20 September 2020

News Flash

इच्छा तेथे मार्ग

‘‘इटलीमध्ये जाऊन इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी लॉ शिकण्याचं माझं स्वप्न. त्यासाठी WIPO पूर्णत: फेलोशिप देणार होतं. ती फेलोशिप मिळण्यापासून तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय भाग

| July 4, 2015 12:34 pm

‘‘इटलीमध्ये जाऊन इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी लॉ शिकण्याचं माझं स्वप्न. त्यासाठी WIPO पूर्णत: फेलोशिप देणार होतं. ती फेलोशिप मिळण्यापासून तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंतचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय भाग ठरला. हा एक नवा प्रवास होता.. नव्या शिक्षणाचा, नवीन लोकांना भेटण्याचा, नवं जग पाहण्याचा, एक अधिक चांगलं, अधिक सुजाण, अधिक  प्रगल्भ माणूस बनण्याचा..’’पाच लेखांची ही मालिका दर शनिवारी.
we are sorry to inform you that we are unable to consider your candidature for the award of WIPO fellowship for pursuing LL.M. cr17in Intellectual Property Law at Turin, Italy.. बस्स, ज्याची शंका वाटली होती तेच झालं. इटलीमध्ये जाऊन इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी लॉ शिकण्याचं माझं स्वप्न मार्था चीकोवोरच्या ‘वर्ल्ड इंटलॅक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाइझेशन’च्या जिनेव्हातील ऑफिसमधून आलेल्या या ईमेलमुळे क्षणार्धात चक्काचूर झालं होतं. असा ईमेल पचवण्याची अर्थात तयारी केली होतीच मी.. पण तरी वाईट वाटलंच.. डोळ्यांत पाणी आलंच. साधारण १२-१५ तासांतच मी शांत झाले आणि डोकं वापरून विचार करू लागले.
का मिळाली नसेल मला फेलोशिप? कागदावर तर खूपच चांगली दिसतात माझी क्वॉलिफिकेशन? मी सगळ्याच निकषांमध्ये बसते आहे. मग का नाही निवडले गेले? कुठे कमी पडले असेन मी? मला नाही मिळाली तर कुणाला मिळाली असेल ही फेलोशिप? कोण असतील हे जगातले ११ भाग्यवंत? काय कमी आहे माझ्यात यांच्यापेक्षा? अशा अनेक प्रश्नांची भाऊ गर्दी होती डोक्यात. आता या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मला शांतता मिळणार नव्हती. खूप विचार करून जिनेव्हाला मार्था चीकोवोरला फोन करायचा ठरवला. मार्था चीकोवोर ही संस्थेच्या जिनेव्हामधल्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण अधिकारी आहे.
काय बोलायचं त्याची उजळणी करून फोन लावला. मार्था म्हणाली की, फेलोशिप मिळाली नाही याचा अर्थ तू कुणापेक्षा कमी पडलीस असा होत नाही. आम्ही जगभरातून फक्त ११ फेलोशिप्स देतो. आणि त्यात देशांचा कोटा असतो. आशियामधून गेल्या वर्षी भारतातल्या एकाला फेलोशिप मिळाली आहे, म्हणून या वर्षी परत भारतीयाला फेलोशिप नाही देता येणार. ‘‘पण मला फार मनापासून हा कोर्स करायचा आहे. स्वप्न आहे हे माझं.’’ मी अगदी कळवळून तिला म्हणाले. आणि ती तळमळ कदाचित तिला कुठेतरी भिडली असावी. ‘‘अगं.. मी इथे फक्त एक प्रशिक्षण अधिकारी आहे. मी हा निर्णय नाही घेतलेला. पण मी एक काम करू शकते. तुझा फोन संस्थेचे संचालक डी. पीएत्रो पेराल्ता यांना जोडून देऊ  शकते. करू का सांग फोन ट्रान्स्फर?’’
