रोझमेरी सिगिन्स.. फक्त धड असणारी एक स्त्री! पण पाय नाहीत म्हणून स्वत:ला अपूर्ण न समजता अव्यंग माणसासारखं जगण्याचा आग्रह धरणारी. जग आपल्यासाठी काही करेल, या विचारांऐवजी स्वत: त्यासाठी धडपडणारी. ती बायको आहे, आई आहे, मेकॅनिकही आहे. आयुष्याने तिच्या वाटेत अनेक काटे पेरले, इतके की ही रोझ, हा गुलाबच काटय़ाचा झाला; पण तरीही ती थांबलेली नाही, कारण तिचा मंत्र आहे, ‘गेट अप अँड गो फॉर इट, जस्ट डू इट.’. मनाच्या ताकदीवर, इच्छाशक्तीवर ‘उभी’ असलेल्या रोझमेरीची, एका दुर्गेची ही कथा..
म नाची ताकद प्रचंड असते. एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून हवी असेल, तर तुम्ही फक्त त्याविषयी ठाम निर्णय घ्यायचा असतो. सगळ्या विरोधांवर मात करत तुम्ही ती मिळवताच मिळवता. रोझमेरी सिगिन्सचं संपूर्ण आयुष्य म्हणजे या मनाच्या ताकदीवर सारं काही मिळवण्याची दास्तान आहे. जगण्याच्या परीक्षेत स्वत:ला तावूनसुलाखून सिद्ध करत मिळवलेलं ते लखलखतं यश आहे..    
रोझ सिगिन्स (Rose Siggins) २ फुटांची आहे, फक्त धड असलेली स्त्री; पण ती समजूतदार मुलगी आहे, काळजी घेणारी बहीण आहे, प्रेमळ बायको आहे, कर्तव्यनिष्ठ आई आहे आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र व्यक्ती आहे. स्वत:ला हवं तसं जगणारी, मिळवणारी आत्मविश्वासू स्त्री. तिला पाहाताना, ऐकताना, तिच्याविषयी वाचताना क्षणाक्षणाला आश्चर्यचकित होत राहाणं एवढंच आपल्या हातात असतं.
‘यू टय़ूब’वर जेव्हा पहिल्यांदा तिचा व्हिडीयो पाहिला तेव्हा धड असणारी, आपल्या दोन हातांच्या आणि स्केटबोर्डच्या मदतीने चालणारी, सर्व व्यवहार करणारी रोझ मनात खोलवर उतरत गेली, ती तिच्यातल्या प्रगल्भतेसह. स्वत:ला आहे तसं स्वीकारण्याच्या, नव्हे तेच माझं आयुष्य आहे, या परिपक्व  विचारांचा सार म्हणजे तिचं आयुष्य आहे.
अमेरिकेत पाब्लो कोलोरॅडो येथे राहणारी, आज ४१ वर्षांची असणारी रोझ म्हणते, ‘‘लोक मला विचारतात, तू कशी काय अशा अध्र्या शरीरासह जगू शकते? मला आश्चर्य वाटतं लोकांचं, माझ्यात काय कमी आहे? एखाद्या बार्बी डॉलचे पाय तोडले की ती कशी दिसेल, माझं तसंच आहे, पाय नसलेली बार्बी डॉल. बाकी माझे सारे स्त्री अवयव व्यवस्थित आहेत. मग मी स्वत:ला कमी का समजू?’’  रोझची स्वत:विषयीची, स्वत:च्या शरीराविषयीची, जे आहे ते पूर्णत्वाने स्वीकारायची ही प्रगल्भता खऱ्या अर्थाने दिसली ती शाळेत असताना. रोझ जन्माला आली ती पायांसह, मात्र त्या पायांत अजिबात जीव नव्हता. केवळ ते दिसतात म्हणून पाय म्हणायचे. खरं तर त्यामुळे अडचणच व्हायची. तिच्या फिरण्याला त्यामुळे बाधा यायला लागली. संवेदना नसलेल्या पायांना नकळत इजा होऊ शकते, हा धोका लक्षात घेऊन रोझच्या आईबाबांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिचे दोन्ही पाय कापून टाकण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती २ वर्षांची होती. ती म्हणते, ‘‘आईवडिलांचा तो निर्णय रास्तच होता. म्हणून मी अधिक मोकळी झाले.’’ पण रोझ शाळेत जायला लागली तेव्हा ती इतर मुलांप्रमाणे नॉर्मल वाटावी म्हणून शिक्षकांनी तिला कृत्रिम पाय लावण्याची सक्ती केली. त्याच्या प्रचंड वेदना तर व्हायच्याच; पण तिच्या चालण्यालाही मर्यादा येऊ लागल्या. शेवटी आठव्या ग्रेडमध्ये असताना तिने ते कृत्रिम पाय लावण्याला नकार दिला. शिक्षकांनी आरडाओरडा केला; पण ती ठाम होती. ‘‘हीच खरी मी आहे. मला सामान्यपणे जगू द्या,’’ हे तिचं ठाम बोलणं मनावर घेतलं गेलं आणि रोझ मुक्तझाली. हातांच्या साहाय्याने ती कुठेही, कशीही चालू शकते. तिला व्हीलचेअरही नको होती, कारण पुन्हा तीही तिच्या हालचालींना मर्यादा आणीत होती म्हणून मग तिने मदत घेतली ती स्केटबोर्डची. ती या बोर्डवर आपलं धड (अक्षरश:) टाकते आणि फिरते हवी तशी मनसोक्त, मनमुराद!
‘यू टय़ूब’ वरच्या  व्हिडीयोमध्येही स्केटबोर्डने पुढे जाणारी रोझ आपल्याला दिसते. हाताच्या साहाय्याने स्केटबोर्ड ढकलत रोझ आपल्या कारजवळ येते. कारचा दरवाजा उघडते. दोन्ही हाताचे तळवे रस्त्यावर घट्ट रोवते. दरवाज्याकडे तोंड करते आणि स्वत:चं धड पाठीमागून कारच्या ड्रायव्हिंग सीटवर जवळजवळ ढकलते. सीटवर स्थानापन्न झालेली ती मग एका हाताने स्केटबोर्ड उचलून घेते. कारचा दरवाजा लावते. गाडीचं इंजिन सुरू करते आणि गाडी सुसाट वेग घेते.. तिच्या आयुष्यासारखीच..     
गाडय़ा, कार, व्ही-८ इंजिन हे तिचं पॅशन आहे. ती कोणतीही गाडी रिपेअर करू शकते. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून तिला हे वेड लागलं. बाबांच्या टूल बॉक्सशी खेळता खेळता ती चक्क गाडय़ा दुरुस्त करू लागली. हे वेड इतकं वाढलं की, काही वर्षांपूर्वी १९८६ मस्तांग (फोर्ड) कार तिने पुन्हा नव्याने बनवली, कशासाठी? तर कार रेसिंगमध्ये भाग घेण्यासाठी.. पाय नसलेली रोझ नुसतीच गाडी चालवते असं नाही, तर स्पध्रेत भाग घेण्याइतपत वेगाने चालवते. वयाच्या १६ व्या वर्षी तिला तिच्या बाबांनी एक कार घेऊन दिली. सेकंड हॅन्ड. ती ही कशी चालवणार, असा प्रश्नही कुणाला पडला नाही. तिने आणि तिच्या बाबांनी गाडीत ‘सुधारणा’ केल्या. ब्रेक आणि क्लचची एकत्रित सोय स्टीअरिंगजवळच पण वेगळ्या पद्धतीने केली. साहजिकच पायांशिवाय, हाताच्या आधारेच चालणारी ही गाडी पुढच्या आयुष्यात तिच्यासाठी वरदानच ठरली.  
