News Flash

खल-बत्ता, कढई-झारा

आणि माझ्या आणि दिलप्याच्या भांडणाशी खल-बत्त्याचा काय संबंध?..

लतिका नाईक

माझं आणि दिलीपचं पुन्हा भांडण झालं. आमच्यात असं सारखं सुरूच असतं! पण माझ्या आजी-आजोबांचं मात्र कधी भांडण झालेलं मी पाहिलेलं नाही. कसं बुवा जमायचं त्यांना?.. हाच विचार करत होते, तर आजीचं ‘खल-बत्ता’, ‘कढई-झारा’, पुटपुटणं चाललं होतं.. हे काय नवीनच?.. आणि माझ्या आणि दिलप्याच्या भांडणाशी खल-बत्त्याचा काय संबंध?..

‘‘दिलप्या, निघाले मी,’’ असं म्हणून धाडकन दरवाजा बंद केला. मी रागावून घराबाहेर पडले हे त्याच्या लक्षातही आलं नाही. कसं येणार? गेला दीड तास हॉस्टेलमधील जुन्या दोस्ताशी गप्पा मारत होता ना. कोण तो सम्या की फम्या. फोनवर ५ वर्षांनी भेटला. अरे, आजच्या ‘सोशल मीडिया’च्या जगात इतकी वर्ष भेटू शकला नाहीत? आणि आज माझी गरमागरम साबुदाण्याच्या खिचडीची प्लेट बाजूला सारून एरवी त्यावर तुटून पडणारा, अगदी कढईत चमचा घालून खाणारा, आज मात्र ती गारढोण झाली तरी त्याला पर्वाच नसावी. मी खाणाखुणा करून ‘खा’ सांगतेय, तर हा गप्प बसण्याची खूण करतो. जणू अमेरिकेच्या अध्यक्षाशी वाटाघाटी चालू होत्या.

गेला आठवडा आम्ही दोघंही रोज ऑफिसमधून उशिराच घरी येत होतो, येतानाच बर्गर, पिझ्झा, असं काही तरी पार्सल मी घरी आणत असे. खरं तर त्याला ते फारसं आवडत नाही. पण मी घरी येईपर्यत फक्त ‘मॅकडोनाल्ड’च उघडं असे. तो कुरकुर न करता खात होता. तेव्हाच ठरवलं की शनिवारी सुट्टी आहे, तेव्हा त्याच्या आवडीचं करायचं. सकाळी भरपूर दाण्याचं कूट घालून केलेली साबुदाण्याची खिचडी, दुपारच्या जेवणाला दम आलू,     काजू-मटार पुलाव, टोमॅटोचं सार, पराठे असा फक्कड बेत ठरवला. त्याचं आवडतं गुलकंद आईस्क्रीम कालच आणून फ्रिजमध्ये ठेवलं. सकाळीच लवकर स्वयंपाकाची सगळी तयारी   के ली. त्या सम्याच्या नादात माझ्या खिचडीचा अपमान करून त्यानं मात्र माझ्या उत्साहाचं पानिपत केलं. एरवीसुद्धा बेशिस्तीनं वागतो. ओला टॉवेल पलंगावर, धुवायचे कपडे जिथे काढले तिथेच जमिनीवर टाकायचे, चहाचा कप कोस्टरवर न ठेवता टीपॉयवर ठेवायचा.. खूप बोलले की दोन दिवस नीट वागतो, नंतर ये रे माझ्या मागल्या! आज तर कहर झाला. बारा वाजले तरी अंघोळ नाही, नाश्ता नाही. माझं डोकंच फिरलं. सरळ चपला घालून बाहेर पडले आणि नकळत पावलं निनीआजीच्या घराकडे वळली.

