05 March 2021

News Flash

चंद्रवेडय़ा अवकाशकन्या

‘चांद्रयान-२’ ची मोहीम यशस्वी झाली की आंतरराष्ट्रीय इतिहासात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल.

|| रुचिरा सावंत

‘इस्रो’च्या पन्नास वर्षांच्या इतिहासात दोन स्त्रिया (रितू क्रिधाल आणि वनिथा मुथय्या) नेतृत्व करत असलेली ही पहिलीच मोहीम असल्यामुळेच तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘चांद्रयान-२’ ची मोहीम यशस्वी झाली की आंतरराष्ट्रीय इतिहासात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवलं जाईल. ‘चांद्रयान-२’ च्या मदतीने चंद्रावर आपलं पाऊल ठेवण्याचं आव्हान पूर्ण होईल आणि मानव किंवा जगातील कोणताच देश जिथवर पोहोचला नाही, त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला जाईल.. यासाठी आता प्रतीक्षा आहे ती ७ सप्टेंबरची..

मोहीम ‘चांद्रयान-२’ जाहीर झाल्यापासूनच सगळ्यांना त्याविषयीची उत्सुकता आणि कुतूहल होते. देशाच्याच नव्हे तर आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन विश्वासाठी ही घटना महत्त्वाची होती. १५ जुलै २०१९ रोजी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी हे यान प्रक्षेपित होऊन ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरणार होतं.. वैज्ञानिक आणि सामान्यजनही त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते आणि टी- ५६ ला म्हणजे मोहिमेच्या काउंट डाउनची शेवटची ५६ मिनिटं बाकी असताना वैज्ञानिकांना यानामध्ये तांत्रिक बिघाड (टेक्निकल स्लॅग) जाणवला आणि मोहीम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.. सगळ्यांचाच हिरमोड झाला खरा, पण वैज्ञानिक नाउमेद झाले नाहीत. त्यांनी सातच दिवसांत म्हणजे २२ जुलै रोजी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘इस्रो’च्या (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) ‘बाहुबली’ रॉकेट म्हणजेच जी.एस.एल.व्ही. मार्क ३ – एम १ ने उड्डाण केल्यावर अवघ्या १८ मिनिटांत, दुपारी ३ वाजता ‘चांद्रयान-२’ ला  प्रक्षेपित केलं गेलं.. आणि एका संभाव्य विक्रमाची नांदी झाली..

१८ मिनिटांचं ते थरारनाटय़ संपलं आणि या यशासंदर्भात बोलण्यासाठी ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन उभे राहिले. अनेकांच्या मनात अभिमान, कौतुक, आनंद, कृतज्ञता उचंबळून येऊन त्याची परिणती आनंदाश्रूमध्ये झाली. त्यांनी सुरुवातीलाच अधोरेखित केलेलं वाक्य फार महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, ‘‘तांत्रिक अडचण आल्यावर सुरुवातीचे २४ तास ज्या झपाटलेपणाने काम झालं ते कल्पनेपलीकडचे आहे. ते करण्यासाठी देशासाठी, आपल्या कामासाठी, ध्येयासाठी सगळ्या मर्यादांपलीकडे विचार करणारी माणसं लागतात. ती आपल्याकडे आहेत.’’

आत्तापर्यंत ‘बाहुबली’ने अपेक्षेहून चांगली कामगिरी दर्शविली ती याच कारणामुळे. जवळपास आठवडाभर उशीर होऊनही वैज्ञानिकांनी चंद्रावर उतरण्याची तारीख फक्त एक दिवसाने पुढे नेली आहे. आता ती आहे, ७ सप्टेंबर २०१९.

या साऱ्या यशामध्ये अनेक वैज्ञानिकांचा, संशोधकांचा हातभार लागला असला तरी कौतुक करायला हवं ते ‘चांद्रयान-२’ मोहिमेच्या मिशन डायरेक्टर रितू क्रिधाल आणि प्रोजेक्ट डायरेक्टर वनिथा मुथय्या यांचं. अनेक समस्यांना तोंड देत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचं यशस्वी उड्डाण करून दाखवलं. आता त्यांच्यासमोर आहे ते आंतरराष्ट्रीय इतिहासात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचं नाव सुवर्णाक्षरांनी गोंदण्याचं ध्येय.. ‘चांद्रयान-२’च्या मदतीने चंद्रावर आपलं पाऊल ठेवण्याची महत्त्वाकांक्षा.. आणि मानव किंवा जगातील कोणताच देश जिथवर पोहोचला नाही, त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवण्याचा ध्यास..

