News Flash

आरोग्यम् धनसंपदा : पित्तविकारावरील आहारोपचार

ज्या पदार्थानी पित्ताचा त्रास होतो किंवा वाढतो, असे पदार्थ जाणीवपूर्वक टाळायला हवेत.

(संग्रहित छायाचित्र)

सुकेशा सातवळेकर

शरीराचं वजन जास्त असेल तर अनेकांना पित्ताचा त्रास जास्त होतो. स्थूल स्त्रियांमध्ये, सडपातळ स्त्रियांपेक्षा पित्ताचा विकार सातत्याने २-३ पटींनी जास्त होतो. तेव्हा कायम योग्य वजन ठेवायला हवं. पित्तविकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी काही गोष्टी मात्र टाळायला हव्यात. आम्लयुक्त, पित्तकर पदार्थ, मसालेदार, तिखट, मिरची किंवा मिरे अतिप्रमाणात वापरलेले पदार्थ, खूप आंबट पदार्थ खाऊ नये. काहींना तूर डाळ चालत नाही, त्यांनी त्याऐवजी मूग, मसूर डाळ वापरावी किंवा सगळ्या डाळी एकत्र करून वापराव्यात. ज्या पदार्थानी पित्ताचा त्रास होतो किंवा वाढतो, असे पदार्थ जाणीवपूर्वक टाळायला हवेत.

‘‘आई, डोकं खूप दुखतंय,

अंगावर पुरळ आलंय. आणि खाजतंयही फार.’’

‘‘हो ना? सांगत होते, रात्रीची जागरणं कमी कर आणि त्या जोडीला दिवसभर काहीतरी अरबट चरबट खाणं थांबव. एका जागी बसून व्यवस्थित जेवायला नको. भाजी-पोळी, वरण-भात कोण खाणार? मग डोकं दुखणारच. थांब, माझ्याकडे मस्त घरगुती औषध आहे ते देते. लगेच आराम पडेल.’’

‘‘नको आई, ती बाबा घेतात ना ती गोळी दे, खूप त्रास होतोय. आणि आत्ता माझी शाळा घेऊ नकोस हं. बघत्येस ना किती गडबड आहे माझी, सबमिशनची डेडलाइन आलीय जवळ. बसून जेवायला वेळ तरी आहे का?’’

हल्ली आपल्या आजूबाजूला आणि घरोघरी असे संवाद ऐकायला येतात, हो ना? कारण हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात, वेगवान जीवनशैलीमध्ये पित्तविकाराचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतं. अगदी लहान वयापासून, शाळकरी मुलं, तरुण आणि प्रौढांना पित्तविकारानं ग्रासलेलं दिसतं. एका अभ्यासानुसार, ५०-६० टक्के प्रौढांना आठवडय़ातून कमीतकमी एकदा तरी पित्ताचा त्रास होतो. अपुरी झोप, जागरणं, वेळी-अवेळी आणि चुकीचं खाणंपिणं, ताणतणाव, चिंता, तीव्र स्पर्धा, शारीरिक हालचालींची कमतरता, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम पचनसंस्थेवर, पर्यायाने आरोग्यावर होतो.

या विकारात काही लक्षणं जाणवतात. जसं की; छातीत जळजळ, घशात जळजळ, तोंडाला आंबट चव असणं, आंबट ढेकर येणं. अस्वस्थता, खाण्यापिण्याची अनिच्छा, आवाज बसणं किंवा घोगरा होणं, कोरडा खोकला, डोकं किंवा मान दुखणं. अपचन, कधी-कधी बद्धकोष्ठता, पोटदुखी असते. त्रास वाढला तर मळमळ, उलटय़ा होऊ शकतात. अंगावर पुरळ उठून अंग खाजतं. हा पित्तविकाराचा त्रास का होतो ते थोडय़ा शास्त्रीय भाषेत समजून घेऊ या. आपल्या पोटात अन्नपचनासाठी गॅस्ट्रीक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल तयार होत असतं. या आम्लाचा शरीराला फायदा असतो तसाच त्याचा दुष्परिणामही होत असतो. हा नको असलेला परिणाम नष्ट करण्यासाठी पोटात बायकाबरेनेट्स आणि प्रोस्टाग्लँडीनस नावाचे घटक स्रवतात. या रासायनिक स्रावांच्या निर्मितीत अडथळा येतो तेव्हा पोटातील अस्तराचा दाह होतो आणि त्यामुळे पित्तविकाराचा त्रास होतो.

