हमारा दर्द ना बांटो, मगर गुजारिश है
हमारे दर्द को महसूस कर लिया जाये..
‘माझ्या दु:खात वाटेकरी झाला नाहीत तरी चालेल फक्त त्या दु:खाची जाणीव असू द्या . एवढंच माझ्यासाठी खूप आहे.’ सागरसाहेबांचा हा शेर मला बरंच काही शिकवून गेला. जाणिवेची ही फुंकर दु:ख हलकं करण्याचं काम करेल की नाही हे माहीत नाही पण ही अपेक्षा मात्र खूप नैसर्गिक वाटते. माणसा-माणसांतल्या परस्पर भावबंधाचा तो आधार आहे असं वाटतं.
माणसाचं आयुष्य म्हणजे त्याच्या वाटय़ाला आलेल्या सुखद आणि दु:खद भोगांची मालिका! या सगळय़ांची एका सशक्त अशा काव्यप्रकारात झालेली अभिव्यक्ती म्हणजे गज़्‍ाल. भट साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर .. ‘गज़्‍ाल म्हणजे एक तत्त्वज्ञान, एक जीवनशैली. गजलचा प्रत्येक शेर म्हणजे जीवनाची एकेक चव, जगण्याचा एकेक प्रत्यय. म्हणूनच दर्दी रसिक प्रत्येक शेर जगतो, त्याच्या स्वागतासाठी मनाची कवाडं खुली करतो.’
 ‘घागर मे सागर’ असा आशयघन शेर आपल्या स्वरांच्या माध्यमातून रसिकाच्या कानावाटे मनात उतरविण्यासाठी प्रयोजन असतं एका गायकाचं.. प्रयोजनाची ही गरज जाणणारा मी एक गायक कलावंत आहे. उगीचच स्वत:ला शीर्षस्थानी ठेवण्याची आगाऊ भूल न करता मी स्वत:ला शायर आणि रसिक यांच्यामधील एक दुवा मानतो. माझ्याकडे सूर आहेत आणि शायराने माझ्या हाती विश्वासाने सोपवलेल्या शब्दांमागे मनोभावे उभं राहण्याची प्रचंड इच्छा आहे, तसंच तो आशय रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचविण्याची एक विनम्र कळकळसुद्धा आहे. ही भूमिका अशा मनाशी स्पष्ट झाली आणि सगळे संभ्रम दूर झाले. मन मोकळं झालं, कोरं झालं आणि मनाच्या या कोऱ्या पाटीवर आशयप्रधान गज़्‍ालगायकीची अक्षरं गिरविण्याची तालीम सुरू झाली. ही तालीम मीच मला देत होतो. भावलेल्या रचनांचं वाचन, त्यावर चिंतन-मनन आणि त्या अनुषंगाने रियाज करत होतो. या प्रक्रियेत गुरुवर्याकडून आत्मसात केलेल्या शास्त्रीय संगीताचीही मदत होत होती, नाही असं नाही, पण आशयावर गायकीचा भार होणार नाही, आशय दबून दुय्यम होणार नाही यासाठी जाणीवपूर्वक सतर्क राहावं लागल ते हा सराव अंगवळणी पडेपर्यंत. हे काम तसं जिकिरीचं होतं. कारण शास्त्रीय संगीत गाणाऱ्याला आपली स्वरविस्ताराची ऊर्मी आवरणं महामुश्कील असतं. मनस्वी आवडणाऱ्या गज़्‍ालमुळेच ही मुश्कील असान झाली. गज़्‍ालच्या प्रेमात पडायला अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. रात्र रात्रभर उरुसातल्या कव्वाल्या ऐकणं, गज्मलमुशायरांना हजेरी लावणं, गज़्‍ालचे संग्रह वाचून काढणं त्यातील आवडलेल्या शेरांवर धमासान चर्चा करणं, उर्दू शिकण्यासाठी जंग जंग पछाडणं हे तारुण्यातले शौक गझलच्या आकंठ प्रेमात बुडवायला पुरेसे होते.
ख्यालगायनाचं बोट जरी सुटत चाललं होतं तरी गज़्‍ालगायकीला आधार राहिला तो शास्त्रीय संगीताचाच. गज़्‍ालची चाल बांधताना शब्दांमधील आशय कसा बोलका होईल, त्यासाठी रागदारीचा यथायोग्य वापर कसा करता येईल याकडे आपसूकच लक्ष जायला लागलं ते शब्दांवरील प्रेमामुळे. प्रत्येक शब्दामध्ये आशयाचं एक चित्रं दडलेलं असतं हे मनोमन उमजायचं आणि वाटायचं की, ते चित्र स्तरांचा कुंचला करून गायकाने रसिकांसमोर साकार केलं तर काय बहार येईल! माझी कोशीश त्या अंगाने सुरू होती. आणि नेमकी एक साक्षात्कारी गोष्ट घडली. लहान वाटणारी ही घटना पथप्रदर्शक ठरली. स्वत:ची गायनशैली कशी घटवावी या चाचपडणीच्या काळात उस्ताद मेहदी हसन यांची एक अप्रतिम गज़्‍ाल  कानावर पडली.