याच गाडय़ांच्या वेडापायी तिच्या आयुष्यात आणखी एक चमत्कार घडला. हा चमत्कार म्हणजे पुन्हा एकदा तिच्या मनाची प्रचंड ताकदच प्रत्यक्षात आलेली. आपण नॉर्मल व्यक्ती आहोत. एक स्त्री आहोत, मग आपलंही लग्न व्हायला हवं, मुलं व्हायला हवीत, ही तिची इच्छाही फलद्रूप झाली. जुलै १९९९ मध्ये अगदी पांढरा शुभ्र वेडिंग गाऊन घालून, तिच्यापेक्षा उंचीने मोठा असलेला केक (डेव्हचं तिला चिडवणं) कापून तिचं लग्न साग्रसंगीत पार पडलं. गाडीचे पार्ट्स विकत घेण्याच्या निमित्ताने तिची डेव्हिड सिगिन्स ऊर्फ डेव्हची ओळख झाली. डेव्ह वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्या दुकानात काम करत होता. तिला असे पार्ट्स सतत लागायचे. फोनवरच झालेली ही ओळख मत्रीत बदलली. जेव्हा ते एकमेकांना भेटले तेव्हा तिचं हे अपंगत्व त्यांच्या मत्रीच्या आणि पुढे जाऊन प्रेमाच्या आड आलंच नाही. उलट डेव्ह पाच फूट अकरा इंची तगडा, स्मार्ट तरुण केवळ बोलण्यातून रोझच्या प्रेमात पडला. ती सांगते, ‘‘मी त्याला पाहिलं आणि त्याच क्षणापासून आमच्यात आकर्षण निर्माण झालं.’’ तर तो सांगतो, ‘‘रोझला मीच काय, कोणीही भेटलं तरी तिच्याशी बोलल्यावर पाच मिनिटांत तिला पाय नाहीत हे कुणाच्या लक्षातही राहात नाही. शिवाय ती खूप सुंदर आहे.’’ भेटीनंतर आठ महिन्यांत ते डेटिंग करायला लागले आणि एके दिवशी तिच्या लक्षात आलं की, ती गरोदर आहे. रोझ सॅकरल एनेन्सीसची बळी आहे. तिच्या पाठीच्या कण्यात व्यंग आहे. तत्पूर्वी असा विकार असणाऱ्या कोणत्याही स्त्रीनं मुलांना जन्म दिला नव्हता. तिलाही डॉक्टरांनी गर्भपाताचा सल्ला दिला; पण तिने तो मानला नाहीच. अत्यंत प्रतिकूल अवस्थेत तिने मुलाला जन्म दिला. आणि सहा वर्षांनंतर मुलीला, सेल्बीला जन्म दिला. ते गर्भारपण तर तिच्या जिवावरच बेतलं होतं. रोझ अक्षरश: मृत्यूच्या दारातून परत आली; पण आई होण्याच्या सुखापुढे तिने ते सारं निभावलं. अर्थात मुलांचं पालनपोषण ही सोपी गोष्ट नव्हतीच, कारण तिचा नवरा डेव्ह दिवसभर कामासाठी बाहेर असे. ती सांगते, माझ्या स्केटबोर्डप्रमाणेच मुलगा, ल्यूकसाठीही एक स्केटबोर्ड बनवला आणि तो घेऊन मी फिरत असे. बाहेर जायच्या वेळी बाळाला झोळीत टाकून ती झोळी मी पाठीमागे बांधायची आणि त्याला तसं घेऊन ती कारही चालवायची. नंतर मुलं मोठी झाल्यावर त्यांना गाडीने शाळेत नेणं-आणणंही तिनेच केलं. घरातलं जेवण करण्यापासून भांडी घासण्यापर्यंत अनेक कामं करत करत तिने मुलांना तसंच वाढवलं जशी एखादी सामान्य, शारीरिक व्यंग नसणारी स्त्री वाढवेल. घरकाम करणाऱ्या रोझचा व्हिडीयो जेव्हा मी पाहिला तेव्हा जाणवलं की, ‘हे काम मलाच करायचंय, ती माझीच जबाबदारी आहे.’ याविषयीचा एकदा का तुमचा निर्णय ठाम झाला, की सगळं शक्य असतं, हेच रोझने सिद्ध केलंय. तळहाताचा उपयोग करत ती घरभर फिरत त्या पातळीवरची कामं करतेच; पण हाताचा उपयोग करत खुर्चीवर चढणे, त्याच्यावरून टेबलांवर चढणे, इतकंच काय, ओटय़ावरही शरीराचा अर्धा भाग चढवून भांडी घासण्यापासूनची कामं ती लीलया करते. कपडे धुवायच्या मशीनवर चढून बसून त्यात आवश्यक ती पावडर, पाणी घालण्याचंही काम करते. मुलांना वाढणं, त्यांना गोष्टी सांगणं, इतकंच नव्हे तर त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांना जवळ घेऊन प्रेमाचा वर्षांव करणं हे ती सहजगत्या करते. इतकंच कशाला, गाडय़ांच्या खाली जाऊन हात काळेकुट्ट करत त्यांना धडधाकट करणारी रोझही आपल्याला दिसते. नादुरुस्त गाडय़ांचे ‘आटे’ टाइट करणं हा तिचा फावल्या वेळेचा उद्योग आणि छंद ती सातत्याने पुरा करत असते.
