25 February 2021

News Flash

पुरुष हृदय ‘बाई’ : चौकोनातील वर्तुळ

या सदरातून पुरुषप्रधान समाजाचे तात्त्विक विश्लेषण- अगदी स्त्री-पुरुष यांच्या मेंदूतील फरकापर्यंत- काही प्रमाणात झालेले आहे

(संग्रहित छायाचित्र)

मकरंद साठे

makarand.sathe@gmail.com

शाळेतल्या घटनांचा परिणाम म्हणजे मी आक्रमक व्हायला शिकलो. नववी-दहावीत व्यायामशाळेत जाऊ लागलो. दोघा-चौघांना बदडून काढले. मी ‘पुरुष’ झालो. पुढे मी बास्केटबॉल खेळायला जाऊ लागलो. क्रीडापटू आणि पौरुषत्व यांचे तर असे काही नाते जोडले गेले आहे की विचारता सोय नाही. तिथे या व्यवस्थेला बढावाच मिळाला. आक्रमकता अजून वाढली. या सगळ्याचे संस्कार घरापासून वेगळे त्यामुळे तिथे गोची. कितीही प्रयत्न केला तरी शाळेत मी मिसफिट ठरलो. शाळेच्या सामाजिक चौकोनात माझे वर्तुळ कधीच नीट बसले नाही.  मी काही प्रमाणात ‘पुरुष’ बनवला गेलो, त्या तणावात काही वर्षे खेचला गेलो,  पण पुढे सावरलो..

‘पुरुष हृदय बाई’ या सदरासाठी मी लिहावे अशी मागणी आल्यावर काय लिहावे हे मला कळेना. त्याचे कारण असे की समाजातली पुरुषप्रधान प्रवृत्ती कमी कमी होत जाण्याऐवजी भारतातील आजच्या अभिनिवेशाने भरलेल्या, समाजात दुभंग निर्माण करू पाहणाऱ्या, हिंसेला उत्तेजना देणाऱ्या, राजकीय वातावरणात, ती वाढतानाच दिसते आहे. अशा परिस्थितीत या सर्वाविरोधात तीव्रतेने आवाज उठवण्यापलीकडे, स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र निषेध करण्यापलीकडे कशालाच महत्त्व उरलेले नाही असे वाटते. पण त्याच वेळी अधिक खोलवरचा विचारही अशा वेळीच कदाचित महत्त्वाचा ठरतो हेही ध्यानात येते, म्हणून हा प्रपंच करणे मी मान्य केले.

या सदरातून पुरुषप्रधान समाजाचे तात्त्विक विश्लेषण- अगदी स्त्री-पुरुष यांच्या मेंदूतील फरकापर्यंत- काही प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे मी वेगळ्या प्रकारे मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मुलींना लहान वयातच सक्षम होण्याचे शिक्षण देण्यापेक्षाही, मुलांना समानतेचे आणि स्वातंत्र्याचे महत्त्व सांगणारे शिक्षण देणे, त्यातून त्यांच्यासाठीही फायद्याचा असणारा सुदृढ समाज कसा बनतो ते समजावून सांगणे आवश्यक झाले आहे. तसे ते आधीही होतेच, पण दुर्दैवाने आजही आहे. माझ्या लहानपणी मला असे घर मिळाले ज्यात हे संस्कार केले गेले. बाहेरच्या जगात जगताना या घरच्या शिकवणुकीचा काही व्यावहारिक त्रासही झाला, पण माझे जगणे एकंदरीने खूपच अधिक समृद्ध झाले यात शंका नाही. काही वर्षांपूर्वी पुण्यात ‘मॅस्क्युलॅनिटीज’ (पुरुषत्व) या विषयावर एक परिसंवाद झाला होता. त्यात बीजभाषण करताना मी या संबंधातले काही मुद्दे आणि अनुभव मांडले होते. त्याचे संक्षिप्त आणि फेरफार केलेले रूप इथे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

