सिद्धी महाजन

जगात सर्वात मोठय़ा प्रमाणावर हरित वायूंचं उत्सर्जन करणाऱ्या चीनमधली होई ऑ धाडसानं पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल बोलते आहे. जागतिक हवामानबदलाचे होणारे भयंकर परिणाम आटोक्यात आणण्यासाठी आता तरी सगळ्यांनी जागं व्हायलाच हवं,  हे ती तळमळीनं सांगते आहे. हे सगळं करण्यासाठी तिला तिच्या देशातच सरकारी पातळीवरून विरोध तर झालाच, पण  तिची शाळाही बंद करण्यात आली आणि तिला स्वत:चं घरही सोडावं लागलं. तरीही होई ऑ पर्यावरण रक्षणासाठी ठामपणे उभी राहिली,  चीनच्या अभेद्य भिंतीसारखी!  

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

हवामानबदलाविरुद्ध जगभर पेट घेणारी ‘फ्रायडेज् फॉर फ्यूचर’ चळवळ पूर्ण वेगानं फोफावत होती तेव्हाची ही गोष्ट. जगभरातील विद्यार्थी आणि पर्यावरण रक्षण चळवळीचे खंदे समर्थक जागोजागी निदर्शनं करत होते. सरकारी इमारती, सार्वजनिक चौक या ठिकाणी ठिय्या देऊन घोषणा देत होते. नाराजी व्यक्त करत होते. लाखो ठिकाणी शाळकरी मुलं आपला शिक्षणाचा हक्क डावलून पर्यावरणविषयक असंवेदनशीलतेविरुद्ध असहकार नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरत होती. शाळेत जाण्याचं नाकारून व्यवस्थेच्या नाकर्तेपणावर बोट ठेवण्याचं धाडस दाखवत होती.

तेव्हाच या सर्व घडामोडींपासून सुमारे सहाशे किलोमीटर दूर एका लहानशा मुलीच्या अटके साठी सारे प्रयत्न के ले जात होते.  पोलिसांकडून तासन्तास चौकशी करण्यात येत होती. तिचे खासगी हितसंबंध, वैयक्तिक माहिती बारकाईनं पाहिली जात होती. तिच्या उद्दिष्टांवर पुन:पुन्हा संशयाची सुई वळवली जात होती. तिची सरकारविरुद्ध चाललेली एकाकी धडपड थांबवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तिच्यावर, तिच्या आईवडिलांवर दबाव टाकण्यात आला. तिच्याकडून बळजबरीनं माफीनामा लिहून घेण्यात आला. तरीही आपल्या भूमिकेपासून ही रणरागिणी यत्किंचितही ढळली नाही. या खमक्या पोरीवर कोणतीच मात्रा चालत नाही हे पाहून शेवटी तिला शाळेची दारं बंद करण्यात आली. धमकीवजा सूचना मिळू लागल्या. तिच्या आईवडिलांना तिच्या सुरक्षेची चिंता वाटू लागल्यानं त्यांनी तिला घरात स्थानबद्ध केलं. तेव्हा मात्र आपल्या तत्त्वनिष्ठ भूमिकेवर ठाम राहात या स्वाभिमानी मुलीनं राहातं घर सोडलं.

ही कहाणी आहे, होई ऑ (Howey Ou) या चीनमध्ये राहणाऱ्या सोळा वर्षे वयाच्या मुलीची. ती आहे हवामानबदलांच्या दुष्परिणामांविरुद्ध सार्वजनिक स्तरावर आवाज उठवणारी  कार्यकर्ती आहे. पर्यावरण संरक्षण आणि हवामानबदल यावर भर चौकात एकटी बसून शांतपणे निदर्शनं आणि जनजागृती करणारी ही मुलगी लोकांना येऊ घातलेल्या संकटाची पूर्वसूचना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. हवामानबदलाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी दर शुक्रवारी रस्त्यावर उतरणारी, चीनमधील गिलीन प्रांतात राहणारी होई पर्यावरणरक्षणासाठी अल्प संख्येनं का होईना, आवाज उठवणाऱ्या चिनी तरुणाईचा राष्ट्रीय चेहरा बनली आहे.

आजघडीला चीन हा जगातील सर्वात मोठय़ा प्रमाणावर हरित वायूंचं उत्सर्जन करणारा देश आहे. अतिघातक प्रदूषण पातळीवर पोहोचलेल्या हवेमुळे निर्माण होणाऱ्या रासायनिक धुक्याच्या माध्यमातून इथली शहरं मृत्यूचा सापळा बनत चालली आहेत. जरी या देशानं २०६० पूर्वी शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट साध्य करण्याचं ध्येय मोठय़ा अभिमानानं जाहीर केलं असलं, तरी कोळसा आणि इतर पेट्रोलियम उद्योगांत गुंतवणूक करणं अजिबात कमी केलेलं अथवा थांबवलेलं नाही. जगात सर्वात जास्त अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता बाळगणाऱ्या या देशात बेसुमार औद्योगिकीकरणामुळे दिवसेंदिवस वाढत जाणारं हरित वायूंचं उत्सर्जन या देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच भयानक विध्वंसाच्या उंबरठय़ावर नेऊन सोडणार आहे.

