01 June 2020

News Flash

गर्जा मराठीचा जयजयकार : सराव हाच कळीचा मुद्दा

गेली १५ वर्ष अमेरिकेत राहून ‘जिनिअस बिझिनेस सोल्युशन्स’ ही  स्वत:ची कंपनी यशस्वीरीत्या चालवणारे उद्योजक शिवाजी पाटील.

शिवाजी पाटील

मुग्धा बखले-पेंडसे / शुभांगी जोशी-अणावकर – Jayjaykar20@gmail.com

‘‘संवादकौशल्याचा भाषेवरच्या प्रभुत्वाशी थेट संबंध नसतो. तुम्ही दुसऱ्याचं म्हणणं नीट ऐकून, समजून घेता का, आणि तुमचं म्हणणं त्याच्यापर्यंत कसं पोहोचवता यावर तुमचं यश अवलंबून आहे. हे जमलं, की मराठी माध्यमात शिकूनदेखील इंग्रजी बोलणाऱ्यांमध्ये अगदी आत्मविश्वासानं वावरता येतं. उलट मराठीतून शिकताना आपल्या समृद्ध मराठी साहित्याची, संस्कृतीची ओळख होते आणि ती फार महत्त्वाची आहे,’’ सांगताहेत औरंगाबादमध्ये मराठी माध्यमात शिकून  त्यानंतर गेली १५ वर्ष अमेरिकेत राहून ‘जिनिअस बिझिनेस सोल्युशन्स’ ही  स्वत:ची कंपनी यशस्वीरीत्या चालवणारे उद्योजक शिवाजी पाटील.

परदेशात जाऊन स्वत:ची कंपनी सुरू करून ती यशस्वी करणं, हे सोपं काम नाही, पण शिवाजी पाटील यांनी ते करून दाखवलं. शिवाजी हे मूळचे औरंगाबादचे. त्यांचं चौथीपर्यंतचं शिक्षण ‘शिवाजी हायस्कूल’मध्ये झालं, तर पाचवीपासून दहावीपर्यंत ते ‘सरस्वती भुवन’ या शाळेत होते. त्यानंतर अकरावी-बारावीसाठी त्यांनी ‘एस. बी. महाविद्यालय’ येथे प्रवेश घेतला. दहावी आणि बारावी दोन्हीत ते गुणवत्ता यादीत झळकले होते. बारावीनंतर  त्यांनी औरंगाबादच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘मेकॅनिकल इंजिनीअरिंग’ची पदवी घेतली. त्यानंतर ‘आय.आय.टी. खरगपूर’ येथे ‘मास्टर्स इन इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमात उच्च शिक्षण पूर्ण केलं. त्याच वेळी ‘कॅम्पस’ मुलाखतीतून त्यांना बंगळूरुमधल्या ‘विप्रो सिस्टिम्स’ या कंपनीत नोकरी मिळाली.  १९९८ मध्ये ते अमेरिकेला गेले. काही र्वष ‘सॅप सॉफ्टवेअर’वर काम केल्यावर त्यांनी  ‘जिनिअस बिझिनेस सोल्युशन्स’ ही  स्वत:ची कंपनी सुरू केली. ही कंपनी गेली १५ र्वष अनेक ‘फॉर्च्यून ५००’ म्हणजे जगातल्या अग्रगण्य कंपन्यांना ‘सॅप’ आणि तत्सम सॉफ्टवेअरच्या बाबतीत सल्ला देते आणि मदत करते. त्यांच्याशी मराठी माध्यम ते इंग्रजी माध्यम हा होणारा मोठा बदल आणि संभाषणात्मक इंग्रजीची गरज याबद्दल मनमोकळ्या गप्पा झाल्या.

प्रश्न :  शिवाजी, तुमच्या यशस्वी कारकीर्दीतल्या अनेक स्थित्यंतरांपैकी पहिलं म्हणजे दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिकल्यानंतर अकरावीपासून किंवा पुढे शिक्षणाचं माध्यम इंग्रजी झालं. ते तुम्हाला जड गेलं का?  त्यावर कशी मात केलीत?

