|| सुमित्रा भावे

‘चित्रपटातील पात्रं येतात कुठून?’ या प्रेक्षकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मलाच प्रश्न पडतो की गणेशवेलाच्या बियांसारखी – कुठून आली ही माणसं? पण भूतकाळातील घटनांतून, माणसांतून वळणं घेत चित्रपट तयार होत जातो आणि सत्य व कल्पित एकमेकांत कसे मिसळून जातात कळतच नाही. सत्य अघटित बनतं आणि कल्पित सत्य बनतं. आत्तापर्यंतच्या प्रवासात एक मात्र नक्की झालं, कल्पित माणसांना रेखाटताना खरी माणसं अधिक समजली..

पावसाळ्यात आमच्याकडे गणेशवेल येतो. नाजूक हिरवीगार पानं. वेल भराभरा वाढत जातो. त्याला लालचुटूक नाजूक फुलं लागतात. परवा एका मत्रिणीनं विचारलं, ‘‘या झाडाच्या बिया तुला कुठे मिळाल्या?’’ ‘‘म्हटलं, कुणास ठाऊक कुठून आल्या त्या बिया. मी लावल्या नाहीत. कुठून आल्या, कशा रुजल्या, नाही सांगता येत. पण हिरवागार, तजेलदार वेल आलाय खरा आणि त्याच्यावर डुलणारी लाल भडक फुलं.’’

आपला नवा चित्रपट हुरहुरत्या मनानं प्रेक्षकांना दाखवला की प्रेक्षकांचा नेहमी येणारा एक प्रश्न असतो, ‘या व्यक्तिरेखा आणि ही कथा तुम्हाला कशी सुचली?’ बहुतेक वेळा मी सांगते, ‘ते सांगता नाही येणार हो.’ मग शोधायला लागते, गणेशवेलाच्या बियांसारखी – कुठून आली ही माणसं?

आमच्या ‘संहिता’ या चित्रपटात मीच एक संवाद लिहिलाय. रेवती ही चित्रपटाची नायिका माहितीपट बनवत असते. तिला फीचर फिल्म बनवण्याची एक ऑफर येते. तेव्हा तिच्या तोंडी हा संवाद आहे. ती म्हणते, ‘डॉक्युमेंट्रीमध्ये आपण आपल्या एका खिडकीतून जग बघायचं आणि आपल्याला ते जसं दिसतंय तसं प्रेक्षकांना दाखवायचं.’ पण फीचर फिल्म ही माणसांची कल्पित गोष्ट असते. फीचर फिल्ममध्ये तर ब्रह्मदेवच व्हायचंय. आत्तापर्यंत अस्तित्वात नसलेली माणसं आपणच जिवंत करायची. म्हणजे ते आपले आरसेच असणार की काय?’ एकदा ते जिवंत झाले की खरी  माणसं, जशी अगदी आपल्या जवळची असली तरीही काही वेळा अनाकलनीय वागतात, तशी वागायला लागतात. तुम्हाला हवं तसं तुम्ही त्यांना वागायला लावलंत तर तुम्हालाच ती खोटी वाटायला लागतात. एकदा त्यांना जन्म मिळाला की लेखकाला, ते जातील त्या वाटेनं त्यांना जाऊ देऊन, त्यांचा पाठलाग करून ते कुठे जातात, एवढंच बघता येतं. आणि त्यांच्या निरंकुश वागण्याचा अर्थ लावत बसावं लागतं.’

आमचा ‘दोघी’ हा चित्रपट पूर्ण झाल्यावर ‘एनएफडीसी’नं विचारलं, ‘‘तुमच्याकडे आणखी काही कथानक असेल तर द्या. पुढच्याही चित्रपटाचा विचार करता येईल.’’ खरंतर त्या क्षणी माझ्या डोक्यात नेमकी कुठलीच कथा नव्हती. पण मी हरखून गेले. घरी आल्यावर आईला ‘एनएफडीसी’त झालेलं हे बोलणं सांगितलं, अगदी सहज म्हणून. आई म्हणाली, ‘‘तुझ्या आजोळच्या ‘चित्तरकथे’- वरच लिही की. ‘चित्तरकथा’ हा खास तिचा शब्द. म्हणजे तुमच्या चित्ताच्या अगदी जवळ असणारी कथा म्हणा, किंवा चित्रकथा म्हणा, म्हणजे चित्रपटच की! आणि माझ्या डोळ्यासमोर माझं आजोळ साकारायला लागलं. मामा, मामी, आजोबा, मावशी सगळे  दिसायला लागले. पण म्हणजे ‘वास्तुपुरुष’ ही आजोळची डॉक्युमेंट्री आहे का? – तर अजिबात नाही. ‘वास्तुपुरुष’मधल्या पात्रांमध्ये आजोळच्या सर्वच माणसांचे गुण-अवगुण, वेगवेगळ्या प्रमाणात जिवंत झाले. काही अस्सल माझ्या स्मरणातल्या घटना त्यात आल्या तर काही, मी म्हटलं त्याप्रमाणे, पात्रांच्या स्वभावातून घडत गेल्या.