पण तरीही सुरुवातीच्या काळात मुलांना वाढवणं हे तिच्यासाठी आव्हानच ठरलं, कारण ल्यूकचा जन्म झाला तेव्हा त्याला सांभाळण्याची जबाबदारी तिच्या आईने घेतली होती. लहानपणापासूनच तिच्यामागे तिची आई ठामपणे उभी होती. ती सांगते, माझी आई माझा कणा होती. सगळ्या कुटुंबाला बांधून ठेवणारी. माझ्यासारखी अपंग मुलगी आणि गतिमंद मुलगा यांना सांभाळणं तिच्यासाठी फार मोठं आव्हान होतं; पण ते तिने मोठय़ा जिकिरीने सांभाळलं. माझ्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी ती ठामपणे उभी राहिली.. तिचाच आदर्श ठेवून मीही जगते आहे.
पण रोझचं आयुष्य इतकं सहज नव्हतं. तिच्या आयुष्याची परीक्षा तिला एकटय़ानेच द्यायची होती, कारण तिचा मुलगा ल्यूक २ वर्षांचा झाला आणि तिची आई कर्करोगाने मरण पावली. पुन्हा एकदा रोझला ठाम व्हायचं होतं, कारण मुलगा, नवरा यांच्याबरोबर आता तिला शरीराने वाढलेल्या, मात्र बुद्धीने लहानच राहिलेल्या भावाचा-जॅकचाही सांभाळ करायचा होता आणि आजारी वडिलांचाही. कारण तोपर्यंत वडील अल्झायमर आणि स्किझोफ्रेनियाचे शिकार झाले होते. वडिलांचं आयुष्य सिगरेट पिण्यात गेल्याने त्यांना ऑक्सिजनच्या सततच्या पुरवठय़ावर जगावं लागत होतं.. रोझपुढे पर्याय नव्हताच. चौघांना सांभाळण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती..
आई जाण्याने एकटेपण वाढलेला जॅक प्रचंड चिडचिडा झाला होता. त्याचं आणि डेव्हचं पटेनासं झालं होतं आणि वडील तर काय, या दुनियेत असून नसल्यासारखे होते. घरातली चिडचिड वाढायला लागली. त्याच परिस्थितीत मुलं मोठी होत होती. सुदैवाने दोघंही सुदृढ आहेत. आईचं अपंगत्व त्यांना कधी जाणवलंच नव्हतं, कारण त्यामुळे कोणतंच काम अडत नव्हतं. त्यांची आई फक्त उंचीने कमी होती आणि तेच त्यांच्यासाठी ‘कूल’ होतं.