शिवाजी :  अकरावीत इंग्रजी माध्यमातून शिकताना मला काही अडचण आली नाही. कारण विषय तांत्रिक होते, फक्त ते इंग्रजीमध्ये होते.  विज्ञान, गणित यातल्या मूलभूत संकल्पना जर तुम्हाला स्पष्ट समजलेल्या असतील तर केवळ ते विषय  इंग्रजीत शिकायचे आहेत म्हणून समजायला काही अडचण येत नाही. उलट माझ्याबरोबरचे जे विद्यार्थी दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमात शिकले होते ते माझ्याकडे यायचे संकल्पना समजून घ्यायला. त्यामुळे तुम्हाला विषयाचं आकलन होणं हे महत्त्वाचं आहे, माध्यम कोणतंही असो. आम्ही मराठी माध्यमातून आलेली मुलं अभ्यासाच्या बाबतीत इंग्रजी माध्यमातून आलेल्या मुलांपेक्षा नेहमी पुढे असायचो.

प्रश्न : परंतु पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ‘सेमिनार’ वगैरे द्यावी लागतात. त्यासाठी संभाषणात्मक इंग्रजी चांगलं येणं आवश्यक असतं. तिथे तुम्हाला काही अडचण जाणवली का?

शिवाजी : फारशी नाही. जेव्हा आपण वर्गात शिकवलेलं लक्षपूर्वक ऐकतो, समजून घेतो त्यानंतर व्यक्त होताना भाषेचा अडथळा येत नाही. कुठल्याही तांत्रिक चर्चेत सहभाग घेताना मला अडचण आली नाही. कदाचित माझ्याकडे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा शब्दसंपदा कमी असेल, पण तांत्रिक बाबींबद्दल बोलताना जास्त शब्दांची गरज भासत नाही. आपल्याला समजलं आहे ते व्यवस्थित मांडता आलं की झालं. महाविद्यालयीन अभ्यासात आपल्याला काय येतंय, काय नाही, मला जे समजत नाहीये ते कोणाला विचारायचं आणि नेमके कोणते प्रश्न विचारायचे हे कळणं जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही कुठल्या भाषेतून संवाद साधता यापेक्षा किती प्रभावीपणे तो साधता याला जास्त महत्त्व आहे. पुढे आय.आय.टी. खरगपूरला गेलो, तेही मुळात माझ्या अगोदरच्या शिक्षणक्रमाचं एक प्रकारे तार्किक विस्तारीकरण होतं. मी ‘सेमिनार्स’मध्येही व्यवस्थित बोलायचो.

प्रश्न : म्हणजे तुम्हाला ‘सेमिनार’, मुलाखती या दरम्यान कधी दडपण आलं नाही का?

शिवाजी : आत्मविश्वास होता अणि दडपण असलंच तर ते एखादी गोष्ट पहिल्यांदा करताना असतं तेच आणि तेवढंच. पण ते भाषेमुळे नव्हतं. आपण जसजसा सराव करत जातो तसतसं दडपण नाहीसं होतं. लहानपणी सायकल शिकताना आपल्याला सुरुवातीला त्रास होतो, पण सरावानं आपण ती अगदी सहजगत्या चालवू लागतो तसंच आहे हे. सराव हा या सगळ्यावर मात करण्यासाठी कळीचा मुद्दा आहे.

प्रश्न : मराठी माध्यमातून आल्यामुळे तुम्हाला कमी लेखलं गेल्याचा अनुभव कधी आला का?

शिवाजी : मला वाटतं, की मैत्रीचा तसा भाषेशी किंवा त्यावरच्या प्रभुत्वाशी थेट संबंध नाही. बऱ्याच लोकांना भाषा उत्तम येत नसली तरी ते खूप चांगला संवाद साधणारे असतात, लोकप्रिय असतात. लोक तुमच्याशी बोलतात की नाही, किंवा तुम्हाला कसं वागवतात हे भाषेपेक्षा इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही कोणाशी आपण होऊन संभाषण सुरू करता का, वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकता का, तुमचा स्वभाव कसा आहे आणि दुसऱ्यांना तुमच्याशी बोलताना कसं वाटतं, या गोष्टी महत्त्वाच्या असतात.