माझी आई बँके त उच्चपदस्थ अधिकारी होती. मी तीन वर्षांची होते ना होते तेव्हा आईला बँकेत वरच्या जागेवर बढती मिळाली आणि त्यासाठी तिला सिंगापूरला जावं लागणार होतं. तेही कमीत कमी ५ वर्षांसाठी. बाबांच्या ऑफिसची शाखाही सिंगापूरला असल्यामुळे त्यांनाही बदली  मिळाली. मग माझी जबाबदारी आईचे आई-वडील म्हणजे निनीआजी आणि आबांनी घेतली. ती एका शाळेत अगदी विद्यार्थीप्रिय शिक्षिका होती, तीन महिन्यांनंतर मुख्याध्यापिका होणार होती. पण तिनं तिच्या लेकीच्या बढतीचा आणि माझा विचार करून राजीनामा दिला. दोघंही माझे खूप लाड करत, पण निनीआजीचा शिस्तीचा बडगाही असे. माझ्या १० व्या वाढदिवशी रात्री आबा देवाघरी गेले. आई-बाबा मला आणि आजीला सिंगापूरला नेण्यासाठी आले, पण आजीनं निक्षून सांगितलं, की मला तिथे करमणार नाही. इथे माझे विद्यार्थी येतात, आमची सोसायटी म्हणजे एक कुटुंब आहे. तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘मग आम्ही प्राचीला तरी..’’ बाबांचं वाक्य मध्येच तोडत आजी म्हणाली, ‘‘आता तीच माझा जीव आणि आधार, माझ्या जगण्याचं प्रयोजन’’ मला फारसं कळलं नाही, पण मी आजीच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. आमच्या दोघींचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास आनंदाचा होता. कधी तो रुसव्या फुगव्याचा, समजगैरसमजांचा, शिस्तीचाही असे. पण तरीही मी तिच्यासाठी आणि ती माझ्यासाठी होती. माझे सर्व प्रश्न तिला सहज समजायचे, तिच्याकडे त्यावर उत्तर असायचं.

मला दारात बघताच माझं काही तरी बिनसलंय हे तिला कळलं, पण काही न दर्शविता म्हणाली, ‘‘तू जेवली नसशील. गरमगरम खिचडी करते, पोह्य़ाचे पापड तळते. तोपर्यंत तू बाहेर जाऊन गाडगीळ काकांनी सोसायटीत ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’साठीचा प्लॅन दिलाय तो वाचत बस.’’

मी गुपचूप बाहेर गेले. थोडय़ा वेळानं आजीची हाक आली. जेवताना तिला आजचा किस्सा सांगायचा खूप प्रयत्न केला, पण उलट मला म्हणाली, ‘‘डोळे बघ कसे झालेत. जेव आणि झोप.’’ खरंच आजीनं बरोबर ओळखलं होतं. दिलप्याचा विचार करता-करता कधी झोप लागली कळलंच नाही. डोळे उघडले, मोबाइल बघितला तर ४ वाजले होते. म्हणजे मी ३ तास झोपले होते. पण गेल्या आठवडय़ाचा शीण गेला. आतून रवा भाजल्याचा खमंग वास आला. मी आत गेले तर आजी म्हणाली, ‘‘खलबत्ता घे आणि वेलची कुटून दे.’’ मी म्हटलं, ‘‘अगं नेहमीसारखी मिक्सरमध्ये दळून ठेवलेली नाही का?’’ ‘‘आहे गं, पण ताज्या कुटलेल्या वेलचीचा सुगंध अप्रतिम असतो.’’ आम्ही दोघींनी शिरा खाल्ला. आजी म्हणाली, ‘‘आता सांग, काय झालं? माझा ‘साईवरचा चेरी’तुझ्याशी भांडला का?’’ मी आजीची ‘दुधावरची साय’ आणि ‘चेरी ऑन द के क’ या न्यायानं दिलीप हा ‘साईवरचा चेरी’! मी मनातलं भडाभडा सांगून टाकलं सगळं. आजीनं शांतपणे विचारलं, ‘‘तो काय म्हणाला?’’ ‘‘तोही माझ्याशी भांडला.’’

आजी म्हणाली, ‘‘अरे बापरे, म्हणजे दोघेही बत्तेच? खल कोणीच नाही.. आता कसं होणार?’’ मी चिडून म्हटलं, ‘‘हा खलबत्ता मध्येच कुठून आला? मगाशी पण मला खलबत्त्यात वेलची कुटायला लावलीस. हे प्रकरण काय आहे?’’

‘‘थांब सांगते.’’ ती म्हणाली. ‘‘तू मगाशी बत्त्यानं दणादण वेलची कुटत होतीस. पण खल मात्र स्थिर होता. बत्त्याचे घाव सहन करत होता. प्राचू, समजा खल आणि बत्ता दोन्ही अस्थिर असते तर काय होईल?’’

‘‘सोप्पं आहे. गोंधळ उडेल. वेलची कुटली जाणार नाही’’ मी म्हटलं.

‘‘तू कधी पोळपाट-लाटणं, कढई-झारा, तवा-कालथा, पातेलं-डाव वापरतेस?’’

‘‘हे गं काय आजी विचारतेस? गेल्या आठवडय़ात प्रेझेंटेशन होतं म्हणून ते पार्सल. नाही तर तुझ्या ‘चेरी’च्याआवडीचं करते हो!’’ मी कृतककोपानं म्हटलं.