गंमत म्हणजे पाच वर्षांपूर्वी, जेव्हा ती इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती, तेव्हा या मुलीला यातलं अवाक्षरही माहीत नव्हतं. जगातील १९० नेत्यांना पॅरिसमध्ये एकत्र येऊन काही कागदांवर स्वाक्षऱ्या करताना तिनं टीव्हीवर पाहिलं तेव्हा पर्यावरण संरक्षण या नावाचं काही गंभीरपणे घ्यायचं असतं हे तिला जाणवलं, पण फारसं समजलं नाही. जेव्हा तिनं याबद्दल अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या पॅरिस कराराचं प्रयोजन तिला समजत नाहीये आणि तिच्या आजूबाजूला कुणीही याबद्दल बोलत नाहीये, याची तिला खूप लाज वाटली. स्वत:चा अन् व्यवस्थेचा रागही आला.

त्यानंतर पर्यावरण संवर्धन, हवामानबदल, जागतिक तापमानवाढ, हरित वायूंचं उत्सर्जन, याबद्दल केले जाणारे अनेक कायदे, तरतुदींबद्दल अधिक जाणून घेण्याचा होईनं जणू चंग बांधला. प्राण्यांबद्दल आस्था निर्माण झाल्यानं तिनं मांसाहाराचा त्याग केला, हळूहळू आपल्या कुटुंबालाही शाकाहाराची दीक्षा दिली. सोळाव्या वाढदिवशी अल गोर यांचा ‘द इनकन्व्हीनियंट  ट्रूथ’ हा माहितीपट पाहून तिचं विचारचक्र वेगानं फिरायला लागलं. तिला कळून चुकलं, की हवामानबदलाची आपत्ती ही पृथ्वीवरच्या सजीवसृष्टीला हळूहळू गिळंकृत करणारी आतापर्यंतची सर्वात मोठी आपत्ती आहे. पण याबद्दल तिला ना शाळेत काही शिकवलं जात होतं, ना तिच्या आजूबाजूच्या मित्रपरिवारात याबद्दल काही बोललं जात होतं. तिला दिसत होतं, की परिस्थितीची पुरती जाणीव होण्यासाठी पुरेसं पर्यावरणविषयक शिक्षणच यांपैकी कुणाला मिळालेलं नाहीये.  वातावरणबदलामुळे उद्भवलेल्या पूर, वादळ, यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर वर्तमानपत्रात सैन्य आणि आपत्कालीन मदत दलांनी केलेल्या मदतीची, त्यांच्या शौर्य आणि धैर्याची बातमी केली जाते, मात्र त्या आपत्तींमागचं शास्त्रीय कारण उलगडून सांगणं, खऱ्या आणि लवकर दिसून न येणाऱ्या संकटाबद्दल लोकांना जागृत करणं हे चौथा स्तंभ करताना दिसून येत नाही. एखाद्या वादग्रस्त विषयावर मत मांडू गेल्यावर, मत मांडू पाहणाऱ्यांचा आवाज दडपून टाकण्याची घातक परंपरा चीनला नवीन नाही.

चीनच्या अनियंत्रित विकासाचा मनोरा दडपशाहीच्या पायावर उभारला गेला आहे. एकाधिकारशाही गाजवण्याची सवय असलेल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना होईच्या छोटय़ाशा आंदोलनाचीही भीती वाटते. तिच्या प्रयत्नांमुळे प्रदूषण आणि इतर पर्यावरणीय समस्यांवर उपाययोजना करण्यात सरकारनं दाखवलेली असमर्थता आणि कोळसा उद्योगात गुंतलेले राजकीय हितसंबंध उघडकीस आल्यास लोकमानस बदलेल. यामुळे चीनच्या विकासाच्या वेगाला खीळ बसेल, असं तिथल्या सरकारला वाटतं. पावलापावलांवर विरोध होणारच, हे माहीत असूनसुद्धा होई शांततापूर्ण रीतीनं आंदोलन करणं पसंत करते. इतकी वर्ष ‘एकला चलो रे’ केल्यानंतर आता सरकारी अधिकारी, सुरक्षा समिती, यांच्याकडून तिला मिळणारी वागणूक अयोग्य आहे हे लोकांना पटतंय. त्यामुळे तिच्या विचाराचा प्रसार होतोय, तिचं काम घरोघरी पोहोचतंय. अठरा महिन्यांच्या आंदोलनानंतर आता तिच्या प्रांतातील लोकांना, हवामानबदलाच्या समस्येला गंभीरपणे घ्यायला हवं असल्याचं हळूहळू कळतं आहे.