प्रश्न : तुम्ही नोकरीसाठी बंगळूरुला गेलात. या बदलाबाबत सांगाल का?

शिवाजी : बंगळूरुचा अनुभव खूप सकारात्मक होता. ती माझी पहिली नोकरी होती. मी संगणक क्षेत्रात, विशेषत: ‘सॅप’ प्रणालीत काम करत होतो. त्यामध्ये तुम्हाला व्यवसायाची प्रक्रिया समजून घ्यावी लागते आणि इतर लोकांशी, चमूतल्या सदस्यांशी संवाद साधावा लागतो. त्यामुळे संवादकौशल्य आणि सॉफ्टवेअरचं तुमचं आकलन या गोष्टी गरजेच्या ठरतात. तेथे दोन र्वष काम करून मी अमेरिकेला आलो. इथे इंग्रजी असलं तरी भाषेचे उच्चार अगदी वेगळे असतात. त्यामुळे अडचण येईल असं वाटलं होतं, पण तितका त्रास झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या मनात हा मुद्दा ठसला, की संवादकौशल्य म्हणजे भाषेतलं प्रावीण्य नसतं. दुसऱ्याचं म्हणणं तुम्ही नीट ऐकून घेता का, आणि तुमचं म्हणणं त्याच्यापर्यंत कसं पोहोचवता यावर तुमचं यश अवलंबून असतं.

प्रश्न : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेकविध भाषा आणि उच्चारण असलेली मंडळी सामावलेली असतात. एकुणात नोकरी करतानाही तुम्हाला थोडं दडपण वगळता काही त्रास झाला नाही तर.

शिवाजी : बरोबर. भाषा हे केवळ एक माध्यम आहे. तुम्ही एक चांगला श्रोता असायला हवं. तुम्ही नीट ऐकता का, ऐकलेलं तुम्हाला नीट समजून घेता येतंय का, आणि जर नसेल तर तुम्ही योग्य माणसाला तुमचे प्रश्न विचारून समजून घेताय का, हा भाग महत्त्वाचा. त्यासाठी भाषा जरी आवश्यक असली तरी एखाद्याची भाषा कितीही चांगली असेल पण नीट ऐकण्याची क्षमता आणि आकलनशक्ती चांगली नसेल तर त्याचा फारसा उपयोग नाही. आपण इंग्लिशला खूप महत्त्व देतो.  मी मराठी माध्यमातून शिकलो. माझं इंग्रजी काही उत्तम नाही. पण गमतीचा भाग असा आहे, की अनेक युरोपीयन देशांमध्ये किंवा कोरिया, चीन इथेसुद्धा इंग्रजीचा वापर कमी असतो. त्यामुळे आपण त्यांच्यापेक्षा पुढे असतो.

प्रश्न : तुम्ही व्यवसायानिमित्त विविध देशांत भ्रमंती करता. तिथे तुम्हाला काय आढळतं? इंग्रजीला तिथे आपल्याइतकं महत्त्व दिलं जातं का? तिथे शिक्षणाचं माध्यम काय असावं, यावर आपल्यासारख्या चर्चा झडतात का?

शिवाजी : मी जेव्हा चीन, तैवान या ठिकाणी गेलो, तेव्हा तिथे मला एक जाणवलं, आजची जागतिक परिस्थिती पाहता त्यांचं भाषाकौशल्य कमी पडतंय. आपल्याकडे बहुतेकांचं दहावीपुढील शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम असल्यानं जागतिक पातळीवर व्यवहार करताना आपला फायदा होतो. तरीही इंग्रजीला किती महत्त्व द्यायचं हे नीट ठरवलं पाहिजे. मराठीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याची गरज नाही. आपली संस्कृती, आपलं साहित्य आपण जतन केलं पाहिजे, आणि त्यासाठी मराठी येणं खूप गरजेचं आहे. जितक्या जास्त भाषा तुम्ही शिकता तेवढा तुमचा दृष्टिकोन व्यापक होतो आणि संवादकौशल्य वाढवण्यासाठी मदतच होते. तुम्हाला जेवढय़ा जास्त भाषा येतील तेवढय़ा अधिकाधिक लोकांशी संवाद साधता येतो.

