माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

पशू-पक्ष्यांच्या हक्काच्या असलेल्या निसर्गावर माणसानं केलेल्या अतिक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर कधी कधी वन्यप्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येतात, कधी पशू-पक्षी जखमी झाल्याचं आढळतं, तर कधी वन्यप्राण्यांच्या तस्करीचाही प्रयत्न होतो. या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवणं वनखात्याला सोपं जावं आणि नागरिकांनाही तातडीच्या वेळी मदत मागता यावी, यासाठी वनखात्याची ‘१९२६’ ही हेल्पलाइन उपयुक्त ठरते आहे. त्याबरोबरीनंच अनेक सेवाभावी जीवरक्षक संस्थाही प्राणी, पक्ष्यांना वाचवण्याचं काम करत असतात. त्यांच्या हेल्पलाइनविषयी..

वनं आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ५ जानेवारी २०१७ पासून ‘हॅलो फॉरेस्ट हेल्पलाइन- १९२६’ ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली.

निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनाविषयी झालेल्या जनजागृतीमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिक त्याविषयी अलिप्त न राहता सजग दृष्टिकोनातून विचार करू लागले आहेत. एखाद्या ठिकाणी वन्यप्राण्यांची शिकार होत असेल, वृक्षतोड होत असेल किं वा भरवस्तीत साप निघाला, मानवी वस्तीजवळ बिबटय़ा फिरताना आढळला किं वा  विद्युत तारांमध्ये, मांज्यामध्ये पक्षी अडकलेला दिसला, तरी नागरिकांना वनविभागाशी थेट संपर्क साधता यावा आणि आपत्कालीन स्थितीत तातडीनं वनविभागाकडून मदत आणि योग्य माहिती मिळावी, यासाठी ‘हॅलो फॉरेस्ट हेल्पलाइन- १९२६’ हा एक डिजिटल पर्याय ठरत आहे.

वनविभागाची ही हेल्पलाइन २४ ऑपरेटर्सच्या साहाय्यानं तीन पाळ्यांत २४ तास कार्यरत असते. त्यावर दिवसाला १०० ते १५० फोन येतात. त्यापैकी १० ते १५ फोन हे आपत्कालीन सेवेसाठी असतात. या हेल्पलाइनची व्यापकता अशी आहे, की त्यावर वनक्षेत्र, वन्यप्राणी, जंगल आणि वनस्पतींची माहिती किं वा आपत्कालीन परिस्थिती असे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणूनच नियंत्रण कक्षातल्या कर्मचाऱ्यांना प्रश्नकर्त्यांशी कसा संवाद साधावा, कोणत्या प्रश्नाला अग्रक्रम द्यावा, प्रश्नाच्या स्वरूपानुसार तो वनविभागाच्या नक्की कोणत्या अधिकाऱ्याकडे पाठवावा याचं प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ- समजा रायगड जिल्ह्य़ातील जंगलात हरीण मृत झाल्याची बातमी ‘१९२६’ या  हेल्पलाइनवर मिळाली. ती मिळताच अलिबाग

