News Flash

पुरुष हृदय बाई : पुरुषसूक्त

अचानक आत पाहिलं, तर आई-बाबा हातात हात घट्ट धरून बसलेले. ते दृश्य मी अनेक कारणांनी विसरलेलो नाही

डॉ. आनंद नाडकर्णी

पुरुषांनी स्वत:ची भावनिक बुद्धिमत्ता वाढवली, तरी सोकावणाऱ्या काळाचं काय?

स्त्री-शरीराकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहाण्याची लाट व्यापार संस्कृतीमध्ये आहेच. मात्र विज्ञानामध्ये अलीकडे ‘एपिजेनेटिक्स’ ही ज्ञानशाखा उदयाला आली आहे. पूर्वी आपण म्हणत होतो की जनुकीय संचित हे माणसाच्या संस्कार, संस्कृतीमुळे फारसं बदलत नाही. पण आज विज्ञान सांगतं की, जनुकीय संचित हेसुद्धा परिवर्तनीय असतं. त्यावर योग्य ‘संस्कार’ झाले तर जनुकांचं कार्य बदलू शकतं. म्हणजे ज्यांनी पुरूष वर्चस्वी संस्कृतीची कळत-नकळत जडणघडण आणि जपणूक केली, त्यांनीच आता आपापली व्यापक विचारवाट शोधायला हवी. नवीन पुरूषसूक्त तयार करायला हवं..

माझ्या आठवणीमधला पहिला पुरुष आणि पहिली स्त्री म्हणजे माझे आई-वडील. आता असं जाणवतं की, त्यांच्या काळाच्या मानानं, त्या दोघांनीही त्या वेळी पारंपरिक स्त्री-पुरुष भूमिकांना छेद द्यायला सुरुवात केली होती. गेल्या शतकामधल्या चौथ्या दशकात त्यांनी प्रेमविवाह ठरवला होता. लग्नानंतर पुढचं शिक्षण घेऊन आईनं माँटेसरी शाळा सुरू केली होती. वडील रसायनशास्त्राचे प्राध्यापक. साम्यवादी विचारांकडून साने गुरुजींच्या प्रभावाकडे आलेले..

आमच्या घरात प्रत्यक्ष स्वयंपाक सोडला तर प्रत्येक घरगुती गोष्टीमध्ये वडिलांचा अर्थपूर्ण सहभाग असायचा. घरातल्या भाजीखरेदीपासून ते स्वच्छतेपर्यंत. त्यामुळे ‘ही’ कामं पुरुषांची, ‘ही’ स्त्रियांची, असं विभाजन कधी जाणवलं नाही. शिस्तीच्या बाबतीत आई वडिलांपेक्षा कोसभर जास्त कडक. वडील तसे ‘मातृहृदयी’. फक्त आम्हा मुलांच्या संदर्भातच नव्हेत, तर त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्यासोबत वागतानाही. आमच्या घरात आवाज चढायचा तो आईचा आणि वडील तिचं संपूर्ण म्हणणं ऐकून तिची समजूत काढायचे. त्यांच्या भांडणांचं ‘टेन्शन’ आम्हाला कधी आलं नाही. मी त्यांचं तिसरं अपत्य. माझे भाऊ-बहीण आणि मी यात अनुक्रमे अकरा आणि साडेबारा वर्षांचं

अंतर. आई-वडिलांनी एकत्र विचारानं असं ठरवलं होतं की, आपली आर्थिक स्थिती सुधारली की तिसरं मूल होऊ द्यायचं. अशी चर्चाही त्यांच्यात व्हायची.

माझे वडील आधी खान्देशात जळगावला, नंतर मराठवाडय़ात अंबाजोगाईला आणि पुढे ठाण्याला नोकरी करायचे. एकदा  मी आणि आई मुंबईहून अंबाजोगाईला जायला निघालो होतो . आम्ही कुर्डूवाडीला उतरलो. ‘बार्शी लाइट’ या रेल्वेनं लातूरला आलो. तिथे वडील आम्हाला घ्यायला आले. लातूर ते अंबाजोगाई तासभराचा एसटीचा प्रवास. मी खिडकीत बसलो होतो बाहेरची मजा पाहात. अचानक आत पाहिलं, तर आई-बाबा हातात हात घट्ट धरून बसलेले. ते दृश्य मी अनेक कारणांनी विसरलेलो नाही. त्यातलं महत्त्वाचं कारण हे की, माझ्यासाठी

स्त्री-पुरुष नात्यामधल्या संयमी समजुतीची कायम बनलेली प्रतिमा आहे ती.