आता निर्णय घ्यायची पाळी माझी होती. ‘‘हकढड अकादमीच्या संचालकाला थेट प्रश्न विचारायचे? बाप रे, हे फारच बालिश दिसेल.. तो फारच मोठा माणूस आहे. त्याच्याशी तयारी न करता कसं बोलू? दोन महिने चर्चा आणि अनेक चाचण्या करून त्यांनी हा निर्णय घेतला असेल. त्यावर शंका कशी घेऊ?’’ एक ना दोन.. एक दशांश सेकंदात अक्षरश: तुफान वेगाने हजारो प्रश्न डोक्यात चमकून गेले. पण त्यात एक विचार अचानक लख्ख विजेसारखा चमकला. ‘‘नाही तरी मिळाली नाहीच आहे फेलोशिप.. बोलण्याने अजून वाईट काय होईल? फार तर फार माझ्याबद्दल मत वाईट होईल ना?.. होऊ  दे झालं तर.. पण ही एक शेवटची संधी आहे, ती घेऊन पाहायलाच हवी!’’ काही सेकंदांत विचार करून मी मार्थाला फोन ट्रान्स्फर करायला सांगितला आणि तिने तो केलाही. पुढची ४० मिनिटे निर्णायक होती. मला डी. पीएत्रो पेराल्ता यांच्यापर्यंत माझी एलएल. एम. करण्यासाठीची कळकळ पोचवायची होती.
‘‘का करायचं आहे तुला हे एलएल. एम.?’’ – डी. पीएत्रो पेराल्ता
‘‘कारण मला पेटंट लॉ, विशेषत्वे फार्मास्युटिकल पेटंट्समध्ये प्रचंड रस आहे. मी १९९७ मध्ये एम. फार्म केलं तेव्हा मला पेटंटचा ‘प’ही समजत नव्हता, पण जेव्हा मला कळलं की किती महत्त्वाचं होऊ  पाहतंय हे क्षेत्र फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तेव्हा शिकायचं ठरवलं. मग एक डिप्लोमा केला पेटंट लॉमधला, एका प्रथितयश विद्यापीठातून, त्यात भारतात दुसरी आले. मग कॉलेजमध्ये हा विषय शिकवायला मागून घेतला. मुलांना आवडायला लागलं शिकवलेलं. मग ‘एलएल. बी’ला प्रवेश घेतला. भारतासारख्या देशात, जो सगळ्या जगाची फार्मसी होऊ  पाहतोय तिथे हे फार गरजेचं आहे फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पेटंट लॉ शिकवणं, पण शिकवायला लोक नाहीयेत.. असलेल्यांना प्रशिक्षण द्यायला महाविद्यालयांकडे पैसे नाहीयेत. खूप उपयोग होईल माझ्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयाला मी हे शिकले तर.’’ – मी म्हणाले.
डी. पीएत्रो फार मन लावून माझं बोलणं ऐकत होते. माझी तळमळ त्यांच्यापर्यंत पोचली असावी असं मला वाटलं. ते म्हणाले, ‘‘फार काही करू शकणार नाही मी तुझ्यासाठी. पण असं कर. पुढच्या वर्षी पुन्हा अर्ज कर. मी बघीन की तुला पुढच्या वर्षी नक्की मिळेल ही फेलोशिप.
मी म्हणाले, ‘‘सॉरी सर, पुढच्या वर्षी मी नाही येऊ  शकणार. माझी मुलगी शाळेच्या महत्त्वाच्या आणि अवघड इयत्तेत असेल. मला नाही जमायचं पुढच्या वर्षी.’’
मग ते पुढे म्हणाले, ‘‘बरं ठीक आहे. मग ऑस्ट्रेलियामधल्या क्वीन्सलँड विद्यापीठातल्या हकढड च्या एलएल.एमला अर्ज कर. तिथे आशियामधल्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण आहे. ती फेलोशिप देतो मी तुला.’’
मी परत निर्लज्जपणे म्हणाले. ‘‘माफ करा सर. तो एक वर्षांचा प्रोग्राम आहे. मी नाही राहू शकणार घर सोडून.. आणि कॉलेज सोडूनही, इतकी रजा नाही मिळायची.’’
माझं नन्नाचा पाढा वाचणं चालूच राहिलं.. पण तरीही मी हे पुन्हा पुन्हा कळकळीने सांगत राहिले की मला खूप अडचणी आहेत, पण मला फार मनापासून हे करायचं आहे.
शेवटी डी. पीएत्रो मला म्हणाले, ‘‘मला माफ कर. मला कौतुक वाटतं तुझ्या शिकण्याच्या धडपडीचं.. पण मला नाही वाटत तुला काही मदत करता येईल. सगळे निर्णय झाले आहेत आता. पण तू एक काम कर. तुझी सगळी महत्त्वाची अर्जाची कागदपत्रे माझ्या वैयक्तिक ईमेल आयडीवर मला पाठवून दे.. हा घे माझा आयडी. पण मी तुला सांगतो, मला नाही वाटत मी काही मदत करू शकतो तुला.’’ फोन बंद झाला होता.
