15 August 2020

News Flash

जीवन विज्ञान : फाइव्ह का फंडा

मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असून त्यांचं कार्यदेखील वेगवेगळं आहे.

अतिनील किरणं, प्रदूषण, मानसिक ताण आणि अयोग्य आहार यामुळे आपल्या शरीरातील पेशींच्या आत ‘फ्री रॅडिकल्स’ बनतात.

डॉ. स्मिता लेले – dr.smita.lele@gmail.com

विविधरंगी फळं आणि रंगीत भाज्या खाल्ल्यास त्यातल्या ‘अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्स’ची आपल्या शरीरातल्या ‘फ्री रॅडिकल्स’बरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन ती नष्ट होतात. अशा रीतीनं वृद्धत्व आणि विविध आजारांचं महत्त्वाचं कारणच आपण एक प्रकारे नष्ट करत असतो. रोज १२० ग्रॅम भाजी ही एक वाटी शिजलेली भाजी आणि एक वाटी कच्चं सलाड अशा स्वरूपात जरूर खावी. रोज पाच रंगांच्या भाज्या नाही खाता आल्या, तर निदान आठवडय़ात सर्व विविध प्रकारच्या भाज्या पोटात जायला हव्यात.

सर्व सजीव-निर्जीव जगाची निर्मिती आणि ऱ्हास  हे रसायनशास्त्रावर चालतं. जीवन म्हणजे पाणी असासुद्धा अर्थ आहे. रासायनिकदृष्टय़ा पाणी म्हणजे ‘हायड्रोजन’ या सर्वात लहान मूलद्रव्याचं प्राणवायूसह बनलेलं संयुग. अर्थात ‘ऑक्साइड’. दोन ‘हायड्रोजन’ अणू आणि एक ‘ऑक्सिजन’ असा ‘एचटूओ’ रेणू म्हणजेच पाणी. ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायूचा अर्थसुद्धा सजीवतेशी जोडलेला आहे. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर चांगल्यासाठी केला तर बरं. तसंच काहीसं या ‘ऑक्सिजन’बाबत आहे. कुठल्याही रसायनासह, तसंच मूलद्रव्यासह त्याची रासायनिक क्रिया पटकन होऊ शकते.

हवेमध्ये मात्र हे दोन अणू एकत्र येऊन ‘ओ टू’ या रेणूरूपात असल्यामुळे स्थिर आहेत, नाही तर किती तरी गोष्टी भस्म झाल्या असत्या, परंतु एकटा ‘ओ’ विशेषत: सेंद्रिय (ऑरगॅनिक) पदार्थाबरोबर पटकन संयोग पावतो आणि त्या पदार्थाचं ‘ऑक्सिडेशन’ करतो. रोजचं उदाहरण म्हणजे चेहरा उजळ दिसावा, त्यावरची मृत त्वचा जावी म्हणून ‘हायड्रोजन पेरॉक्साईड’ वापरतात. ‘क्लोरिन’च्या एकटय़ा अणूला सुद्धा हे जमतं. म्हणून बेसिन किंवा मोरीत  शेवाळं जमा झालं तर ‘ब्लीचिंग पावडर’ अथवा ‘हायपोक्लोराइड’ घालतात. काही रसायनं मात्र नेमकं उलट वागतात. म्हणजेच ‘ऑक्सिडेशन’ न करता ‘अ‍ॅण्टी ऑक्सिडेशन’ करतात. अशा पदार्थाना ‘अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्स’ असं नाव आहे.

