16 February 2019

News Flash

आइन्स्टाइनचे‘पहिले प्रेम’

‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे.

| August 3, 2013 01:01 am

‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे. अर्थात ‘प्रेम’ आणि ‘सेक्स’ या वेगवेगळय़ा गोष्टी असल्या तरी एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्याने, त्यांच्या संमिश्रभावांमुळे प्रेमात विविध छटा आढळतात. आणि अशा वेगवेगळय़ा छटांमुळे आइन्स्टाइनचे ‘पहिले प्रेम’ एकापेक्षा जास्त वेळा होऊ शकते.
‘सर, तुमचं ‘आर्ट ऑफ इंटिमसी’ शिकणारा तुमचा शिष्य त्या ज्ञानाला फारच सार्वत्रिक करतोय,’ नेहा मला तिचा नवरा मधुरबद्दल सांगत होती.
‘सार्वत्रिक? म्हणजे?’ मी थोडा बुचकळय़ात पडलो.
‘बघा ना, सकाळी तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याने मला जादू की झप्पी दिली खरी, पण ‘आय लव्ह यू’ म्हणताना ‘आय लव्ह यू.. टू’ असं म्हणाला.’ नेहा.
‘मग तू काय म्हणालीस? चिडलीस की काय?’ मी.
‘छे. मग मीपण त्याला ‘मी टू’ असं म्हणाले.’ नेहाने सांगितले.
‘गुड. मग झाली ना फिटम्फाट?’ मी तिला विचारले.
‘पण सर मला याच्याबद्दल संशयच आहे. परवा त्याच्या ऑफिसमध्ये मी अचानक गेले होते त्या वेळी त्याच्या केबिनमधून त्याची सेक्रेटरी खुशीत बाहेर येताना दिसली. मला जाम राग आलाय मधुरचा.’ नेहाच्या ठिणग्या अजून जाणवत होत्या.
मी प्रश्नार्थक नजरेने मधुरकडे पाहिले. तो हसत म्हणाला, ‘सर, तुम्हाला माहीतच आहे की आमचं लव्ह मॅरेज आहे आणि त्यालाही आता एक वर्ष होत आलंय. आणि सर, ती नेहमीच माझ्यावर संशय घेत असते. कारण या सेक्रेटरीच्या अगोदर नेहाच माझी सेक्रेटरी होती!’
‘ओऽ’ नेहाच्या संशयाचे मूळ कारण लक्षात आले.
‘तसं नाही सर, मुळात हाच तसा वागतो. अतिप्रेमळ.’ नेहा.
‘सर, पण तुम्हीच मला सांगा, आपण सर्वाशी प्रेमाने वागलं पाहिजे की नाही? तरच ते आपल्याशीही प्रेमाने वागतील, नीट कामं करतील, हो की नाही?’ मधुर.
‘हो ना, अगदीऽ’ नेहा थोडी घुश्शातच. ‘सर, आणि परवा मला म्हणाला की आपलं तर सात नंबरचं प्रेम आहे ना? मग काळजी कशाला करतेस?’
‘सात नंबरचं प्रेम? म्हणजे तू सातवी ?’ मी.
‘नाही सर. तुम्ही ते प्रेमाचे आठ प्रकार सांगितले आहेत ना, त्यातलं ते सात नंबरचे, असोसिएशन लव्ह, सहवासोत्तर प्रेम. वारंवार संपर्काने, व्यक्तीची निगेटिव्ह बाजू मान्य करून होणारं. मी मधुरची बरीच र्वष सेक्रेटरी होते ना! म्हणून म्हणाला.’ नेहाने विश्लेषण केले.
‘बरं हे बघ, या गोष्टी फार गंभीरपणे नको घ्यायला. आणि तूही त्याला मी टू, म्हणालीस की.’ मी.