मी परत त्यांना एक ईमेल केला आणि माझे सगळी कागदपत्रे त्यांना पाठवून दिली. रात्री अंथरुणावर पडले तेव्हा डोक्यात एकच विचार होता की, डी. पीएत्रोपर्यंत पोचली असेल का माझी तडफड? करतील का माझ्या अर्जाबाबत ते पुनर्विचार? त्या माणसाने माझं माझ्या विषयातलं ज्ञान तपासणारा एकही प्रश्न विचारला नाही. तो फक्त माझा खरेपणा तपासत असावा. कुठेतरी कधीतरी हे वाचल्याचं आठवलं की माणसाचा प्रत्येक निर्णय हा भावनांवर आधारित असतो.. माझ्या भावनांची.. हा कोर्स करण्याच्या माझ्या तीव्र इच्छेची कंपनं पोचली असतील का त्यांच्यापर्यंत? त्यांच्या मेंदूतला निर्णय घेणारा कप्पा माझ्या या कळकळीने उघडला असेल का, हाच विचार करत त्या दिवशी झोपी गेले. स्वत:चे प्रयत्न सोडायचे नाहीत असं सतत स्वत:ला सांगत..
चार दिवस गेले.. आठ दिवस गेले.. बारा दिवस गेले. मला कळून चुकलं की आता काहीही होणार नाही. मी माझ्या उद्योगांना लागले.. रुटीनमध्ये बुडून गेले. एक दिवस संध्याकाळी राधाला क्लासमध्ये सोडून पायऱ्या उतरत होते. जिन्यातच माझा फोन वाजला. कुठला तरी आयएसडी आहे इतकं लक्षात आलं.
‘‘मृदुला???’’ फोनवर एका बाईचा जाड, घोगरा, विचित्र अ‍ॅक्सेंटमधला आवाज!!
‘‘येस, मृदुला हिअर.. हूज धीस?’’-मी
‘‘हाय मृदुला. मी मार्था चीकोवोर बोलतेय, हकढड अकादमी, जिनेव्हातून. मला माहीत आहे. जरा उशीरच झाला आहे, मात्र यावर्षीच्या कोर्समध्ये एक ड्रॉप आऊट आहे. तुला आवडेल का ही फेलोशिप घ्यायला? इटालीतील टय़ूरीन येथे आयपी लॉमध्ये एलएल. एम. करण्यासाठी तुला हकढड करून पूर्णत: फंडिंग मिळणार आहे.’’
अहाहा!!! माझा माझ्या कानांवर विश्वासच बसेना. डोळ्यांतून आपोआप पाणी वाहायला लागलं. शेवटी मी जिंकले होते. आयुष्यात उशिरा का होईना, माझ्या मनासारखं काहीतरी घडत होतं.. एकदाचं हे प्रवेशाचं पर्व संपलं होतं..
पण माझ्या लक्षात आलं नाही तेव्हा, हा शेवट नाही सुरुवात होती, एका नव्या प्रवासाची.. नव्या शिक्षणाच्या.. नवीन लोकांना भेटण्याच्या.. नवं जग पाहण्याच्या.. माझ्या छोटय़ा छोटय़ा भीतींवर विजय मिळवण्याच्या.. माझ्या डबक्यातून बाहेर पडून मोकळा श्वास घेण्याच्या.. एक अधिक चांगलं, अधिक सुजाण, अधिक प्रगल्भ माणूस बनण्याच्या प्रवासाची!!
राहून राहून एकच विचार मनात येत होता. माझं सगळं धाडस गोळा करून मी त्या दिवशी मार्थाला फोन केला नसता तर? ‘डर के आगे जीत है’ हे किती खरं आहे!!!
कौन कहता है के आसमान में छेद नही हो सकता?
एक पत्थर तो तबीयत से उछालो मेरे यार
यातून अजून एक धडा शिकले तो हा की जात, देश, धर्म, भाषा या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसाला माणसापर्यंत पोचवणारा एकच धागा असतो. माणसातला सच्चेपणा, त्याच्या उद्देशातील तळमळ.. ती असेल तर तुमची कळकळ समोरच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहात नाही.
नियम, कायदे, सरधोपट पद्धत यांच्या पलीकडे जाऊन कुणी तुमच्यासाठी त्यांचा निर्णय बदलायला हवा असेल तर तुमच्यात फक्त सच्चेपणा हवा, कारण निर्णय घेणारा अवयव तुमचं मन असतं, मेंदू नव्हे आणि मनाला फक्त सच्च्या भावनांची भाषा कळते.. व्यवहारांची नव्हे!
(क्रमश:)
प्रा. डॉ. मृदुला बेळे –  mrudulabele@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2015 12:34 pm

Web Title: education country and public
Next Stories
1 मदाऱ्यांची मदार सरकारवर?
2 रे तुझ्यावाचुनी काही येथले अडणार नाही!
3 विकसित व्हावे.. अर्पित होऊन जावे..
Just Now!
X