या मुलीला वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी एफजीएम (फीमेल जेनायटल म्युटिलेशन)सारख्या भीषण अत्याचाराला सामोरं जावं लागलं होतं, नंतर त्याच प्रथेचा नायनाट करण्याचं व्रत तिनं हाती घेतलं. त्याआधी तिनं स्वत:ला खूप उंचीवर नेऊन ठेवलं. प्रतिष्ठा मिळवली, पैसा मिळवला आणि मग आपल्या देशातल्या, सोमालियातील लोकांच्या समृद्धीसाठी आयुष्य वाहून घेतलं. त्या झुंझार वारिस डीरी, परदेशातल्या ‘तिची’ ही कहाणी. जगभरात अशा अनेक लढवय्या स्त्रिया आहेत. ज्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत स्वत:ला, त्यांच्या देशाला प्रगतीच्या मार्गावर आणून ठेवत आहेत. काही नवीन घडवत आहेत. अशा परदेशातल्या ‘ती’च्या कहाण्या दर आठवडय़ाला.
ही कहाणी आहे एका झुंझार वृत्तीच्या मुलीची. सोमालियासारख्या पूर्णपणे सुन्नी मुस्लिमांच्या, परंतु वेगवेगळय़ा वंश-निष्ठांमुळे विभागल्या गेलेल्या देशात गालयाको गावातील एका भटक्या कुटुंबात, १९६५ साली तिचा जन्म झाला. सहाव्या वर्षांपासून, तिच्या कुटुंबाच्या मालकीच्या शेळय़ा-मेंढय़ांचं, तरसांपासून आणि रानटी कुत्र्यांपासून संरक्षण करण्याचं काम तिला करावं लागत होतं. अशिक्षित आणि गरीब कुटुंबातल्या या मुलीला तिचा पिता तीन उंटांच्या बदल्यात एका जरठ वृद्धाला विकायला निघालेला पाहून, अंगावरच्या एका फाटक्या शालीनिशी १३ वर्षांची ही मुलगी-वारिस डीरी, ज्वालामुखीप्रमाणं धगधगणारं सोमाली वाळवंट पार करून, सोमालियाच्या मोगाडिशू या राजधानीच्या गावी पोचली. वाटेत तिनं अपार संकटांना तोंड दिलं. वाटेत एका सिंहाचं भक्ष्य बनता-बनता ती बचावली. अशी आणखी काही शकुन चिन्हं अनुभवाला आल्यावर, तिला तो दैवी संकेतच वाटला की, आपल्या हातून कोणतं तरी महत्त्वाचं कार्य घडवण्यासाठीच देव आपल्याला तारतो आहे!
या मुलीला वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी एफजीएम (फीमेल जेनायटल म्युटिलेशन) सारख्या भीषण अत्याचाराला सामोरं जावं लागलं होतं, आणि आपलं आयुष्य घडवल्यावर तिनं या भीषण प्रथेचा नायनाट करण्याचं व्रत हाती घेतलं. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या माहितीनुसार एफजीएम (स्त्रियांच्या योनिमुखाची सुन्ता आणि शिलाई) सर्वात भीषण प्रकार आहे. ‘इनाफिब्युलेशन’ याला फॅराओनिक सर्कमशिजन (सुन्ता) असेही म्हणतात. सोमालियातील ८० टक्के स्त्रियांना या सर्वात भीषण प्रकाराला सामोरं जावं लागतं. या शस्त्रक्रियेत क्लायटोरिसचा (योनी उंचवटय़ाचा) सर्व किंवा काही भाग  छाटला जातो. आणि झालेली जखम शिवून टाकून योनिमुख बंद करून टाकण्याची तजवीज केली जाते. लघवी आणि मासिक स्राव जाण्यापुरतं छिद्र ठेवलं जातं.
लोक म्हणतात की, ही भीषण प्रथा-इजिप्तसारख्या अरब देशातून सोमालियात आली. म्हणूनच बहुधा त्याला ‘फॅराओनिक’ म्हणत असावेत. इजिप्तमध्ये फॅराओ बायकोला सोडून जाताना जबरदस्तीने तिची एफजीएम करत असत. हेतू हा, की तिनं नवऱ्याच्या गैरहजेरीत इतर पुरुषांशी संबंध ठेवू नयेत.