देख तो दिल के जां से उठता है
ये धुआंसा कहां से उठता है..
मीरसाहेबांचे सुंदर शब्द आणि मेहदी हसनसाहेबांची लाजबाब गायकी. ही गज़्‍ाल  गाताना ‘ये धुआंसा’ या शब्दाला त्यांनी स्वरांची अशी काही रचना केली की आशय सुस्पष्ट झाला, शब्दामधील चित्र साकार झालं. मेणबत्तीचा तो आळसावलेला धूर वातावरणात विरघळून जाताना माझ्या मनाच्या डोळय़ांनी मी चक्क पाहिला. माझ्या आयुष्यातला साक्षात्कारी क्षण होता तो.. मी भारावून गेलो.. थरारलो.. कधीही न भेटलेल्या माझ्या या उस्तादाने आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी माझ्या हाती सोपवली होती..
हाच धागा धरून छोटय़ा छंदातली एक गज़्‍ाल  स्वरबद्ध करून गाण्यासाठी निवडली..
आयुष्य तेच आहे
अन् हाच पेच आहे..
आयुष्यात नवीन असं काहीच घडत नाही. तेच ते, तेच ते असं घाण्याच्या बैलासारखं आयुष्य चाललेलं आहे. हा आशय ‘तेच’ या शब्दाला विशिष्ट पद्धतीने गाऊन, स्वरात घोळवून, विराम घेऊन, जोर देऊन ठसविला जाऊ शकतो. शिवाय स्वरांचा वरील पद्धतीने वापर करून हेसुद्धा स्पष्ट करता येतं की, अशा रटाळ आयुष्यामुळे जगणं हा पेच होऊन बसला आहे. आयुष्य जणू एक न उलगडणारा गुंता झालं आहे.
केवळ वाचून आशय न समजायला रसिक काही अडाणी नसतात हे कबूल, पण गजम्लमैफिलीत त्यांचा पूर्ण सहभाग, गुंतणं अपेक्षित असतं, त्या शेरातील अर्थाशी त्यांनी एकरूप व्हावं आणि पुन:प्रत्यय अनुभवावा असं प्रकर्षांनं वाटत असतं आणि त्यासाठी त्यांना शब्द-सुरांच्या त्या भावयात्रेत रेंगाळत ठेवणं गरजेचं असतं. म्हणूनच रसिकांच्या आधी गजम्ल गायकाला तिथे रमावं लागेल.
या स्वराशयात रमणं गायकाला तेव्हाच शक्य होईल जेव्हा शायराचा ‘पेच’ तो आपला मानेल. शायर मित्रांना मी गमतीने म्हणतो की, ‘यारो! तुम्ही शब्दांच्या मार्फत तुमच्या व्यथा-वेदना माझ्याकडे एकदा सोपवून मोकळे होता. मला मात्र जितक्या वेळा ती रचना गाईन तितक्या वेळा त्यातून जावं लागतं’ असो.. परकायाप्रवेशासारखं हे सगळं शायराचं नसून माझंच आहे असं मानलं तर ती अभिव्यक्ती आतून येईल आणि ‘दिल से निकलेगी तो दिल तक पहँुचेगी’ या सूत्रानुसार रसिकांच्या काळजालासुद्धा ती भिडेल. नुसतीच भिडणार नाही तर रसिकाला शायर आणि गायकाच्याही एक पाऊल पुढे जाता येईल आणि तो म्हणेल की, हे तर माझंच आहे, स्वरांत भिजवून माझीच कर्मकहाणी हा गाणारा मला सांगतो आहे.
‘हमारे दर्द को महसूस कर लिया जाये’ ते हेच. महसूस करण्याचा हाच मापदंड मला अभिप्रेत आहे. या नादात कधी कधी मोठी पंचाईत होते. एखादा शेर पेश करताना डोळे भरून येतात, कंठ दाटतो आणि गाणं मुश्कील होऊन जातं. सुरेश भटसाहेबांच्या मृत्यूनंतरची एक मैफील..गजम्ल त्यांचीच होती-
हा असा चंद्र अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी..