मानवी शरीरामध्ये अनेक प्रकारच्या पेशी असून त्यांचं कार्यदेखील वेगवेगळं आहे. अतिनील किरणं, प्रदूषण, मानसिक ताण आणि अयोग्य आहार यामुळे आपल्या शरीरातील पेशींच्या आत ‘फ्री रॅडिकल्स’ बनतात. त्यामुळे रोग निर्माण होतात, तसंच वार्धक्य येतं. तसं पाहिलं तर मेंदूखेरीज सर्व शरीर परत नवीन तयार होत असतं. तीन महिन्यांत त्वचा बदलते, तर नऊ वर्षांत हाडं पूर्ण वेगळी बनतात. मग आपण मरेपर्यंत चिरतरुण का दिसत नाही?  एखाद्याचं वय किती, हा अंदाज करताना आपण त्याची त्वचा बघतो. व्यक्ती रंगानं काळी-गोरी कशीही असली तरी दर ३-४ वर्षांनी त्वचेची प्रत कमी-कमी होताना सहज जाणवते. याचं मुख्य कारण असं, की शरीराच्या वाढीशी निगडित संप्रेरकं- ‘ग्रोथ हॉर्मोन्स’ कमी तयार होतात. त्यामुळे त्वचेचा रबरीपणा, ताण आणि घट्टपणा कमी होतो. ‘कोलॅजिन’ या प्रथिनांच्या साखळीमुळे त्वचा मजबूत होते, तर ‘इलॅस्टीन’मुळे ती रबरी वा लवचीक बनते. त्वचेखाली असणारं ‘हॅलुसनिक आम्ल’ अनेक प्रकारे क्रिया करतं. ‘जेली’प्रमाणे पाणी शोषून जखम भरतं, तसंच श्वेत कोशिकांना रोगजंतूंसह लढण्यास मदत करून हे आम्ल त्वचेचं आरोग्य राखतं. वार्धक्य टाळता किंवा निदान पुढे ढकलता येईल का, हे संशोधन जगभर चालू आहे. तरुण दिसायला कुणाला आवडणार नाही? हे सगळे नको असलेले बदल होतात ते ‘ऑक्सिडेटिव स्ट्रेस’मुळे. शरीरातल्या आणि त्वचेमधल्या पेशींमध्ये ‘फ्री रॅडिकल्स’ तयार झाल्यानं हा तणाव निर्माण होतो.

‘फ्री रॅडिकल्स’चे अनेक प्रकार आहेत. पण सर्वात धोकादायक म्हणजे ‘इलेक्ट्रॉन’च्या शोधात मोकळा फिरणारा एकटा ‘ऑक्सिजन’चा लहानसा अणू, जो दिसेल त्या वस्तूला ‘ऑक्सिडाइझ’ करून स्वत:ला हवी असलेली ऊर्जा आणि ‘इलेक्ट्रॉन’ खेचून घेतो. त्यामुळे आपल्या शरीराच्या पेशींचं कार्य मंदावतं, तर कधी बंद पडतं.  काही वेळा गुणसूत्रामधे बिघाड होऊन कर्करोगासारखा भयानक आजारही होऊ शकतो. मधुमेह, हृदयरोग, वार्धक्य, त्वचारोग आणि इतर बरेच रोग होण्याचं मुख्य कारण ‘फ्री रॅडिकल्स’. आज आपण बघूया की योग्य आहाराच्या मदतीनं हा धोका कसा टाळता येईल.