सोमालियात (आणि सुदान, इथिओपिआ, इजिप्त, माली, जिबूटी यांसारख्या अन्य देशांत) ही शस्त्रक्रिया होईपर्यंत मुली ‘हलाल’ (पवित्र) समजल्या जात नाहीत. त्यांना ‘हराम’ (अपवित्र) मानतात. ही संबोधनं चुकीची आहेत, कारण या प्रथेचा धर्माशी काही एक संबंध नाही. ही केवळ एक पुरुषधार्जिणी प्रथा आहे. पुरुषांना वाटतं की, एफजीएम केलेली स्त्री चांगली नाही, कारण योनिमार्ग खुला असल्यामुळे ती कुणाशीही समागम करू शकते. परंतु मुलींचा नीटपणे विवाह व्हावा, या इच्छेपोटी आईवडील आपल्या कोवळय़ा वयाच्या मुलींवर ही शस्त्रक्रिया करून घेतात.
 ही शस्त्रक्रिया कुशल डॉक्टरकरवी र्निजतुक वातावरणात केली जाते, असंही नाही. कुणीही अनुभवी माणूस अशा शस्त्रक्रिया करत असतो. त्यावेळेस कधी भूल दिली जाते, तर कधी दिलीही जात नाही. जंतुसंसर्गाचा भरपूर संभव असतो. मासिक पाळी आली की वर्षांनुर्वष रक्ताच्या गुठळय़ा आतच साचून राहतात. आणि भीषण वेदना होतात. विवाहानंतर, शिवून टाकलेल्या योनिमार्गामुळे समागम हे स्त्रीच्या दृष्टीनं एक संकट बनतं. एकूणच हा प्रकार अत्यंत अमानुष आणि जिवावर बेतेल असाच आहे. परंतु त्या विरोधात जगभरातून पुरेसा आवाज मात्र उठवला जात नव्हता! आपली झुंझार तेजस्विनी- वारिस डीरी हिनं कालांतरानं या प्रथेविरुद्ध आवाज उठवला. ती युनायटेड नेशन्सची ‘ह्य़ुमन राइट्स अ‍ॅम्बॅसेडर’ (मानवी अधिकारांची प्रवर्तक) बनली. परंतु सोमाली वाळवंट तुडवून मोगाडिशूला पोचल्यावर तिला अजून अनेक समस्यांशी झुंझावं लागणार होतं.
मोगाडिशूत मोठय़ा बहिणीजवळ आणि तिच्या कुटुंबीयांजवळ काही काळ राहून, ती इतर काही नातेवाइकांबरोबर लंडनला पोचली. तिथे सोमालियाचे राजदूत असलेले तिचे दूरचे एक काका राहात होते. त्यांच्या घरात काही दिवस घरकाम करत ती राबली. त्यांची राजदूत म्हणून नियुक्तीची मुदत संपल्यावर ती लंडनमध्येच राहिली आणि मॅकडॉनल्ड्समध्ये काम करू लागली.
भटक्या कुटुंबात जन्मलेल्या, शहरी वातावरणाचा आणि इंग्रजी भाषेचा गंधही नसलेल्या या किशोरवयीन मुलीचं हे स्थित्यंतर अत्यंत तणावपूर्ण होतं. भरीला ब्रिटिश इमिग्रेशन ऑफिसबरोबर तिला झटापट करावी लागली होती. तिनं मोठय़ा जिद्दीनं या साऱ्या अडचणींचा सामाना केला.
योगायोगानं नशिबाचे फासे सुलटे पडले. अत्यंत आकर्षक रूप आणि देहयष्टी लाभलेली वारिस, टेरेन्स डॉनोवॅन या छायाचित्रकाराच्या नजरेस पडली. त्यानं १९८७ सालच्या पिरेली कॅलेंडरवर तिचा फोटो छापून आणला. त्यानंतर तिनं मॉडेलिंग व्यवसायात उंच झेप घेतली. श्ॉनेल, लेव्ही, लॉरिएल, रेव्हलॉन यांसारख्या नामवंत कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये ती झळकली. तिचे फोटो एल्, ग्लॅमर, व्होग यांसारख्या फॅशन-मॅगेझिन्समध्ये छापून आले. लंडन, मिलान, पॅरिस, न्यूयॉर्क अशा शहरांमध्ये ठिकठिकाणी ती दिसू लागली. काही काळ तिनं न्यूयॉर्कमध्येसुद्धा वास्तव्य केलं. १९८७ साली तिनं ‘द लव्हिंग डेलाइट्स’ या जेम्स बाँड चित्रपटातही एक लहानशी भूमिका वठवली होती. त्यानंतर बी.बी.सी.नं तिच्यावर आणि तिच्या मॉडेलिंग व्यवसायावर, ‘ए नोमॅड इन न्यूयॉर्क’ नावाचा एक अनुबोधपटसुद्धा काढला.
