चांगला सामाजिक विषय

‘कुटुंबातील एकटेपण’ हा डॉ. शुभांगी पारकर यांचा लेख वाचला. ‘आत्महत्या बोलक्या असतात. मात्र त्याआधी त्यांच्या कृतीचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. एक आयुष्य त्यामुळे वाचू शकतं.’ हे लेखिकेचे म्हणणे योग्यच आहे. आत्महत्या, मग ती कुणीही केली असो, हा शुद्ध ‘वेडगळपणा’ आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. भलेही ती ज्याने वा जिने केली तो, त्याच्या वा तिच्या दृष्टीने समस्या, नैराश्य, दु:ख, अपमान, एकटेपण, मनासारखं होत नसल्यामुळे येणारे नैराश्य, कौटुंबिक विवंचना आदीतून कायमचे सुटण्याचा एक मार्ग असेल; परंतु कायद्याच्या दृष्टीने तर, आत्महत्या गुन्हाच आहे. कारण भलेही ती व्यक्ती आत्महत्या करून, तिला होणाऱ्या सर्व त्रासातून कायमची मुक्त होत असेल; परंतु त्या व्यक्तीच्या आत्महत्येची फार मोठी किंमत, तिच्यावर अवलंबून असणाऱ्यांना, तिच्या मुलाबाळांना चुकवावी लागते. एका व्यक्तीमुळे, घरातील अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ  शकते आणि एकदाच मिळणारे हे सुंदर आयुष्य आपल्याच हाताने का संपवावे? लेखिकेने लेखात, स्त्रियांच्या, कुटुंबात येणाऱ्या एकटेपणाविषयी, त्याच्या कारणाविषयी, त्यामुळे येणाऱ्या नैराश्याविषयी आणि त्यामुळे वाढणाऱ्या आत्महत्यांविषयी किंवा केल्या जाणाऱ्या आत्महत्यांच्या प्रयत्नांविषयी विवेचन करून, एक चांगला सामाजिक विषय मांडला आहे. स्त्रीची जशी माता, भगिनी, पत्नी आदी अनेक रूपे आहेत व ही नाती सांभाळण्यासाठी तिला कुटुंबात व समाजात स्वत:चे मन मारून तडजोडी कराव्या लागतात, तसेच तिच्याही एक ‘माणूस’ म्हणून काही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा, इच्छा, अपेक्षा असतात, हे जोपर्यंत समाज म्हणून आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत असे आत्महत्येसारखे टोकाचे विचार स्त्रियांमध्ये येणे थांबणार नाही, हे हा लेख वाचल्यावर लक्षात आले. मुळातच संवेदनाक्षम असणारी स्त्री जेव्हा, तिला तिच्या शिक्षणासाठी होणाऱ्या विरोधामुळे असो वा मनाविरुद्ध कराव्या लागणाऱ्या लग्नामुळे असो वा घरातील कौटुंबिक प्रश्नांमुळे असो, आत्महत्येसारखे टोकाचे विचार करू लागते तेव्हा ती तिची वैयक्तिक हानी तर असतेच; परंतु एक समाज म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक देश म्हणून होणारी हानीही खूप मोठी असते. कारण आपला समाजच  कुटुंबव्यवस्थेच्या पायावर उभा असल्यामुळे व स्त्री ही कुटुंबातील प्रमुख सदस्य असल्यामुळे, तिच्या मनात येणारे आत्महत्येचे विचार एका संपूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करू शकतात. म्हणूनच, लेखिकेच्या म्हणण्याप्रमाणे, घरातील स्त्रीच्या प्रत्येक कृतीचा, तिच्या वागण्यातील बदलाचा, तिच्या बोलण्याचा, त्राग्याचा अर्थ तिच्या जवळच्यांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तिच्या बोलण्याकडे, विचारांकडे, इच्छांकडे, अपेक्षांकडे दुर्लक्ष न करता, तिला समजून घेणे महत्त्वाचे आहे, तर आणि तरच ती, आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापासून परावृत्त होऊ शकेल.