पित्तविकाराचा त्रास टाळण्यासाठी किंवा आटोक्यात ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीत, आहारविहारात काही बदल करणं आवश्यक असतं. सर्वात महत्त्वाचं आहे, खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं. ठरावीक वेळी, नियमितपणे, पोटात पाचकरसांची निर्मिती होत असते. त्यावेळी खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. पण खाण्यापिण्याची वेळ चुकली, बराच वेळ पोट रिकामं राहिलं तर पित्तविकाराचा त्रास होतो. तसंच, थोडय़ा-थोडय़ा वेळाने, थोडं थोडं खावं. दोन वेळा जेवण आणि मध्ये २-३ वेळा थोडा नाश्ता करावा. बराच वेळ पोट रिकामं राहिलं तर भूक वाढते आणि त्यामुळे, खाण्याचं प्रमाणही वाढतं. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. पोटाला तडस लागेपर्यंत, अति प्रमाणात एका वेळी खाऊ नये. त्यामुळे आम्लनिर्मिती वाढते.

‘फूड डायरी’ अर्थात ‘आहार रोजनिशी’ लिहायची सवय ठेवली तर खूप फायदा होतो. ज्या दिवशी पित्ताचा त्रास झाला त्यादिवशी काय आणि किती प्रमाणात खाल्लं होतं ते समजेल. असे पदार्थ टाळता येतील. सावकाश खावं प्यावं. ‘डायजेस्टिव्ह डिसीज वीक’मध्ये केल्या गेलेल्या अभ्यासावरून असं सिद्ध झालं, की ज्यांना जेवणासाठी ३० मिनिटं वेळ लागतो त्यांना; कमी वेळात घाईघाईने जेवणाऱ्यांपेक्षा, पित्ताचा त्रास कमी झालेला दिसला. सावकाश चावून चावून, प्रत्येक घास खावा. भाकरी-पोळीसारखे पदार्थ प्यावेत. प्यावेत म्हणजेच व्यवस्थित चावून, त्यात भरपूर लाळ मिसळून ते पातळ होऊ द्यावेत. लाळेतील पाचकरस त्यात मिसळला, की मग प्यावेत. पातळ पदार्थ, पेयं तोंडात घोळवून मग खावेत.

झोपायच्या २-३ तास आधी जेवावं. जेवल्या-जेवल्या लगेच आडवं पडू नये. पालथं झोपू नये. वाकून बसू नये. खूप जोरात हालचाली करू नये. जेवल्यावर शक्यतो ताठ बसावं किंवा उभं राहावं किंवा सावकाश चालावं म्हणजेच शतपावली करावी. झोपताना पलंगाची डोक्याकडची बाजू थोडी उंच ठेवावी. तुमची छाती, पोटापेक्षा थोडय़ा उंचीवर हवी. त्यामुळे झोपेत अन्न पोटातून, उलटय़ा दिशेने घशात येऊ शकणार नाही आणि पचन नीट होईल. एका अभ्यासावरून असं सिद्ध झालं, की योग्य स्थितीत झोपल्यामुळे पचनसंस्थेतील आम्ल, ६७ टक्के जलद गतिमान होतं आणि त्याचा योग्य वापर होतो.

भरपूर पाणी प्यावं. ‘डायजेस्टिव्ह डिसीज अँड सायन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, प्यायचं पाणी वाढवण्याचा उपाय; पित्तनाशक औषधांच्या उपचारापेक्षा जास्त प्रभावी आहे. आहारात काही आवश्यक अन्नघटक योग्य प्रमाणात हवेत. त्यातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे प्रथिनं. योग्य प्रमाणातील प्रथिनांमुळे गॅस्ट्रीनचा स्राव वाढतो, पचन सुधारतं आणि पित्ताचा त्रास होत नाही. आहारात ओमेगा ३ आणि ओमेगा ६ मेदाम्लांचं योग्य प्रमाण हवं. तंतुमय पदार्थ किंवा चघळचोथ्याचं प्रमाण वाढवायला हवं. पित्तविकार कमी व्हायला मदत होईल.