‘वास्तुपुरुष’मधली आई, माझी आई आणि माझ्या मामी यांच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. माझी आई लग्न झाल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी खेडय़ातून शहरात आली आणि तिनं पुण्यासारख्या शहरातला बौद्धिक स्मार्टनेस उचलला. अत्यंत अनपेक्षितपणे, ती जवळजवळ अशिक्षित असूनही, म्हणजे जेमतेम दुसरी-तिसरी शिकलेली (आणि माझे वडील जुन्या काळातले डबल ग्रॅज्युएट ), आयुष्यातले कुठलेच निर्णय तिने केवळ भावनेनं किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन धर्मभोळेपणे घेतले नाहीत. तिला तिच्या नवऱ्याच्या(म्हणजे माझ्या वडिलांच्या) किंवा थोरल्या भावाच्या (म्हणजे माझ्या मामांच्या) काही गोष्टी चुकीच्या वाटल्या तर ती खणखणीत, सुस्पष्ट शब्दात त्यांची कानउघाडणी करायला मागेपुढे पाहत नसे. मामी यापेक्षा वेगळ्या. जास्त मऊ, एक प्रकारे ‘हॅपी गो लकी’ म्हणता येईल अशा. त्या तशा होत्या म्हणूनच माझ्या आजोळच्या देशपांडय़ांच्या वतनदारी घरात सन्मानाने राहू शकल्या. आई म्हणायचीच, ‘‘मला वहिनींसारखं जमलं नसतं.’’ मामी आपल्या नणंदेच्या कानाला लागून गुळूमुळू-गुळूमुळू, नवऱ्याबद्दलच्या आणि परिस्थितीबद्दलच्या तक्रारी करायच्या. मग आईने मामींच्या बाजूने स्वत:च्या थोरल्या भावाला सुनवायचं आणि मामांनी निमूट ऐकायचं. आमच्या या वतनदारी घरात सगळा ‘अहोजाहो’चा कारभार असे. म्हणजे मामा थोरले आणि आई धाकटी बहीण – तरी दोघेही एकमेकाला ‘अहोजाहो’ करायचे. एवढंच काय, ते मलाही ‘अहोजाहो’ करायचे.

थोरल्या मामांना मूळ बाळ नव्हतं. तेव्हा ‘वास्तुपुरुष’मधल्या भास्करमध्ये मला मीच दिसते. भास्कर हा कथानकातल्या माणसांवर प्रेम करून, त्यांचा आदर करून, घडणाऱ्या घटनांकडे बघणारा साक्षी आहे – जशी मी. भास्करची आई, बाई आजीचं करते, तसं कुरकुरत, तरी कर्तव्यभावनेने मामी आजोबांचं करायच्या. माझे धाकटे मामा ‘वास्तुपुरुष’मधल्या धाकटय़ा काकांसारखे, खरंच हरहुन्नरी आणि कलासक्त होते. थोरले मामा गांधीवादी. पण वतनदारी मुरवून घेतलेले. माझे वडील पुण्यात असून धोतर नेसायचे, पण थोरले मामा खेडय़ात राहूनही खादीच्या पँट्स घालायचे.

मामी आणि आई, दोघीही बायका गुप्तधनाच्या मोहात कधीही पडल्या नाहीत. पण ‘वास्तुपुरुष’मध्ये दाखवल्याप्रमाणे मामांनी वाडय़ातल्या माजघरातली जमीन खोदली होती. मामा, आपल्या राजकारणातल्या मित्रांना भेटायला परगावी गेले की मामी स्वत: कुळांच्याकडे जाऊन वसुली करून यायच्या. मामा, मामी, आई, सगळेच या घराचं, इथल्या वास्तूचं ऋण कसं फेडायचं या शोधात जिवाचा तडफडाट करून घेणारे. आई म्हणायची, ‘‘जुन्या काळी स्वत:च्या माजात आपल्या पूर्वजांनी अनेक अश्राप जिवांचा तळतळाट घेतला असणार. तेव्हा त्यांचा आत्मा शांत केल्याशिवाय इथली वास्तू शांत होणार नाही. भास्करची आई माझ्या आईचं हेच वाक्य उचलून म्हणते, ‘‘भास्करनं गरिबांची सेवा केल्याशिवाय ही वास्तू शांत होणार नाही.’’

