04 August 2020

News Flash

‘होम स्कूलिंग’ मुलांचं ‘शाळाबाह्य़’ शिक्षण!

‘होम स्कूलिंग’ अर्थात रीतसर शाळेत न जाता घरी राहून घेतलेलं शिक्षण. ही संकल्पना आता समाजात रूढ होत चालली आहे.

अनेक मुलं आणि त्यांचे पालक जाणीवपूर्वक ‘होम स्कू लिंग’चा पर्याय निवडताना दिसत आहेत.

चेतन एरंडे / प्रीती एरंडे – chetanerande@gmail.com

‘होम स्कूलिंग’ अर्थात रीतसर शाळेत न जाता घरी राहून घेतलेलं शिक्षण. ही संकल्पना आता समाजात रूढ होत चालली आहे. अनेक मुलं आणि त्यांचे पालक जाणीवपूर्वक ‘होम स्कू लिंग’चा पर्याय निवडताना दिसत आहेत. कारण शिक्षणाचा मूळ हेतू त्यामुळे साध्य होतो आहे, असा त्यांचा अनुभव आहे. काय आहेत या मुलांचे, पालकांचे अनुभव?.. मुलांचं सामाजीकरण, त्यांच्या परीक्षा, त्याचं उच्चशिक्षण आदी गोष्टी साध्य करत असतानाच मुलांची नैसर्गिक वाढ शाळेत न जाताही होऊ शकते का या प्रश्नांची उत्तरं देण्याचा स्वानुभवातून के लेला हा प्रयत्न..

‘‘मला ‘थ्री-डी डिझाइन’ आणि ‘अ‍ॅनिमेशन’ खूप आवडतं. मला ते शिकायचंय.’’ आमच्या १३ वर्षांंच्या मुलानं- स्नेहनं हे सांगताच सुजाण पालकत्वाच्या भूमिकेत शिरून मी आणि प्रीतीनं त्याच्यासाठी थ्री-डी डिझाइनचा क्लास शोधून काढला. मात्र स्नेहला त्या क्लासची माहिती देऊन, ‘‘तू हा क्लास करशील का?,’’ असं विचारताच त्यानं ठाम नकार दिला. त्याचा नकार बघून आम्ही जरी हा विषय सोडून दिला, तरी त्यानं मात्र तो सोडून दिला नाही, उलट तो झपाटून कामाला लागला..

जमतील तेवढे ‘ऑनलाइन’ प्लॅटफॉर्म पालथे घातले.. ‘ब्लेंडर’ हे थ्री-डी डिझाइनचं सॉफ्टवेअर शोधून काढलं  आणि ‘यूटय़ूब’च्या मदतीनं ते सॉफ्टवेअर शिकायला सुरुवात करून एक महिन्यात डोनट आणि कॉफी कपचं ‘थ्री-डी मॉडेल’ बनवून आमच्यापुढे थाटात सादर केलं.  ते मॉडेल बघताना आम्ही आनंदी झालोच, पण आम्ही आयता शोधून दिलेला क्लास नाकारून त्यानं शिकण्याचं साधन स्वत:हून का निवडलं असावं हा प्रश्न आम्हाला पडला आणि आम्ही भूतकाळात पोहोचलो.. स्नेह तेव्हा सात-आठ वर्षांंचा होता. तो सकाळी उठायचा तेच डोक्यात असंख्य नवनवीन कल्पना घेऊन!  त्या कल्पना कधी लिहिण्याच्या, बोलण्याच्या असत, तर कधी एखाद्या मॉडेलच्या किंवा चित्राच्या माध्यमातून त्याला व्यक्त करायच्या असत. पण शाळेत जायची घाई असल्यानं हे सगळं गुंडाळून ठेवायला लागायचं. साहजिकच तो खट्टू व्हायचा. ‘तुला जे काही करायचं आहे ते संध्याकाळी आल्यावर कर,’ असं सांगून मी आणि प्रीती कसंबसं त्याला शाळेत पाठवायचो. संध्याकाळी आल्यावर घरी दिलेला अभ्यास, मग त्याचं खेळणं, हे सगळं करता करता तो इतका दमून जायचा की त्या कल्पना हवेत विरून जायच्या. त्याची दमछाक आणि मनातल्या कल्पना प्रत्यक्षात आणता येत नसल्यानं होणारी घुसमट आम्हाला अस्वस्थ करत होती. ही घुसमट कमी करण्यासाठी आम्ही शिक्षणाचा खरा अर्थ, मुलांची शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी अभ्यासाला लागलो.