किं वा रोहा येथील उपवनसंरक्षक किंवा साहाय्यक वनसंरक्षक अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते. तिथून ती पुढे ‘रेंज ऑफिसर’कडे जाते. रेंज ऑफिसरनं चौकशी करून हरीण कशामुळे आणि कधी मृत झालं, त्यावर कोणती कार्यवाही केली गेली, हे तातडीनं वरिष्ठांना कळवणं बंधनकारक असतं. त्यानंतर ती माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीला ४८ तासांच्या आत पुरवली जाते. प्रसंगी ही माहिती त्वरित मिळावी यासाठी उपवनसंरक्षक आणि विभागीय वनअधिकाऱ्यांच्या वरिष्ठांचे भ्रमणध्वनी क्रमांकही देण्यात येतात.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक- वन्यजीव (पश्चिम), मुंबई  सुनील लिमये विभागाच्या या हेल्पलाइनविषयी विस्तारानं माहिती देतात. ‘‘हेल्पलाइनवर प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर देणं ही वनविभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यात गडचिरोलीत वणवा पेटणे, इथपासून ते ब्राझीलच्या वनविभागाचा विस्तार किती, इतक्या  व्यापक स्वरूपात कोणत्याही प्रश्नाचं अचूक उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असतो. नागरिकांनी ‘१९२६’ हा हेल्पलाइन क्रमांक फिरवताच मराठी, हिंदी वा इंग्रजी भाषा निवडण्यासाठी पर्याय विचारले जातात. त्यानंतर पुरवण्यात येणाऱ्या सेवेनुसार फोन करणाऱ्यानं कोणता आकडा दाबायचा याची ०, १, २, ३, ४ अशी वर्गवारी सांगण्यात येते. ‘०’ क्रमांक आपत्कालीन सेवेसाठी आहे. म्हणजेच एखाद्या वन्यजीवाचं संरक्षण किं वा वन्यजीवापासून माणसाचं रक्षण करण्यासाठी हा क्रमांक आहे. वस्तीत बिबटय़ा फिरतोय, घरात, चारचाकीमध्ये किं वा लिफ्टमध्ये साप निघाला, तर तातडीनं पुढची कार्यवाही के ली जावी, यासाठी या क्रमांकावर मदत मागता येते. जंगलात चरण्यासाठी बेकायदेशीररीत्या गुरं सोडणं, अवैध वृक्षतोड, जंगलात शेती करणं किं वा बांधकाम करणं याचीही माहिती हेल्पलाइनवर फोन करून पुढे ‘०’ हा क्रमांक निवडून कळवता येते. उन्हाळ्यात शहर वा ग्रामीण भागातील जंगलात वणवा पेटल्याच्या घटना त्यावर कळवल्या जातात. हेल्पलाइनवर आलेल्या फोननंतर योग्य ती पावलं उचलण्यासाठी वनविभाग सावध आणि सज्ज असतो. कधी कधी हेल्पलाइनवर खोटी माहिती देणारे फोनही येतात, परंतु त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. वृक्षलागवडीची मोहीम असलेल्या ‘हरित महाराष्ट्र मिशन’बद्दलच्या माहितीसाठी हेल्पलाइनवर फोन करून पुढे ‘१’ हा आकडा निवडायचा असतो.  ‘हरित सेने’नं आजवर ५० कोटी झाडं लावली आहेत.

‘हरित सेने’त सहभागी होऊन कु णाला वनविभागाबरोबर काम करायचं असेल तर क्रमांक १ वर त्याची माहिती मिळते. निसर्ग पर्यटन वा जंगल सफारीच्या माहिती आणि नोंदणीसाठी क्रमांक २ देण्यात आला आहे. जंगलात घेतल्या जाणाऱ्या आवळा, बेहडा, मोह, तेंदूपत्ता आदी वनोत्पादनाबाबतची

माहिती आणि प्रश्न हे क्रमांक ३ वर विचारता येतात. जंगलातील संशोधन, प्रशिक्षण यासंबंधीच्या माहितीसाठी ‘४’ हा क्रमांक देण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या वनविभागातील अधिकाऱ्यांखेरीज पुणे, नागपूर येथील वनविभागाचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित असतात. ते नियंत्रण कक्षाला योग्य मार्गदर्शन करतात. प्रश्नकर्त्यांला केवळ एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर ई-मेलद्वारे किं वा मोबाइलवर संदेश पाठवून माहिती दिली जाते. ‘१९२६’ या हेल्पलाइनच्या रूपानं नागरिकांना सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचण्यासाठीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे.’’

हेल्पलाइनवर येणाऱ्या समस्यांच्या निवारणासाठी वनविभागाला अनेकांचं सहकार्य मिळत असल्याचं सुनील लिमये आवर्जून नमूद करतात. अनेकदा कबुतरं किं वा घारी पतंगाच्या मांजात अडकतात आणि जखमी होतात. अशा वेळी पशुवैद्यक कर्मचारी त्यांच्यावर उपचार करून त्यांना मोकळ्या आकाशात सोडून देतात. वन्यप्राण्यांचं संरक्षण आणि हाताळणी याविषयी वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं असलं, तरीही सर्वच प्राण्यांना कौशल्यानं हाताळणं त्यांनाही शक्य नसतं. अशा वेळी सर्पमित्र, गोसावी समाज, जीव संरक्षकांच्या सेवाभावी संस्था, पक्षीनिरीक्षक यांची वनखात्याला खूप मदत होते.