पण आता दिवसेंदिवस रोझची तब्येत खालावत चालली आहे. आयुष्यभर हाताच्या जोरावर चालल्याने तिचे दोन्ही खांदे निखळण्याच्या बेतात आहेत. दोन जीवघेण्या गर्भारपणामुळे तिच्या शरीरावर नाना शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तरीही ती ‘उभी’ आहे. दोन मुलं, नवरा, भाऊ आणि वडील यांच्यासह संसार करते आहे. अर्धवेळ मेकॅनिकचं काम करत आणि मधूनमधून कार रेसिंगमध्ये भाग घेत आयुष्य घडवते आहे. तिची कार तिचा स्ट्रेस बस्टर आहे. ती म्हणते, ‘‘जेव्हा जेव्हा मी गहन विचारात पडते, माझ्याबरोबर माझी कार असते. आम्ही दोघी खूप दूर एकांतात जातो, माझ्यावरच्या तणावाचा निचरा करताना ती मला सोबत करते. मला माझ्यासाठीचे हे काही क्षण खूप आवडतात..’’  रोझच्या आयुष्यातले हे काही क्षण तिला पुढचं आयुष्य जगायला प्रेरणा देत असावेत. मध्यंतरी तिने आपल्या फेसबुकच्या माध्यमातून आधुनिक वा मशीन असलेल्या स्केटबोर्ड वा फ्रीडम बोर्डसाठी आíथक मदतीचे आवाहन केले आहे, त्याला जगभरातून प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या दोन वर्षांत तिला त्यातून सुमारे ७ हजार डॉलर्स मिळाले आहेत.
खूप प्रयत्न करूनही मला रोझशी प्रत्यक्ष बोलता आलं नाही. त्यामुळे अलीकडच्या काळातले धागेदोरे सापडले नाहीत; पण तत्पूर्वीच्या इंग्लंडच्या चॅनल ५ वरून प्रसिद्ध होणाऱ्या ‘एक्स्ट्रॉऑर्डिनरी पीपल’ मालिकेतील तिची मुलाखत पाहिली. ‘यू टय़ूब’वरचे तिचे काही व्हिडीयोज् पाहिले. क्लोझर मासिकांतून आलेल्या तिच्या मुलाखतीही वाचल्या.
ती आत्तापर्यंत जे जगत आली त्यामागे आहे तिचं असं एक तत्त्वज्ञान. ती म्हणते, ‘‘अनेक अपंग वा विकलांग लोकांना असं वाटतं की, आयुष्य आपल्याला काही तरी देणं लागतं. मी मात्र अशा विचारात वाढले की, नाही – कुणीही एक छदामही तुम्हाला देणं लागत नाही. जे तुमच्याकडे आहे ते तुमचं आहे, तुमची सगळी साधनसंपत्ती कामी लावा – आयुष्य मार्गी लावा आणि माझा व्यक्तिगत मंत्र म्हणजे ‘गेट अप अँड गो फॉर इट, जस्ट डू इट’. ती तो मंत्र आयुष्यभर अमलात आणते आहे; परंतु तरीही तिचा संघर्ष अजून संपलेला दिसत नाही.
 नुकतंच ट्विटरवर तिनं केलेलं ट्विट वाचलं, ५ मे २०१४ ला टाकलेलं, ‘ गेटिंग आऊट ऑफ बॅड मॅरेज, रायझिंग बोथ किड्स सोलो. वॉव! लाइफ गिव्हज् यू लेमन क्रिएट लेमोनेड.’ हा मेसेज अस्वस्थ करून गेला. तिला स्त्री म्हणून जगू देणाऱ्या, भरभरून प्रेम करणाऱ्या, अनेकदा आपल्या पाठीवर तिला वाहून नेणाऱ्या डेव्ह आणि तिच्यात नेमकं काय झालं असावं? दोन्ही मुलांची जबाबदारी तिने एकटीने का उचलली असावी? अजून किती काळ तिने असा संघर्ष करायचाय? या प्रश्नांची उत्तरं जरी मिळाली नाहीत तरी त्याचं सार तिच्याच शेवटच्या वाक्यात आहे. ‘‘आयुष्याने तुम्हाला लिंबू दिलाय म्हणून नाराज होण्यापेक्षा त्याचं सरबत करून पिणं तुमच्या हातात असतं’’.. तिने तेच तर केलं आत्तापर्यंत.. पुढेही करणारच!
(छायाचित्रे ‘फेसबुक’ व ‘यू टय़ूब’ यांच्या सौजन्याने)