मानवी शरीरात निर्माण झालेले ‘फ्री रॅडिकल्स’ हे एखाद्या चोराप्रमाणे ऊर्जा आणि ‘इलेक्ट्रॉन’ च्या शोधात असतात. म्हणून जर पेशीमध्ये असे काही पदार्थ असतील की ज्यांच्यात भरपूर ताकद आणि ‘इलेक्ट्रॉन’चा साठा आहे, आणि जर त्यांनी आनंदानं ते दान केलं तर किती उपयुक्त! असे पदार्थ म्हणजे ‘अ‍ॅण्टी-ऑक्सिडंट्स’- म्हणजे रंगीत फळं, भाज्या यात असणारे नैसर्गिक अन्नरंग. सध्या फळं आणि भाज्या खा, असं नुसतं न सांगता विविध रंगाची फळं आणि विविध रंगाच्या भाज्या रोज खा, असं सांगितलं जातं. पाच वेगळ्या रंगांची फळं आणि पाच वेगळ्या रंगांच्या भाज्या रोज आपल्या आहारात असल्या पाहिजेत. पण रोज हे शक्य नाही. म्हणून ‘फाइव्ह का फंडा’ या संकल्पनेवर आधारित संशोधन मी गेली २० वर्षे करत आहे आणि काही अन्नपदार्थ आणि प्रक्रिया विकसित केल्या आहेत. प्रक्रिया करताना असे काही अन्नपदार्थ आपण बनवू शकतो, की ज्यात पाच भाज्या वापरल्या जातात. भाज्या खायला आवडत नाहीत तर भाज्या प्या, असं काही जण म्हणतात. ‘ड्रिंकिंग व्हेजिटेबल’ हा एक प्रकारचा पदार्थ बाजारात मिळतो.  हे सूप नव्हे, अन्न आहे. भूक लागण्यासाठी जेवणापूर्वी सूप घेतात आणि ते पोट भरण्यासाठी नसतं. पण ‘प्यायच्या भाज्या’ हा एक पोटभरीचा अन्नपदार्थ आहे. तसं पाहिलं तर आपल्या आधीच्या पिढीला हे पारंपरिक शहाणपण होतं. विविध नैसर्गिक अन्नरंग रोज खाल्ले जावेत म्हणून सांबारमध्ये ४-५ वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या असतात आणि उंधीयोसारख्या प्रकारात तर ८-१० भाज्या असतात. शाकाहारी पुलाव करताना आपण अनेक भाज्या घालतो. पण रोज काही आपण पाच प्रकारची फळं- ‘फ्रूट सॅलड’ खात नाही. विमानात प्रवास करताना वर्षांनुर्वष बाकीच्या तीन-चार फळांबरोबर एकच छोटं निळं किंवा काळं  द्राक्ष देतात असं आपण पाहतो. एक द्राक्ष खाऊन असे काय वेगळे फायदे होणार? तर त्यामागे हीच विचारसरणी आहे. बाकीची जी तीन-चार फळं- म्हणजे सर्वसाधारणपणे पपई, अननस आणि सफरचंद अशी पिवळट किंवा केशरी असतात, तर त्याच्यामध्ये हे एक निळं-जांभळं फळ- द्राक्ष.