‘‘तसं नाही. पण तू कधी निरीक्षण केलंयस का? या जोडगोळीतलं एक साधन स्थिर, तर दुसरं अस्थिर असतं. लाटणं, झारा, कालथा, सतत अस्थिर आणि पोळपाट, कढई, पातेलं स्थिर. म्हणूनच पोळी लाटता येते, भाजता येते. आमटी-भाजी ढवळता येते. गोंधळ  होत नाही. सकाळी चेरी चिडला, तर तू गप्प बसायचं.’’

‘‘अरे वा! मी खल होऊन घाव सोसायचे आणि त्यानं बत्ता होऊन मला कुटायचं? मला नाही जमणार!’’ मी फणकारले.

आजी म्हणाली, ‘‘तसं नव्हे गं बाळा. गेल्या आठवडय़ात तू त्याला न आवडणारं पार्सल आणलंस. मला माहितीय तुझा नाइलाज होता. पण तो चिडला नाही ना? आता तू ४-५ वेळा खल होऊन बघ. मग त्याचा बत्त्याचा मुखवटा आपोआप गळून पडेल. मग हो तू बत्ता आणि कूट भरपूर! आणि हो, तू नेहमी खल होऊच नकोस. भूमिकांची अशी अदलाबदल केली की संसाराची रंगत वाढते.’’

मला १०० टक्के  पटलं. मी  खळाळून  हसले आणि विचारलं, ‘‘आजी तू आणि आजोबा कधी भांडलेले मला आठवत नाही. ती म्हणाली, ‘‘आमच्या आयुष्याच्या पूर्वार्धात खूप भांडलो. मग भांडणाचं रूपांतर वादविवादात झालं आणि मग आम्ही एकमेकांना म्हणू लागलो, ‘‘मी हरले.. नाही गं मी हरलो!’’ नंतर आम्हा दोघांना न बोलताच एकमेकांच्या मनातलं कळू लागलं. याच काळात तू आलीस. मग तुला कुठून आमच्या खल-बत्त्याच्या भूमिका दिसणार?

‘‘पण आजी दोघंही खल झाले तर?’’

‘‘सोप्पं आहे. तुमच्या भाषेत ‘विन विन सिच्युएशन’.’’

‘‘आजी, तुला हा मंत्र कोणी दिला?’’

‘‘माझ्या आजीनं.’’

‘‘अरे वा! म्हणजे आजीची पैठणी असते, तसा हा आजीचा मंत्र!’’

‘‘हो, पण पैठणी कधी तरी विरते, विटते, पण या मंत्रानं संसाराचं वस्त्र उजळतं, वीण घट्ट होते हो!’’

मी पटकन उठले आणि निघाले. ‘‘अगं इतक्या घाईनं का जातेयस?’’ ‘‘वस्त्राची वीण घट्ट करायला!’’ मी हसतहसत म्हणाले.

आजीनं दिलेला शिऱ्याचा डबा घेऊन घर गाठले. लिफ्ट २० व्या मजल्यावर होती. तिची वाट न पाहता दोन मजले पळतपळत चढले, धापा टाकत बेल मारली तर दिलप्यानं लगेच दरवाजा उघडला. जणू माझी वाटच पाहत होता. ‘‘अगं किती धापा टाकतेस, थांब पाणी देतो.’’ पाण्याचा ग्लास देऊन म्हणाला, ‘‘प्राचू मी सकाळी उगाच भांडलो. रिअली सॉरी! तू दुखावलीस ना?’’

‘‘अरे वा, खल!’’ मी उद्गारले.

‘‘खल.. म्हणजे काय ग?’’

‘‘जाऊ दे. तू जेवला नसशीलना. शिरा खा.’’

‘‘बरं.. मग लाँग ड्राइव्हला जाऊ या.’’

‘‘नको पायीच जाऊ या.’’ मी म्हणाले.

‘‘हो, म्हणजे हा शिराही जिरेल आणि तुझ्या स्पेशल जेवणावर ताव मारता येईल. बरोबर आहे तुझं.’’ शिरा खात तो म्हणाला.

‘‘अरे वा, कढई!’’ मी पुटपुटले. तरी त्याला ऐकायला आलंच! तिथूनच ओरडला,‘‘मगाशी खल, आता कढई.. काय भानगड आहे? ही माझी नवीन नावं नाहीत ना?’’

‘‘नाही रे. माझी आणि आजीची गंमत आहे. सांगीन कधी तरी’’ असं म्हणत मी बेडरूममध्ये गेले. फ्रेश होताना विचार आला, चला आज एक टाका घट्ट  झाला!

nlatikav@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 1:01 am

Web Title: closeness with grandmother causes of conflict in relationships zws 70
Next Stories
1 होती धाडसवेडी एक..
2 दुसऱ्या लाटेच्या निमित्तानं
3 ज्येष्ठांचे लिव्ह इन : एका मनस्विनीची गोष्ट
Just Now!
X