सिद्धार्थ महाविद्यालयातलं व्याख्यातापद सोडून बँकेत शिरकाव. तिथल्या नोकरीतही स्त्री म्हणून स्वत:ला सिद्ध करत प्रवास सुरू असतानाच समाजसेवा हे पूर्णवेळ करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय घेणं आणि ते करत असतानाच पुन्हा बँकेच्या अधिकारीपदावर जाऊन विक्रमी कामं करणं. संसार, नोकरी सांभाळून मनाला समाधान देणारी समाजसेवाही करता येते हे
जयश्री काळे यांच्या उदाहरणावरून ठसठशीतपणे समोर येतं.

सत्तरच्या दशकाचा काळ.. स्त्रियांनी करिअर करण्याची मानसिकता समाजाने नुकतीच स्वीकारलेली. मात्र, अशा वेळी अनेक आव्हानांना तोंड देऊन मिळवलेले बँकेतील अधिकारीपद सोडून समाजसेवा हे पूर्णवेळ करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय तसा धाडसीच. पण या धाडसानेच त्यांना करिअरच्या दोन वाटा दाखवल्या. घर, संसार, नोकरी आणि आवड म्हणून स्वीकारलेले समाजसेवेचे क्षेत्र.. अशी कसरत लीलया पेलली.. ती जयश्री काळे यांनी. साहित्याचा वारसा, गणिताची आवड आणि सामाजिक भान.. हे सगळं पेलण्यासाठी अमाप उत्साह, धाडस आणि तार्किक दृष्टिकोनाची जोड असा मिलाफ म्हणजे जयश्रीताई!
जयश्रीताईंच्या घरातूनच साहित्य आणि समाजसेवेचे संस्कार झाले. ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या त्या कन्या. मात्र, कोणतीही भाषा किंवा साहित्य या ऐवजी त्यांनी गणित विषय निवडला. गणितात एम.ए. केल्यानंतर मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयात त्या व्याख्याता म्हणून रुजू झाल्या. अध्यापनाचं क्षेत्र आवडीचंच होतं. पण त्याच वेळी मोठं होणारं बँकिंग क्षेत्र, राष्ट्रीय बँकेतील नोकरी, त्याचे लाभ खुणावत होते. म्हणून बँकेच्या परीक्षा दिल्या आणि एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली. ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये त्या १९७१ मध्ये अधिकारी म्हणून रुजू झाल्या. बँकेमधल्या नोकरीतही स्त्री म्हणून प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला सिद्ध करत प्रवास सुरू झाला..
जयश्रीताई या प्रवासाबद्दल सांगतात, ‘‘मी सिद्धार्थ महाविद्यालयातील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा बाबांनी पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला होता. पण बँकिंगचं नवं क्षेत्र मला आवडलं होतं. या क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी मिळेल असं वाटत होतं आणि ती मिळालीही. स्त्री म्हणून कधी वाईट अनुभव आला नाही, तरी प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला सिद्ध करावं लागलं. बँकेची वेळ संपल्यावर, सगळं कामही संपलेलं असूनही घरी जायला निघाले तरी.. ‘चाललात वाटतं लगेच..’ असा सहकाऱ्यांचा आविर्भाव असायचा. पण या सगळ्या गोष्टींवर आपल्या कामातून उत्तर देणं हाच पर्याय असतो आणि तोच मी निवडला.’’