‘ते मी गमतीने म्हटलं होतं. पण खरंच सर, पुरुषांना असं पुन:पुन्हा प्रेमात पडता येतं?’ नेहा.
‘अहो सर, मी एरवी तिला काहीही गंभीरपणे म्हटलं तर ती ते कधीही गंभीरपणे घेत नाही, पण हे तिला मजेने म्हटलं आणि तिने ते गंभीरपणे घेतलं. आता माझी ही सेक्रेटरी आहे. आकर्षक आहे, पण प्रेम वगरे कल्पना काही माझ्या मनात अजून तरी आल्या नाहीयेत. पण नेहा अशीच संशय घेत राहिली तर मात्र..’ मधुरने हुशारीने वाक्य अर्धवटच सोडलं. नेहा फुत्कारली, ‘तर काय? बोल, बोल ना!’
‘तर काही नाही, मला दुसरी सेक्रेटरी बघावी लागेल.’ धूर्त मधुर सुस्कारा टाकत बोलला.
मी सर्व पाहत होतो. ऐकत होतो. मधुर नेहाची फिरकी घेण्यात पटाईत दिसत होता. ते पेल्यातले वादळ होते आणि पेल्यातच शमले. पण मला मात्र प्रेम, आकर्षण, शरीरसंबंध या निसर्गनिर्मित भावांचा, प्रेरणांचा विचार पडला. आणि अल्बर्ट आइन्स्टाइन यांचे एक वाक्य आठवले.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी एकदा म्हटले होते, ‘भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र यांच्या भाषेत जीवशास्त्रीय ‘पहिल्या प्रेमा’ची परिभाषा कशी काय करता येईल?’ (हाऊ ऑन अर्थ आर यू एव्हर गोइंग टू एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड केमिस्ट्री अ‍ॅन इम्पॉर्टट बायॉलॉजिकल फिनॉमेनॉन अ‍ॅज फर्स्ट लव्ह?) ही विचारणा करताना त्यांना हेच सुचवायचे होते की, अशी गोष्ट अशक्य आहे. आणि त्याचबरोबर आइन्स्टाइन यांना बहुतेक जीवशास्त्रीय ‘दुसरे प्रेम’, ‘तिसरे प्रेम’ वगैरे होऊ शकतात याची कल्पना असल्यानेच त्यांनी ‘पहिले प्रेम’ हा शब्दप्रयोग वापरला असणार!
वेगवेगळय़ा वैद्यकीय क्षेत्रातील मॉलेक्युलर बायॉलॉजीच्या आधुनिक संशोधनांचा सखोल अभ्यास करून त्यांचे कामशास्त्रीय संदर्भीकरण व विश्लेषण (सेक्सॉलॉजिकल इंटरप्रिटेशन) करून तसेच ‘प्रेम व सेक्स’ या दोन्हींचे वैद्यकीय परिभाषेत सुसूत्रीकरण करून, मी आइन्स्टाइन यांच्या ‘पहिल्या प्रेमा’चे स्पष्टीकरण सर्वसामान्यांसाठी करत आहे. त्यामुळे ‘पाऊले चालती प्रेमपंढरीची वाट’ हे कसे घडते, हे लक्षात येईल.
गुरुत्वाकर्षणासारखाच तुल्यबळ प्रेमाकर्षणाचा जोर निसर्गाने पृथ्वीवर निर्माण करून मानववंश गुरुत्वाकर्षणामुळे या पृथ्वीशी आणि तर प्रेमाकर्षणामुळे तो आपसात एकमेकांशी बांधील राहील असे पाहिलेले दिसते. पाहिलेल्या आकर्षक व्यक्तीविषयीच्या संवेदना पहिल्यांदा मेंदूतील दृष्टिज्ञान मेंदूतून मानवाच्या वैचारिक मेंदूच्या प्रीफ्रंटल भागात जातात. क्षणार्धात तिथे त्या व्यक्तीविषयीच्या निर्माण झालेल्या मोहमयी भावना तपासून त्या मेंदूत इतरत्रही विश्लेषणासाठी