अशा अनेक सेवाभावी जीवरक्षक संस्थांचे हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस, अग्निशमन दल अथवा नागरिक त्यांच्याशी तातडीनं संपर्क साधतात. ‘वाइल्ड अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड रेप्टाईल रेस्क्यू फाऊंडेशन’ (‘डब्ल्यूएआरआर’- वा ‘वॉर’) या संस्थेचे सल्लागार दत्ता बोंबे सांगतात, ‘‘आम्हा सेवाभावी जीवरक्षक संस्थांना सुनील लिमये यांच्या प्रयत्नांमुळे वनखात्याचं अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे आमचं वन्यजीव रक्षणाचं कार्य सुकर झालं आहे. वन्यप्राणी आणि माणूस यांच्यात पुरातन काळापासून संघर्ष सुरू आहे. ग्रामीण भागात हा संघर्ष धारदार आहे. आम्ही अनुभवानं हे जाणतो, की प्रत्येक प्राण्याची स्वभाववैशिष्टय़ं, स्पर्शज्ञान आणि प्रतिसादाचं स्वरूप वेगवेगळं असतं. त्यामुळे कोणत्याही प्राण्याचा बचाव करताना स्वत:चा जीव सुरक्षित ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यासाठी आम्ही योग्य साधनसामग्रीसह सावधपणे बचावकार्य पार पाडतो. उदा. साप पकडण्यासाठी जाताना गमबूट आणि संपूर्ण अंग झाकणारे सैलसर कपडे घालतो. तसंच हेड टॉर्च, बॅटरी, काठी, दोन कापडी पिशव्या असं सर्व आवश्यक साहित्य नेतो. कुत्रा वा माकडाला पकडण्यासाठी दोरी, पक्ष्यांसाठी मऊ हातमोजे वापरतो. ज्या प्राण्याचा बचाव केला जातो, त्याची माहिती ४८ तासांत वनविभागाला देणं आणि त्या प्राण्याला त्याच्या अधिवासात सोडणं बंधनकारक असतं. बचाव केलेला प्राणी जखमी असेल, तर पशूवैद्यकांच्या उपचारानंतर वनअधिकाऱ्यांसमक्ष त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जातं.’’

‘धर्म लीला अ‍ॅनिमल वेलफे अर फाऊंडेशन’चे सचिव विशाल कंथारिया सांगतात, ‘‘कु ठे मोकाट आणि बेवारस जनावरं अडकल्याचं कळताच आमचा चमू योग्य साहित्यासह तिथे रवाना होतो आणि त्यांची सुटका करतो. प्राणी वा पक्षी जखमी असेल, तर त्याला पशू रुग्णालयात दाखल केलं जातं. एकदा एका भटक्या कुत्र्याचं तोंड प्लास्टिकच्या बरणीत अडकलं होतं. आम्ही अतिशय सावधपणे ती बरणी कापून कुत्र्याची सुटका केली. एकदा एक कुत्रा नायलॉनच्या जाळीत अडकल्यामुळे अतिशय हिंस्र झाल्याचा फोन आमच्या हेल्पलाइनवर आला होता. अशा प्रसंगी जीव धोक्यात घालूनही आम्ही प्राण्यांची सुटका करतो.’’

‘वॉर’ संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे सांगतात, ‘‘किंग कोब्रा, घोणस, नाग अशा सापांच्या प्रजातींचं रूप, स्वभाव आणि सवयींविषयीचं ज्ञान अनुभवानं आम्हाला मिळाल्यामुळे  फोन आल्यावर अगदी मध्यरात्रीसुद्धा आम्ही साप पकडायला जाऊ शकतो. एकदा मुरबाडला एक अजगर नांगराच्या फाळात अडकून जखमी झाला होता. पशुवैद्यकांसह मी स्वत: त्याची जखम साफ केली, आतडी जागेवर बसवली, जखमेवर टाके घातले आणि सलाइनमधून पाणीही पाजलं. आठवडय़ाभरानं अजगर अंडी खाऊ शकला. महिन्याभरानंतर तो बरा झाल्यावर त्याला त्याच्या जंगलात सोडण्यात आलं.’’