प्रत्येक माणसाच्या घडणीमध्ये या संस्कारांचं स्थान फार महत्त्वाचं असतं. स्त्रीत्व आणि पुरुषत्वाचं आपापलं जनुकीय संचित घेऊन येतोच आपण सारे. पण त्याची अभिव्यक्ती होते ती या कौटुंबिक वातावरणामध्ये. आणि भोवतालची संस्कृती आपल्याला भेटते ती घराच्या संस्कार-खिडकीमधूनच. माझ्यातलं पुरुषी वेगळेपण मला कळायला लागलं ते हार्मोन्सच्या बदलातूनच. पण माझं स्वत:बद्दलचं एक निरीक्षण नोंदवायला हवं. ज्याला आपण प्रौढ लैंगिकता म्हणू, त्या भावनेच्या अस्फुट अशा अनुभवांना मी वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षांपासून सामोरा गेलो. हे नेमकं काय होत आहे हे कळायचं नाही. प्रौढ आयुष्यात समवयस्क मित्रांसोबत बोलताना अनेकांनी याला दुजोरा दिला. त्यानंतर मानसशास्त्रामध्ये सिग्मंड फ्रॉइडची  मांडणी वाचली. ‘इडिपस’ आणि ‘इलेक्ट्रा’ कॉम्प्लेक्स म्हणजे मनोगंडांबद्दल त्यानं लिहिलं आहे. ‘मनोगंड’ हा शब्द जरा तीव्र वाटेल, पण पौगंडावस्थेआधीपासूनच लैंगिक पुरुषत्वाचं भान आणणाऱ्या संवेदना अनेकांना जाणवतात असं आढळलं.

आठवी-नववीमध्ये गेल्यावर पौरुषाची लैंगिक भावना अधिक ठळक आणि ओळखीची झाली. चिं.त्र्यं. खानोलकर, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, मिलिंद बोकील, गौरी देशपांडे, सानिया अशा लेखकांच्या लिखाणाचा खरंतर ‘पुरुषी’ घडणीच्या संदर्भात विचार व्हायला हवा. याच सुमारास समाजातले ‘पुरुषा’वतारही आपल्यासमोर येतात. त्यातले काही तर आपल्या वर्गात, शाळेत किंवा कॉलेजात किंवा शेजारीपाजारीच असतात.

‘नेचर’ म्हणजे जनुकीय संचित, ‘नर्चर’- कौटुंबिक संस्कार, ‘कल्चर’- भोवतालची संस्कृती, या तीन घटकांमधून प्रत्येक पुरुषाची (आणि स्त्रीचीसुद्धा) ‘सिग्नेचर’ म्हणजेच ‘एकमेवाद्वितीय अस्तित्वमुद्रा’ तयार होत असते. म्हणजेच एक व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीची एक अस्तित्वमुद्रा असते आणि ती वेगवेगळी असते. पण पुरुषसमूह आणि स्त्रीसमूह यांच्या अस्तित्वमुद्रेमध्ये काही फरक आहेत. त्यामागे पुन्हा तेच तीन घटक आहेत. त्यांच्या ‘तपशीलवार कॉन्ट्रिब्युशन्स’मध्ये न जाता आपण ज्याला सर्वसाधारणपणे ‘पुरुषी’ वृत्ती म्हटलं आहे, ती काय असते त्याकडे येऊया. स्वत:च्या वेगळेपणातलं सामर्थ्य आणि मर्यादा ठाऊक असणं हे विवेकाचं लक्षण. त्यामधूनच सहकार्य निर्माण होतं. स्वत:च्या वेगळेपणातून आलेलं सामर्थ्य कोणत्याही प्रकारच्या सत्तेसाठी आणि शोषणासाठी वापरणाऱ्या वर्चस्ववादी वृत्तीला आपण पुरुषी वृत्ती म्हणत आलेलो आहोत. आणि ही व्याख्या सिद्ध करण्यास जगातल्या अनेक पुरुषांनी आजवर हातभार लावला आहे. त्यातून एक ‘स्टिरिओटाइप’ म्हणजे प्रारूप निर्माण झालं, ते पुरुषी वृत्तीचं. या वृत्तीची अभिव्यक्ती काही स्त्रियांमध्येही झाल्याचं इतिहासानं पाहिलेलं आहेच.

स्त्रीच्या वेगळेपणाचा, सामर्थ्यांचा आणि मर्यादांचाही मन:पूर्वक स्वीकार आणि आदर करणं हे प्रत्येक पुरुषाचं कर्तव्य आहेच. माझ्या अनुभवाप्रमाणे लैंगिक सुखाकडे आणि स्त्री-पुरुष नात्याकडे पाहाण्याचे दृष्टिकोन या संदर्भात खूप महत्त्वाचे आहेत. स्त्री-पुरुषांतील प्रेमभावनेकडे आम्ही पुरुष वर्चस्ववादाच्या नजरेतून पाहात असतो. सामाजिक व्यवहारात समानता जपणारे अनेक जण व्यक्तिगत जीवनात संकुचित असतात. अगदी जवळच्या वैयक्तिक स्त्री-पुरुष नात्यामध्ये मी जेव्हा लैंगिक दृष्टीनं स्वत:ला ‘डिप्राइव्ह्ड’ किंवा वंचित समजू लागलो, तेव्हाच माझ्यातल्या आदिम, सत्तावादी भावना वर उसळल्या होत्या. त्यातून मी जे शिकलो त्याचा उपयोग मला स्त्री-पुरुष नात्याचे अनेक हळुवार बंध उलगडताना झाला.