रितू क्रिधाल हे या मोहिमेतील एक महत्त्वाचे नाव. रितूंना लहानपणापासूनच वेगळ्याच जगाने भुरळ घातली होती. ते जग म्हणजे त्यांच्याभोवती असणारं अमर्याद अवकाश आणि त्यातला त्यांचा लाडका मित्र चांदोबा. रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीत झोपल्यावर तिथून दिसणारा चांदोबा त्यांना सोबत करणारा सखा वाटायचा. त्याच्या बदलणाऱ्या छटा, त्याचं हे असं सतत दूर आकाशातून त्यांच्या संगे असणं त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करायचं आणि यातूनच या चंद्रवेडय़ा मुलीच्या मनात शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच चंद्राविषयी कुतूहल निर्माण झालं. पुढे त्यांचा ध्यास, त्यांना असणारी नावीन्याची ओढ,  काही तरी वेगळं करण्याची दांडगी इच्छाशक्ती.. त्याच दृढतेच्या जोरावर अवघं जग आशा लावून असलेल्या एका फार महत्त्वाच्या चांद्रमोहिमेच्या त्या मिशन डायरेक्टर झाल्या.

बालपणीचा मित्र चांदोबा ते भविष्यात प्रेरणा देणारा चंद्र ही वाटचाल यशस्वीपणे करणाऱ्या रितू क्रिधाल या अवकाश वीरांगनेचा हा अवकाशप्रवास आता अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. गुगलवर त्यांच्या नावाच्या शोधाचं प्रमाण वाढलं आहे. या ‘अवकाशकन्या’ रितू क्रिधालना रॉकेट वूमन म्हणूनही ओळखलं जातंय. २४ सप्टेंबर २०१४ रोजी झालेल्या भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या  ‘मार्स ऑर्बायटर मिशन’ च्या पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करण्यात त्यांचं फार मोठं योगदान होतं.

त्यांनी अशा प्रकारच्या यशाची मालाच गुंफल्यावर ‘इस्रो’ने त्यांचा गौरव केला तो ‘चांद्रयान-२’ या जागतिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेची मिशन डायरेक्टर म्हणून जबाबदारी त्यांना देऊन. रितूंनी बालपणी चंद्रासोबत केलेला प्रवास ते चंद्रापर्यंत एका मानवरहित रोव्हरच्या माध्यमातून केलेली वाटचाल ही एक स्वप्नपूर्तीच. ‘इस्रो’च्या कडक नियमांमुळे रितूंसोबत थेट संवाद साधणं शक्य नव्हतं, त्यांना त्यांची या मोहिमेसंदर्भातील मतं मांडण्यासाठी परवानगी नसल्यामुळे रितूंविषयी माहिती घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मिनी वैद यांनी लिहिलेलं, ‘‘Those Magnificient Women and Their Flying Machines’’ हे पुस्तक. अत्यंत सोप्या आणि तरी खिळवून ठेवणाऱ्या शैलीत मीनीने यात ‘इस्रो’च्या मंगळ मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या स्त्रियांविषयी लिहिलं आहे. जितक्या बारकाव्यांनी हे पुस्तक त्या स्त्रियांचा प्रवास उलगडतं तितकं खचितच इतर कोणत्या माध्यमातून ते शक्य आहे. पुस्तकात सांगितल्याप्रमाणे याआधीच्या मोहिमेदरम्यान रितूंना घर आणि काम यामध्ये समतोल साधण्यासाठी कसरत करावी लागली. पण तुम्ही मल्टीटास्किंग करणारे असलात आणि थोडे अधिक कष्ट घेण्याची तयारी असेल तर तुम्ही हे सहज करू शकता, असं रितू ठामपणे सांगतात. बऱ्याचदा असं व्हायचं की रितू काम संपवून घरी येण्यापूर्वी त्यांचे कुटुंबीय झोपी गेलेले असायचे आणि ते उठण्यापूर्वी त्या आपल्या नेमून दिलेल्या जबाबदारीच्या पूर्ततेसाठी ऑफिसला निघून जायच्या. कधी कधी त्या लॅपटॉपवरून घरातून काम करायचाही प्रयत्न करायच्या. पण या सगळ्यात त्यांच्या नवऱ्याने आणि कुटुंबाने त्यांची भरीव साथ दिली. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिलेच, पण सोबतच ते त्यांची ताकदसुद्धा झाले.