मुलं शाळेत आठ तास बसून ज्या गोष्टी करतात त्या घरी तीन ते चार तासांत सहज होऊ शकतात हे आमच्या लक्षात आलं. बरं, मुलांचं ‘सामाजीकरण’ (socialization) व्हावं म्हणून त्यांना शाळेत पाठवावं, तर वर्गात शिक्षकांच्या दबावानं आणि १५-१५ मुलं कोंबलेल्या व्हॅनमध्ये ड्रायव्हर काकांच्या दबावानं मुलांना एकमेकांशी फारसं बोलतासुद्धा येत नाही..  हे आम्ही अनुभवलं. स्नेहची रोज होणारी चिडचिड बघून एक वर्ष त्याला शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना ‘होम स्कूलिंग’ हा शब्दसुद्धा आम्ही ऐकला नव्हता. आमची प्राथमिकता ही स्नेहच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद आणण्याला होती. आम्ही त्याला घरीच शिकवायला सुरुवात के ली आणि आमचा अंदाज खरा ठरला. पहिल्या वर्षी आम्ही त्याला क्रमिक पुस्तकाच्या मदतीनं शिकवत असताना अभ्यासक्रम तीन-चार महिन्यांत पूर्ण झाला आणि त्याला भरपूर मोकळा वेळ मिळू लागला. त्याचा उपयोग सकाळी उठल्यानंतर त्याला ज्या नावीन्यपूर्ण कल्पना सुचत होत्या, त्या प्रत्यक्षात आणायला होऊ लागला. एकामागून एक अनेक गोष्टी नुसत्या शिकत बसण्यापेक्षा त्यांचं आकलन करून घेण्याची त्याला सवय लागली. हा पहिल्या वर्षी आम्हाला झालेला ‘होम स्कूलिंग’चा मोठा फायदा होता आणि तो बघूनच आम्ही ‘होम स्कूलिंग’सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

पहिली दोन वर्षं क्रमिक पुस्तकांच्या मदतीनं शिकत असताना मोकळ्या वेळात ज्या गोष्टी समजून घ्यायच्या, त्या पुस्तकांच्या बाहेर जाऊन- म्हणजे कधी निसर्गात जाऊन, कधी एखाद्या संस्थेत जाऊन, कधी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीला भेटून, तर कधी इंटरनेटच्या मदतीनं समजून घ्यायला सुरुवात झाली. ‘होम स्कूलिंग’च्या तिसऱ्या वर्षांपासून आधी पुस्तकातून शिकणं आणि मग ते पडताळण्यासाठी बाहेर पडणं, ही प्रक्रिया बरोबर उलटी घडू लागली. आता स्नेह बाहेरच्या जगाशी जास्त जोडला गेला आणि त्या जगातले प्रश्न सोडवण्यासाठी कधी पुस्तकं, तर कधी ऑनलाइन साधनं, यांची मदत घेऊ लागला. आम्ही आता फक्त त्याला शिकण्यासाठी लागणारं वातावरण निर्माण करणं, साधनं उपलब्ध करून देणं, ती साधनं वापरताना काय काळजी घेतली पाहिजे हे सांगणं, आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं एवढंच करत होतो.

स्नेहची स्वत:हून शिकण्याची प्रक्रिया अनुभवत असताना उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून शिकण्याच्या प्रक्रियेचा आम्ही अभ्यास सुरू केला. या निमित्तानं या विषयात ४० वर्षं संशोधन केलेल्या एका संस्थेशी जोडले गेलो. त्यातून शिकणं ही माणसाची एक नैसर्गिक प्रेरणा आहे. ती जपली आणि तिचा वापर करण्यासाठी लागणारं वातावरण निर्माण केलं तर प्रत्येक सजीवाची मुलं स्वत:हून शिकतात हे आम्हाला समजलं.  हे वातावरण म्हणजे शिकण्याची जबाबदारी मुलांची आहे हे मान्य करणं. त्यांना मुक्तपणे खेळू देणं, आवडीनिवडी जोपासू देणं, उपजीविकेसाठी जी साधनं वापरली जातात (सध्या कॉम्प्युटर व मोबाइल) ती मुक्तपणे हाताळू देणं, नवीन गोष्टी शिकण्यासाठी मुलांना गुणांच्या कसोटीवर न तोलता त्यांना हवं ते शिकण्यासाठी मदत करणारे गुरू उपलब्ध करून देणं, मुलांना सुरक्षित आणि आपलासा वाटेल असा गट तयार करणं हे आहे.

