पती असो वा पत्नी अगदी संपूर्णपणे दुसऱ्याच्या मनासारखी वागेल अशी अपेक्षा ठेवणे सर्वस्वी चूक आहे. अनेक माणसे वेगवेगळ्या घरात, वेगवेगळ्या संस्कारांत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेली असतात. त्यामुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व, विचारधारा, मते, आवडी-निवडी भिन्न असतात. वैवाहिक जीवन आनंदी होण्यासाठी जे भाग बदलल्याने जोडीदार आनंदी होईल ते बदलायचे आणि जोडीदाराच्या स्वभावातील न बदलणारे भाग स्वीकारायचे असे सूत्र ठेवावे लागते.
ही लेखमाला लिहीत असताना अनेक वाचकांशी संपर्क येत गेला आणि या विषयावर लिहा, त्या विषयावर लिहा अशा मागण्या येत राहिल्या. खरे तर स्त्री-पुरुष नातेच असे आहे की त्यावर लिहावे तितके कमीच!  ९० टक्क्य़ांहून अधिक कथा, कादंबऱ्या, टीव्ही मालिका, चित्रपट, नाटके या विषयावरच आधारित असतात. तरीही हा विषय संपता संपत नाही. त्याविषयीचे कुतूहल सदैव जागे असते.
परंतु ही लेखमाला लिहिताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली होती. यात अनुभव सांगायचे पण त्या अनुभवांतून काहीतरी शिकता येईल यासाठी प्रयत्न करायचा. माझे ज्येष्ठ मित्र अनिल अवचट मला नेहमी सांगतात, कोरे अनुभव लोकांसमोर आहेत तसे मांडत जा. त्यात तुझी विशेषणे, तुझे मत व्यक्त करू नकोस. या रीतीने लिहिण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न होता आणि वाचकांनी ज्या प्रेमाने हे सदर वाचले आणि प्रतिसाद दिला त्यावरून माझा हेतू काही प्रमाणात सफल झाला असे वाटते.
गेली अनेक वर्षे मी माणसांशी बोलत आलो आहे. गेल्या पंधरा वर्षांत मी किमान चार हजार जोडप्यांशी बोललो आहे आणि सर्वसाधारण मध्यमवर्गीय जोडपी वागतात तरी कशी? काय असतात त्यांची स्वप्ने? काय असतात त्यांच्या अडचणी? त्यांची दु:खं असतात तरी कोणती? त्यांच्या जीवनात जे प्रश्न निर्माण होतात त्या वेळी ती काय करतात? त्यांचे पर्याय शोधण्याची आणि निवडण्याची प्रक्रिया असते तरी कशी? अशा अनेक प्रश्नांचा मी माझ्या रीतीने, अभ्यास करत गेलो आणि लक्षात आले की या सगळ्या मंडळीना कोणीतरी छोटीशी दिशा दिली तर त्यांचे जीवन कालच्या पेक्षा अधिक आनंदी, कमी त्रासदायक होऊ शकेल .
