डॉ. स्वरूपा भागवत – chaturangnew@gmail.com

मावळत्या दिनकरानं मागे सोडलेल्या लाल, केशरी, सोनेरी छटा काही क्षणांतच लोप पावल्या आणि आसमंतात काळोखाचं साम्राज्य पसरलं. काळोखाला निराशेचं प्रतीक मानलं जातं. माझ्या मनाची अवस्था तरी याहून काय निराळी होती? दररोजच्या सवयीप्रमाणे कॉफीचा मग घेऊन घराच्या बाल्कनीत मी बसले खरी. पण आज माझं कशातच लक्ष लागत नव्हतं. बाल्कनीच्या समोरच्या बागेत स्वच्छंद खेळून आपापल्या घराकडे निघालेली छोटी मुलं, दिवसभराच्या कामाने थकूनभागून घरी परतणारे स्त्री-पुरुष, मंदिरात संध्याकाळच्या आरतीसाठी थांबलेले माझ्यासारखे ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचं निरीक्षण करायला मला नेहमी किती आवडायचं. पण आज चित्त थाऱ्यावरच नव्हतं. गेल्या काही दिवसातल्या घटनांचा विचार करण्यात ते नकळतच गुंग झालं होतं..

light pollution effect on human health
अंधेरा कायम रहे!!
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
narayana murthy experienced hunger for 120 hours hitchhiking in Europe 50 years ago but what happens your body starvation 5 day doctor said
नारायण मूर्ती राहिले होते १२० तास उपाशी; पाच दिवस उपाशी राहिल्याने शरीरावर काय परिणाम होतात?
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा

दहा दिवसांपूर्वीची संध्याकाळ. आमच्या ‘ज्येष्ठ नागरिकसंघा’च्या गायन स्पध्रेत पहिलं बक्षीस पटकावून मी घरी आले होते. वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षीही किती छान गाऊ शकतो आपण! मी मनोमन आनंदले होते. ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ हे माझं आवडतं गाणं आणि ‘ह्यचं’ही. आठ वर्षांपूर्वी वसंतराव गेले.

३८ वर्षांची साथसंगत सोडून. एकुलता एक मुलगा अभिजीत अमेरिकेत स्थायिक झालेला. एका खासगी शाळेत आधी शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका अशा भूमिका बजावून मी ११ वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. ‘‘आपल्यापकी एकजण आधी जाणार. पण दुसऱ्यानं जीवनाची घडी कधी विस्कटू द्यायची नाही हं.. आणि प्रेमाच्या आठवणींचा वसंतही कायम फुललेला ठेवायचा.’’,जाण्याच्या थोडे दिवस आधी वसंतराव मला थट्टेने म्हणाले होते. मला त्यांची खूप आठवण आली. मी एकटी राहते. पण किती गुंतवून ठेवलं आहे ना मी स्वत:ला? अभिजीत सारखा आग्रह करतोय अमेरिकेला यायचा. पण इथं कसं माझं अगदी मस्त चाललं आहे. मत्रिणी, समाजसेवा, पर्यटन, लेखन.. मला स्वत:चाच क्षणभर हेवा वाटला. ‘जीवनात ही घडी ..’, हे गाणं पुन्हा पुन्हा गुणगुणावंस वाटत होतं.

रात्रीचं जेवण झाल्यावर मी झोपायची तयारी करत होते, आणि हे काय? अचानक ओटीपोटात का दुखायला लागलं माझ्या?.. योनीतून किंचितसा रक्तत्राव झाला आहे, असंही वाटलं मला. रक्तस्त्राव? या वयात? मी विचार करायला लागले, असू दे.. पुढचे चार दिवस खूप बिझी आहे मी. वेळ कुठं आहे इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला? उद्या सकाळी अनाथाश्रमात जायचंय. दत्तक घ्यायला दोन जोडपी येणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. आणि दुपारी? अरे हो, विसरले कशी? दिव्यांगांसाठी चित्रकला स्पर्धा ठेवली आहे ना आपल्या ‘स्नेहबंध’संस्थेनं परवा,  माझ्या बिझी शेडय़ूलचा विचार करता करता कधी झोप लागली ते कळलंच नाही. पोट दुखायचंही थांबलं होतं.