भूतकाळातल्या या सगळ्या गोष्टींची उजळणी करता करता पाच वर्षांंपूर्वी आम्ही स्व-अध्ययनाच्या रूपानं स्नेहच्या मनात जे बीज पेरलं होतं त्याचं आता रोपटं झाल्याचं आम्हाला उमगलं. थ्री-डी डिझाइन शिकण्याची जबाबदारी घेऊन तो त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी शोधण्यासाठी कसा सक्षम आहे हे दाखवण्यासाठी त्यानं आम्ही सुचवलेला क्लास नाकारला आणि स्वत:हून शिकण्याचा निर्णय घेतला हे बघून आम्ही योग्य मार्गावर आहोत याची खात्री पटली आणि सुटकेचा निश्वास टाकला. तो आज थ्री-डी डिझाइन शिकण्यासाठी जी धडपड करतोय, तीच धडपड उद्या तो त्याच्या आवडीच्या गोष्टीत उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि त्या मार्गात येणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी करेल असं आम्हाला वाटतं.

अशीच गोष्ट दीड वर्षांंपूर्वी ‘होम स्कूलिंग’सुरू केलेल्या असीम श्रोत्रीची आहे. ११ वर्षांचा असताना ‘होम स्कूलिंग’ला सुरुवात केल्यावर सुरुवातीचे चार-पाच महिने त्यानं काही न करता फक्त स्वत:ला या नवीन पद्धतीशी जुळवून घ्यायला दिले. त्या दरम्यान तो त्याचं आवडतं सायकलिंग, प्रोग्रॅमिंग, छोटे-मोठे व्यवसाय करणं, या गोष्टी जमेल तशा करत होताच. शिवाय तो लहानपणापासून प्रयोगशील शाळेत गेल्यानं स्वत:हून शिकण्याची सवय त्याला होतीच. सहा महिन्यांत त्यानं या प्रक्रियेशी जुळवून तर घेतलंच, शिवाय आता त्याला भरपूर मोकळा वेळ मिळाल्यानं त्याच्या आवडीच्या गोष्टी तो अजून मुळापर्यंत जाऊन करू लागला आहे.

वैभवी भिडेनं तर सातवीपर्यंत वर्गात पहिल्या  क्रमांकानं उत्तीर्ण होणं कधीच सोडलं नव्हतं तरीही तिला शाळेत बांधून राहणं त्रासदायक होत होतं. शिवाय राजकीय हस्तक्षेपामुळे सातत्यानं बदलणारा एकांगी अभ्यासक्रम तिच्या पालकांना चीड आणत होता. मागची दोन वर्षं वैभवी ‘होम स्कूलिंग’करत आहे. अभ्यासक्रम तर ती लीलया पूर्ण करतेच, पण आता ती तिच्या आवडीच्या गोष्टी- फॅशन डिझाइन, जर्मन, संस्कृत हे कधी गुरूंकडून, तर कधी ऑनलाइन शिकते. ‘‘तू लहान आहेस, मोठी झाल्यावर हे शिक,’’ असं सांगत तिचा वारंवार हिरमोड करणारी मोठय़ांची महाविद्यालयं आणि अभ्यासक्रम यांविषयी मात्र तिला प्रचंड राग आहे.