एकीकडे माणुसकीचं दर्शन घडत असतानाच अनेक प्राण्यांच्या अवयवांची तस्करीही मोठय़ा प्रमाणावर चालते. त्याला आळा घालण्यासाठी ‘वाइल्डलाइफ क्राइम कंट्रोल ब्यूरो’ हा विभाग वन खात्याच्या सहयोगानं प्रभावी कार्य करत आहे. त्यांना सेवाभावी संस्थांची कशी मदत होते ते ‘वॉर’चे सचिव सुहास पवार सांगतात. ‘‘एकदा आमच्या हेल्पलाइनवर मांडूळ जातीच्या सापाची तस्करी चालू असल्याचा फोन आला. या तस्करांकडे हत्यारं असल्याचीही माहिती मिळाली. आम्ही पोलिसांना त्या नेमक्या ठिकाणी घेऊन गेलो. साध्या वेशातल्या पोलिसांनी सौदा करण्यासाठी आल्याचा बहाणा करून मांडूळ    कु ठे आहे, अशी विचारणा के ली. मात्र तस्करांनी दाखवलेल्या ठिकाणी झडती घेतल्यावर तिथे काहीच आढळलं नाही. तेवढय़ात आमचं लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या सुक्या गवताकडे गेलं. अनुभवानं आम्ही जाणलं, की ते गवत नुकतंच कु णी तरी तुडवून आत गेलं आहे. आम्ही माग काढत आत घुसलो, तर ६०-७० फूट आत पिशवीत बांधलेलं मांडूळ सापडलं. अशा वेळी तस्करांना पकडण्याइतकंच सुटका केलेल्या प्राण्यांना वाचवणं आणि त्यांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. एकदा बिहारमधून ५० कासवं विक्रीसाठी आली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका हॉटेलवर धाड टाकली.

तेव्हा एका खोलीत सूटकेसमध्ये पन्नास कासवं कोंबून भरलेली मिळाली. त्यातल्या चार कासवांचा मृत्यू झाला होता. पोलीस तस्करांवर कारवाई करत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत आम्ही कासवांचं संगोपन केलं. अनेकदा जखमी झालेले प्राणी व पक्षी नैसर्गिक अधिवासात सोडेपर्यंत आम्ही स्वखर्चानं त्यांचा सांभाळ करतो.’’

सुनील लिमये सांगतात, ‘‘आपत्काळात हेल्पलाइनचा खूप उपयोग होतो. तीन वर्षांपूर्वी कोल्हापूरला पन्हाळा येथे काही मुलं फिरायला गेली होती. त्यांना काही लोक जंगलाच्या बाजूनं संशयितपणे फिरताना आढळली. त्यांनी ‘१९२६’ क्रमांकावर फोन केला. वनअधिकारी तातडीनं तिथे पोहोचले आणि त्यांनी तिघांना पकडलं. तेव्हा त्यांच्या गाडीत बंदूक, बॅटऱ्या आणि एक मेलेला मोर सापडला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अशा वेळी वनखात्याला न्यायालयाची मोलाची साथ मिळते. हेल्पलाइनवरील फोनला तातडीनं प्रतिसाद दिल्यामुळे लोकांचा वनखात्यावर विश्वास बसतो. त्याच वेळी शहरांच्या विस्तारीकरणामुळे आपण प्राण्यांच्या हद्दीत आणि घार, कबुतरं, कावळे, चिमण्या यांच्या आकाशावर अतिक्रमण केलं आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवं.’’

हेल्पलाइन

हॅलो फॉरेस्ट हेल्पलाइन- १९२६

वाइल्ड अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड रेप्टाईल रेस्क्यू फाऊंडेशन (‘वॉर’)- ८८५०५८५८५४, ९८६९३४३५३५

इकोप्रो चंद्रपूर- ९३७०३२०७४६

नेचरवॉक, पुणे- ९३२६८२३०५२

सह्य़ाद्री निसर्ग मित्र – ९४२३८३१७००

ऑर्गनायझेशन फॉर वाइल्डलाइफ स्टडीज (ओडब्ल्यूएलएस)- ९०११४८४९६९

ग्रीन वल्र्ड फाऊंडेशन, बारामती- ९८६०५०४०७६