पाठवल्या जातात. पुरुषामध्ये ‘मॅमीलरी बॉडी’ या मेंदूभागामध्ये त्या व्यक्तीचे शारीरिक आकर्षणही मापले जाते. पुरुष वयात येतानाच सेक्स हॉर्मोन टेस्टोस्टेरॉनच्या प्रभावाने सुरू झालेली ही क्रियाशीलता मेंदू जिवंत असेपर्यंत चालूच असते. (रसिकता अमर असते!) स्त्रीमध्ये सेक्स हॉर्मोन इस्ट्रोजेनमुळे घनिष्टतेच्या भावुक आकर्षणाशी संबंधित भागांचा (इन्शुला व अँटीरीयर सिंग्युलेट कॉर्टेक्स) प्रभाव असतो.
या सर्व भागांच्या प्रतिसादात्मक माहितीने त्या संवेदनांमधील र्सवकष मोहकता (अ‍ॅट्रॅक्शन) पारखून त्या व्यक्तीचा आकर्षणभाव (अ‍ॅट्रॅक्टीवनेस) मेंदूकडून ठरवला जातो. आकर्षण भावातील उत्कटता जास्त वाटल्यास (हाय, मार डाला) त्या संवेदना लगेचच मेंदूतील खोलवर भागातील व्हेंट्रल टेगमेंटल एरिया (व्हीटीए) येथे पाठवल्या जातात. व्हीटीए इथे फेनिलएथिलअमाइन (पीईए) हे मेंदू पेशींतील संवेदन, कम्युनिकेशन जलद करणारे रसायन कार्यान्वित होते. आणि मग पीईए जिच्यामुळे तयार होते त्या व्यक्तीबद्दल आसक्ती निर्माण होते. पीईए हेच प्रेमाकर्षणाचे मूळ आसक्ती-रसायन.
नंतर लॅटरल टेगमेंटल भागात नॉरएपिनेफ्रीन रसायन वाढून ते पसरते. त्यामुळे उत्तेजन, एक्साइटमेंट होऊन धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे यासारख्या ‘दिल धकधक करने लगा’सारख्या गोष्टी क्षणार्धात घडतात. पीईए व नॉरएपिनेफ्रीन या रसायनांनी मेंदूतील न्यूक्लिअस अ‍ॅक्युबन्स या आनंदकेंद्रात व कॉडेट न्यूक्लिअस या भागात डोपामाइन हे आनंद-रसायन पसरते. कॉडेट न्यूक्लिअस हा भाग सौंदर्यपारखी आहे. त्याच्या उत्तेजनामुळे प्रेमपात्राविषयीच्या विचारांशी, नजरभेटीशी आनंद-संवेदना जोडली जाते. मग तिच्या आठवणीनेही मन प्रफुल्लित व उत्साही होऊ लागते.
शेकडो वर्षांपूर्वीच्या सिद्धयोगीश्वर रचित ध्यानधारणेच्या विज्ञानभरव तंत्रातील धारणा ४६, श्लोक ६९ मध्ये याचा विचार केलेला आढळतो. कामसुखाच्या नुसत्या कल्पनांनी, केवळ ध्यानाने (फॅण्टसीने) व्यक्तीचे मन आनंदाने प्रफुल्लित होते. (‘लेहनामन्थनाकोटै .. भवेदानन्दसंप्लव’)
मोहमयी संवेदनांनी अशा प्रकारे मेंदूतील हायपोथॅलॅमसमध्ये ऑक्सिटोसीन व व्हाजोप्रेसीन निर्माण होऊन वासनानिर्मिती होते. इन्शुला व अँटीरीयर सिंग्युलेट कॉर्टेक्स भागांमध्ये ऑक्सिटोसीनच्या परिणामांनी जिव्हाळय़ाचे, तर व्हेंट्रल पॅलिडम भागात व्हाजोप्रेसीनचा प्रभाव होऊन बांधीलकीचे, कमिटमेंटचे भाव निर्माण होऊ लागतात.
