|| मेघना जोशी
करोनाच्या कठीण काळात परीक्षा न घेता आल्यानं दहावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन ही अवघडच गोष्ट होती. पण यंदाच्या दहावीच्या निकालाचं के वळ इतकं च महत्त्व नाही. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबद्दल के वळ कागदावर नव्हे, तर खरोखर खोलात जाऊन सुधारणा करण्याची वेळ आली आहे.  गुण ‘मिळणे’, ‘पाडणे’ आणि आता पुढे जाऊन गुण ‘देणे’ हा मूल्यांकनाचा बदलता प्रवास याचंच द्योतक आहे. शिक्षण क्षेत्रातल्या  बाजारीकरणाबरोबर गुणपद्धती कशी बदलत गेली हे समजून घेतलं, तरी आपल्या मानसिकतेत आणखी किती बदल होणं बाकी आहे, हे लक्षात येतं…    

शिक्षणशास्त्र पदविका विद्यालय. माझी पहिलीच अल्पकालीन नेमणूक झालेली. जीवनाचा अनुभव दोन तपांपेक्षाही कमी आणि नोकरीचा अनुभव शून्य! तेव्हा शिक्षक भरती ऐरणीवर होती. ‘डी. एड्.’, ‘बी. एड्.’ पदरात असणं हे नोकरीसाठीचे हुकमाचे एक्के. त्यामुळे समोर विद्यार्थीरूपात असणारे बहुसंख्य माझ्याहून जास्त वयाचे. नवीन रुजू झालेल्या शिक्षिकेला येणारे सगळे अनुभव तिथे जास्त प्रखरतेनं माझ्या वाट्याला न आले तरच नवल. नुकत्याच

FMCG Sector, share market, Investment Opportunities, Market Trends, Investment Opportunities in FMCG, Market Trends of fmcg, stock market, Fast Moving Consumer Goods, Food and beverages, personal use goods,
क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
gadchiroli lok sabha marathi news, gadchiroli lok sabha election marathi news
७ हेलिकॉप्टर, १५ हजारांहून अधिक जवान, गडचिरोलीत युद्ध क्षेत्राचा भास व्हावा…..
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

‘बी. एड्.’ला शिकलेल्या ‘अनुभवातून शिक्षण’ याचा मी तिथे रोज अनुभव घेत होते.

एके दिवशी काही कारणानं वर्गातल्या एका थोराड विद्याथ्र्याशी वर्गात व्यत्यय आणल्यावरून माझी बोलाचाली झाली. मी म्हटलं, ‘‘अहो, मी काय सांगते ऐकून घ्या आणि इतरांनाही ऐकू द्या. परीक्षेत तर लिहावंच लागेलच ना? गुण नकोत का मिळायला?’’ त्यावर तो खवळलाच. म्हणाला, ‘‘अहो, गुण काय मिळायचे? किती हवेत सांगा. पाडून दाखवतो जेवढे सांगाल तेवढे. त्यासाठी वर्गात कशाला लक्ष द्यायचं?’’ ‘गुण पाडून दाखवतो’ हे एवढ्या मुजोरपणे म्हटलेलं मी तेव्हा पहिल्यांदाच ऐकलं होतं. मनात अनेक विधानं दाटून आली- ‘गुण म्हणजे काय आंबे आहेत का झाडावरून मोजून पाडायला?’, ‘मूल्यमापन विषय शिकता ना इथे? त्यात समजलं नाही का गुणांबद्दल?’ ‘नुसतं रट्टा मारून का ज्ञान वाढणार आहे?’ एक ना अनेक. माझी निबंध, वक्तृत्व स्पर्धेतली प्रमाणपत्रं, ‘बी.एड्.’चा अभ्यास, सगळं वाकुल्या दाखवत उभं होतं समोर. खचाखच भरलेल्या त्या वर्गात माझे डोळे भरून आले. त्या विद्याथ्र्याला किती गुण मिळाले वगैरे काही मला समजलं नाही, कारण सहा महिन्यांतच माझी ती नोकरी संपली.

