News Flash

परंपरागत व्यवसाय हरवलेले भिल्ल गोसावी

भिल्ल गोसावी या जमातीचे लोक गोसाव्याचे सोंग घेऊन भिक्षा मागण्यापलीकडे इतर समाजाशी जोडलेले दिसत नाहीत. नागपूर जिल्हय़ातील जामगढ, तरोडा, वाई, पंचधार, कोंढासावळी गावांमधल्या या...

| July 18, 2015 01:01 am

परंपरागत व्यवसाय हरवलेले भिल्ल गोसावी

ch0005भिल्ल गोसावी या जमातीचे लोक गोसाव्याचे सोंग घेऊन भिक्षा मागण्यापलीकडे इतर समाजाशी जोडलेले दिसत नाहीत. नागपूर जिल्हय़ातील जामगढ, तरोडा, वाई, पंचधार, कोंढासावळी गावांमधल्या या जमातीतील सुमारे हजार लोकांपैकी एकाकडेही जात दाखला नाही. हक्काचे घर नाही. महाराष्ट्रात या जमातीची लोकसंख्या दीड ते दोन लाखांपर्यंत असावी. आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा हे अति मागास आहेतच.
‘काय सांगू पोरी तुला, अलीकडं सगळंच बिघडलंय. लई कष्टाची जिंदगी झालीय. पहाटं जल्दी उठून रिकाम्या थैल्या खांद्याला अडकवून बाहेर पडावं लागतं. जमलं तर काळ्या चहाचा घोट घ्यायचा, नाही तर चूळ भरून रस्ता धरायचा. सकाळपासून येचलेला कचरा व्यापाऱ्याला विकून घरी परत येइस्तोर दिस मावळतीला गेलेला असतो. दिसभर मागून मिळेल तो शिळापाका भाकरतुकडा खाऊन जमेल तसं दिस काढायचा. जेवण तयार करण्यासाठी आमची चूल रोज रात्री एकदाच पेटते. आम्ही कचरा येचायला गेल्यावर, रात्रीचं उरलंसुरलं घरातली लहान लेकरं खात्यात. काई उरलं नसलं, तर शेजारी किंवा भोवती असलेल्या मोठय़ा लोकांच्या वस्तीत मागून खात्यात. आमी गटारी व उकिरडय़ातला घाण कचरा व भंगारही साफसुतरा करतो, वेगवेगळा करून. यातून कधी दीडशे तर कधी दोनशे रुपये मिळतात. गाडीघोडय़ाचा व सोताच्या च्या-पान्याच्या खर्चाचा पैसा देऊन त्यातून उरलेली कमाई आपली.
आमच्या या पालात पन्नास घरं असतील. वस्तीतल्या समद्या बाया कचरा वेचायला जात्यात. गडीमानसं छत्र्या, स्टोव्ह-दुरुस्तीची आणि तुटक्या प्लास्टिकच्या बादल्या आणि सिंटेक्सच्या टाक्या दुरुस्त करण्याची कामं करतात. पन सध्या बेकार असल्यातच जमा हैत. त्यांच्यापैकी काईजन भंगारच्या पिशव्या व्यापाऱ्याकडे घेऊन जाण्यास बायकांना मदत करतात. माझं लगीन झालं तवा चाळीस वर्साआधी असं नव्हतं. गडीमानसांच्या मेहनतीवरच घर चालायचं. रानावनातून चुलीला जळण अणि जनावरांना चारा आम्ही बाया आणत असू. सैपाक आणि मुलं सांभाळण्याची घरातली कामं आमची. गडीमाणसं शिकार करून आणि मासेमारी करून मुबलक अन्न घरात आणायची. आमच्या जातीत मांसाहारच जास्त चालायचा. आमच्यासह आमच्या बिरादरीचे लोक पूर्वी डोंगर, जंगल, नद्या, नाले असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर प्रदेशांतच मोठय़ा संख्येने होते, आजही आहेत. बहुतेकांकडे वागरी (फासे), पिंजरे असायचे. पाच-दहा जण मिळून शिकारीला जायचे. टिलोडी(खार), छुंगर (मुंगूस), छलाडी (रानमांजर), गेंदर (कोल्हा), लोकडी (खोकड), मिनकी(मांजर), चिपट (घोरपड), शेंव (साळिंदर, सायाळ), रानडुक्कर, सालगो (खवल्या मांजर), रुदडा (उदमांजर) अशा प्राण्यांची केलेली शिकार घरी आणून वाटणी करून घेत असत. पाच-दहा जण मिळून नदीत जाळे लावून मासेमारी करीत. बिळात हात घालून खेकडे पकडण्यात हे लोक तरबेज होते. शिकारीचे मांस आणि मासे जळत्या लाकडावर भाजून खाणे हा सर्वाचा आवडीचा छंद होता. आम्ही गाई, म्हशी, शेळ्या-मेंढय़ा, कोंबडय़ा पाळायचो. डोंगरदऱ्यात, जंगलात जाईल तिथे ही जनावरे आम्ही बरोबर न्यायचो. भटकेच होतो, घरे नव्हती; पण आमच्या जगण्याच्या पद्धतीला कोणाचा विरोध नव्हता. मस्तीत, मजेत जगत होतो. पुढे पुढे शिकारबंदीचे नवीन कायदे आले. मासेमारीसाठी परवाना पाहिजे, अशा अटी आल्या. घरात शिकारीचे नुसते फासे किंवा पिंजरा मिळाला तरी अटक होऊ लागली. आमची शिकार व मासेमारी दोन्ही बंद झाली. जंगलाबाबतचे नवीन कायदे आले, ज्यामुळे आम्हास सरपण, वैरण, कंदमुळे व औषधी वनस्पती मिळणे बंद झाले. गडीमानसं बेकार झाली. जगण्याचा आधार शोधत डोंगरी भाग सोडून चोहूकडे विखुरली. ऐन जवानीत खाऊन-पिऊन ऐटीत राहिलेल्या आम्हा बायांना, म्हातारपणात कचरा येचण्यासाठी पायपीट करन्याचे नशिबी आले.
आज आमच्या या पन्नास कुटुंबाच्या पालवस्तीत एक बाई शिकलेली नाही. एका पोरीनं वा पोरानं शाळंचं तोंड बघितलेलं नाही. आजच संगीबाई राजू पवार या महिलेनं आपल्या पाचव्या लेकराला बाजूच्या पालात जन्म दिला आहे. आमची देवीमाता हाय आमच्याबरोबर. आम्ही सारी अशीच पालात, झाडाखाली, नदीच्या काठावर, जंगलात उघडय़ावर जन्मलेली मानसं हाव. डॉक्टर नाही, दवाखाना नाही, कुनाचा जन्म कुठं आनी कधी झाला हे कुनाला याद नाही. दुसरं कुनी सुख-दु:ख विचारायला आमच्या वस्तीत आलं बी नाही.’’ हे सांगत होत्या साठीच्या घरातल्या कमळाबाई बंडू जाधव गोसावी. भिल्ल गोसावी समाजाच्या संघटनेचे पदाधिकारी सांगलीचे शिवाजी काळू गोसावी, सोलापूरचे बाळकृष्ण जाधव-गोसावी, बबन घाडगे-गोसावी यांच्यासह आम्ही होतो, सोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजी नगरला लागून असलेल्या भिल्लगोसावी समाजाच्या पाल वस्तीत. पिढय़ान्पिढय़ा मिळालेल्या माहितीनुसार हे लोक आपल्या जमातीचा इतिहास सांगतात. ch17राजस्थानमधील मेवाड प्रांतात जंगलातल्या भिल्लांचे अनेक गट असले तरी ते सर्व मिळून महाराणा प्रतापसिंहाच्या बाजूने व मोगल बादशहा अकबराच्या विरोधात लढले. १८ जून १५७६ रोजी सुरू झालेल्या हल्दीघाटाच्या लढाईत महाराणांना माघार घ्यावी लागली, त्यांच्या सैन्याचे फार मोठे नुकसान झाले; परंतु महाराणा अकबराच्या हाती लागले नाहीत. अकबराने हे युद्ध पुढे दहा वर्षे चालू ठेवले. जंगलातल्या भिल्ल आदिवासींची साथ असल्यानेच महाराणा प्रतापसिंह हाती लागत नाही हे अकबर जाणून होता. म्हणून त्या दहा वर्षांत अकबराच्या मोगल सैन्याने दऱ्याखोऱ्यातली अनेक गावे लुटली. अन्याय-अत्याचार करून तिथल्या आदिवासी लोकांना त्यांनी निराधार केले. जीवनाधाराची गरज, मोगलांची दहशत आणि छळवणुकीपासून सुटका या गरजांपोटी तेथील भिल्ल आदिवासींनी वेशांतर करून गोसाव्याच्या रूपात तेथून स्थलांतर केले. या जमातीने आजही भटकेपण जपलेलं आहे. वेगवेगळ्या प्रांतांत ते विखुरले गेले. सुरुवातीस डोंगर-दऱ्या व नदी-नाल्यांचा प्रदेश त्यांनी निवडला. नंतर सपाट प्रदेशातसुद्धा त्यांचे अस्तित्व दिसते. त्यांना राजपुती गोसावी, राजपुती भिल्ल, भिल्ल गोसावी, डुंगरी गरासिया अशी नावे पडली. मारवाडी, गुजराती, हिंदी व डोंगरी भाषांचे मिश्रण असलेली, परंतु मारवाडीचा प्रभाव असलेली त्यांची एक स्वतंत्र बोलीभाषा आहे.
पूर्वीच्या शिकार व मासेमारी या मुख्य व्यवसायांसोबत, भगवे कपडे, कपाळाला राख आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात कमंडलू अशा गोसाव्याच्या रूपात लोकांना आशीर्वाद देत भिक्षा मागण्याचे कामही यांच्यातले काही लोक करायचे. काही जण आजही करतात; पण इतर गोसाव्यांप्रमाणे यांना गुरुपरंपरा, मठ, पीठ, पंथ, संप्रदाय, आखाडा यापैकी काहीही नाही. यामुळे इतिहासातले स्थलांतर करताना शत्रूपासून सुखरूप सुटका आणि जगण्यासाठी साधनाची उपलब्धता या दोन गरजांपोटी केलेले वेशांतर हेच या गोसावीपणाची उत्पत्ती आहे, असे ते सांगतात. मातृभूमीसाठी व महाराणा प्रतापसिंहासाठी शूरपणाने व निष्ठेने लढणाऱ्या सैनिकांचे आम्ही वंशज आहोत हेही ते अभिमानाने बोलतात.
घटाड, खगार, पडियार, जुवे, चौहान, बामन्या, तेवऱ्या, लुंगेतर, मंगवेतर, धंदवेतर, पठार, मुळ्यानी, काळमा, मांगळ्या, वाघेला, मकवाना, धांतुर, उमट, कडवा, घेयलोत, बेमटा इ. नावांची त्यांची गोत्रं आहेत. त्यांच्यात सगोत्र लग्न होत नाही. पूर्वी पाळण्यातच मुला-मुलींची लग्नं व्हायची; परंतु आता १२/१३ वर्षांच्या पुढे होतात. लग्न, आई-बाप आणि पंच लोक मिळून ठरवितात. जमातीतल्या वयस्कर अनुभवी माणसाकडून लग्न लावले जाते. पाच देवींची नावे घेऊन त्यांच्याकडे नवरा- नवरीला सुखी ठेवण्याची प्रार्थना केली जाते. यालाच लग्न लागले असे समजतात.
शितलादेवी ही सर्व गोत्रांची प्रमुख देवता आहे. शिवाय गोत्रागणिक त्यांच्या देवताही वेगळ्या आहेत. हिरेकरी देवीमाँ(दुर्गा), काळी देवीमाँ, मरीदेवीमाँ (मरीआई), लक्ष्मी देवीमाँ (कडकलक्ष्मी), शिकोतर देवीमाँ, खोडियार देवीमाँ या त्यांच्या मुख्य देवता आहेत. दसरा व होळी हे यांचे मुख्य सण आहेत. दसऱ्याला प्रत्येक देवीच्या नावे वेगळी घटस्थापना होते. देवीसमोर नऊ दिवस तुपाचा दिवा सतत तेवता ठेवला जातो. दहाव्या दिवशी मरीआई आणि कडकलक्ष्मीला कोंबडय़ांचे बळी देऊन हातावरच्या भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. आपल्याच गोत्रातल्या सुवासिनींना प्रथम जेवायला दिले जाते. बाराव्या दिवशी ‘हिरेकरी देवीला’ (दुर्गामातेला) मेंढा- बकरा बळी दिला जातो.
या भटक्या समूहांबरोबर त्यांच्या देवताही ‘भटक्या’ आहेत. वस्तीच्या बाहेर एका बाजूला देवीच्या काठय़ा मातीत रोवून उभारल्या जातात. त्या काठय़ांना चोळखणं व इतर रंगीत फडके बांधलेले असते. या जमातीत घरात किंवा पालात देवी-देवता किंवा त्यांचे फोटो ठेवणे परंपरेने मान्य नाही; परंतु या देवतांवर यांची नितांत श्रद्धा आहे.
अंगात उलटी चोळी, घागरा व ओढणी असा महिलांचा परंपरागत पेहराव आहे. हातात चांदीचे गोट, गळ्यात चोरसा किंवा हासडी असते. कमरेच्या वरचेच दागिने चांदीचे असू शकतात. या जमातीतल्या स्त्री-पुरुषांना सोने पूर्णपणे वज्र्य आहे. त्यामुळे ठीकठाक आर्थिक स्थिती असलेल्या कुटुंबातही सोने शोधून सापडणार नाही. पुरुष अंगात सदरा व धोतराऐवजी आडवा पंचा लावत असत. भिक्षा मागायला जाताना भगव्या रंगाचा सदरा व गलबंधी, डोक्याला पागोटे, कपाळाला राख, गंधाचे पट्टे, दाढी वाढलेली, हातात कमंडलू व काखेत झोळी अशा वेशात लोक भिक्षा मागतात.
या जमातीत जात पंचायतीचा मोठा प्रभाव आहे. कोणी आई-बहिणीवरून शिवी दिली तरी हे गंभीर प्रकरण म्हणून जात पंचायतीत जाऊ शकते. साधारणपणे दसरा आणि होळीच्या सणात जात पंचायती बसतात. वस्तीच्या बाहेर एखादे सावलीचे मोठे झाड बघून पंचायत बसते. लग्न, सोडचिठ्ठी, बलात्कार, व्यभिचार, आर्थिक व्यवहार, चोरी, फसवणूक बाबतीतल्या सर्व चुका किंवा गुन्हय़ांबाबत जात पंचायतीत निर्णय होतात. जात पंचायतीत स्त्रियांचा सहभाग नसतो. जमातीच्या सभा-बैठकीत जमातीची बोलीभाषा सोडून इतर स्थानिक भाषेत बोलणेसुद्धा जात पंचायतीच्या नियमांनुसार गुन्हा आहे. पती-पत्नी दोघांच्या सहमती असेल तर केवळ तीन रुपयांत सोडचिठ्ठी मिळते. दोघांपैकी एकाचीच मागणी असेल तर त्या प्रकरणाची तपासणी केली जाते. नवऱ्याकडून तीन बारा म्हणजे रुपये ३६ दंड घेऊन परवानगी दिली जाते. या वेळी नवऱ्याच्या डोक्यावरील फेटय़ाचा पदर फाडून पत्नीच्या पदरात आठ आणे टाकून ‘आजपासून तू माझी आई-बहीण आहेस’ असे पंचांसमक्ष घोषणा केली की, घटस्फोट झाला. पत्नीकडून दंड घेतला जात नाही. हीच मुलगी परत त्याच नवऱ्याच्या घरात घुसली तर तिला ‘सिंदळ’ मानले जाते. अशा प्रसंगी नवऱ्याला पुन्हा एकदा ६० रुपये देज मुलीच्या बापाला द्यावे लागतात. प्रेमविवाह केला तर त्यास मोठे पाप समजण्याची प्रथा आहे. त्यासाठी सव्वाशे तीन बाराचा दंड (४५०० रुपये) घेतला जातो. पुनर्विवाहास परवानगी आहे. विवाहित स्त्रीचा म्होतर लावला जातो, तर पुरुष मात्र कितीही वेळा लग्न करू शकतात. म्होतर म्हणजे पंचांच्या समोर दोघांनी मिळून उभं राहायचं आणि मुलाने मुलीला धक्का मारायचा. झाला पुनर्विवाह.
समाजातले इतर गोसावी देव-धर्माच्या किंवा आध्यात्मिक रूढी-परंपराच्या संदर्भात इतर समाजाशी किंवा त्याच्या एखाद्या घटकाशी कोठे ना कोठे जोडलेले दिसतात तसे स्वत:ला भिल्ल गोसावी म्हणवणाऱ्या या जमातीचे लोक गोसाव्याचे सोंग घेऊन भिक्षा मागण्यापलीकडे इतर समाजाशी जोडलेले दिसत नाहीत. नागपूर जिल्हय़ातील काटोरी तालुक्यातील जामगढ, तरोडा, वाई, पंचधार, कोंढासावळी गावांमध्ये या जमातीतील सुमारे १००० लोकांपैकी एकाही जणाकडे जात दाखला नाही. हक्काचे घर नाही. समाजकार्यकर्त्यांचे संघटनात्मक अनुभव आणि प्रत्यक्ष माहितीनुसार महाराष्ट्रात या जमातीची लोकसंख्या दीड ते दोन लाखांपर्यंत असावी. आर्थिक, सामाजिकदृष्टय़ा हे अति मागास आहेतच. अशा दुर्लक्षित व वंचित जमातींचा अभ्यास व संशोधन होऊन विकास प्रक्रियेत त्यांना प्राधान्य दिल्याशिवाय आधुनिक डिजिटल विकास प्रक्रियेच्या रणगाडय़ाखाली चिरडून जायला यांना फार वेळ लागणार नाही.
अ‍ॅड.पल्लवी रेणके – pallavi.renke@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2015 1:01 am

Web Title: bhila gosavi
Next Stories
1 मदाऱ्यांची मदार सरकारवर?
2 अभावग्रस्त ‘गवलान’
3 ‘पान पे खाना और पत्ते पे रहना’
Just Now!
X