स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या परस्पर आकर्षणाच्या अनंत छटा असतात. रूढ समजुतीप्रमाणे प्रौढ स्त्री आणि पुरुष यांच्यात ‘अफे अर’च असतं. लग्न म्हणजे मान्यताप्राप्त अफे अर! माझ्या सुदैवानं माझ्या जीवनात अनेक जिवलग मैत्रिणी आल्या. मैत्री महत्त्वाची. ती मित्राबरोबरची असो, की मैत्रिणीबरोबरची! पण त्यातही मैत्रिणीच्या नात्यामध्ये असणाऱ्या शारीर प्रेमाकर्षणाच्या छटांना नाकारायचं कशाला? त्यांचा स्वीकार करून संयमानं अभिव्यक्ती करता येते की. त्यांना दडपायला भाग पाडत असतं ते भोवतालचं वातावरण. स्वत:च्या विवेकाला साक्षी ठेवून जे स्त्री-पुरुष अशा नात्यांमध्ये खंबीर राहिले, राहातात ते एक नवा इतिहास लिहीत आहेत.

स्त्री-पुरुष नात्यामधले अनेक पदर गवसावे यासाठी मैत्री हवी. आणि मैत्र म्हणजेच स्वीकार, समानता आणि नित्य आदर. लपवण्याची वृत्ती आली की गेलो आपण पारंपरिक आणि ‘सेफ’ वाटणाऱ्या अतिसावध वाटेवर. त्यासाठी आपल्या नात्याची जाण आणि भान सतत तेवत ठेवायला हवं. एका संवादामध्ये मी जिवलग मैत्रिणीला म्हणालो, ‘‘आपल्या नात्याचे खूप भाग दिसतात मला. एका बाजूनं मी तुझ्यासाठी ‘फादर फिगर’ आहे, तुझा ‘मेंटॉर’ आहे, दुसरीकडे अगदी जिवलग मित्र, तिसरीकडे तुझा सहकारी.. आणि संपर्क झाला नाही तुझ्या-माझ्यात तर आतुर होणारा प्रेमीसुद्धा.’’ शपथेवर सांगतो, यातील शेवटचं वाक्य प्रामाणिकपणे म्हणायला खूप धैर्य लागलं. पण त्या नात्यानं, तोवर इतकं सुरक्षाकवच दिलं होतं की, व्यक्त होण्याची भीती पार झाली होती.

प्रेमाकर्षण म्हणजे शरीरसंबंध, म्हणजेच व्यभिचार! म्हणजेच चौकटीतल्या नात्यांवरचा अविश्वास.. अरे, किती ठोकळेबाज विचार करावा मनानं. तरी बरं, आज अनेक स्त्री-पुरुष, अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र काम करतात, प्रवास करतात, एकत्र शिकतात, मजाही करतात.

स्त्री-पुरुष नात्याचा एक आविष्कार शारीर प्रेममय समागमात निश्चितच आहे. पण तो प्रत्येक नात्याचा अंतिम टप्पा असायलाच हवा का? शरीरांचा संवाद हा मनांच्या संवादाला अधिक सौंदर्यमय करण्यासाठी यावा. क्षणिक लालसेची वादळी अभिव्यक्ती म्हणून नको. तसंच वर्चस्वाची खूण म्हणूनही नको. म्हणजे मूलभूत प्रश्न कोणता आहे समजलं का?

पुरुष आणि स्त्री या दोघांच्या भावनांकाचा- ‘इक्यू’चा (इमोशनल कोशंट). या नात्याच्या संदर्भातला समाजाचा भावनांक वाढण्याची गती आपल्या हातात नाही. पण शेवटी व्यक्तींच्या भावनिक परिपक्वतेवरच समाजाची परिपक्वता ठरणार की नाही!