‘वास्तुपुरुष’मध्ये भास्करचा मोठा भाऊ निशी याला कृष्णाशी लग्न करायचं असतं. परंतु जातिभेदामुळे ते होऊ शकत नाही. भास्करचे पुढारलेले वडील त्याला विरोध करतात. परंतु आईची मात्र संमती असते. पुढे घटना अशा घडत जातात की जी मुलगी या घरात सून म्हणून आली नाही तीच आईची देखभाल करते. ही कृष्णाची आणि नात्याच्या गुंत्याची व्यक्तिरेखा माझ्या डोक्यात कुठून आली असेल? तर, मामांनी एकदा अचानकपणे जाहीर केलं की वाडय़ातल्या अंगणात बाजूला जो गोठा आहे त्यात आता जनावरं तर राहिली नाहीत. त्या गोठय़ाची डागडुजी करून घेऊ, तिथं एक कुटुंब राहायला येईल. वेळेला या कुटुंबाची मदतही होऊ शकेल. मामींना वाटलं, बरं झालं कुणाची तरी सोबत आली.

नंतर मामींना कळलं की ते दलित कुटुंब होतं. मामींना वाटलं, आपली फसवणूक झाली. त्या कुटुंबाचं त्यांना काहीच गोड वाटेना. मामांनी मामींच्या नाराजीकडे साफ दुर्लक्ष केलं. मामी त्यांच्या मूळ स्वभावानुसार बारीक-बारीक चिडचिड करण्याशिवाय काहीच करू शकत नव्हत्या. माझ्या आईनं तिच्या बुद्धिप्रामाण्याने मामींना समजावण्याचा खूप प्रयत्न केला की, जातीपातीला अर्थ नाही, माणुसकी हीच महत्त्वाची. खरंच, त्या कुटुंबाचा आधार होईल. तो सुखानं अंगी लावून घ्या. पण मामींना पटेना. काही महिने गेले आणि अचानक मामीचं आईला आग्रहाचं निमंत्रण आलं, ‘यंदा सिद्धेश्वराच्या जत्रेला नक्की या.’ आईला माहेरी जाणं आवडायचंच. आम्ही सगळेच गावी गेलो. मामी प्रसन्न आणि खुशीत दिसत होत्या. चहापाणी होतंय, तर सोप्यातल्या उंबऱ्यात सपासप रांगत येणारं एक बाळ! मामींनी पुढे होऊन बाळाला उचलून घेतलं, बाळाचा मुका घेतला. आई म्हणाली, ‘‘हे कुणाचं?’’ तर मामी म्हणाल्या, ‘‘आपल्या गोठय़ातला चंद्रू आहे ना, त्याची नात आहे.’’ आई म्हणाली, ‘‘अहो पण..’’ – तर मामी आईचं वाक्य तोडून म्हणाल्या, ‘‘लहान पोराला जातपात नसते.’’ ते छोटं बाळ, ती मुलगी, मामींच्या पानात, शेजारी बसून जेवायची. मामींना तिचं उष्टही चालायचं. मामींच्या आणि हिच्या नात्यात मला कृष्णा सापडली. मामींच्या वार्धक्याच्या काळात हिने मामींची खूप काळजी घेतली. आता ती स्वत: प्राध्यापक आहे. आईला वाटायचं तसं, तिच्या माहेरानं कुण्या परक्याला आपलंसं करून, समाजाचं ऋण फेडलेलंच आहे. वाडा आता पडला आहे. आमचे कुणीच नातेवाईक तिथे राहत नाहीत. पण चंद्रूभाऊंचा मुलगा आणि नातवंडं आता गोठा सोडून वाडय़ाच्या दर्शनी भागातच राहतात.

या अशा घडलेल्या घटनांमधून, ‘वास्तुपुरुष’चं कथानक, वळणं घेत पुढं सरकलं. सत्य आणि कल्पित एकमेकांत कसे मिसळून जातात कळलंच नाही. सत्य अघटित बनतं आणि कल्पित सत्य. एक मात्र नक्की झालं, कल्पित माणसांना रेखाटताना खरी माणसं अधिक समजली. साक्षी म्हणून बघताना ‘ही माणसं-ती माणसं’ याच्या पलीकडे जाऊन ‘माणूसच’ जरा अधिक समजला.

sumitrabhavefilms@gmail.com

Dchaturang@expressindia.com

((( ‘वास्तुपुरुष’ चित्रपटात उत्तरा बावकर, रेखा कामत व सिद्धार्थ दफ्तरदार.