झोप झाल्यामुळे  दुसऱ्या दिवशी सकाळी मला चांगली हुशारी वाटली. माझ्या एकटीपुरता स्वयंपाक करून डबा घेऊन मी घराबाहेर पडले. अनाथाश्रमात जायचं होतं. संध्याकाळी परत यायला किती वाजतील कुणास ठाऊक? स्पध्रेनंतर अवयवदानावरचं एक व्याख्यान ऐकायलाही जायचं होतं मला. मी रिक्षात बसले आणि माझ्या मत्रिणीचा, पुष्पाचा फोन आला. पुष्पा माझी शाळेतली सहकारी. माझ्याच वयाची. आम्ही दोघी एकत्र नोकरीला लागलो आणि एकाच वर्षी निवृत्त झालो. शनिवार-रविवार तिच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर येणार का विचारत होती मला. मी आनंदानं होकार कळवला. पुढे काय घडणार आहे याची मला थोडीतरी कल्पना होती का?

व्याख्यानानंतर संध्याकाळी घरी परतल्यावर मात्र माझं पोट जास्तच दुखायला लागलं आणि योनीतून पुन्हा रक्तस्त्राव सुरू झाला. दुसऱ्या दिवशी तर अजिबातच सहन होईना. थकवाही जाणवत होता. मला घराबाहेर पडणं शक्यच नव्हतं. ‘हे काय दुखणं उपटलंय? आज किती कामं होती मला..’ माझी स्वत:वरच चिडचिड सुरू  झाली. हे प्रकरण नक्कीच साधं नाही, हे मला समजत होतं. पण माझं मन मात्र मानायला तयार नव्हतं. ‘‘अगं शुभदा, आता अंगावर काढायचं नाही हं. चल बरं. मी येते तुझ्याबरोबर डॉक्टरांकडे.’’, शेजारच्या बििल्डगमधली प्रतिभा मला म्हणाली.

पुढच्या पाच-सहा दिवसांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जोशी यांच्याकडे तपासण्या, बायॉप्सी, रक्ताच्या चाचण्या, एमआरआय यांमधून मला ज्याची भीती होती तेच निदान झालं, गर्भाशयाचा कर्करोग. मी पुरती खचून गेले. प्रतिभा आणि तिची सून आळीपाळीने माझ्याबरोबर रुग्णालयात थांबत होत्या. कालच्या भेटीत डॉक्टरांनी मला सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. ‘‘मिसेस दाते, तुम्ही घाबरून जाऊ नका. खरं म्हणजे या कर्करोगाची लक्षणं सुरवातीलाच दिसून येतात. तुमच्या बाबतीत ही लक्षणं उशिरा दिसून आली म्हणून काळजी करू नका. तुम्ही या बाबतीत लकी आहात, की ही कर्करोगाच्या तिसऱ्या स्टेजची फक्त सुरुवात आहे. म्हणजे कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर आलेला असला तरी तो आजूबाजूच्या किंवा लांबच्या कुठल्याही भागात पसरलेला नाही. अर्थात शस्त्रक्रियेच्या वेळेस चित्र अधिक स्पष्ट होईल. आम्ही असे रुग्ण पाहिले आहेत आणि ते उपचार घेऊन पूर्ण बरेही झाले आहेत.’’ डॉ. जोशी त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून सांगत होते. माझाही त्यांच्यावर विश्वास होता. ‘‘पण उपचार काय घ्यावे लागतील मला?’’, मी थोडं चाचरतच विचारलं. मग शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपी या उपचारपद्धती, त्याला लागणारा खर्च, कालावधी याविषयीच्या माझ्या सगळ्या शंकांचं त्यांनी निरसन केलं. आता निर्णय मला घ्यायचा होता. शस्त्रक्रियेसाठीची व्यवस्थाही करायची होती. माझ्या मनाची घालमेल सुरू झाली. रुग्णालयामधून प्रतिभा मला तिच्या घरी घेऊन गेली. रात्री जेवता-जेवता प्रतिभा मला म्हणाली, ‘‘हे बघ, अभिजीतला फोन करून बोलावून घे. लवकरात लवकर करून टाकू या शस्त्रक्रिया आणि त्याला लगेच यायला जमत नसेल तर मी आहे की तुझ्याबरोबर. तो नंतर मागाहून आला तरी चालेल. पण निर्णय घ्यायलाच हवा तुला.’’