मी एक सामान्य पण सुदैवी माणूस आहे. सुदैवी कारण मी जन्माने ‘आहे रे’ गटातला, ‘प्रिव्हिलेज्ड् क्लास’ मधला आहे – मी जन्माने एक पुरुष, मध्यमवर्गीय, तथाकथित उच्च जातीतला, हिंदू म्हणजे बहुसंख्येतला, शहरवासी अशी व्यक्ती आहे. आपण असे आहोत, आर्थिक आणि सामाजिकदृष्टय़ा आपण शोषणकर्त्यांच्या भूमिकेतले आहोत आणि ते चुकीचे आहे, याचे भान मला लहानपणी कधीतरी आले. निदान लिंगभानाच्या अंगाने पाहिले तर ते भान येण्यामागील कारण माझ्या कुटुंबातच अस्तित्वात होते. मी ज्या कुटुंबात वाढलो त्या कुटुंबाची जीवनपद्धती, विचारसरणी आणि कुटुंबाबाहेर मी ज्या समाजात- म्हणजे शाळा, कॉलेज आदीत- वावरत होतो तिथल्या रूढी, जीवनपद्धती यात कमालीची तफावत होती- या लेखाच्या अनुषंगाने पाहिले तर लिंगभावाच्या अंगाने त्यात प्रचंड दरी होती आणि त्याचा तणाव मला लहानपणापासून सतत जाणवत आला, काही प्रमाणात तरी मी ज्या प्रकारचा लेखक झालो तसा होण्याला कारणीभूत झाला.

माझ्या आईची आई, म्हणजे माझी आजी ही संपूर्णपणे निरक्षर होती, पण ती उत्तम शब्दकळा असणाऱ्या कविता करत असे. ती कविता करत असे त्या बहुतांशी स्त्री जीवनाशी निगडित, म्हणजे बडबडगीते, मंगलाष्टके, अंगाईगीते, निसर्गकविता अशा होत्या.  विशेष म्हणजे ती जहाल स्त्रीवादी होती (१९४० च्या दशकात तिने माझ्या आईला उच्चशिक्षण देण्याचा आग्रह धरला आणि १९५४ मध्ये तिने माझ्या आईचे कन्यादान करणे नाकारले.) तिच्या या कविता जहाल स्त्रीवादी असत. तिने माझ्या आईसाठी लिहिलेल्या अंगाईचे हे एक कडवे :

ही जन्माला आली कन्या म्हणुनी,

औदास्य पसरते सदनी

नच केवळ ते प्रियजन दुखित होती,

वसुधाही खचते म्हणती

परि असेल का कारण हेच तयाते,

निज दुहिता परकी होते,

तू होऊ नकोस कुणाचे खेळणे बाळ गमतीचे

कवि म्हणती तशापरिचे ते फूल तसे,

मूल आणि ही वनिता,

गणुनी एक करिती कविता

किंवा ही एक वेगळी कविता :