बँकेची नोकरी छान सुरू होती. पण तरीही काही तरी कमी आहे अशी जाणीव होतच होती. घरातून वारशानं मिळालेलं सामाजिक भानाचे संस्कार त्यांना अस्वस्थ करत होते. सासरचं वातावरणही प्रोत्साहन देणारं आणि समाजसेवेचं भान टिकवणारं होतं. बँकेतील नोकरी सुरू असताना वेश्या वस्तीतील महिलांपर्यंत बँकेच्या योजना पोहोचवणं, स्त्रियांचे अर्थभान वाढवण्यासाठी प्रयत्न असे उपक्रम सुरूच होते. पण त्याला नेमकी दिशा मिळत नव्हती. ती मिळण्यासाठी निमित्त ठरल्या घरातल्या कामवाल्या बाई. ‘‘मी माझ्या दहावीतल्या मुलीला अवघड वाटणारी गणितं समाजावून सांगत होते. तेवढय़ात आमच्याकडे काम करणाऱ्या बाई त्यांच्या १३-१४ वर्षांच्या चुणचुणीत मुलीला घेऊन माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, हिला दोन घरची कामं मिळतील का बघा ना. सातवीला नापास झाली. आता शाळा बास झाली. पुढच्या वर्षी लग्नाचं बघणार. त्या बाईंना समजावून त्या मुलीचा शिक्षणाचा खर्च आणि अभ्यासाची जबाबदारी मी उचलली. हा प्रयोग यशस्वी झाला आणि ती मुलगी दहावीला चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली. त्या वेळी वाटलं अशा अनेक मुली असतील. त्यांच्यापर्यंत का पोहोचू नये?’’ त्या घटनेने हुरूप दिला आणि जयश्रीताईंना एक नवी दिशा मिळाली.
समाजसेवेत करिअर करण्याचा नवा रस्ता चोखाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी सुरळीत सुरू असणाऱ्या ‘बँक ऑफ बडोदा’मधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि मिळालेल्या लाभातील अठरा लाख रुपये समाजसेवेसाठी वापरायचे ठरवले. हे धाडस करायचं बळ मिळालं ते घरच्यांच्या सहकार्यामुळे. या नव्या वाटेबद्दल जयश्रीताईंनी सांगितलं, ‘‘करिअर म्हणजे नोकरीत आणखी वरचा टप्पा गाठत जाणे, अशीच माझीही सुरुवातीला कल्पना होती. नोकरी सांभाळून एखाद्या संस्थेत स्वयंसेवक म्हणूनही काम करू शकले असते. पण त्या वेळी ‘एक नोकरी अडवण्यापेक्षा इतरांसाठी नोकरीच्या संधी तयार कर,’ असा विश्वास घरच्यांनी दिला. मग पूर्ण लक्ष देऊन समाजसेवा हेच करिअर का निवडू नये, असा विचार केला आणि काम सुरू केलं.
काही समविचारी मैत्रिणी एकत्र आलो आणि कामाची सुरुवात झाली. प्रश्न काय आहेत, कुठे आहेत, त्यावर उपाय काय याचा रीतसर अभ्यास सुरू केला. पुण्यातील पाच ते सहा वस्त्यांमध्ये पाहणी करताना आजूबाजूला दिसणाऱ्या चकचकाटाला छेद देणारं, अस्वस्थ करणारं वास्तव समोर आलं. गर्दी करून उभ्या असलेल्या, अंधाऱ्या वस्त्या. छोटय़ा खोल्यांतून राहणारं पाच-सहा जणांचं कुटुंब. स्त्रियांच्या नशिबी कायमचे कष्ट, मारहाण. मुलांच्या आरोग्याची, शिक्षणाची हेळसांड. मुलगी नापास झाली की लहानपणीच तिचं लग्न करून द्यायचं. तिच्या नशिबी पुन्हा तेच भोग. हे दुष्टचक्र थांबवायचं तर मुलींना किमान दहावीपर्यंत शिकवायचं हा उद्देश ठेवून अभ्यासवर्ग सुरू केले. आपली कामं सांभाळून धावत-पळत या मुलींना शिकवायला जायचं, तर मुलीच नसायच्या. पण हळूहळू आमच्या प्रयत्नांना यश येऊ लागलं आणि मग मुलींनाच नाही तर आमच्या मुलांनाही शिकवा, असा आग्रह पालकांनी सुरू केला. या सगळ्या प्रयत्नांतून १९९७ मध्ये ‘जागृती सेवा संस्थे’ची नोंदणी झाली.’’