पण आजही तो प्रसंग मला परत परत आठवतो. कारण त्याचे ‘गुण पाडून दाखवतो’ हे शब्द मनात घट्ट रोवून बसले. त्याआधी महाविद्यालयात असताना दर शनिवारी सकाळी सराव चाचणी असायची. प्रश्नपेढी आधी देऊन त्यातील ठरावीक प्रश्न चाचणीत विचारले जात. त्या वेळी आमच्या वर्गातली काही मुलं ‘या चाचणीत मी एवढे एवढे गुण पाडीन’ असं म्हणायची. पण आमच्यासारख्या बहुसंख्य सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मात्र गुण मिळायचे ते आम्ही किती अभ्यास केलाय, किती आणि कसा पेपर सोडवलाय त्यावरून. शिक्षणशास्त्राच्याच भाषेत सांगायचं, तर आम्ही किती क्षमता प्राप्त केल्या, किती कौशल्यं साध्य केली, याचं मापन केलं जायचं आणि त्यानुसार आम्हाला गुण मिळायचे.

बघताबघता जग बदललं. अनेक क्षेत्रांचं बाजारीकरण झालं आणि त्याचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होणार नाही असं कसं बरं घडेल! जगात नफेखोरी वाढली तशी ती शिक्षणक्षेत्रातही वाढली. गुणांकडेही नफ्याच्या दृष्टीनं पाहिलं जाऊ लागलं आणि जास्तीत जास्त गुण ‘पाडण्याची’ भाषा सुरू झाली. एवढा अभ्यास, अशा अशा प्रकारे करायचा, तो अशा अशा पद्धतीनं सादर करायचा, मग त्यातून एवढे एवढे गुण पदरात पाडून घ्यायचे. ते कसे पाडावे हे शिकवणारे ‘पॅटन्र्स’ही बाजारात तयार झाले, ते प्रचंड लोकप्रिय झाले. शिक्षणाच्या या बाजारपेठेत खोऱ्यांनी पैसे ओतले आणि कमावले जाऊ लागले, ते निव्वळ गुण पाडण्यासाठी. हे गुण का पाडायचे, याचं कारण सोपंच  होतं आणि ते भौतिकीकरणात दडलेलं होतं. हे एवढे एवढे गुण पाडायचे, त्यातून ही ही नोकरी किंवा व्यवसाय करायचा आणि त्यातून सुखसोयी, ऐषोराम असं पदरात पाडून घ्यायचं. गुण मिळवण्याकडून गुण पाडण्याकडे वळण्यात समाजाची ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’पासून ‘मला हे हे पाहिजे आणि ते ते मी पदरात पाडून घेणारच’ अशी बदलती मनोवृत्ती सहज लक्षात येते. त्यामुळे गुण पाडण्यात भलेबुरे मार्ग आचरण्याचीही पद्धत रुजत गेलीच.