थोर पवाडे पतिव्रतेचे,

गाऊनि करिती कौतुक साचे,

परि ते आमुच्या पराभवाचे प्रतीक सुंदर,

कसे आजवर उमगले न आम्हा

या आजीने आणि तिने दिशा दिलेल्या मुलीने आणि त्यांना साथ देणाऱ्या- मुळातच सामान्यपणे सुबुद्ध असणाऱ्या आणि या बायकांनीच बदलायला लावल्यामुळे का होईना, पण समानतावादी झालेल्या- त्यांच्या नवऱ्यांनी मला समानतेसाठी भांडायला शिकवले, वेळप्रसंगी अगदी त्यांच्या स्वतशीही भांडण्याचे स्वांतत्र्यही दिले. वडिलांच्या कुटुंबातही काहीशी अशीच परिस्थिती होती. आजोबा शिक्षक, परिस्थिती बेताची. वडिलांची आई त्यांच्या लहानपणीच वारली. माझ्या आजोबांनी ठरवून दुसरे लग्न केले ते दुसऱ्या जातीतल्या विधवेशी. या आजोबांबाबत आणि माझ्या वडिलांबाबतही अजून आठवण नमूद केली पाहिजे. विशेषत: बाहेरच्या जगाशी ती वागणूक इतकी फटकून होती की त्यातून निर्माण होणारा तणाव मोठाच होता. या माझ्या आजोबांचे एका कोठीवालीशी संबंध होते. तसे ते वरवरचे होते. ते तिचे हिशेब वगैरे लिहून देत असत. माझे वडील आर्थिक कुतरओढीतून शिकले. काही आप्तेष्टांच्या मदतीतून डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करू शकले. पुढे रुग्णालय काढायचे तर पैसे नव्हते. या बाईकडून माझ्या आजोबांनी त्यासाठी कर्जावर पैसे मिळवले. माझ्या वडिलांची प्रॅक्टिस पुढे मोठी झाली तरी त्यांचे रुग्ण श्रीमंत वर्गातले कमीच होते. त्यामुळे सर्व पैसे फिटेस्तोवर बराच काळ गेला. तोपर्यंत मी शाळेत वरच्या वर्गापर्यंत पोचलो होतो. परतफेडीचा शेवटचा हप्ता देण्याच्या वेळी माझे वडील मुद्दाम मला घेऊन त्या बाईच्या घरी- कोठीवर- गेले. त्यांची ओळख माझ्याशी करून देऊन, त्यांचे संबंध, त्यांचे आमच्यावरचे उपकार, याविषयी स्वच्छपणे त्यांनी मला माहिती दिली. त्यांनी त्यावेळी त्या स्त्रीसंबंधी दाखवलेला आदर एकीकडे आणि तिथले वातावरण, वस्ती दुसरीकडे आणि बाहेरच्या जगाची त्याविषयीची भावना तिसरीकडे, यात विरोधाभास होता.

त्यातून आमच्या कुटुंबात तीन पुरुष- मी, माझा धाकटा भाऊ आणि वडील. आई एकटीच स्त्री. माझ्या मावस-चुलत भावंडांतही त्यावेळी मुलगेच जास्त होते. आईही, १९५० ते १९६० च्या दशकात जे हिरिरीने स्त्रीवादी झाले त्यांच्यातली, म्हणजे, ‘पुरुष जे करू शकतो ते सगळे मी करू शकते,’ असे मानणारी. याबाबतही एक गमतीदार गोष्ट माझ्या आईनेच मला सांगितलेली मला आठवते. माझ्या आईवडिलांचे लग्न ठरले तेव्हा नेहमीची ‘देवाणघेवाणीची’ बोलणी न होता, पुढे ‘मुलगी शिकणार’ अशी बोलणी दोन्ही बाजूने होती. (त्याप्रमाणे ती पुढे पीएच. डी. झालीही.) लग्न ठरल्यावर दोघे फिरायला जात. एकदा टेकडीवर फिरायला गेले असता थोडासा उंचवटा आल्यावर वडिलांनी- आईच्या मते पुरुषसत्ताक मनोवृत्तीतून- आईला मदतीचा हात दिला. (त्यात रोमान्सचाही भाग असावा!) त्यावर, ‘मला येतंय, तुझं तू चढून जा,’ असं बाणेदार उत्तर दिल्याचे, आणि नंतर त्यातला विनोद, बाणेदारपणाचा बालिश आवाका, वगैरे आपल्याला कसा जाणवला तेही तिने हसत हसत मला सांगितल्याचे स्मरते. नटणे, मुरडणे टाळणे, नवऱ्याला चारचौघांतही एकेरी हाक मारणे इत्यादी प्रकार होतेच. माझ्या आईने माझ्या काही मावशांप्रमाणे वा इतर काही स्त्रियांप्रमाणे लिपस्टिक वगैरे लावावी असे मला लहानपणी वाटे. तिने ते कधीच ऐकले नाही. थोडक्यात काय, सर्वच बाबतीत, अगदी छोटय़ा गोष्टींपासून महत्त्वाच्या गोष्टींपर्यंत, ‘स्त्रीत्व-पुरुषत्व’ अशा बायनरी नाकारणाऱ्या घरात मी वाढलो.