डोक्यात विचारचक्र सुरू झालं. मी एवढी सक्रिय, सगळ्या क्षेत्रांमध्ये धडाडीनं काम करणारी, स्वावलंबी. मला याचा जरा जास्तच अभिमान होता ना? आता काय? पुढचं एक-दीड  वर्ष काहीच करायचं नाही? आणि इतरांवर अवलंबून राहायचं? माझ्यातल्या ‘इगो’नं डोकं वर काढलं होतं. एक रात्र प्रतिभाकडे राहून मी स्वत:च्या घरी परतले. ‘‘काही काळजी करू नको गं. शेजारीच तर आहोत. काही लागलं तर फोन करीनच की, आणि आता औषधांमुळे पोटात दुखतही नाहीये. शस्त्रक्रियेचंही ठरवते आजच.’’ माझ्याकडून पक्कं आश्वासन मिळाल्यावरच प्रतिभानं मला घरी जायची परवानगी दिली होती. माझ्या हट्टापुढे तिला नमतं घ्यावं लागलं होतं.

मी आज घरी आले होते खरी. पण मला खूपच एकाकी आणि निराश वाटायला लागलं होतं. काळोख आता आणखीनच मिट्ट झाला होता. आभाळात ढग भरून यायलाही सुरुवात झाली होती. थंड झालेली कॉफी कशीबशी घशाखाली उतरवत असताना टेलिफोन खणखणला आणि मी भानावर आले. पुण्याहून माझ्या भाच्याचा-केतनचा फोन होता. ‘‘काय मामी, कशी आहेस? अगं, आनंदाची बातमी द्यायला फोन केला. अथर्वच्या मुंजीची तारीख ठरली.  यायचंस हं तू नक्की.’’‘‘अरे वा! हो का? प्रयत्न करते यायचा.’’ मी त्रोटकच उत्तर दिलं.

‘‘अगं म्हणजे काय? माझी लाडकी मामी हवीच मुंजीत. तू आणि मामानं किती केलं या अनाथ भाच्याचं. जसा अभिजीतदादा तसाच मीही होतो तुमच्यासाठी. आणि आत्तासुद्धा किती झटतेस गं इतरांसाठी. तुझे आशीर्वाद अथर्वसाठी खूप मोलाचे आहेत. असं कर, चार दिवस आधीच ये. थोडा वेळ काढ ना आमच्यासाठी..’’, केतन मनापासून बोलत होता. मग त्याची बायको केतकीही बोलली. माझी व्यथा सांगून त्यांच्या आनंदावर विरजण का घालू मी? ‘‘हो, येईन मी नक्की.’’, माझी निराशा लपवत बळे-बळे हसतच मी म्हणाले.

त्यानंतर पाठोपाठ अमेरिकेहून अभिजीतचा फोन आला. मुलगा आणि सुनेनं केलेली माझी काळजी, अमेरिकेला येण्याचा प्रेमळ आग्रह आणि नातवंडांचा लाघवी हट्ट.. आता मात्र माझा बांध फुटला. ‘ऐकायला नीट येत नाहीये,’ असं म्हणत मी फोन कट केला. आभाळात ढग भरून आले आणि पाऊस पडायला सुरुवात झाली..

मी पुन्हा एकटी बसून राहिले. माझ्या आजारापेक्षाही माझ्यामुळे इतरांना होऊ घातलेल्या त्रासाचं मला जास्त दडपण आलं होतं. आता काय उरलं होतं माझ्या आयुष्यात? ३५ वर्षे शिक्षिकेची नोकरी केली. परिपूर्ण जगले. सुदैवाने आíथक चणचणही भासली नाही. ह्यंच्या जाण्यानंतरही मी खचले नाही. एकटी राहायला कचरले नाही. माणसं जोडली. समाजसेवा केली. आता कशाला हवीय शस्त्रक्रिया, केमोथेरपी अन् रेडिएशन? हो, मी सर्वाना हवीहवीशी वाटते. पण माझ्या आजाराबद्दल कळल्यावर मुलगा, नातेवाईक, मत्रिणी माझी तितकीच काळजी घेतील? घेतीलही कदाचित. पण त्यांना त्रास कशाला माझा? त्यांच्यावर भार टाकायचा? आणि इतरांवर का अवलंबून राहू मी? उपचारांशिवाय फार फार तर वर्षभर आयुष्य असेल माझं. हे उरलेलं आयुष्य आता ‘बोनस’ समजून जगायचं. नाही घ्यायचे उपचार. चला मग माझा निर्णय ठरला तर. डॉक्टरांना सांगून टाकते उद्याच..

रात्रीचे नऊ वाजले होते. मला फारशी भूक नव्हतीच. पाऊस अजून पडतच होता. तितक्यात माझा मोबाइल वाजला. कर्करोग हॉस्पिटलमधून फोन होता. ‘‘सॉरी मॅडम. इतक्या उशिरा फोन केला. पण सुजय पाटीलच्या कर्क रोगाच्या उपचारांसाठी तुम्ही मदत मिळवून दिली होती ना सहयोग ट्रस्टकडून? त्याचे उपचार उद्या सुरू होत आहेत.  तुम्ही इकडे येऊ शकाल ११ वाजता? काही पेपर्सवर सह्य हव्या आहेत.’’ तिकडून विचारणा झाली.

‘‘कळवते तुम्हाला.’’, निर्वकिारपणे मी फोन ठेवून दिला.  पण अंतर्मुख झाले..

इतका टोकाचा विचार मी कसा काय करत होते थोडय़ा वेळापूर्वी? दहा वर्षांच्या सुजयसमोर, कर्करोगाच्या इतर रुग्णांसमोर मी नकळत कोणता आदर्श ठेवणार होते? नकारात्मकतेचा? त्यांचे मनोधर्य वाढवण्याचा माझ्यासारख्या पराजितेला काय अधिकार होता? मान्य, माझ्या आयुष्याचा उत्तरार्ध होता आणि त्यांचा पूर्वार्ध. म्हणून काय झालं? आजवर मी इतरांसाठी झटले, आता माझ्यासाठी करायची इतरांची वेळ नाही का? अर्थात ही काही व्यावहारिक देवाण-घेवाण नाही आणि केलेल्या मदतीचा जमाखर्चही नाही. पण शेवटी नातीगोती, मुलांवरचे संस्कार, सामाजिक बांधिलकी म्हणजे काय हो? एकमेकांसाठी झटण्यात, एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यात आणि आपल्यावर वेळ आली असता मदतीसाठी हाक मारण्यात कसली भीड आणि कसला संकोच? आपल्यासाठी कोणी करणारच नाही किंवा त्यांच्यावर भार कशाला, हा विचार कशासाठी? आपल्या भारतीय समाजात तर नात्यांना किती महत्त्व आहे. मी इतकी भाग्यवान आहे की फक्त रक्ताची नाहीत, तर प्रेमाची नातीही आहेत माझ्यासोबत. या नात्यांची किंमत मला कळली कशी नाही? याउलट स्वत:ला दुर्दैवी समजून हतबल झाले होते मी थोडय़ा वेळापूर्वी. शिवाय यांना- म्हणजे वसंतरावांना दिलेलं सकारात्मक जगण्याचं वचनही मी कशी काय मोडत होते? महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनाही विश्वास वाटतोय की हे उपचार यशस्वी होणार. मग मलाही असा विश्वास वाटलाच पाहिजे. सुदैवाने हे उपचार घेण्याची माझी ऐपत आहे. ज्यांना उपचार परवडत नाहीत त्यांचं काय? या आजारातून मी बरी होईन आणि इतरांच्या मदतीला उभी राहीन. बस्स.. आता जगायचं इतरांसाठी आणि स्वत:साठीही. हाक मारायची मदतीसाठी. उद्या सकाळीच अभिजीतला फोन करते आणि बोलावून घेते. मनामधल्या द्वंद्वामध्ये सकारात्मकतेचाच विजय झाला होता. त्या एका फोन कॉलनं माझा दृष्टिकोन बदलून टाकला होता. मोठय़ा आत्मविश्वासानं आणि शांत मनानं मी झोपी गेले. पाऊसही थोडा कमी झाला होता..

सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानं मला जाग आली. पाऊस पूर्ण थांबला होता. गरम चहाचा कप घेऊन मी बाल्कनीत येऊन बसले. मनावरचं मळभ दूर झालं होतं. कोवळ्या सूर्यकिरणांनी आसमंत प्रफुल्लित झाला होता. आकाश मोकळं झालं होतं..