अनेकदा ‘होम स्कूलिंग’करण्याचा निर्णय आधी पालक घेतात आणि मग तो मुलांना सांगितला जातो. मात्र बेळगावच्या रावी कोडबागेच्या बाबतीत हे उलट होतं. शाळेत होणारी कुचंबणा, शारीरिक शिक्षा, आणि जे आवडतंय ते शिकायला न मिळणं, यामुळे कित्येक दिवसांपासून रावीनं ‘होम स्कूलिंग’चा तगादा लावला होता. रावीच्या आईनं मग वर्षभर बेळगावमधल्या काही पालकांना सोबत घेऊन शिक्षणावरची वेगवेगळी पुस्तकं वाचली. मुलांचे भातलावणीपासून ते इतर वेगवेगळ्या ठिकाणांना एकत्र भेटी देण्यासारखे उपक्रम आयोजित केले. मुलांना शाळेपासून स्वातंत्र्य दिल्यानंतर मिळणारा मोकळा वेळ कसा वापरायचा हे समजल्यावर, आणि त्यासाठी आपण हवी ती मदत करू शकतो ही खात्री पटताच रावीला ‘होम स्कूलिंग’करायची परवानगी मिळाली. रावी सध्या बेळगावमध्ये तिच्यासारखे आणखी मित्रमैत्रिणी मिळतात का याचा शोध घेत आहे.

स्नेहच्याच वयाचा मीत चांदगुडेही शाळेला कंटाळला होता. शाळा त्याला समजून घेत नसल्यानं आणि त्याला काय करायचं आहे यापेक्षा शाळेला काय हवंय हे त्याच्यावर लादायचा प्रयत्न करत असल्यानं तो शाळेत जायचा कंटाळा करायचा. आई-वडील दोघं नोकरी करत असूनही मुलाला शिकण्याचा कंटाळा येऊ नये, तर आनंद मिळावा म्हणून त्यांनी दोन वर्षांंपूर्वी मीतचं ‘होम स्कूलिंग’सुरू केलं. ज्या मुलावर अभ्यासाचा कंटाळा करण्याचा आरोप केला जायचा तोच मुलगा आता त्याच्या आवडीची गोष्ट करायला सुरुवात केल्यावर तहानभूक हरपून ती गोष्ट पूर्ण करायचा प्रयत्न करू लागला आहे. याचा पुरावा म्हणजे त्यानं तयार केलेल्या कलात्मक वस्तू ठेवायला आता त्यांच्या घरातल्या हॉलमध्ये जागाच शिल्लक राहिली नाहीये. एवढंच नाही, तर आई-वडिलांनी माझ्या आनंदाचा विचार केला, ही गोष्ट त्याला इतकी भावली, की शाळेत जाणाऱ्या मीतपेक्षा ‘होम स्कूलिंग’करणारा मीत आता आईशी विश्वासानं अनेक गोष्टी शेअर करू लागला आहे. हा होम स्कूलिंगचा गुणांच्या कसोटीवर मोजता न येणारा एक मोठा फायदा आहे.

आयुष्यभर कधीच शाळेत पहिलं येणं न सोडलेल्या आणि एका नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या प्रसाद व रूपा गुरव यांना शिक्षणाचं व्यापारीकरण आणि मुलांच्या शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये शाळेच्या रूपानं निर्माण होणारा अडथळा अस्वस्थ करत होता. त्यांच्या मुलीची- वल्लरीची शाळेत जाताना वयाच्या चौथ्या वर्षी होणारी रडारड अस्वस्थ करत होती. म्हणूनच तिचं ‘होम स्कूलिंग’करून तिला नैसर्गिक प्रेरणेनं शिकू देण्याचा निर्णय घेतला. शिकणं ही नैसर्गिक प्रेरणा असल्यानं त्यासाठी आपण जबरदस्ती करण्याची गरज नाही, हे तत्त्व त्यांनी पाळलं. वयाच्या सहाव्या वर्षीच ती सहा भाषांतून बोलू लागली आहे.  चुकीच्या पद्धतीनं शेती के ल्यामुळे जमिनीचं होणारं नुकसान बघून तिचं व्यथित होणं, तिच्या आकलनानुसार त्यावर उपाय सुचवणं प्रसादला महत्त्वाचं वाटतं. ही सहवेदनाच वल्लरीला यशस्वी विद्यार्थी बनवेल असं तो म्हणतो.