या पाश्र्वभूमीवर मी ज्या शाळेत गेलो तिथे हे भेद प्रचंडच मोठे होते. मी एका सामान्य मराठी माध्यमाच्या शाळेत होतो. ही शाळा म्युनिसिपालिटीची नव्हती, पण सर्व स्तरातील विद्यार्थी येऊ शकतील अशी होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती फक्त मुलग्यांची होती. हुशार, एस.एस.सी.ला खूप मार्क मिळवणाऱ्या मुलांइतकीच, गुंडपणासाठी शाळा प्रसिद्ध होती. प्रत्येक वर्गात १० टक्के मुले तरी गुंड या कॅटेगरीत चपखल बसतील अशी असत. आपल्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे शाळा पुरुषी होती. शिक्षकसुद्धा बहुतेक सारे पुरुष होते. दोन-तीनच शिक्षिका होत्या. त्यांना सतावणे हा मुख्य उद्योग असे. एक नवीन शिक्षिका आली. ती तरुण आणि सुंदर होती. साधारण सहावीच्या पुढची सर्व मुले तर तिच्यावर लट्टू होतीच, पण काही शिक्षकांशी तिची जोडी जमवणे हाही एक टाइमपास होता आणि त्याला काही शिक्षकही खतपाणी घालत असत. वर्षभराच्या आतच या बाई शाळा सोडून गेल्या. दुसरी एक खमकी होती. ‘भ ७७, ये इकडं’ म्हणत हाक मारू शकायची. दिसायलाही पुरुषी होती. राकट, काळा वर्ण, अगदी यथास्थित. ती मुलांना पुरून उरायला शिकली होती. पण आमच्या पुरुष शिक्षकांबाबत विचारायलाच नको. काही शिकवायचे उत्तम, पण मारणे हा मुख्य उद्योग आणि शिव्या, विनोद या सगळ्यालाच एक लैंगिक किनार असायची. लिंगभावाच्या दृष्टीने पुरुषप्रधान संस्कृतीला पोषक असे वातावरण ते तयार करायचे.

मुलांमध्ये तर हा पुरुषी अभिनिवेश पूर्ण भरलेला होता. सातवीतली मुले विशिष्ट भाषेत आणि तपशिलात वेश्यागमनाच्या बढाया मारायची. माझ्या घरी ‘गाणाऱ्या’ तवायफबद्दल काय वातावरण होतं ते मी आधी लिहिलंच. या पाश्र्वभूमीवर मी वेगळा पडणार हे उघड होते. त्यातून मी गोरागोमटा, नाकेला, सुंदर नसलो तरी रेखीव- म्हणजे बायकीच. आक्रमकतेचा अभाव असलेला. चेहऱ्यावर, हातापायांवर केसही ज्याला उशिरा आले असा. (मी शाळेत एक वर्षांनं पुढेही होतो.) साहजिकच मी या समूहाचा बळी होणार हे उघड होते. त्या काळीच मग कधीकधी तोतरेपणा माझा कब्जा घेऊ लागला. आजही तो कधीमधी साथ देतो.

या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपणच आक्रमक व्हायला शिकणे. तसा मी झालो. नववी-दहावीत व्यायामशाळेत जाऊ लागलो. दोघा-चौघांना बदडून काढले. मी ‘पुरुष’ झालो. तितकीच वाईट गोष्ट म्हणजे निव्वळ पुरुष मित्रांसमावेत असताना घेतला जाणारा लैंगिकतेचा शोध. लिंगभावाच्या दृष्टीने तो फारच विचित्र वाटेला नेणारा. पुढे मी बास्केटबॉल खेळायला जाऊ लागलो. क्रीडापटू आणि पौरुषत्व यांचे तर असे काही नाते जोडले गेले आहे की विचारता सोय नाही. तिथे या व्यवस्थेला बढावाच मिळाला. आक्रमकता अजून वाढली. या सगळ्याचे संस्कार घरापासून वेगळे त्यामुळे तिथे गोची. कितीही प्रयत्न केला तरी शाळेत मी मिसफिट ठरलो. शाळेच्या सामाजिक चौकोनात माझे वर्तुळ कधीच नीट बसले नाही. त्यामुळे मला शाळेतील दिवसांचा नेहमी तिरस्कारच वाटत आला आहे. एक फार मोठा काळ जो सुखाचा असतो, असू शकतो, तो मी गमावून बसलो. मी काही प्रमाणात ‘पुरुष’ बनवला गेलो, त्या तणावात काही वर्षे खेचला गेलो आणि नंतर त्यावर मात करण्याच्या प्रयत्नात सार्त्रप्रमाणे म्हणायचे झाले तर, ‘आय लोथ माय चाइल्डहूड अँड ऑल दॅट रिमेन्स ऑफ इट.’