मतल्याचा हा शेर गातानाच असं भरून आलं की पुढे गाणच जमेना. साथीदारांनी या ओळी वाजवत ठेवल्या, तेवढय़ा वेळात पाणी प्यायलो, मोठे श्वास भरून घेतले, स्वत:ला स्थिर केलं आणि गजम्ल पुढे चालवली..
महाडचा प्रसंग तर कायमचा कोरला गेला आहे काळजावर..
शायर जे लिहितो ते त्याच्या अनुभवातून किंवा प्रखर जाणिवेतून. रसिक मात्र आपला एक अर्थ त्यातून काढत असतो जो त्याच्या जगण्याशी संलग्न असतो. शायराला अभिप्रेत असलेला अर्थ आणि रसिकाने घेतलेला अर्थ यात साम्य असेलच असं नाही. रचनेचं बहुआयामित्वसुद्धा त्याला मान्य होईलच असंही नाही. त्याने काढलेल्या अर्थाला त्याच्या लेखी कोणताच अन्य पर्याय नसतो.
महाडला असंच झालं..
चवदार तळय़ाकाठच्या सभागृहात माझी प्रकट मुलाखत घेत होते दया पवार. गजम्लकार नीता भिसेसह महाड व आसपासच्या परिसरातील दर्दी रसिकांची कार्यक्रमाला हजेरी. प्रश्नांची उत्तरं आणि त्या अनुषंगाने काही निवडक गजम्लचा एखादा विशिष्ट शेर गात होतो. लिहिताना गजम्लकाराची व गाताना गायकाची मनोदशा काय असते? असा एक प्रश्न आला. उदाहरणादाखल नीताचीच एक गजम्ल घेतली-
मी किनारे सरकताना पाहिले
मी मला आक्रंदताना पाहिले..
लोक ते मागे फिराया लागले
मी तुला रेंगाळताना पाहिले..
सर्वच रसिकांच्या आवडीची ही गजम्ल होती पण त्यातल्या एकासाठी ती होती जगण्याचा आधार! दररोज रात्री ही गजम्ल ऐकून रडत-रडत झोपी जाणे हा त्याचा नित्यक्रम असल्याचं त्याने सांगितलं.
नीताचं त्या गझलेविषयीचं साधं सरळ स्पष्टीकरण ऐकून त्याने आपली कहाणी सांगितली. त्याने सांगितलं की, घरच्यांचा विरोध पत्करून आंतरजातीय प्रेमविवाह कसा झाला, सगळं काही छान चाललेलं असताना दोन्हीकडच्यांनी कसं विष कालवलं, दोघांची मनं कलुषित केली आणि प्रकरण घटस्फोटापर्यंत आलं. कोर्टाने निकाल देऊन दोघांना विभक्त केलं. निकाल ऐकल्यावर आगलावे सगळे निघून गेले होते. आणि आम्ही मात्र हताशपणे एकमेकांकडे बघत तिथेच रेंगाळत होतो.. सगळं संपल्यावर! आज त्या बिचाऱ्याचं मागणं एवढंच होतं की, तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ एवढा सरळ-सपक असेल तर तो तुमच्याकडेच ठेवा, आमच्यासारख्यांपर्यंत कृपा करून येऊ देऊ नका.
आज इतक्या कालावधीनंतरही ही गजम्ल गाताना त्या रसिकाची याद येते, मन गलबलून जातं आणि त्याचं जगणं उधार घेत मी पुन्हा तो शेर आळवतो..
लोक ते मागे फिराया लागले..
‘सुखन अज माशुक गुफ्तन’ म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीशी केलेला संवाद.. अशी छोटीशी व्याख्या आहे गजम्लची. प्रेम हा स्थायिभाव असलेल्या गजम्लने आपला स्थायिभाव बरकरार ठेवून अल्पावधीतच सामाजिक वेदनेला आपल्या कवेत घेतलं. गजम्लला मग कुठलाच विषय वज्र्य राहिला नाही. गजम्ल फक्त प्रेम, विरह, आशुक-माशुक, साकी-शराब, हुस्नो शबाब या विषयांवरच बोलत नाही, तर तळागाळातल्या माणसाचं जगणंही ती व्यक्त करते. असा दावा करण्यात येतो की, जे जे काही समाजात घटित होतं त्याचं प्रतिबिंब गजम्ल नावाच्या या तरल काव्यप्रकारात तात्काळ उमटतं. आणि खरंही आहे ते.
गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय
महागाईने पिचलेल्यांना होळी काय, दिवाळी काय..