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली

अंतर्मुख करायला लावणारा लेख

‘मी’ची गोष्ट या सदरातील ‘स्थिर जगण्यातली अस्थिरता’ हा ३० नोव्हेंबरच्या अंकातील रेणुका कल्पना यांचा लेख खूप आवडला, गोष्टींकडे बघण्याचा माझा दृष्टिकोण नेमका कसा आहे हा विचार करायला भाग पाडणारा, जे करतेय, वाचतेय, विचार करतेय, त्यात आत्ता मी नेमक्या कोणत्या पायरीवर आहे, याचा विचार करण्यासाठी अंतर्मुख करायला लावतोय मला हा लेख! त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता जाणवतेय, पण त्या जाणिवेचा त्रास न होता ती हवीशी वाटतेय, जिवंतपणा देतेय मला. जगण्याचा पुन्हा एकदा सगळ्याच कोनांतून विचार व्हायलाच हवा, असे अगदी आतून वाटतेय, या सुंदर जाणिवेसाठी रेणुका यांचे आभार.

– निलांबरी वाडेकर

अभिनव कल्पना

‘माझ्या कवितेची वेदना’ हा वृषाली विनायक यांचा १४ डिसेंबरच्या अंकातील लेख वाचला. इतर तरुण-तरुणी एकीकडे करिअरच्या किंवा  कुठल्या क्षेत्रात भरभक्कम पगाराची आणि प्रतिष्ठेची नोकरी मिळेल, या विचारात असताना अशा प्रकारची रूढ वाट न चोखाळता कवयित्रीने अगदी समाजभान, स्वभाषा आणि स्वत्व टिकवण्याच्या ऊर्मीने निर्मिलेली वाट अगदी योग्य वाटते. हल्लीच्या तरुण पिढीला नसलेली स्वभाषेबद्दलची गोडी फार भीतीदायक आहे. मराठी भाषेला कुचकामी वाटणाऱ्या हल्लीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या लेखांमधून मराठी भाषेबद्दल आणि मराठी साहित्यविश्वाबद्दल गोडी निर्माण होऊन सकारात्मकतेकडे वाटचाल करण्यास उपयोगी ठरेल, असे वाटते. स्वत:बद्दलचे आत्मभान निर्माण होऊन स्वत:बद्दल विचार करण्यास हल्ली कुणाकडेही वेळच नसतो. त्यासाठी आता मार्गदर्शकाची गरज आताच्या समाजाला भासते आहे, ही फार विदारक बाब आहे. आपापसातील संपत चाललेला संवाद आणि लेखातून मांडलेल्या शालेय मुलीची मनोवस्था हल्ली सगळीकडेच बघायला मिळेल. तरीही कवयित्रीने स्वभाषेत काही तरी नावीन्यपूर्ण आणि अभिनव असे मार्ग शोधण्याची कल्पना उद्याच्या पिढीसाठी फार मोठी गरज आहे.

– कृष्णा जावळे

आवाहन तरुण कथालेखिकांसाठी

मराठी साहित्यात कथेचं समृद्ध दालन आहे. आत्तापर्यंत अनेकांनी दर्जेदार कथा लिहीत मराठी साहित्याचं हे दालन जिवंत ठेवलं, नव्हे वाढवलं, मोठं केलं. आजच्या तरुण कथालेखिका, ज्यांचं वय चाळिशीच्या आत आहे,  पाठवू शकतात आपल्या कथा आमच्याकडे. २०२० च्या ‘चतुरंग’ पुरवणीत असेल त्यांच्या दर्जेदार कथांचं दालन, जे असेल मराठी साहित्यात महत्त्वाची भर घालणारं!  कथेला विषयांची मर्यादा नाही, की शैलीचं बंधन नाही. कथा कुठेही घडणारी, कुठल्याही काळातली असली तरी चालेल, मात्र माणसाच्या अस्सल जाणिवांना हात घालणारी असावी. जगण्याच्या वास्तवाला भिडत कल्पनेच्या रंजकतेून उतरलेल्या रसरशीत अनुभवगाथा आम्ही प्रसिद्ध करू शनिवारच्या अंकांतून. शब्दमर्यादा १५०० ते १८०० शब्दांपर्यंत. पाठवा chaturangnew@gmail.com किंवा  चतुरंग,  ई एल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४००७१० या पत्त्यावर.  पाकिटावर वा सब्जेटमध्ये – ‘कथा चतुरंग’ लिहिणे आवश्यक.