‘गुण पाडणे’ हा शब्द पहिल्यांदा ऐकल्यावर दचकलेली मी, हळूहळू या वाक्प्रचाराला सरावले. मीच कशाला, माझ्यासारखे सगळेच सरावले असणार. गुण पाडण्याबद्दल कोणाला काही वाटेनासंच झालं का? असा प्रश्न विचारे-विचारेपर्यंत गेल्या एक-दोन वर्षांत हाही वाक्प्रचार बदलला आणि हल्ली मुलांच्या तोंडी एक नवीन वाक्प्रचार उदयाला येतोय- ‘गुण दिले’. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. पेढे घेऊन आलेल्या मुलांना सवयीनं विचारलं, ‘काय मग… किती गुण मिळाले? कोणत्या विषयात किती?’ त्यावर मुलं सहज म्हणतात, ‘मला अमुक अमुक टक्के दिले.’ अनेकदा दररोज वापरली जाणारी क्रियापदं परभाषेचा प्रभाव किंवा भाषासंकर यामुळे बदलतात हे मान्य करूनच इथे मात्र ‘मिळणे’, ‘पाडणे’ आणि ‘देणे’ हा क्रियापद बदल असा प्रभाव किंवा संकरामुळे झाला नसून गुणदानामागच्या मनोभूमिकेमुळे झाला आहे असं मला वाटतं. ‘देणे’ हा शब्द का बरं रूढ होऊ लागला असेल, यामागचा विचार केला, तर पहिली गोष्ट अशी जाणवली, की पूर्वी संयुक्त कुटुंबं असायची, घरात भरपूर मुलं असायची, घरात आणलेल्या वस्तूंची वाटणी केली जायची आणि प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाला ‘मिळायचा’. नंतर कुटुंबपद्धतीत हळूहळू बदल होत गेला. विभक्त कुटुंबांचा जन्म, घरात घटत जाणारी मुलांची संख्या यातून आपल्याला हवं ते हिसकावून, हट्ट करून मिळवण्याची सवय घरातच लागू लागली आणि तेच गुणांबाबत. गुण ‘पाडले’ जाऊ लागले. पण सध्याच्या ‘हम दो हमारा एक’च्या या युगात ‘स्पून फीडिंग’ ही काही नावीन्याची गोष्ट राहिली नाही. अगदी मोबाइलवर खेळले जाणारे गेम्स पाहिले, तरीही आपल्या लक्षात येईल की, पूर्वी सगळ्या ‘लेव्हल्स’ खेळून पार कराव्या लागायच्या; आता जाहिरात पाहिल्यावर ‘पॉइन्टस्’ दिले जातात किवा ते पॉइन्टस् विकतही दिले जातात! या  बाकीच्या गोष्टी  जशा वेगवेगळ्या मार्गांनी ‘दिल्या’ जातात, तसेच गुणही ‘दिले’च जातात, अशी मानसिकता होणं नैसर्गिकच. महत्त्वाचं म्हणजे शिक्षणक्षेत्राच्या दृष्टीनं सध्याचा काळ हा मूल्यमापन पद्धतीत आमूलाग्र बदल होण्याचा असा संक्रमणाचा काळ आहे. सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनात उत्तरपत्रिकेत लिहिलेल्या उत्तरांना मिळालेल्या गुणांचा जसा अंतर्भाव असतो, तसाच तो वेळोवेळी घेतलेल्या चाचण्या, तोंडी परीक्षा, उपक्रम, प्रात्यक्षिकं, विद्याथ्र्याचं वर्गातलं काम आणि घरी करायला दिलेलं काम (गृहकार्य) यांत मिळवलेल्या गुणांचाही असतो. या गुणांबाबत अजूनही पालक आणि विद्यार्थी यांची मानसिकता शिक्षक हे गुण देतात, अशीच आहे. त्यामुळे नकळतच ‘गुण दिले’ असा वाक्प्रचार वापरण्याची सवय निर्माण झाली असावी. इथे पालक आणि शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ज्या आकारिक मूल्यमापनात उत्तरपत्रिकेव्यतिरिक्तचे गुण दिले जातात, ते गुणदान विद्यार्थीकृतीवरच अवलंबून असतं, हे विद्याथ्र्याला स्वत:च्या कृतीतून दाखवणं, ही ती महत्त्वाची भूमिका.

हे सांगावंसं वाटलं, कारण शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या मुलांची संख्या हजाराला हात मिळवायला गेली. सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनात शंभर टक्के गुण, म्हणजे त्या विद्याथ्र्याचा परिपूर्ण, सर्वांगीण विकास. म्हणजे या वर्षी परीक्षेला बसलेल्यांपैकी नऊशेहून जास्त विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व परिपूर्ण विकसित झालेलं आहे हे कोणालाच, कधीच न पटणारं आहे. शंभर टक्के गुण मिळवणारे ही एक बाजू आहे आणि उत्तीर्णतेचं प्रमाण शंभर टक्के असणं ही दुसरी बाजू. किमान लेखन, वाचन आणि गणन कौशल्य नसणारी अनेक मुलं आठवीपर्यंतच्या ‘न नापास’च्या धोरणामुळे नववीपर्यंत पोहोचतात हे सर्वांना माहीत असूनही तिकडे कानाडोळा केला जातोच. ‘शंभर टक्के निकाल’ म्हणजे प्राथमिक स्तरावरचं कौशल्यही प्राप्त नाही, असे अनेक विद्यार्थी दहावी पास होतात. मग इथे प्रश्न पडतो की, मूल्यमापन प्रक्रियेतून गुण मिळतात, की गुण देण्यासाठी मूल्यमापन प्रक्रिया राबवली जाते? एकंदर निरीक्षण करता दुसरी गोष्टच जास्त प्रखरतेनं घडते हे जाणवतं. यात आणखीही एक तोटा होतोच. जी वीस-पंचवीस टक्के  मुलं ख्ररोखरच जिवाचा आटापिटा करून अभ्यास करतात, कष्ट करतात त्यांचा शिक्षणपद्धतीवरचा विश्वास क्षणात उडून जातो. सच्चाई, सचोटी, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांच्या मुळावरच घाव घातला जाण्याचं पातक यात नकळत घडतं हे नक्कीच.