मी आणि माझी पत्नी गौरी असे मानतो की समाज सुखी व्हायचा असेल, मुलावर चांगले संस्कार व्हायचे असतील आणि पुढची पिढी अधिक समंजस व्हावी असे वाटत असेल तर पती आणि पत्नी यांचे नाते भक्कम हवे. आई-वडील, भावंडे, नातेवाईक कसे असावेत, त्यांनी कसे वागावे हे आपल्या कोणाच्याच हातात नसते. पण अनेकदा पती किवा पत्नी निवडण्याची संधी वधू किंवा वर यांना असते. म्हणजेच पती-पत्नी हे नाते आपोआप चिकटलेले नसून निवडलेले असते. त्यामुळे एकमेकांनी एकमेकांशी कसे वागायचे आणि हे नाते अधिक चांगले कसे करायचे हा पर्याय दोघांनाही खुला असतो.आणि जर दोघांनी थोडेसे प्रयत्न करून नाते शक्य तेवढे चांगले करायचा प्रयत्न केला तर यथावकाश एक चांगली पिढी आणि चांगला समाज निर्माण होईल याची आम्हा दोघांना खात्री वाटते.त्यासाठी आमच्या परीने जे करता येणे शक्य असते ते आम्ही दोघे करतो. ही लेखमाला हा त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग आहे
इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, पती असो वा पत्नी अगदी संपूर्णपणे दुसऱ्याच्या मनासारखी वागेल अशी अपेक्षा ठेवणे सर्वस्वी चूक आहे. अनेक माणसे वेगवेगळ्या घरात, वेगवेगळ्या संस्कारांत आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेली असतात. त्यामुळे प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व, विचारधारा, मते, आवडी-निवडी भिन्न असतात. त्यापकी काही गोष्टी थोडय़ा प्रयत्नाने काही गोष्टी जाणीवपूर्वक जोडीदाराच्या आनंदासाठी नक्कीच बदलता येऊ शकतात. पण तरीही काही बदलणे अवघड असलेला भाग राहतोच. वैवाहिक जीवन आनंदी होण्यासाठी जे भाग बदल्याने जोडीदार आनंदी होईल ते बदलायचे आणि जोडीदाराच्या स्वभावातील न बदलणारे भाग स्वीकारायचे असे सूत्र ठेवावे लागते. वाचकांच्या लक्षात आले असेल की गेल्या पंचवीस लेखांतून हेच मूलभूत सूत्र मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अजून काही महत्त्वाच्या गोष्टींवर मी अद्याप खुलासेवार लिहिलेले नव्हते. आजच्या शेवटच्या लेखात त्या विषयांना मी किमान स्पर्श करतो
१. अपत्य नसलेली जोडपी! मला नेहमी अशा जोडप्यांच्या जीवनाबद्दल खूप कुतूहल राहिलेले आहे. नमिता नावाची तिशीतली मुलगी मधून अधून माझ्याशी बोलायला येत असे. लग्न होऊन चार-पाच वर्षे झाली होती. मूल होईना म्हणून उपचार चालू झाले. ती यामुळे डिप्रेशनमध्ये गेली. मूल दत्तक घेणे हेसुद्धा खूप कागदपत्रांचे काम.
शेवटी दोघांनी निर्णय घेतला की, कोणतेही उपचार नकोत आणि दत्तकही नको. तिने दोन गोंडस कुत्री पाळली आहेत. पण समाजाचे टोमणे आहेतच. पण आता दोघे सरावले आहेत. जीवनातील प्रश्नांना मार्ग शोधावा लागतो तो असा.
२. एका जोडीदाराला मानसिक आजार असेल तर?
आमच्याकडे घटस्फोट झालेले पुरुष अनेकदा सांगतात. आमची फसवणूक झाली. तिला मानसिक आजार आधीपासूनच होता. एखाद्या जोडीदाराला मानसिक आजार असणे यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही हे खरे. पण अनेक मानसिक आजार योग्य उपचारांनी बरे होऊ शकतात याची माहिती न घेता थेट विभक्त होणे त्याहूनही दुर्दैवाचे. अनेक वेळा रुग्णाची प्रगती आणि औषधांना देत असलेला प्रतिसाद यावरून डॉक्टर रुग्णाला लग्न करण्यास हरकत नाही असा सल्ला देतात. परंतु पत्नीच्या किंवा पतीच्या आजाराचे स्वरूप, त्याची वारंवारिता, तीव्रता आणि संभाव्य धोके यांची माहिती करून घेऊन निर्णय घेणे शहाणपणाचे असते. इतर कोणत्याही शारीरिक आजाराप्रमाणे बरेच मानसिक आजार असतात आणि जोडीदाराच्या सजग साथीने ते नियंत्रणात राहातात. ठाण्याच्या आयपीएच संस्थेत याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.
३.  जोडीदाराला लंगिक समस्या असतील तर ?
स्त्री- किंवा पुरुष दोघांनाही मानसिक अढीमुळे, भीतीमुळे सुरुवातीच्या दिवसांत शरीरसंबंध करण्यात अडचणी येऊ शकतात. कामजीवन तज्ज्ञांच्या मताने अनेक समस्यांच्या मुळाशी गरसमज आणि अज्ञान असते. काहीजणांना एकमेकांच्या शरीराची प्रत्यक्ष चांगली ओळख होण्यापूर्वीच ब्लू फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे आसने करावीशी वाटतात. त्यामुळे जोडीदार विकृत आहे, नपुंुसक आहे, पत्नी फ्रीजीड आहे असे शिक्के मारून वैवाहिक जीवन दु:खाचे करतात.
इतर काही आजार, औषधांचे दुष्परिणाम यामुळे जोडीदाराची लंगिक प्रेरणा कमी होऊ शकते. त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अगत्याचे असते.
४. एखादा जोडीदार व्यसनी असेल तर?
मला पूर्ण कल्पना आहे त्या स्त्रीचे किती हाल होतात याची. रोजची भांडणे, शिवीगाळ, प्रसंगी मारहाण, पशाची ओढाताण, मुलांची फरफट, त्याच्या व्यसनामुळे सासू-सुनांची भांडणे अशा एका माणसाच्या आयुष्यात घडू नयेत अशा सगळ्या गोष्टींना तिला नित्यनेमाने तोंड द्यावे लागते आणि भवतालचा समाजसुद्धा तिच्या दु:खाला डागण्या देत असतो. पोकळ सहानुभूती, त्याच्या व्यसनाला तिला जबाबदार धरणे, स्त्री म्हणून तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणे अशा साऱ्या अनुभवांना तिला सामोरे जावे लागत असते. आणि अपराधीपणा, संताप, नराश्य, चिंता आणि उबग या साऱ्या भावना तीव्र स्वरूपात अनुभवत असते. साधारणपणे दारूचे व्यसन माणसाला ३०-३५ वर्षांचा असताना वाढते. तेव्हा संसार मोठा झालेला असतो. मुलांसकट माहेरी जाणे हा पर्याय अनेक जणी निवडतात, परंतु तिथेही भावाच्या संसारात आपण उपरे आहोत ही भावना राहतेच.
परंतु विभक्त राहणे किंवा घटस्फोट ही भूमिका घेण्यापूर्वी व्यसनी व्यक्तीला मुक्तांगण, पुणे, कृपा, पुणे यासारख्या उत्तम व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून उपचार केले तर संसार सावरू शकतो.
सर्वात महत्त्वाची गोष्ट मला अलविदा म्हणण्यापूर्वी सांगायची आहे.
तुमचे वैवाहिक जीवन आनंदाचे असेल तर त्यासारखी उत्तम गोष्ट नाही. याचाच अर्थ, तुम्ही दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या स्वभावदोष संपूर्ण स्वीकारले आहे. म्हणजेच तुम्ही एकमेकांचे दोष कधीही एकमेकांना दाखवून देत नाही. हे विषय तुमच्या दृष्टीने बंद झालेले असतात. असे असेल तर निश्चित तुमचे जीवन उत्तम चालले आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा.
ज्यांना असे वाटते की, आपल्या नात्यात काहीतरी कमी आहे, सुधारणा हवी आहे त्यांनी कागद-पेन घ्यावे आणि खालील प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे लिहावीत. माझ्या नात्यात नेमकी कोणती सुधारणा व्हावीशी वाटते?
३. मी माझे नाते कुणाशी तरी तुलना करून पाहते/तो म्हणून माझ्या नात्यात कमतरता वाटते का?
४. जोडीदार आणि मी आमच्या या कामजीवनाबद्दल  नेमकं  आणि स्पष्टपणे बोललो आहोत का?
५. जोडीदाराचा त्याबद्दल प्रतिसाद काय होता?
६. मग काय झाले?
जर तुम्हाला वाटते हे सगळे करून झाल्यावरही फरक पडत नाही तर तुम्ही त्यासाठी स्वत:त कोणते बदल करू शकता? माझी सोपी सूचना : अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या हातात जे करणे शक्य होते ते केले आहे . परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करा आणि पुढे चला. तुमच्या वैवाहिक जीवनाला माझ्या शुभेच्छा.
(समाप्त)