‘होम स्कूलिंग’करणारी मुलं स्वत:च्या आवडीनिवडी ओळखून त्याप्रमाणे स्वत:हून शिकतात. मात्र याची अनुभूती यायला आधी ‘होम स्कूलिंग’ला सुरुवात करावी लागते. ‘होम स्कूलिंग’करायची इच्छा असली तरी तीन महत्त्वाच्या गोष्टींमुळे त्याकडे वळण्यास धजावत नाहीत- पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच परीक्षा,  दुसरी मुलांचं सामाजीकरण (socialization). आणि तिसरी मुलांना द्यायला लागणारा वेळ. परीक्षा हे आपल्या शिक्षणव्यवस्थेनं आणि समाजानं स्वीकारलेलं मूल्यमापनाचं एक साधन आहे. परीक्षा, गुण यांचा शिकण्याच्या प्रक्रियेशी  संबंध नाही. परीक्षेशिवाय, खरं तर परीक्षा नसतील तरच मुलं  मनापासून शिकतात हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.

‘होम स्कूलिंग’करणाऱ्या मुलांना परीक्षा हे मूल्यमापनाचं साधन वापरता येतं का? तर, हो. शाळेत मुलं दरवर्षी परीक्षा देतात, मात्र ‘होम स्कूलिंग’करत असताना जर तुम्ही ‘महाराष्ट्र मुक्त शिक्षण बोर्डा’त प्रवेश घेतला तर मुलं पाचवी व आठवीची परीक्षा आणि नंतर दहावीची परीक्षा देऊ शकतात. या परीक्षा सर्व विद्यापीठांमध्ये ग्राह्य़ धरल्या जातात. तुम्हाला जर केवळ पाचवी आणि आठवीची परीक्षा देण्याऐवजी पहिलीपासून परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग’कडून (एनआयओएस) पहिली ते तिसरीसाठी ‘लेव्हल ए’, चौथी,पाचवीसाठी ‘लेव्हल बी’ व सहावी ते आठवीसाठी ‘लेव्हल सी’ला प्रवेश घेऊन परीक्षा देऊ शकता आणि नंतर दहावी व बारावीची परीक्षा देऊ शकता.

‘एनआयओएस’मध्ये तुम्ही वर्षभरात कधीही प्रवेश घेऊ शकता आणि कधीही परीक्षा देऊ शकता. ‘महाराष्ट्र मुक्त शिक्षण बोर्ड’ असो किंवा ‘एनआयओएस’ असो, यांनी स्वत:चे अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण आराखडय़ाशी मिळतेजुळते असतात. अर्थातच त्यांचा भर हा शिक्षणाला जीवनाशी जोडण्यावर असतो. त्यामुळे मुलं शाळेत जसं भूगोल, इतिहास, विज्ञान, भाषा व गणित शिकतात, तसंच ते ‘होम स्कूलिंग’ करतानासुद्धा शिकू शकतात. हे विषय शिकण्यासाठी ‘एनआयओएस’चं प्रचंड प्रमाणात अभ्यासाचं साहित्य ऑनलाइन उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही निवडलेल्या ‘स्टडी सेंटर’ला प्रत्यक्ष भेट देऊन मुलांच्या शंकांचं निरसन करता येतं. दहावीनंतर तुम्हाला कुठे जायचं आहे याचा विचार करून तुम्ही विषय निवडू शकता आणि त्या विषयांचा ‘ऑनलाइन’ किंवा ‘ऑफलाइन’ साधनं वापरून मुलांच्या कलानं व गतीनं अभ्यास करून परीक्षा देऊ शकता. त्यांनी दिलेल्या ‘स्टडी सेंटर’ला जाऊन तुम्ही प्रयोगशाळा वापरू शकता. तसंच खाजगी प्रयोगशाळा, ग्रंथालयं यांचा उपयोगसुद्धा तुम्ही करू शकता.