रितूंसोबतच्या आठवणींविषयी मिनी वैद यांच्याशी गप्पा मारताना जाणवतो तो त्यांच्या आवाजातला वेगळाच उत्साह. त्या म्हणतात, ‘‘रितूंसोबत घालवलेले जवळपास सगळेच क्षण मी पुस्तकात नमूद केले आहेत. तरी त्यांचं नाव घेताच क्षणी मला आठवण होते ती त्यांच्या कमालीच्या आत्मविश्वासाची आणि संयमाची. त्यांच्या कामाविषयी आणि घराविषयी बोलताना त्या ज्या सहजतेने दोन्ही हाताळतात आणि दोघांनाही समान महत्त्व देतात हे फार वाखाणण्याजोगे आहे. इतकी गुंतागुंतीची मोहीम आखत असताना त्यातलं आव्हान सांभाळणं आणि त्याचबरोबरीने घरी पाहुण्यांचं मनापासून स्वागत करणं यामधला त्या सांभाळत असलेला तोल दुर्मीळच. आणि या सगळ्यांसोबत लक्षात राहतो त्यांना साथ देणारा त्यांचा नवरा-अविनाश. जो अभिमानाने, मला माझ्या बायकोचा अभिमान आहे, असं सांगतो. आणि वर्तनातून ते दाखवूनही देतो.’’

‘चांद्रयान-२’ मोहिमेची दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टर वनिथा मुथय्या, त्यामानाने प्रकाशझोतापासून दूर आहे. मिनीच्या पुस्तकासाठीही त्यांची मुलाखत न झाल्यामुळे त्यांच्याविषयी फारच मोजकी माहिती उपलब्ध आहे. २००६ च्या ‘अ‍ॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ सायन्स’च्या ‘बेस्ट वूमन सायंटिस्ट अवॉर्ड’ने त्यांना गौरवले गेले. काटरेसॅट – १, ओशनसॅट-२ आणि मेगा ट्रॉपिक रिमोट सेन्सिंग सॅटलाइट डेटा सिस्टमच्या त्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टरही होत्या. ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या प्रसिद्ध जर्नलमध्येही २०१९ मधील महत्त्वाच्या वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या दोन्ही स्त्रिया नेतृत्व करत असलेली ही मोहीम यशस्वी झाली तर अवकाश विज्ञानात अधिराज्य गाजवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होईल. ‘इस्रो’च्या ५० वर्षांच्या (येत्या १५ ऑगस्टला ‘इस्रो’च्या स्थापनेला  ५० वर्षे पूर्ण होत आहेत.) इतिहासात दोन स्त्रिया नेतृत्व करत असलेली ही पहिलीच मोहीम. आणि त्यामुळेच तिचे महत्त्वही अनन्यसाधारण. केवळ भारतातीलच नव्हे तर पुरुषी वर्चस्व असणाऱ्या अवकाश विज्ञानाच्या या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील स्त्रियांसाठी हे प्रोत्साहन आहे. अविरत प्रेरणा आहे.

यंदाचं वर्ष हे अवकाश मोहिमा आणि चंद्र यासंदर्भात खास आहे. मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं त्याला नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली, ‘नासा’ने २०२४ मध्ये पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवण्याची केलेली घोषणा आणि भारताचे ‘चांद्रयान-२’.  ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘नासा’ने या वर्षी अपोलो मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या स्त्रियांविषयी माहिती देणारी एक मालिका सुरू केली. त्या स्त्रियांचं मोहिमेतील छोटं-मोठं योगदान त्यांचा फोटो आणि कर्तृत्व अशा स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं.  या पाश्र्वभूमीवर ‘इस्रो’च्या या अतिशय महत्त्वाच्या मोहिमेचं नेतृत्व करण्याची संधी दोन स्त्रियांना मिळणं हे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाचं ठरतं.