‘जबाबदारी कुणाची?’ हा प्रश्न हल्ली प्रत्येक जण विचारताना दिसतो. त्याचंही प्रतिबिंब या नवीन वाक्प्रचारामागे आहेच. ‘गुण मिळवणं’ किंवा ते ‘पाडणं’ यात ते मिळवणाऱ्यावर किंवा पाडणाऱ्यावर जबाबदारी येते. म्हणजे अध्ययनाची जबाबदारी, आकलनाची जबाबदारी, मांडणीची जबाबदारी अशी एकंदरीनं सर्वच. पण ते कोणीतरी ‘दिले’ म्हटलं की आपोआप ‘त्यांनी कमी दिले’, ‘त्यांना द्यायचेच नव्हते’, वगैरे विधानं करून जबाबदारी त्यांच्यावर गेलीच, पर्यायानं झटकलीच. असं म्हणतात की, जेव्हा एखादी व्यक्ती कष्ट करून अगदी तीळ मिळवते, तेव्हा तो तीळही खूप मौल्यवान असतो; पण जर दुसऱ्या कोणी मणभर सोनं दान दिलं, तर त्या विनाकष्टाच्या सोन्याची किंमतही मातीसमानच असते. अगदी तसंच इथेही दिसतं. ‘गुण दिले’ म्हणताना अनेक विद्यार्थी त्यांना मिळालेल्या गुणांबद्दल सहज नापसंतीनं नाक मुरडतात. परवाच एका अठ्ठयाण्णव टक्के गुण मिळालेल्या मुलाशी बोलणं झालं. तो स्वत:च्या अठ्ठयाण्णव टक्क्यांवर खूश नव्हताच. ‘इंग्रजीच्या शिक्षकांनी कमी गुण दिले,’ अशी त्याची वारंवार तक्रार होती आणि तरी बरं, पाच विषयांचेच गुण धरले जातात असंही म्हणणं होतंच. त्यामुळे सतत असमाधानी राहाण्याची वृत्ती नकळतपणे मुलांमध्ये पेरली जातेय की काय? असं वाटलं. भारतीय योगसाधना, त्यामुळे मिळणारी मानसिक शांती आणि समाधान यांचे गोडवे जगात गायचे आणि आपल्या मुलांमध्ये मात्र या इतर धोरणांमुळे असमाधानाचं बीज रोवत राहायचं, यातून आपण काय साध्य करणार आहोत?

मूल्यमापन पद्धतीच्या संक्रमणाचा हा काळ करोनामुळे आणखीनच अधोरेखित झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय परिस्थिती लक्षात घेऊन अलीकडेच जाहीर झालेले शिक्षण मंडळाचे निकाल सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचं बाळकडू देणारे आहेत. कारण दहावीचे गुण देताना त्यात नववीचे गुण, दहावीच्या वर्षभरात झालेल्या परीक्षांचे गुण आणि गृहकार्याचे गुण या सगळ्या गुणांचा समावेश होता. या वेळी अचानक संकटानं बावचळून गेल्यामुळे गुणदानात थोडी घाई झाली. पण चूक सुधारतो तोच मानव या उक्तीप्रमाणे या झालेल्या घाईतून आपण शिकलं पाहिजे आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचं बाळकडू परत नव्यानं उगाळायला घेतलं पाहिजे. ते उगाळताना व्यवस्थेतील प्रत्येकाचीच त्यामागची योग्य मनोभूमिका तयार करण्याचं कामही आपलंच आहे, याकडे डोळयांत तेल घालून लक्ष द्यायला हवं.

(लेखिका माजी मुख्याध्यापिका आहेत.)

joshimeghana.23@gmail.com