गणित, विज्ञान, इतिहास या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या सरकारी व खाजगी संस्था आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही काम करू शकता. ‘खान अकादमी’, ‘एडेक्स’, ‘कोर्सेरा’सारखे मुलांना आवडणारे प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही थेट ‘हार्वर्ड’, ‘एमआयटी’, ‘स्टॅनफर्ड’सारख्या विद्यापीठांकडून मोफत शिकून तुम्हाला आवडणारा विषय सगळ्या बाजूंनी समजून घेऊ शकता.  ‘एनआयओएस’मधून परीक्षा देऊन तुम्ही भारतातल्या व विदेशातील जवळपास सगळ्या विद्यापीठांत- अगदी ‘आयआयटी’ला किंवा वैद्यकीय वा ‘डेंटल’ला सुद्धा प्रवेश घेऊ शकता. अर्थातच त्यासाठी तुम्हाला योग्य विषयांची निवड करावी लागते. याविषयी सगळी माहिती ‘एनआयओएस’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दुसरा प्रश्न सामाजीकरणाचा. हा प्रश्न विचारण्याआधी शाळा सुरू होण्यापूर्वी ते होत होतं का नव्हतं, आणि सामाजीकरण हे बंदिस्त वातावरणात कुणाच्या देखरेखीखाली चांगलं होईल, की मुक्त वातावरणात, या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. शाळा जेमतेम २०० वर्षांंपूर्वी सुरू झाल्या. त्याच्या आधी मुलं चार भिंतींच्या बाहेर अनेक गोष्टी शिकत होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा सुरू झाल्यापासून मुलं फक्त त्यांच्या वयाच्या मुलांबरोबरच जास्त वेळ राहू लागली. यात मोठय़ा मुलांकडून प्रेरणा घेऊन शिकणं आणि लहान मुलांना सांभाळताना जबाबदारीची जाणीव शिकणं, या सामाजीकरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या अंगाला आपण मुकलो. ‘होम स्कूलिंग’करत असताना इयत्तेची मर्यादा नसल्यानं मुलं केवळ त्यांच्या वर्गातल्या नाही, तर जगातल्या कोणत्याही मुलाशी थेट संपर्क करून मैत्री करू शकतात. स्नेहसुद्धा अशाच एका गटाचा सदस्य आहे, ज्यामध्ये जवळपास ३० देशांतील वेगवेगळ्या वयाची मुलं एकत्र येतात, कधी एकत्र शिकतात, तर कधी एकत्र मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करतात. त्याचबरोबर भारतातल्या जवळपास प्रत्येक शहरात ‘होम स्कूलिंग’करणाऱ्या पालकांचे गट आहेत, जे मुलांना एकत्र येण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात. ‘होम स्कूलिंग’ करणाऱ्या मुलांकडे भरपूर वेळ असल्यानं जेव्हा इतर मुलं शाळेत असतात, तेव्हा ही मुलं ग्रंथालयं, संग्रहालयं, नेहरू तारांगण अशा संस्थांमध्ये तुलनेनं कमी गर्दी असताना जाऊन अनेक ताई-दादांशी  मैत्री करतात. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्याच वयाच्या व त्याच-त्याच मुलांमध्ये मिसळून त्यालाच ‘सोशलायजेशन’ म्हणायची वेळ येते तशी ‘होम स्कूलिंग’करणाऱ्या मुलांवर येत नाही. अर्थातच सामाजीकरणाचा या दृष्टिकोनातून विचार न झाल्यानं ‘होम स्कूलिंग’ला सुरुवात करण्याआधी पालकांना भीती वाटणं साहजिक आहे. मात्र पहिल्या दोन महिन्यांतच सामाजीकरणाच्या या अंगाची अनुभूती आल्यानं पालक बिनधास्त होतात असा आमचा अनुभव आहे.

तिसरी गोष्ट वेळेची. मुलांसाठी पुरेसा वेळ नाही ही तक्रार करत राहिलं तर काहीच करता येणार नाही. वेळ काढावाच लागेल. ‘होम स्कूलिंग’ करणाऱ्या मुलांचे पालकही उदरनिर्वाहासाठी काम करत आहेतच. त्यातून ते वेळ काढतात. पण एकदा का मुलांवर विश्वास टाकला की अनेक गोष्टी सोप्या होतात.