आपलं घर आणि हे असं किचकट वाटणारं अवकाश विज्ञानाचं क्षेत्र या दोन्हीचा समतोल लीलया साधणाऱ्या या स्त्रिया इतरांपेक्षा वेगळ्या कशा ठरतात याविषयी मिनी वैद सांगतात, ‘‘कोणताही मोठेपणा न बाळगता, आपण काही तरी वेगळं आणि अवघड काम करतोय हे मुळीच न दर्शवता या स्त्रिया सगळं ज्या सहजतेने स्वीकारतात आणि पूर्णत्वास नेतात तेच त्यांचं अद्वितीय असणं अधोरेखित करतं.’’

स्त्रियांना मिळत असलेल्या या संधीविषयी, त्यांना ही मोठी पदं मिळाल्यावर स्त्रिया या सगळ्यासाठी कशा सक्षम आहेत, आपण त्यांना यापासून वंचित ठेवून त्यांच्यावर कसा अन्याय केलाय या सगळ्याविषयी वेगवेगळ्या माध्यमांतून भरभरून लिहिलं आणि बोललं जात असताना त्या मात्र ‘‘आम्हाला स्त्री वैज्ञानिक म्हणून वेगळी वागणूक देण्यापेक्षा एक वैज्ञानिक म्हणून बरोबरीने वागवा. इतकीच आमची अपेक्षा आहे,’’ असं सांगतात आणि आपले डोळे खाडकन उघडतात. त्या वैज्ञानिकातील स्त्रीला अधोरेखित करण्याऐवजी त्या स्त्रीमधील वैज्ञानिकाला योग्य मान आपल्या सर्वाना देता यायला हवा हे आपल्याला लवकरात लवकर उमगलं तर किती फरक पडेल!

या क्षेत्रात काम करण्याविषयी या स्त्रिया त्यांचे अनुभव सांगताना म्हणतात की, सतत आपलं कर्तृत्व अधोरेखित करताना त्यांचं स्त्री असणं त्यांच्या आड येत नाही. स्त्री म्हणून त्यांना स्वत:ला वेगळ्या पद्धतीने सिद्ध करावं लागत नाही. त्यांना नेमून दिलेली कार्ये आणि ती पार पडण्याची त्यांची हातोटी या आधारावर त्यांच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. नाहीतर रितू आणि वनिथांना ‘चांद्रयान- २’ मधील या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळूच शकल्या नसत्या. यावरून एकच सिद्ध होतं की हे क्षेत्र जरी पुरुषी वर्चस्व असणारं असलं तरी इथे यशाकडे नेण्यासाठी तुमच्यातील जिद्द आणि बुद्धिमत्ता कारणीभूत ठरते.

असं असलं तरी एक स्त्री वैज्ञानिक म्हणून काम करणं, स्वत:ला सिद्ध करणं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच तसं कठीण. आकडेवारीचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की संशोधन क्षेत्रातील एकूण संशोधकांपैकी स्त्री संशोधक केवळ २८.८ टक्के इतके आहेत. जगातील ६९ विज्ञान विद्यपीठांच्या एकूण सदस्यांपैकी केवळ १२ टक्के सदस्य स्त्रिया आहेत. १९०१ पासून आतापर्यंत दिल्या गेलेल्या विज्ञानाच्या तीन शाखांमध्ये मिळून केवळ १७ स्त्रियांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. जे आंतरराष्ट्रीय पातळीवर तेच इथेही. भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारही आतापर्यंत साधारण ५०० जणांना देण्यात आला आणि त्यापैकी केवळ सोळा स्त्रिया होत्या. ही आकडेवारी पाहिली की पुन्हा एकदा स्त्रियांना या क्षेत्रात अधिकाधिक संधी मिळायला हव्यात याविषयी आणखी ठाम होतो आपण. ‘इस्रो’ने घेतलेल्या या निर्णयासोबत भविष्यात आणखी अनेक स्त्रिया मिशन डायरेक्टर होतील आणि संधी इतक्या मिळतील की मिशन डायरेक्टर एक स्त्री आहे याचं वेगळं कौतुक करावं लागणार नाही ही आशा आपण नक्कीच करू शकतो.