साओ जियासिन या आणखी एका पर्यावरण चळवळीतील विद्यार्थी कार्यकर्त्यांबरोबर एकत्र काम करत ती अधिकाधिक तरुणांशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करतेय. एका आंतरराष्ट्रीय युथ हॉस्टेलमध्येच राहून चळवळीचं काम सांभाळण्याचा प्रयत्न करतेय.

वैज्ञानिक आणि संशोधक यांच्या म्हणण्याप्रमाणे सरकारनं आपली भूमिका बदलायला हवी, असं खूप मनापासून सांगू पाहणारी ही मुलगी वैयक्तिक प्रयत्नांचं महत्त्वही सांगत असते. ती पर्यावरणपूरक जीवनशैलीचं महत्त्व सोप्या शब्दांत पटवून देते. पर्यावरणपूरक जगणं म्हणजे नुसतं निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तूंचा उपयोग टाळणं किंवा नैसर्गिक स्रोतांचा अपव्यय टाळणं एवढंच नाहीये. पर्यावरणपूरक जीवनशैली अनुसरणं म्हणजे निसर्गाला आपल्या जगण्याच्या केंद्रस्थानी मानून जगणं. आतल्या अस्तित्वाच्या अन् बाहेरील महत्त्वाच्या जाणिवेसकट निसर्गाशी जोडलं जाणं. तसं आपण जोडलं गेलो म्हणजे आपण निसर्गाचं संरक्षण करत नसून निसर्गच आपलं संवर्धन करत आहे, हे हळूहळू लक्षात येऊ लागेल. तर आतापर्यंत व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून के ल्या जाणाऱ्या अपवादांचं परिवर्तन भवतालाशी ताल धरून गुंफलेल्या घननादात होऊन जाईल. सर्वानीच आपल्या या निसर्गाशी असलेल्या सुंदर नात्याचं पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडेसं शांत, एकाग्रचित्त बसून डोळे बंद केल्यास आपल्या आतच बाहेरील निसर्गाचं प्रतिबिंब अनुभवता येईल. जन्म झाल्यापासून निसर्गाच्या साधनसंपत्तीवर पोसलेलं हे शरीर, समाज, देश आणि उभ्या मानवजातीच्या विकासाची प्रेरणा निसर्गकेंद्रित असली पाहिजे, हेच पटवून देण्याचा आटापिटा होईसारख्या मुली आपल्या प्रयत्नांतून करत आहेत.

अनुभवाच्या सर्वात मोठय़ा शाळेत तावून सुलाखून निघालेली होई आता १८ वर्षांची आहे. ‘‘सध्या मी करत आहे ते काम आवश्यक आहे, म्हणून मी पुन्हा शाळेत जाऊ इच्छित नाही.’’ ती म्हणते. ‘‘चीनला आणखी एका हवामानशास्त्रज्ञाची गरज नाही, कारण प्रयोग करणारे आणि निरीक्षणं नोंदवणारे असे बरेच लोक आहेत. विज्ञानाचा रोख स्पष्ट आहे. तो ओळखून सरकार आणि जनतेकडून कार्यवाही घडणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी कुणीतरी बदलाची मागणी करणं गरजेचं आहे. बदलाचा पाठपुरावा करण्यासाठी अधिकाधिक कार्यकर्त्यांची इथे गरज आहे.’’ असं ती सांगते.

‘करोना’च्या साथीनं हातात किती कमी वेळ आहे याची जाणीव जगाला करून दिली. ही साथ नुसतीच कुण्या विषाणूची मक्तेदारी नसून भविष्यात येऊ घातलेल्या महाकाय हवामान आणि पर्यावरणीय आणीबाणीची रंगीत तालीम होती. कोणत्याही पाठिंब्याशिवाय असुरक्षिततेच्या सावटात दोन वर्ष चाललेली तिची धडपड हळूहळू का होईना, आता यशस्वी होते आहे. तिचा आवाज ऐकला जातोय. तिची जगभर दखल घेतली जातेय. ‘व्हच्र्युअल प्रायव्हेट नेटवर्क ’च्या आधारे, पूर्ण काळजी घेऊन ती देशाबाहेरच्या पत्रकारांशी, आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधते आहे. आपल्याच देशात आपला आवाज ऐकला जावा यासाठी तिला मोठा संघर्ष करावा लागत आहे.

तिचा आवाज क्षीण करण्यासाठी उच्च स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. तरीही तो आवाज तिथल्या तरुणाईकडून एक ना एक दिवस ऐकला जाईल, अशी आशा ती बाळगून आहे. याचसाठी साऱ्या अडचणींवर मात करीत होई खंबीरपणे उभी आहे. चीनच्या अभेद्य भिंतीसारखी!

wsnmhjn33@gmail.com