ए. के. शेखांची ही सुंदर गजम्ल खूप दिवस मनात रेंगाळत होती. शब्द आणि सुरांचा संयोग घडत असतानाच एका शस्त्रक्रियेसाठी हिन्दूजा हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच्या पॅसेजमधली ती गारठवणारी थंडी, सुन्न एकटेपणा.. नंतर शरीराला औषधाने आलेली गुंगी, मन मात्र या गजम्लच्या नशेत. घरी परतलो ते भैरवी रागात स्वबद्ध केलेली ही यादगार गजम्ल घेऊनच.
रसिकांना खूप आवडली ही गजम्ल, पण काही असेही होते ज्यांना हे शब्द अगेय, असांगीतिक वाटले. मी विचार केला की, कुणाला असं वाटत असेल तर खुशाल वाटू दे. तळागाळातल्या माणसाचं रोजचं हे जगणं आहे जे मी जवळून नुसतं पाहिलं नाही तर अनुभवलंसुद्धा आहे. म्हणून हे वास्तव माझ्याच गळय़ातून व्यक्त झालं पाहिजे..
‘मजरुह’ साहेबांचं म्हणणं आहे की, गजम्लला शेर आपला अर्थ कधीच सांगत नाही, तर अर्थाची फक्त दिशा दाखवतो. अर्थाच्या दिशेने शायर आणि गायकाच्याही पुढे गेलेले असंख्य रसिक मला आठवतात. पत्र-मेलद्वारा मिळालेल्या त्यांच्या प्रतिक्रिया वाचून मन ‘बाग-बाग’ होतं..
‘इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते,’ ही गजम्ल ऐकून मृत्यूला सामोरे जाण्याची मनोमन तयारी केलेली यवतमाळची ती कॅन्सरग्रस्त भगिनी आठवते; ‘हारण्यास एक नवा डाव पाहिजे.’ ऐकली आणि आत्महत्येच्या कगारवरून परत फिरलो’ असं कळवणारे पुण्याचे विद्याधर आठवतात. वडिलांच्या आजारात, त्यांना आराम वाटतो म्हणून ‘राहिले रे अजून श्वास किती’ ही एकच गजम्ल साठ मिनिटांच्या सीडीवर रेकॉर्ड करून देणारा मुंबईचा महेश आठवतो आणि डायलेसिस सुरू असताना भीमरावांची गजम्ल लावून ठेवा, असा आग्रह धरणारे हॉलंडचे वयोवृद्ध मोहरीर काकासुद्धा आठवतात.
‘मै तेरी खोज में तुझसे भी परे जा निकला’ या मिसऱ्याप्रमाणे अर्थाच्याही पलीकडे निघून जाणाऱ्या अशा अनगिनत रसिकांनी मला असीम आनंद आणि समाधान दिलं आहे.
लाइव्ह मैफिलीत उचंबळून दाद देऊन चार-पाच तास मला गात ठेवणारे, ज्यांच्या फर्माइशी कधी संपतच नाहीत असे जिन्दादिल रसिक तर माझे सदाचेच सोबती. माझ्या एवढूशा देहात तेच आपल्या ‘वाह वा!’ची ऊर्जा भरतात.. मला थकू देत नाहीत. सभागृहाचे वेळचे नियम आडवे येऊन डोक्यावर पडदा पडणं तर नित्याचंच!
मी काही फार मोठा गायक नाही. परिपूर्ण वगैरे तर मुळीच नाही. माझं गाणं सगळय़ांनाच भावत असेल असा अट्टहासी दावाही मी कधी करत नाही. मात्र शायर आणि रसिकजनांमधील एक दुवा बनवून गजम्लने माझ्या आयुष्याचं सार्थक केलं या समाधानात मी खूश आहे.
‘आष्टगांव ते अमेरिका व्हाया मुंबई’ या ४२ वर्षांच्या अविरत प्रवासात गजम्लने माझं बोट धरून देश-विदेशातल्या रसिकांपर्यंत नेलं, त्यांच्या भावविश्वात सहभागी केलं, माज येऊ दिला नाही, पण मस्तीत जगणं शिकवलं, अर्थपूर्ण जगण्याची जाणीव दिली अन् जाणीवपूर्वक जगण्याचं भानसुद्धा दिलं.
या गजम्लमार्गावरून चालताना ‘मंजिल की तलाश’ किंवा एखादं लक्ष्य गाठायचं आहे हा विचारही नव्हता-आजही नाही. ‘राह बनी खुद मंजिल’ प्रमाणे बस रास्ता ही रास्ता, सफर ही सफर..
हात गजम्लेचा सदा हातात आहे
हिंडण्याला वेदनेचा प्रांत आहे..
‘चतुरंग मैफल’च्या अंतिम लेखात (२८ डिसेंबर) भेटतील सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले