्यावेळी भारत-कॅनडा सहकार्याने काही उपक्रम सुरू होता. मी ट्रेनिंग स्कूलमध्ये पहिला आलो होतो व पहिला येणाऱ्या व्यक्तीला स्वत:च्या इच्छेनुसार क्षेत्र निवडायची मुभा दिली जात असे. त्यानुसार मी संशोधनाची निवड केली. त्यावेळी मला कॅनडात जाण्याची संधी होती, पण मी त्याला नकार दिला. ‘‘कॅनडात जाऊन मी काय करू? मला नोकरीचा भाग म्हणून तिथं पाठवू नका, मला शिकायला पाठवा’’, असं म्हणालो. वरिष्ठ नाराज झाले. म्हणाले, ‘‘ही मोठी संधी तू नाकारतोस.’’ पण मी नाही गेलो. त्याऐवजी हीट ट्रान्स्फर होण्यासाठी रिअ‍ॅक्टरला आवश्यक उपकरण आपण इथंच बनवू, काही नवीन करू या विचारानं मी कामाला लागलो. गोडाऊनमध्ये असणारं सामान गोळा केलं व त्यावर संशोधन करून उपकरण बनवलं. ज्या दिवशी चाचणी घेणार होतो, त्याच्या आदल्या दिवशी ते धूड चालेल की नाही या आशंकेनं मला झोप आली नाही. (झोप नाही आली अशी ही आयुष्यातील एकमेव वेळ.) दुसऱ्या दिवशी चाचणी यशस्वी झाली व त्यावेळी झालेला आनंद अभूतपूर्व होता. नंतर अनेक मोठय़ा मोठय़ा गोष्टी केल्या, त्या त्या वेळी अनिश्चितता जाणवली, पण त्या आनंदाची गंमत काही और.

हे सारं करत असताना देशानं अनेक सन्मान दिले, ते नम्रतेने स्वीकारत राहिलो. पण, त्या सन्मानांसाठी कधीही काम केलं नाही. ‘गुणी गुणं वेत्ति’, या न्यायानं गुणीजनांची कदर होतेच. एक मजेदार आठवण झाली, एकदा मला माझ्या वरिष्ठांनी त्यांची मीटिंग सुरू होती तिथं बोलावलं. मी गेलो तेव्हा कळलं, की ती मीटिंग पदोन्नत्तीचा विचार करण्यासाठी होती. मला बाहेर बसवलं. पण थोडय़ा वेळानं वरिष्ठ बाहेर आले व मला म्हणाले, ‘‘अनिल, तुझं वय लहान आहे, म्हणून तुला पदोन्नत्ती द्यायला काहींनी विरोध केला. सॉरी.’’ मी त्यांचंच सांत्वन केलं. त्यांना म्हणालो, ‘‘सर, जाऊ  द्या हो. मी तुमच्याकडे पदोन्नत्ती मागितली नव्हती व त्यासाठी आपण कोणीही काम करत नाही.’’ ही उलटी गंगा होती. मी कधीही काहीही कोणाकडेही मागितलं नाही. मला मिळत गेलं. नियतीचं दान माझ्या बाजूने पडत गेलं.