त्यानंतर आले कॉलेज. स्त्री सहवासाला मुकलेल्या पुरुषांना अचानक एक मोकळे रान मिळाले. त्याचा परिणाम वेगळाच. दुर्दैवाने या लेखाच्या शब्दसंख्येच्या मर्यादेत ते बसणे अवघड. तेव्हा त्या विषयी परत कधी. या गोंधळपणाची जाणीवपूर्वक चिकित्सा काही त्यावेळी झाली नाही. थोडे भान होते. त्यातून असे वाटायचे, की असे पुरुष बायकांना आवडू कसे शकतात? मी कोणा मुलीला आवडणे शक्य नाही असे वाटू लागले होते. दुसरीही बाजू जाणवू लागली. एक गोष्ट स्वच्छ आहे. मूलत: स्त्रियांसाठी अन्यायकारक असणारी ही व्यवस्था स्त्रियांच्या गळी उतरवली गेली आहे. पुरुषी वर्चस्ववादाचा, इझीमनीचा हा अंतिम आविष्कार. या सर्व गोष्टींनी त्यावेळी मनात खळबळ उडवून दिली होती. काहीशी स्पष्टता हळूहळू आली. आधी होती ती या ‘स्त्री’त्वाला भिडण्याची भीती. प्रत्यक्षातही आणि वाङ्मयीन कृतीतूनही.

पण सर्वात मोठा परिणाम म्हणजे मी या दोन्ही जगात बसेनासा झालो. हळूहळू मला स्त्री आणि पुरुष अशी जगाची वाटणीच अमान्य होऊ लागली. त्यात काही फरक राहणार हे उघड आहे. त्यांच्यात जैविक फरक आहे, तो राहणार. पण त्यांच्यातला सांस्कृतिक फरक मला अमान्य होऊ लागला. लिंगभावाचा मी विचार करू लागलो आणि अशा प्रकारे ठोस बायनरीमधून पाहणे मला अमान्य होऊ लागले. त्यातल्या राजकारणाचा वेध घेणे मला जास्त महत्त्वाचे वाटू लागले. त्यातून उलगडलेले दुसरे तत्त्व असे की ही विभागणी कप्पेबंद करण्याची, एकमेकांबद्दल ‘गूढभाव’ तयार करण्याची आवश्यकता नाही. हे दोन घटक एकमेकांना समजून घेऊ शकतात.

अनेक मराठी पुरुष लेखकांना ‘स्त्री’ कळत नाही असे म्हटले जाते. ते काही अंशी खरेच आहे. त्यामागे वर उल्लेखलेल्यासारखी काही कारणे असावीत. पण तरी हे म्हणताना कुठे तरी, ‘अशी गूढता आहे, ती त्यांना कळत नाही’, असा भाव नसावा असे मला वाटते. कारण अशा गूढतेचे अवडंबर माजवण्याचे कारण नाही. ती असलीच तर तिची निर्मिती आपण केलेली आहे.

विषय मोठा आहे. शब्दमर्यादेमुळे, लिहिले त्यापेक्षा राहून गेलेले अधिक याचे भान आहे. ते पुढे कधी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 1:09 am

Web Title: circle in squares chaturang article purush hruday bai abn 97
Next Stories
1 अपयशाला भिडताना : घरचा अभ्यास
2 निरामय घरटं : नि:शंक ऐकणं
3 व्वाऽऽ हेल्पलाइन : लाजतो मराठी लपवतो मराठी
Just Now!
X