विविधरंगी फळांमध्ये आणि रंगीत भाज्यांमध्ये जी रंगद्रव्यं आहेत ती बहुतांशी ‘अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्स’ असतात. त्यामुळे आपल्या शरीरातल्या ‘फ्री रॅडिकल्स’बरोबर रासायनिक प्रक्रिया झाल्यानं ‘फ्री रॅडिकल्स’ नष्ट होतात. अशा रीतीनं ज्यामुळे वृद्धत्व आणि विविध आजार येतात ते कारण नष्ट होतं. विशेषत: फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असलेले रंगीत पदार्थ शरीराला जास्तीत जास्त मिळावेत म्हणून ते कच्चं खाणं आवश्यक आहे. भाज्या खूप वेळ शिजविल्यानं त्यातल्या रंगीत अन्नद्रव्यांचं पोषणमूल्य नष्ट होतं. रासायनिकदृष्टय़ा तीन प्रकारांत विभागलेली शेकडो ‘अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्स’ आहेत. पाण्यामध्ये विद्राव्य असलेली, तेलासारख्या स्निग्ध गोष्टींमध्ये विद्राव्य असलेली आणि धातूवर आधारित संप्रेरकं असलेली (म्हणजे ‘एंझाइम’ व ‘कोएंझाइम’). त्वचेसाठी चांगलं, प्रतिकारशक्ती वाढवणारं महत्त्वाचं ‘अ‍ॅण्टी ऑक्सिडंट्’ म्हणजे ‘क’ जीवनसत्त्व. हे रोज खावं, कारण जास्त असल्यास मूत्रावाटे बाहेर टाकलं जातं. स्निग्ध गोष्टींमध्ये विद्राव्य आणि सुमारे ७०० विविध प्रकारांत आढळणारं रंगीत भाज्या व फळांतील रंग द्रव्य म्हणजे ‘कॅरोटीनाइड’. यामधलं ‘बीटा कॅरोटीनाइड’ म्हणजेच ‘अ’ जीवनसत्त्व हा गाजर, आंबा, पपई यांमधला केशरी रंग. तसंच हिरवं रंगद्रव्य आहे ‘क्लोरोफिल’. पालकसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये हे असतं. हिरव्या भाज्यांमध्ये केशरी रंगदेखील असतो, पण हिरवेपणामुळे तो दिसत नाही. टोमॅटो, कलिंगड यातला लाल रंग ‘लायकोपिन’ या पोटाचा कर्करोग रोखणाऱ्या ‘कॅरोटीनाइड’चा. बीट, कोकम, जांभूळ, काळी द्राक्षं अशा फळांमध्ये ‘अँथोसाइनिन’ हे लाल, निळं, जांभळं रंगद्रव्य असतं. हा ‘फ्लेवोनाइड’चा प्रकार. पाण्यामध्ये सहज विरघळतो. कोकम सरबत पिणं, तसंच भाजी-आमटीत चिंच न वापरता आमसूल वापरणं चांगलं. हिरव्या सिमला मिरचीच्या जोडीला पिवळी, तांबडी सिमला मिरची आणि जांभळा कोबी, हिरव्या रंगाचा फ्लॉवर (ब्रोकोली)यांचं हल्ली मोठय़ा प्रमाणात उत्पादन होतं. रोज १२० ग्रॅम भाजी ही एक वाटी शिजलेली भाजी आणि एक वाटी कच्चं सॅलड अशा स्वरूपात खावी. रोज पाच भाज्या नाही खाता आल्या, तर निदान आठवडय़ात सर्व प्रकार आणि विविध नैसर्गिक रंग पोटात गेले पाहिजेत. विविध प्रकारची पाच फळंदेखील आपल्या आहारात रोज घेतली गेली पाहिजेत. ‘फ्रूट सॅलड’ रोज खाणं कठीण आहे. पण मुरांबा, मिक्स फ्रूट जॅम, जेली, ड्रायफ्रूट स्वरूपात साखरेत पाकवलेली फळं – किवी, पेरू, आंबा, पपई, तसंच आंबापोळी, फणसपोळी असे पदार्थ बाजारात सहज उपलब्ध आहेत. परंतु खरेदी करताना त्या पदार्थात फळाचं प्रमाण भरपूर आहे ना, तसंच कृत्रिम, रासायनिक रंग तर नाहीत ना, हे बघायला हवं. मधुमेह नसेल तर अशा प्रकारेही पाच फळं रोज खाता येतील.

नवीन लग्न झालेली मुलगी आणि गर्भवती स्त्री यांची पाच फळांनी ओटी भरायचीही पद्धत आपल्या देशात का पडली असावी? ‘बाई गं, पाच प्रकारची फळं खा आणि तुझं आरोग्य सांभाळ’, हा संदेश असावा. गृहलक्ष्मी आरोग्यवान राहिली तर निरोगी बाळं जन्माला येतील, तसंच पूर्ण घरामध्ये शांती, समृद्धी नांदेल हाही विचार कदाचित त्यामागे असावा. तेव्हा आहारामध्ये असू द्या ‘फाइव्ह का फंडा’!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 1:05 am

Web Title: free radicals in body jeevan vidnyan dd70
Next Stories
1 यत्र तत्र सर्वत्र : चित्रपट तिच्या नजरेतला…
2 व्वाऽऽ हेल्पलाइन : ‘थोर’वयाचा ‘थोर’खेळ
3 अपयशाला भिडताना : मानगुटीवरचं भूत
Just Now!
X