मार्चपासून ‘करोना’मुळे जवळपास सगळ्याच मुलांना नाइलाजानं का होईना, पण एक प्रकारे होम स्कूलिंगच करावं लागत आहे. मार्चमध्ये ही गोष्ट लक्षात आल्यानंतर स्नेहनं आमच्या ‘सर्जनशील पालक’ या समूहातील काही शाळेत जाणाऱ्या, पण सध्या जबरदस्तीनं ‘होम स्कूलिंग’करणाऱ्या मुलांना एकत्र घेऊन ‘ऑनलाइन प्रोग्रॅमिंग’ शिकायला सुरुवात केली. ही शिकण्याची प्रक्रिया पूर्णपणे मुलांच्या नियंत्रणात होती. कोणत्याही मोठय़ा व्यक्तीची इंटरनेट उपलब्ध करून देण्यापलीकडे कोणतीच भूमिका नव्हती. या उपक्रमातून स्नेह, निधी, कैवल्य, अनिश, आयुष, ज्ञानेश, अर्जुन आणि साकेत या मुलांनी मागच्या चार महिन्यांत स्वत:हून दोन ‘प्रोग्रॅमिंग लँग्वेज’ शिकल्या. एवढंच नाही, तर मुलं स्वत:हून कशी शिकतात याचं प्रात्यक्षिक त्यांनी अमेरिकेतल्या काही शिक्षणतज्ज्ञांना अर्थातच ऑनलाइन दिलं. सध्या यातल्या काही मुलांच्या ऑनलाइन शाळा आणि क्लास सुरू झाल्यानं त्यांना वेळ मिळत नाही. मग ही मुलं सकाळी पावणेसहाला भेटून प्रोग्रॅमिंग शिकतात. ‘आमची मुलं स्वत:हून एवढय़ा लवकर उठून शिकतात यावर विश्वासच ठेवू शकत नाही,’ ही पालकांनी दिलेली प्रतिक्रियाच मुलांना स्वत:हून शिकण्याचा निर्णय घ्यायची परवानगी दिली तर काय घडू शकतं याची प्रचीती देते.

ऑनलाइन किंवा शाळेबाहेरचं शिक्षण यशस्वी करायचं असेल तर शिकण्याच्या प्रक्रियेचं नियंत्रण हे विद्यार्थ्यांकडे देणं आवश्यक आहे, किंबहुना त्याशिवाय ही प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही, असं ‘हार्वर्ड’ विद्यापीठाच्या शिक्षण विभागाचं संशोधन सांगतं. आता जो ऑनलाइन-ऑफलाइन शिक्षणाचा गोंधळ सुरू आहे, तो थांबवायला काही दिवस अभ्यासक्रम बाजूला ठेवून शिकण्याचं नियंत्रण मुलांकडे देत त्यांना जे शिकायचं आहे ते शिकू दिलं पाहिजे. त्यामुळे मुलं पुस्तकातले धडे शिकली नाहीत तरी शिकण्याची प्रक्रिया मात्र नक्की शिकतील व त्या आधारावर धडय़ांचं आकलन योग्य वेळी सहज करून घेतील स्वानुभववरून सांगू शकतो.

मुलं शाळेत असताना आणि आता मागचे चार महिने घरी असताना मुलांमध्ये झालेले बदल पालकांनी त्रयस्थपणे आणि प्रामाणिकपणे टिपले तर आम्ही ‘होम स्कूलिंग’का करतो, हे पालकांना आपोआपच कळेल अशी आम्हाला खात्री आहे.

मूल्यमापनासाठी परीक्षा

‘होम स्कूलिंग’करणाऱ्या मुलांना परीक्षा हे मूल्यमापनाचं साधन वापरता येतं का? तर, हो. शाळेत मुलं दरवर्षी परीक्षा देतात, मात्र ‘होम स्कूलिंग’करत असताना जर तुम्ही ‘महाराष्ट्र मुक्त शिक्षण बोर्डा’त प्रवेश घेतला तर मुलं पाचवी व आठवीची परीक्षा आणि नंतर दहावीची परीक्षा देऊ शकतात. या परीक्षा सर्व विद्यापीठांमध्ये ग्राह्य़ धरल्या जातात. तुम्हाला जर केवळ पाचवी आणि आठवीची परीक्षा देण्याऐवजी पहिलीपासून परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूलिंग’कडून (एनआयओएस) पहिली ते तिसरीसाठी ‘लेव्हल ए’, चौथी,पाचवीसाठी ‘लेव्हल बी’ व सहावी ते आठवीसाठी ‘लेव्हल सी’ला प्रवेश घेऊन परीक्षा देऊ शकता आणि नंतर दहावी व बारावीची परीक्षा देऊ शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 1:04 am

Web Title: home schooling learning outside school dd70
Next Stories
1 ‘ऑनलाइन’ शाळेतलं ‘ऑफलाइन’ शिक्षण!
2 जीवन विज्ञान : भूक, आहार आणि तृप्ती
3 यत्र तत्र सर्वत्र : ‘नासा’तल्या मानवी संगणक!
Just Now!
X