वजन आटोक्यात ठेवायला हवं. तुपकट, जास्त चरबीयुक्त पदार्थ पचायला जड असतात. असे पदार्थ व्यवस्थित पचले नाहीत तर पित्ताचा त्रास वाढतो. वजन जास्त असेल तर पित्ताचा त्रास जास्त होतो. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे, की स्थूल स्त्रियांमध्ये, सडपातळ स्त्रियांपेक्षा पित्ताचा विकार २-३ पटींनी जास्त असल्याचे दिसून येते. तेव्हा कायम योग्य वजन ठेवायला हवं. पित्तविकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी काही गोष्टी मात्र टाळायल्या हव्यात. आम्लयुक्त, पित्तकर पदार्थ, मसालेदार, तिखट, मिरची किंवा मिरे अतिप्रमाणात वापरलेले पदार्थ, खूप आंबट पदार्थ खाऊ नये. खरं तर ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे, प्रत्येकाला वेगवेगळ्या पदार्थामुळे पित्ताचा त्रास होतो. त्रास देणारे पदार्थ व्यक्तीनुरूप बदलतात. काहींना काकडीने पित्त होतं तर कुणाला मेथी, शेपूच्या भाजीनं होतं. कोणाला आंबट पदार्थ चालत नाहीत तर कुणाला कडू पदार्थानी त्रास होतो. काहींना तूर डाळ चालत नाही, त्यांनी त्याऐवजी मूग, मसूर डाळ वापरावी किंवा सगळ्या डाळी एकत्र करून वापराव्यात. आंबट फळं, टोमॅटो, सॉसमुळे काहींना पित्त होतं, काहींना आंबवलेले पदार्थ चालत नाहीत. ज्या पदार्थानी पित्ताचा त्रास होतो किंवा वाढतो, असे पदार्थ टाळायला हवेत. तेलकट, अति प्रमाणात चहा, कॉफी आणि कोला ड्रिंक्स टाळायला हवीत. ही पेयं कॅफिनयुक्त किंवा कॅफिनविरहित असली तरी त्यांनी पचनसंस्थेतील आम्लाचं प्रमाण वाढतं.

रात्री उशिरा तुडुंब पोट भरेपर्यंत जेवून लगेच झोपू नये. झोपेत शरीरांतर्गत सर्वच क्रिया मंदावतात. अन्नाचं पचन व्यवस्थित होऊ शकत नाही आणि पित्तविकार वाढतो. जेवणानंतर अन्न पचनाला थोडा वेळ द्यायला हवा. जेवताना, खाता-पिताना चिंता करणं, वादविवाद टाळायला हवेत.

अति घट्ट कपडे वापरणं शरीराला त्रासदायक ठरतं म्हणूनच कमरेचे बेल्ट्स घट्ट बांधू नये. जेवल्यावर तर ही काळजी घ्यायलाच हवी. पोटावरचा दाब वाढून, अन्न पुढे न सरकता घशात येऊ शकतं. जेवणाआधी किंवा जेवणानंतर लगेच अतिप्रमाणात पातळ पदार्थ किंवा पेयं पिऊ नयेत. त्यामुळे पोट फुगून पोटावर ताण येईल. सिगारेट ओढणं टाळायलाच हवं. सिगारेटमधील निकोटीनमुळे पोटाच्या अस्तराला इजा पोहोचते. पोटातील आम्लनिर्मिती वाढते. त्यामुळे पित्तविकार वाढतो. मद्यप्राशन टाळायला हवं. मद्य आणि पित्तविकाराचा संबंध, संशोधनावरून सिद्ध झालाय. अल्कोहोलमुळे पोटाच्या स्नायूंचं नुकसान होऊ शकतं. घशातील स्पिंक्टर हा भाग शिथिल झाल्यामुळे पोटातील आम्ल घशात येतं. आंबवलेली अल्कोहोलिक पेयं – बिअर, वाईन प्यायल्यावर पोटातील आम्लाचा स्त्राव वाढून पित्तविकार वाढतो.

सर्व प्रकारची काळजी घेऊनही पित्तविकाराचा त्रास झालाच, तर काहीजणांना गार दूध पिण्यानं फायदा होतो. घशातील, छातीतील जळजळ कमी होते. घशाशी आलेलं आम्ल निवळतं. जीवनशैलीत सुयोग्य बदल आणि सुधारणा ही पित्तविकार टाळण्यासाठी आणि आटोक्यात ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. खाण्यापिण्याच्या योग्य सवयी, समतोल आहार आणि वजन आटोक्यात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

dietitian1sukesha@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2019 12:53 am

Web Title: dietary treatment for gall disorder abn 97
Next Stories
1 तळ ढवळताना : मरम ना कोउ जाना
2 ‘पृथ्वी’ प्रदक्षिणा : परकी माती आपलीशी
3 शिक्षण सर्वासाठी : ही मुलं शिकत का नाहीत?
Just Now!
X