आता या संस्थेचा पसारा वाढला आहे. बालवाडीपासून ते व्यवसाय शिक्षण, मुलींसाठी निवासगृह, आरोग्य केंद्र अशा अनेक पातळ्यांवर संस्थेचं काम सुरू आहे. पण हा प्रवासही सोपा नव्हता. रोज नवा प्रश्न समोर आला आणि त्यातून नवा प्रकल्प उभा राहिला.
संस्थेच्या प्रवासाबद्दल जयश्रीताई सांगतात, ‘‘वस्तीचा अधिक जवळून परिचय होऊ लागला तेव्हा नवे प्रश्न समोर येत गेले. मुलांचे जन्मदाखलेच नाहीत, त्यामुळे मुलं मुख्य शिक्षण प्रवाहापासून दूर गेलेली. मग मुलांचे जन्मदाखले काढले. त्यांना लहान वयातच एकत्र करण्यासाठी बालवाडी सुरू केली. आता संस्थेकडून बारावीपर्यंत शिक्षण दिलं जातं. पाचशेच्या वर मुलं संस्थेत शिक्षण घेत आहेत. पोषण, शिक्षण आणि आरोग्य या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मुलांसाठी लसीकरण, वैद्यकीय तपासण्या, रोजचा पौष्टिक नाश्ता देणं असे उपक्रम सुरू झाले. मानसिक वाढीसाठी विविध चर्चासत्रं, वाचनालय सुरू झालं. या प्रवासात काही खूप बुद्धिमान मुलं पुढे आली. मग त्यांच्या उच्च शिक्षणाचे काय असा प्रश्न निर्माण झाला. त्यातून उच्च शिक्षणासाठी साहाय्य करण्यात येऊ लागलं.
आमच्याकडील एका मुलीनं अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. तिला लागणारं सर्व साहित्य संस्थेनं दिलं. मात्र, एक दिवस तिच्या वडिलांनी दारूसाठी तिची पुस्तकं रद्दीत विकून टाकली. आसपासच्या गोंधळामुळे अभ्यास होणार नाही, म्हणून तिने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. मग तिच्यासाठी तातडीने निवासाची सोय केली. ही मुलगी पुढे अभियांत्रिकीला पहिली आली. आज ती नोकरी सांभाळून संस्थेबरोबर काम करत आहे. तिने आम्हाला खूप उमेद दिली आणि तिच्यासारख्या चाळीस मुलींची पूर्ण काळजी घेणारं वसतिगृह उभं राहिलं. जी मुलं उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी व्यवसाय शिक्षण सुरू केलं.
बालवाडी शिक्षिका, परिचारिका प्रशिक्षण, शिवणकाम यातून अनेक कमी शिकलेल्या मुलीही स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. मग त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण आली. तेव्हा या महिलांना अगदी एका रात्रीत कर्ज मिळवून देण्यासाठी ‘हिरकणी’ योजना सुरू झाली. वस्त्यांमध्ये आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत, हेही जाणवत होतं. त्यातून आरोग्य केंद्र उभं राहिलं. आज रोज ७० ते ८० रुग्णांवर नाममात्र शुल्कात उपचार केले जातात. ७५० मधुमेही रुग्णांची पूर्ण काळजी घेतली जात आहे. कष्टकरी स्त्रियांसाठी फिजिओथेरपी केंद्र, त्याचबरोबर एचआयव्ही आणि क्षय रोगावर उपचार करण्यासाठी केंद्र चालवले जात आहे. या प्रवासांत अनेक घटना निराशही करून गेल्या. पण त्यातून नवे मार्गही सापडले.’’
समाजसेवेतील करिअर सुरू करतानाच पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रातील करिअरची संधीही चालून आली आणि त्यांनी दोन्ही क्षेत्र स्वीकारून त्यात पाय रोवले.