भावनिक बुद्धिमत्ता काय करते? कोणत्याही नात्याला एका चौकटीत बसवत नाही. त्या नात्याच्या विविध छटा अनुभवायला, स्वीकारायला मदत करते. म्हणजे माझ्या काही मैत्रिणी ‘आई-मैत्रीण’सुद्धा असतात. माझी मुलगी जीवाभावाची मैत्रीण असते. अडचणीच्या काळात शांत पाठराखण करणारी पत्नीसुद्धा काय वेगळी असते? माझ्या ‘वहिनी’नात्यानं तर माझ्यावर सतत मायेची पाखर घातली आहे. माझ्या आजी-मावशी मैत्रिणींचं कौतुक ऐकायला माझे कान आसुसलेले असतात. माझ्या एक मॅडम म्हणजे माझी मोठी बहीणच होत्या. आणि मला ‘आनंदकाका’ म्हणत हक्कानं साद घालणाऱ्या माझ्या कर्तृत्ववान पुतण्या!.. अनेक वयोगटांमधल्या. वा, वा.. काय मोहोर फुलून आलाय स्त्री-पुरुष नात्यांचा. माझ्यातल्या त्या पारंपरिक पुरुषाला स्वत:चं उन्नयन (सब्लमेशन) कसं करता आलं असतं इतकी सारी ‘रेंज’ नसती तर.. कुठेही जा, नेटवर्क मिळतंच.

पारंपरिक, रूढ समीकरणाच्या बाहेर पडू इच्छिणाऱ्या पुरुषासाठी विनोबांच्या ब्रह्मचर्याच्या व्याख्या फार कामाला येतात. विविध ठिकाणी त्यांनी त्या लिहून ठेवल्या आहेत. विनोबा लिहितात, ‘ ‘विषयसेवन करू नको’ ही (ब्रह्मचर्यासाठी) अभावात्मक आज्ञा झाली. ब्रह्मचर्याला मी विशाल ध्येयवाद आणि तदर्थ संयमाचरण म्हणतो. मातृत्व आणि पितृत्व, पुरुषत्व आणि स्त्रीत्व यांचा मनोहारी प्रेममय संगम म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे स्त्रियांना निर्भयपणे सामाजिक कार्यात भाग घेता येणं.’ पहिल्या व्याख्येमध्ये विशाल ध्येय आणि संयमावर भर आहे. दुसरी व्याख्या आहे स्त्रीत्व आणि पुरुषत्वाला विशिष्ट ‘जेंडर’मधूनच मुक्त करणारी. आणि तिसरी आहे सामाजिक व्यवहारामधल्या विवेकाला जपणारी.

आता मूलभूत प्रश्न हा उरतो की, पुरुषांनी स्वत:ची भावनिक बुद्धिमत्ता वाढवली, स्वत:मधल्या वर्चस्ववृत्तीचं अगदी उन्नयन केलं, तरी सोकावणाऱ्या काळाचं काय? स्त्री-शरीराकडे उपभोग्य वस्तू म्हणून पाहाण्याची लाट व्यापार संस्कृतीमध्ये आहेच की. स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या बातम्या आजही येतच आहेत. समजा काही पुरुषांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, तरी ती ‘भिनलेली’ प्रवृत्ती कशावरून कमी होईल? विज्ञानामध्ये अलीकडे ‘एपिजेनेटिक्स’ ही ज्ञानशाखा उदयाला आली आहे. पूर्वी आपण म्हणत होतो की जनुकीय संचित हे माणसाच्या संस्कार, संस्कृतीमुळे फारसं बदलत नाही. पण आज विज्ञान सांगतं की, जनुकीय संचित हेसुद्धा परिवर्तनीय असतं. त्यावर योग्य ‘संस्कार’ झाले तर जनुकांचं कार्य बदलू शकतं. म्हणजे विकासाकडे नेणाऱ्या विचारांच्या वाटेला नेटानं पुढे न्यायला हवं. पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्द वापरून गुळगुळीतही झालेत आणि त्यावर पूर्वग्रहांचं शेवाळंपण साचलं आहे. मानवधर्मी, व्यापक वैचारिकतेला आणि भावनिक बुद्धिमत्तेला म्हणू या विश्वगामी दृष्टिकोन. ज्यांनी पुरुष वर्चस्वी संस्कृतीची कळत-नकळत जडणघडण आणि जपणूक केली, त्यांनीच आता आपापली व्यापक विचारवाट शोधायला हवी, नाही का? सहज आठवल्या, कविवर्य बा. सी. मर्ढेकरांच्या ओळी-‘धैर्य आणि नम्रता दे, पाहाण्या जे-जे पाहाणे वाकू दे बुद्धीस माझ्या, तप्त पोलादाप्रमाणे’ अनुरूप भावनांक आणि लवचीक, तरीही कणखर वृत्ती यांचं सूचन करणाऱ्या या ओळी सांप्रत काळातलं ‘पुरुषसूक्त’ म्हणून घ्याव्या अशाच आहेत.

anandiph@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 1:04 am

Web Title: epigenetics and its role in male infertility introduction to epigenetics zws 70
Next Stories
1 जोतिबांचे लेक  : स्त्री सन्मानासाठी
2 गद्धेपंचविशी :  तो योग्य निर्णय..
3 खल-बत्ता, कढई-झारा
Just Now!
X