दशकभरापूर्वी ‘चांद्रयान-१’च्या निमित्ताने चंद्रावरील पाण्याचा शोध मानवाला लागला आणि त्यामुळेच चांद्रयान-२ कडून आणखी अपेक्षा वाढल्या. ‘चांद्रयान-२’ मध्ये ऑर्बायटर, लँडर आणि रोव्हर यांचा समावेश आहे. आणि मोहीम सुरू होण्यापूर्वी आणि आताही ‘इस्रो’चे वैज्ञानिक सध्या श्रीहरिकोटाच्या सेंटरमध्ये यासंदर्भातील कामांमध्ये व्यग्र आहेत. यापैकी ऑर्बायटरचं काम चंद्राच्या पृष्ठभागाची पाहणी करणे आणि लँडर आणि ग्राउंड स्टेशन यांच्यातील संवाद टिकवणे हे आहे. तर लँडर प्रगत प्रणोदन प्रणाली (अ‍ॅडव्हान्स प्रॉपल्शन सिस्टमचा) वापर करून सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय चंद्रमोहिमेचे जनक आणि ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष के. कस्तुरीरंगन या संदर्भात टीआयएफआर (टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) मध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘‘ही मोहीम आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने फार महत्त्वाची आहे. या मोहिमेच्या यशामुळे भारताचे जागतिक स्तरावरील स्थान उंचावेल. प्रामुख्याने आंतरग्रहीय उड्डाणासाठीच्या क्षेत्रातील. जर आपण हे करून दाखवलं तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकलेल्या अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीन या देशांनंतर आपण चौथा देश ठरू. शिवाय ‘चांद्रयान-२’च्या यशामुळे चंद्रावरील मानवी वस्तीसाठी आपला मार्ग खुला होईल.

या मोहिमेमुळे संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थान आणि महत्त्व वाढेल. चंद्राच्या कक्षेत व्यवस्थित प्रवेश मिळवता येणं हे काही महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक आहे. ऑर्बायटरवर ८, लँडरमध्ये ३, रोव्हरमध्ये २ आणि ‘नासा’चं एक अशा प्रकारे या मोहिमेदरम्यान अनेक वैज्ञानिक साधनं चंद्रावर नेण्यात आली आहे. या मोहिमांसाठी ‘नासा’चे वैज्ञानिकही उत्साही दिसत आहेत. हेन्री थ्रूप (‘नासा’ प्रोग्रॅम सायंटिस्ट) याविषयी बोलताना फार आनंदाने बोलतात. ते स्वत: या मोहिमेबाबत खूप उत्साही आहेत. त्यांच्या मते, ‘‘आपल्याला माहीत असलेल्या माहितीला नव्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा तपासण्याची संधी ही मोहीम देईल. आपल्याला माहीत नसलेल्या काही नव्या गोष्टींची उकल होईल. ‘नासा’ला या मोहिमेचा भाग होता आलं याचा ‘नासा’ला आनंद आहे.’’ आजवर कधीच न पाहिलेल्या दक्षिण ध्रुवावर आपण उतरणार असल्यामुळे आपल्याला माहितीची, शोधांची नवी दारं खुली होतील, असा त्यांना विश्वास वाटतो. गंमत म्हणजे लाँचच्या दिवशी लाइव्ह अनुभव घेण्यासाठी हेन्री आणि यासंदर्भात त्यांच्या इतकीच उत्साही असणारी त्यांची मुलं तिथल्या वेळेनुसार सकाळी लवकर उठून तयार होऊन बसतात यातच या मोहिमेविषयी लोकांमध्ये असणारे कौतुक आणि कुतूहल स्पष्ट होते.

या मोहिमेदरम्यान चंद्राचा जन्म, त्याच्या पृष्ठभागाची पाहणी, तिथल्या पाण्याचं प्रमाण आणि उगमस्थान यांचा शोध या सगळ्याचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास, तिथल्या खनिजांची शास्त्रशुद्ध माहिती, पृष्ठभागाची रासायनिक रचना या सगळ्याची खोलात जाऊन सविस्तर महिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘नासा’च्या ‘फ्लोरिडा स्पेस ग्रँट कॉन्सोर्टिअम’चे संचालक जयदीप मुखर्जी याविषयी सांगतात की, ‘‘चंद्राच्या त्या दूरच्या भागात जाऊन तिथून नमुने मिळवून त्याचा अभ्यास करणं वैज्ञानिकांना आपल्या सूर्यमालेच्या इतिहासाची माहिती करून घ्यायला उपयोगी पडेल. जेव्हा ‘नासा’ आणखी काही वर्षांनी पुन्हा माणूस चंद्रावर पाठवण्यासाठी मोहीम आखते आहे तेव्हा ‘चांद्रयान-२’ या मोहिमेतून मिळणारी माहिती ‘नासा’ला मानवी मोहीम आखण्यासाठी खूप उपयोगी पडेल.’’

या अशा मोहिमा अज्ञाताचा शोध घेण्याची माणसाची वृत्ती आणि विश्वाच्या निर्मितीविषयी त्याला असणारं प्रचंड कुतूहल शमवणं यासोबतच सामान्य माणसालाही उपयोगी पडतात का असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. यामुळे सामान्य भाषेत सांगायचं तर काय होईल माहिती आहे? नव्या युगातील शोध लागतील, त्यामुळे जागतिकीकरण वाढेल, भारतातील व्यावसायिक संधी वाढतील, सामान्य माणसाची अवकाश विज्ञान समजून घेण्याची क्षमता आणि इच्छा वाढेल, तंत्रज्ञानामध्ये प्रगती होईल आणि पुढची तरुण पिढी यातून प्रेरणा घेईल.

याचसंदर्भात बोलताना नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे म्हणतात की, ५० वर्षांपूर्वी माणूस चंद्रावर उतरला ते जितकं उत्साहवर्धक होतं, ही मोहीमसुद्धा तितकीच प्रेरणादायी ठरेल. आपल्या सर्वात जवळच्या आणि लाडक्या चंद्राकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन ही मोहीम आपल्याला देईल याची खात्री वाटते.

आता प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहताहेत ७ सप्टेंबरला होणार असलेल्या स्मूथ लँडिंगची.. सगळं आता आहे तसंच आलबेल राहिलं तर लवकरच भारत इतिहास रचेल आणि आपण सारे त्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होऊ. त्यासाठी अनेक जण नियमितपणे चांद्रयानच्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. या मोहिमेसोबत माणसाने आपल्या मर्यादेचं क्षितिज आणखी विस्तारलं आहे हे नक्की. एकत्र येऊन अखंड मानवजात एकवटली तर अशी अनेक कोडी सोडवण्याचा व नवनवी क्षितिजे गाठण्यासाठीचा प्रवास आणखी सफल होऊ  शकतो याची खात्री या अशा मोहिमा देतात.

लहानपणी पाण्यात दिसणारा चंद्र पाहता पाहता आता त्या चंद्रावर असणाऱ्या पाण्याच्या शोधात माणूस निघाला आहे. आणि तो प्रयत्न करतोय अनेक गोष्टी उलगडण्याचा.. हा प्रवास त्याच्यासाठी अनेक नवी कवाडं खुली करणार आहे.. नव्या पिढीला प्रोत्साहन देणार आहे. आणि त्यातूनच या अवकाशाला गवसणी घालता घालता त्याला आपल्या रंगात रंगवण्यासाठी, आपली छाप तिथे सोडण्यासाठी तो सज्ज होतोय.. प्रत्येक वेळी नव्या नवलाईने. नव्या दमाने.. स्त्रियांना मिळत असलेल्या या संधीविषयी, त्यांना ही मोठी पदं मिळाल्यावर स्त्रिया या सगळ्यासाठी कशा सक्षम आहेत, आपण त्यांना यापासून वंचित ठेवून त्यांच्यावर कसा अन्याय केलाय या सगळ्याविषयी वेगवेगळ्या माध्यमांतून भरभरून लिहिलं आणि बोललं जात असताना त्या मात्र ‘‘आम्हाला स्त्री वैज्ञानिक म्हणून वेगळी वागणूक देण्यापेक्षा एक वैज्ञानिक म्हणून बरोबरीने वागवा. इतकीच आमची अपेक्षा आहे,’’ असं सांगतात आणि आपले डोळे खाडकन उघडतात. त्या वैज्ञानिकातील स्त्रीला अधोरेखित करण्याऐवजी त्या स्त्रीमधील वैज्ञानिकाला योग्य मान आपल्या सर्वाना देता यायला हवा हे आपल्याला लवकरात लवकर उमगलं तर किती फरक पडेल!

ruchirasawant48@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 12:10 am

Web Title: chandrayaan 2 ritu karidhal vanitha muthayya isro mpg 94
Next Stories
1 वाचक प्रतिसाद : भांडणातली समृद्धी उमजली
2 पावसाळ्याचा आनंद अनुभवताना..
3 आक्रोश ते आर्टकिल १५
Just Now!
X