बँकिंग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना संचालक मंडळावर नेमण्याच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या सूचना आल्या. त्यानुसार १९९८ मध्ये भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर काम करण्याबाबत जयश्रीताईंना विचारण्यात आले. ही पूर्णपणे महिलांनी चालवलेली बँक. जयश्रीताईंनी आठ वर्षे बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. जयश्रीताई गेली अनेक वर्षे बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत आहेत. त्यातील आठ वर्षे त्यांनी अध्यक्षपदी काम केले आहे. एका आदर्श बँकेचे सर्व निकष ही बँक पूर्ण करते. बँकेची उलाढाल अकराशे कोटी रुपये आहे. अनुत्पादित कर्ज शून्य टक्के आहे आणि भागीदारांना सर्वोत्तम म्हणजे १५ टक्के परतावा मिळतो. या बँकेला २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. महिलांनी चालवलेली ही बँक बँकिंग आणि व्यवस्थापन क्षेत्रातील आदर्श उदाहरण म्हणून कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या बँकेवर पीएच.डी. केली आहे.
भगिनी निवेदिता बँकेतील या टप्प्याबद्दल जयश्रीताई सांगतात, ‘महिलांनी चालवलेली बँक म्हणून उत्सुकता होती. त्यातच जागृतीच्या माध्यमातून करत असलेल्या कामाला पूरक असं हे काम होतं, बँकिंग क्षेत्रातील करिअरही पुढे जाणार होतं. सहकारी बँकांबद्दल असलेली मानसिकता, त्यात महिलांची बँक, बँकिंग क्षेत्रातलं बदललेलं वातावरण ही आव्हानं खुणावत होती. पण आज सर्वात विश्वासार्ह, उत्तम सेवा देणारी बँक म्हणून या बँकेची ओळख आहे, त्याचा अभिमानही आहे.
दोन क्षेत्रांतील जबाबदारी सांभाळतानाच घरातील जबाबदारी, मुलांचं शिक्षण या जबाबदाऱ्याही होत्या. त्यासाठी घरच्यांचा खंबीर पाठिंबाही साथीला होता. त्यांच्या कामात मुलांनीही मदत केली. ‘‘नोकरी किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना घराची जबाबदारीही असतेच. पण वडिलांना समाजसेवा करताना लहानपणापासून आम्ही पहातच होतो. माझ्या सासूबाई प्रभावती आणि सासरे श्री.वा. काळे यांनाही सामाजिक कार्यात रस होता. पती विश्वास काळे यांचेही प्रोत्साहन होते. या वातवरणात मुलेही लहानपणापासून शिकत गेली. आई काही चांगले करते आहे याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे मुलांनीही सहकार्य केले. ’’
आता जयश्रीताई नव्या करिअरकडे वळल्या आहेत. पुढची पिढी घडवण्याच्या, नवे स्वयंसेवक तयार करण्याच्या. ‘सुरू केलेलं काम पुढे जाणं. पुढच्या पिढीला त्याचा वारसा देणं आणि ते जपण्यासाठी या पिढीला सक्षम बनवणं हेच एखाद्या कामाचं यश असतं,’ असं त्या सांगतात.
नव्या वळणावर उभ्या असताना आजपर्यंतच्या प्रवासाकडे मागे वळून पाहात त्या सांगतात, ‘‘प्रत्येक गोष्टीची वेळ असते, मुदत असते. ती समजून घ्यायला हवी. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एखादा प्रश्न टिकवणं, आपलं पद टिकवण्यासाठी धडपडणं हे यश नाहीच. हातचा वसा पुढे देता आला पाहिजे. त्यातच समाधान असतं, कोणतंही करिअर असो समाधान हीच त्याची सुरुवात असते आणि शेवटही.’’
रसिका मुळ्ये – rasika.mulye@expressindia.com

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई