.. पानगळ सुरू झाली. नातेसंबंधाची वीणही थोडीफार सैलावली, पण या पडापडीत एक कृतज्ञ आठवण मात्र पिंपळपानागत अल्लद तरंगत राहिली. त्या दिवशी केवळ काकांच्या प्रयत्नांमुळेच बाबा वाचले. माझ्या माथ्यावरचं छत्र शाबूत राहिलं..
त्या वेळी मी तिसरी किंवा चौथीत होते. शाळेला सुट्टी असली की मी उशिरा उठायचे आणि त्या वेळी बाबांचं पेपरवाचन सुरू असायचं. त्या दिवशी मात्र ते गप्प पडून होते. ‘‘त्यांना बरं नाहीय. तू बाहेर खेळायला जा.’’ आईने दबक्या आवाजात सांगितले आणि मी खुशीखुशी बाहेर पडले.
दुपार झाली. रस्ते सुस्तावले. दुपारचं पिवळेजर्द ऊन लाल-लाल डोळे वटारीत खडूस मास्तरासारखं येरझाऱ्या घालीत होते. त्याच्या धाकाने वर्दळ अधिकच उणावली. जराशाने ऊनं निवू लागली आणि बाबांची प्रकृती अधिकच बिघडली. सुट्टीचा दिवस त्यामुळे दवाखाने बंद. आतासारखे घरोघरी फोन नाहीत की सेवेसी तत्पर मोबाइल चाकर नाही. सारी मदार दोन पायांवर, त्यामुळे खेतवाडी ते मॅजेस्टिक सिनेमाजवळचं मावशीचं घर अशा माझ्या चकरा सुरू झाल्या. नेमकी त्याच दिवशी मावशी बाहेर गेली होती, त्यामुळे तोंडावर बोट ठेवल्यागत ढिम्म बसलेलं दारावरचं कुलूप बघून घरी परतायचं आणि आईने सांगितलं की, पुन्हा एक हेलपाटा मारायचा. खूप उशीरा रडत-रडत मी कशी तरी गेले आणि शेजारी निरोप ठेवून घरी आले. कोवळे वय आणि त्यात ही तंगडतोड त्यामुळे मी पार गळपटून गेले होते. पानात वाढलेलं मटामट जेवले आणि सारं काही आलबेल असल्यागत गाढ झोपी गेले. घराची झोप मात्र उडाली होती. आईचे डोळे काकांच्या वाटेवर लागले होते आणि आता येतीलचा जप करीत घडय़ाळ टिकटिकत होतं. रात्रीचे दहा वाजले आणि काका आले. ते ‘केईएम’मध्ये पॅथॅलॉजीचं काम पाहायचे.
बाबांना मधुमेह होता. कार्यालयात जबाबदारीचं काम आणि कामाची व्यग्रता यामुळे कधी तरी पथ्यपाणी कोलमडून पडायचं. त्या दिवशीपण तसंच झालं. कामाच्या गडबडीत प्रकृतीची हयगय झाली आणि दबा धरून बसलेल्या मधुमेहाने फणा काढला. बाबांचा जीव घाबराघुबरा होत होता, त्यामुळे नेमकं काय झालं असावं याचा अंदाज काकांना आला. जराही वेळ न दवडता त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने बाबांना टॅक्सीत घातलं आणि केईएम गाठलं. त्यांचा अंदाज बरोबर होता. बाबा सेमी-कोमात गेले होते. तातडीने उपचार करणे आवश्यक होते. वैद्यकीय यंत्रणा भराभर कामाला लागली. उपचार सुरू झाले आणि अशातच बाबांच्या वार्डातला एक मधुमेही रुग्ण अकस्मात दगावला. वातावरण धास्तावलं. मृत्यू जवळपास कुठे तरी घुटमळत होता.
सकाळ झाली आणि मला शेजारणीकडे सोपवून आई दवाखान्यात आली. तिथलं एकंदर वातावरण पाहूनच तिला घाम फुटला, पण काकांनी धीर दिला. तो संपूर्ण दिवस ते तिथेच बसून होते. त्यांच्या निगराणीमुळे बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आणि ३-४ दिवसांतच ते घरी आले. लवकरच कचेरीतही जाऊ लागले. मध्यंतरी बरीच र्वष गेली. मी नोकरीला लागले, पण त्यापूर्वीच बाबा आणि हल्ली आईही निघून गेली. पानगळ सुरू झाली. नातेसंबंधाची वीणही थोडीफार सैलावली, पण या पडापडीत एक कृतज्ञ आठवण मात्र पिंपळपानागत अल्लद तरंगत राहिली. त्या दिवशी केवळ काकांच्या प्रयत्नांमुळेच बाबा वाचले. माझ्या माथ्यावरचं छत्र शाबूत राहिलं.
 अलीकडेच काकांना भेटले तेव्हा हा विषय मी स्वत:हून काढला. त्यांच्या नातीला अनिशाला ती कृतज्ञ आठवण आवर्जून सांगितली. ‘‘अगं, त्याचं काय एवढं कौतुक? मी फक्त माझं कर्तव्य केलं.’’ काका असं बोलले खरे, पण माझ्या शब्दांनी त्यांचं मन निश्चितच सुखावलं होतं. मनापासून मानलेले आभार किंवा व्यक्त केलेली दिलगिरी थेट हृदयाला जाऊन भिडते. त्यांच्याही बाबतीत तेच झालं असावं.
आज ही घटना आठवली की जाणवतं ते हे की, त्या वेळी आतासारख्या सोयीसुविधा नव्हत्या, पण दुखवटय़ाचा संदेश मोबाइलवर पाठविण्याइतपत माणसं रूक्ष, रोबोटिक झाली नव्हती. रिक्षा-गाडय़ांचा सुळसुळाट नव्हता, पण तरीही वेळोप्रसंगी नातेवाईक मंडळी धावत-धडपडत यायची. इंटरनेटच्या जमान्यात जग जवळ आलं, पण माणसं दूर गेली. अंगणात बागडणाऱ्या चिमण्यांकडे पाहायला कुणालाच सवड होत नाही, पण ‘ट्विटर’वरची आगाऊ चिऊ मात्र अखंड टिवटिवत असते. गुगल-सर्च इंजिनच्या जमान्यात नातीगोती अन् आपुलकी हरपली. त्यांचा सर्च अद्याप लागलेला नाही, म्हणूनच कधी तरी वाटतं- ‘कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन!’    
chaturang@expressindia.com

Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: माणसांबाबत तरी संवेदनशील आहोत?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Loksatta kutuhal Application of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीचे उपयोजन