सेक्स आणि प्रेम यांची निर्मिती यंत्रणा वेगवेगळी असली तरी संलग्न असते. ऑक्सिटोसीन हा त्यांच्यातील महत्त्वाचा दुवा. म्हणूनच शृंगारिक प्रेमाकर्षणाला लैंगिकतेचा स्पर्श असतो. या गोष्टी लैंगिक हॉर्मोनच्या प्रभावाखाली घडत असतात. म्हणूनच शृंगारिक प्रेम हे लैंगिकतेविना नसते.
व्हाजोप्रेसीनचा प्रभाव जितका जास्त, तितकी बांधीलकीची जाणीव जास्त. मधुरच्या ‘प्रेमळ’ स्वभावाचा पुरेपूर अनुभव असल्याने नेहाला मधुरच्या ‘आकर्षति’ सेक्रेटरीचा धोका वाटणे साहजिकच होते; परंतु त्यांचे जर ‘सात नंबर’चे प्रेम होते तर मधुरनेही नेहाबरोबर इंटीमसी वाढवून ते प्रेम ‘आठ नंबर’चे करून (कंपॅनियनशिप, साहचर्य) तिची प्रेमातील ‘असुरक्षितते’ची भावना घालवणे गरजेचे होते हे मात्र खरे. (आणि तो तोच प्रयत्न करीत होता. म्हणूनच ते वादळ पेल्यातले ठरले.)
पीईए, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाइन, ऑक्सिीटोसीन, व्हाजोप्रेसीन ही पंच महा-प्रेमरसायने मज्जासंस्थेमार्फत शरीरात इतरत्र प्रभाव करू लागतात. वाढलेल्या डोपामाइनचा परिणाम मेंदूतील अ‍ॅमिग्डाला भागावरही होऊन भीतीभाव नष्ट होतो व प्रेमात ‘बिनधास्तपणा’ व धोके पत्करण्याची प्रवृत्ती उफाळून येते. (अब चाहे सर फुटे या माथा, मैंने तेरी बाह पकडम् ली).
डोपामाइन वाढल्याने मेंदूत वैचारिक संतुलनाचे सेरोटोनीन रसायन कमी होऊन प्रेमाचे ‘वेड’ लागते (दिल तो पागल है). प्रेमात तारतम्य उडून जाते. प्रेमाची व्यक्ती ही अत्यंत आदर्श व दोषविरहित असल्याचा साक्षात्कार होत राहतो आणि ‘जो तुमको हो पसंद वोही बात करेंगे, तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे’ असा अव्यवहारीपणा उफाळून येतो. (अर्थात लग्न झाल्यावरच त्या व्यक्तीतील उणिवा व दोष दिसू लागतात, हे वेगळे!)
‘सेक्स’ ही समस्त प्राणीजगतातील ‘मूलभूत’ भावना असून ‘शृंगारिक प्रेम’ ही मानवामधील ‘विकसित’ भावना आहे. अर्थात ‘प्रेम’ आणि ‘सेक्स’ या वेगवेगळय़ा गोष्टी असल्या तरी एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्याने, त्यांच्या संमिश्रभावांमुळे प्रेमात विविध छटा आढळतात. आणि अशा वेगवेगळय़ा छटांमुळे आइन्स्टाइनचे असे ‘पहिले प्रेम’ एकापेक्षा जास्त वेळा होऊ शकते. (व्यावहारिक जगात मात्र एक प्रेम सुरळीतपणे होणे मुश्कील!). रोमँटिक प्रेमाचे अधिष्ठान असल्यास सेक्सच्या क्रियेचा आनंद हा दोघांचेही मन विभोर करणारा ठरतो हे खरे.
म्हणूनच प्रसिद्ध उर्दू शायर जाँनिसार अख्तर यांनी एका शेरमध्ये चपखलपणे सांगितले आहे,
‘सोचो तो बडी चीज़्‍ा है तहज़ीब (संस्कृती) बदन की.. वर्ना तो ये बदन आग बुझाने के लिये है’
shashank.samak@gmail.com

First Published on August 3, 2013 1:01 am

Web Title: first love of einstein
टॅग Chaturang