आज विज्ञाननिष्ठ, वैज्ञानिक दृष्टिकोन असणं हे अपरिहार्यपणे आवश्यक आहे. विज्ञान समजणे हे महत्त्वाचे आहे. नवनवीन शोधत राहाणं ही विज्ञानाची वाटचाल आहे. पण म्हणून आपल्याला सगळं समजलं असं होतं नाही. आपल्या अवतीभवती जे घडतं ते खूप गुंतागुंतीचं क्षेत्र असतं. त्याला शक्यतांचं क्षेत्र म्हणा, आपण सर्वानी एक लक्षात घ्यायला हवं, तुम्हाला जे समजतं ते, तुम्हाला समजायला हवं अशापैकी अगदीच एखादा छोटासा तुकडा असतो. त्यामुळे विज्ञान समजलं म्हणजे सर्व काही समजलं, असं मानलं की अधोगती सुरू होते. तुम्हाला जर विनयशीलता, नम्रता जपायला हवी तर त्यासाठी श्रद्धा जपणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती असतं, त्यापेक्षा माहिती नसलेल्या गोष्टी अधिक असतात. त्यामुळे अमुक गोष्ट अशीच का घडते याविषयी तुम्ही खात्री बाळगू शकत नाही. तुम्हाला नेहमी समजून घेण्याची भूमिकाच स्वीकारावी लागते, यासाठी श्रद्धा असणे आवश्यक आहे. म्हणून माझा देवावर विश्वास आहे, पण देवाकरता केलं जाणारं कर्मकांड मात्र मला अजिबात मान्य नाही. माझ्या आईच्या इच्छेखातर मी पूजेलाही बसलोय, नवीन प्रकल्प सुरू करताना माझे काही सहकारी सांगत, सर आपण श्रीफळ वाढवू या. मी त्यांच्या इच्छेला मान देत होतो. आपल्या आसपासच्या माणसांच्या भावना जपणं मी महत्त्वाचं मानतो. मी आस्तिक की नास्तिक? मी आस्तिक! पण, माझा कर्मकांडावर शून्य विश्वास आहे. मी तीस-पस्तीस वर्षांचा होतो, तेव्हा प्रयागला गेलो होतो, पण संगमात स्नान केलं नाही, आग्र्याला जाऊन ताजमहाल पाहिला नाही की पॅरिसला जाऊन आयफेल टॉवर पाहिला नाही. वेळेच्या नियोजनात प्रायॉरिटी कोणती हे पाहिलं पाहिजे. हे सर्व मला वेळ मिळेल तेव्हा मी करेन, कदाचित करणारही नाही. पण आत्ता नक्की नाही.

मी वयाची पंच्याहत्तरी ओलांडली, हे मला ठाऊक आहे. करण्याजोगी खूप कामं आहेत, ती करतो आहे. त्यासाठी तब्येत उत्तम राखायला खाण्यावर नियंत्रण आणलंय, मूलत: मी शाकाहारी आहे. वयाप्रमाणे काही आजार आहेत, गोड टाळतो, पण समोर आलं की खातोही.  साधासा वरणभात माझा लाडका आहे. मला पत्नीची व कुटुंबीयांची खूप छान साथ मिळाली. आम्ही आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. काही वेळा वाटतं, की कुटुंबाबरोबर अधिक काळ घालवायला हवा होता, पण ठीक आहे. सर्वानी समजून घेतलं. आयुष्यात करण्याजोग्या काही गोष्टी होत्या, त्यांची एक यादी माझ्याकडे कायम असते.  न केलेल्याही अनेक कामांची यादी आहे. पण मी या याद्या बघत नाही, वा त्यांची उजळणी मनात करत नाही.

मला संगीत, नाटक, साहित्य यातलं खूप काही समजत नाही; त्यांची घडण समजून घ्यायची आहे. रणजित देसाईंची स्वामी, पु. ल. देशपांडे यांचे संपूर्ण लेखन हे मला आवडलेलं साहित्य आहे. मी चित्रपट आजही बघतो. नुकताच हैदराबादला गेलो असताना ‘राजी’ हा सुंदर चित्रपट बघितला, आवडला! या गोष्टींनी, माझ्या कामाने मला खूप आनंद दिला आहे. आपल्या सभोवतालानं आपल्याला खूप काही दिलं आहे, या सभोवतालाला परत काही देण्याची भावना जपणं हे जास्त महत्त्वाचं आहे, मी माझ्या परीने प्रयत्न करतो आहे इतकंच!

माझा दिवस दररोज सकाळी साडेसहा-सातच्या दरम्यान सुरू होतो व रात्री अकरा-साडेअकरापावेतो चालत राहतो. सकाळी उठल्यावर पहिला विचार मनात येतो, तो म्हणजे आज दिवसभरात जी कामं करण्याचं म्हणून आपण योजलं आहे त्यांचा मनात आढावा घेऊन नियोजन करणं, सर्व आवरून, आलेल्या ई-मेलना आवश्यकतेनुसार उत्तरं देणं; देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वरील तिन्ही क्षेत्रांत कार्यरत असणारे विविध गट आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी पाठवलेले अहवाल वाचून प्रतिक्रिया देणं; समित्यांच्या अहवालांवर भाष्य करणं अशी कामं दिवसाच्या पहिल्या टप्प्यात मी करतो. नंतर दिवस नीट पार पडतो. दिवसातला प्रत्येक क्षण हा उपयोगी पडावा या हेतूने आम्ही काम करतो.

chaturang@expressindia.com