प्रश्न : गेल्या काही वर्षांपासून इंग्रजीचं मराठी भाषेवर होणारं आक्रमण रोखायचं असेल किंवा इंगजीच्या जोडीनं मराठीला समान महत्त्व मिळावं या दृष्टिकोनातून तुमच्या काही कल्पना आहेत का?

शिवाजी :  मला वाटतं, की महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करावी. प्रत्येकाला मराठी भाषा लिहिता-वाचता यायला हवी. पण पूर्ण शिक्षण मराठी माध्यमात व्हावं, असं काही गरजेचं नाही.  विशेषत: विज्ञान आणि गणित हे विषय पूर्णपणे संकल्पनांवर समजून घ्यायचे असतात. त्यासाठी भाषा कुठलीही असली तरी चालते. मराठी भाषेत या संकल्पनांसाठी काहीसे क्लिष्ट शब्द आहेत. मराठी जगवायची असेल तर आपणही इतर भाषेतल्या सुयोग्य शब्दांचा मराठीमध्ये समावेश केला पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्या तरुण पिढीला आपल्या साहित्य आणि संस्कृतीची ओळख करून दिली पाहिजे. हे साहित्य दुसऱ्या भाषेत रूपांतरित केलं गेलं पाहिजे. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती एक संस्कृती आहे. त्यामुळे जास्तीत जास्त इतर भाषेत मराठी साहित्य अनुवादित झालं, तर मराठी भाषेचं संवर्धन होण्याबरोबरच मराठी संस्कृतीही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपल्याला यश येईल. तुम्हाला एक उदाहरण देतो. आजच्या घटकेला संस्कृत भाषा शिकणाऱ्यांची संख्या भारतापेक्षा भारताबाहेर अधिक आहे. युरोपीयन लोक संस्कृत शिकून आपल्या वेदांचं अध्ययन करत आहेत. आपण अमराठी लोकांसाठी जर  जास्तीतजास्त मराठी साहित्य अनुवादित केलं, शंभर लोकांनी ते वाचलं, तर निदान त्यातल्या कदाचित दोघांना तरी मराठी भाषेविषयी कुतूहल निर्माण होईल आणि ते शिकतील.

प्रश्न : मराठी माध्यमातल्या मुलांना इंग्रजी बोलण्याबद्दल जो एक न्यूनगंड असतो तो घालवण्यासाठी काय करता येईल?

शिवाजी : आपल्याला दृष्टिकोन थोडा व्यापक करायला हवा. मराठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालकांच्या अपेक्षा ओळखून योग्य बदल करायला हवेत, जेणेकरून पालक अभिमानानं सांगतील, की मुलांना मराठी शाळेत गेल्यानं फायदाच झाला, कारण त्यांना इंग्रजीही आलं, मराठी संस्कृतीची ओळख झाली आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे उत्तम संवादकौशल्यही मिळालं. असं झालं, तर फक्त इंग्रजी माध्यमात शिकलेल्या मुलांपेक्षा ही मुलं बाह्य़ जगात अधिक सक्षमपणे वावरतील.

आजच्या घटकेला संस्कृत भाषा शिकणाऱ्यांची संख्या भारतापेक्षा भारताबाहेर अधिक आहे, असं मला वाटतं. युरोपीय लोक संस्कृत शिकून आपल्या वेदांचं अध्ययन करत आहेत. आपण अमराठी लोकांसाठी जर आपलं जास्तीत जास्त मराठी साहित्य अनुवादित केलं, शंभर लोकांनी ते वाचलं, तर निदान त्यातल्या दोघांना तरी मराठी भाषेविषयी कुतूहल निर्माण होईल आणि ते शिकतील. मराठी सर्वदूर पसरायला मदत होईल.

विशेष सहाय्य : वंदना कामत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 1:12 am

Web Title: entrepreneur shivaji patil genius business solutions garja marathicha jayjaykar dd70
Next Stories
1 हेल्पलाइनच्या अंतरंगात : विद्यार्थ्यांची आर्थिक संजीवनी
2 महामोहजाल : जबाबदार पालकत्व
3 चित्रकर्ती : संजादेवीचा चित्रमय जागर
Just Now!
X