19 October 2019

News Flash

गच्चीवरची बाग : खरकटय़ा अन्नापासून खतनिर्मिती

शिजलेले उरलेले वा खरकटे अन्न आपणाला अनेकदा फेकून द्यावे लागते.

शिजलेले उरलेले वा खरकटे अन्न आपणाला अनेकदा फेकून द्यावे लागते. ते फेकून न देता त्याचा उपयोग खत म्हणूनही करता येतो. शिजलेले खरकटे अन्न उन्हात वाळवून घेतल्यास त्याचे केक किंवा पापडासारखे खडे तयार होतात. ते चुरून झाडांना देता येतात. तसेच शिजलेल्या खरकटय़ा अन्नाचे वेगळ्या पद्धतीनेही व्यवस्थापन करता येते. त्यासाठी पुढील पद्धती वापरता येतील.
माठाचा वापर –
आपल्याकडे एक मोठे तोंड असलेला माठ असल्यास त्याच्या तळाशी एक भोक करावे. त्यात सुक्या मातीचा, पालापाचोळ्याचा एक थर द्यावा. त्यानंतर त्यात खरकटे अन्न टाकावे. त्यावर पुन्हा मातीचा, पालापाचोळ्याचा थर द्यावा. असे थर देत देत महिनाभरात माठ गच्च भरतो. तो उन्हात रिकामा करावा त्यास सुकवून घ्यावे. सुकवणे शक्य नसल्यास दोन किंवा तीन माठांत प्रक्रिया करावी. साधारण ४५-६० दिवसांत छान खत तयार होते. यात पातळ पदार्थ टाकू नयेत.
प्लॅस्टिक बॅगचा वापर
आपल्याकडे बॅ्रण्डेड होजिअरी मटेरिअल ज्या पिशवीत पॅक करून येते तिचाही शिजलेले खरकटे अन्नाचे खत तयार करण्यासाठी उपयोग करता येतो. अशा पिशव्या उपलब्ध नसतील तर हवाबंद तेलाच्या जाडसर पिशव्यांतही खत तयार करता येते. यासाठी पिशवीच्या आकारापेक्षा थोडे कमी खरकटे अन्न घेऊन त्यास दोरीने हवाबंद ठेवावे. त्यात ३ ते ४ महिन्यांत छान खत तयार होते. यात हवा जाऊ देऊ नये. हवेच्या संपर्कात आल्यास त्यात अळ्या तयार होतात. नाजूक पिशवीला कीटक छिद्रं तयार करतात. त्यामुळे एकामध्ये एक याप्रमाणे दोन पिशव्या वापरूनही असे खत तयार करता येते.
संदीप चव्हाण -sandeepkchavan79@gmail.com

First Published on September 12, 2015 12:59 am

Web Title: fertilizer produced from waste food
टॅग Fertilizer