१९९७ साली, मॉडेलिंग व्यवसायात उच्चस्थानी असताना वारिस पहिल्यांदाच, ‘मारी क्लेअर’ या स्त्रियांसाठीच्या मासिकाच्या लॉरा झिन् हिच्याशी एफजीएमबद्दल आणि वयाच्या पाचव्या वर्षी त्या भीषण अनुभवातून स्वत: गेल्याबद्दल विस्तारानं बोलली. तिच्या या मुलाखतीला जगभरातील प्रसारमाध्यमांनी तुफान प्रसिद्धी दिली. साऱ्या जगाचं लक्ष या लांच्छनास्पद प्रथेकडे प्रथमच वेधलं गेलं. त्याच वर्षी एफजीएम या प्रथेचं निमूर्लन करणारी ‘यू. एन. अ‍ॅम्बॅसेडर’ म्हणून वारिसची नियुक्ती झाली. हे पद तिनं १९९७ ते २००३ पर्यंत सांभाळलं. त्यानंतर वारिस अनेक वर्षांनी तिच्या जन्मदेशात-सोमालियात आणि तिच्या आईला भेटली.
१९९८ साली वारिसनं तिचं पहिलं पुस्तक ‘डेझर्ट फ्लॉवर’ प्रसिद्ध केलं. ही तिची आत्मकहाणी आहे. या पुस्तकानं जगभरात खपाचा उच्चांक गाठला. याच पुस्तकावर २००९ साली एक चित्रपट काढण्यात आला. त्यात लिया केबिडी या इथिओपिअन अभिनेत्रीनं वारिसची भूमिका रंगवली. हा चित्रपट वेगवेगळय़ा २० देशांत प्रकाशित झाला आणि जानेवारी २०१० मध्ये त्याला अत्युत्कृष्ट चित्रपट म्हणून, बल्गेरियन अ‍ॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं. त्या चित्रपटानं इतरही अनेक पारितोषिकं पटकावली. २०१० साली आफ्रिका देशांच्या महासंघानं वारिसची नियुक्ती ‘शांततेच्या वर्षांसाठीची शांतिदूत’ म्हणून केली. वारिसनं ‘डेझर्ट फ्लॉवर’खेरीज ‘डेझर्स डॉन’, ‘डेझर्ट चिल्ड्रन’, ‘लेटर टू माय मदर’ आणि ‘श्वार्झ फ्राड’ही चार अन्य पुस्तकं लिहिली आहेत आणि त्यांना जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
सध्या वारिसनं ऑस्ट्रियाचं नागरिकत्व घेतलं आहे. परंतु ती करत असलेल्या मानवतावादी कार्याची यादी खूपच मोठी आहे. १९९७ साली वारिसनं तिचा मॉडेलिंग व्यवसाय थांबवला आणि तिनं एफजीएमचं निर्मूलन करण्याच्या कामाला स्वत:ला पूर्ण वेळ वाहून घेतलं. २००२ साली तिनं ऑस्ट्रियामध्ये ‘डेझर्स फ्लॉवर फाऊंडेशन’ची स्थापना केली. ही संस्था एफजीएमच्या धोक्यांबद्दल जनजागृती करण्याचं महत्त्वाचं काम करते आहे. तिनं २००९ सालच्या जानेवारीत, स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी आणि हक्कांसाठी प्रयत्न करणारी ‘पीपीआर फाऊंडेशन’ स्थापन केली. याच्या संस्थापनेत तिला फ्रेंच अब्जाधीश फ्रँको पिनॉ आणि हॉलीवूड अभिनेत्री असलेली त्याची पत्नी सलमा हायेक, यांनी साथ दिली. तिनं ‘डेझर्ट-डॉन’ या संस्थेची स्थापना करून तिच्या मायदेशात- सोमालियात शाळा आणि दवाखाने बांधण्यासाठी पैसे उभे करायला प्रारंभ केला आहे. तिच्या पुस्तकांचा आणि तिच्या मानवतावादी कामांचा अनेक पुरस्कारांद्वारे गौरव करण्यात आला आहे. यातील विशेष उल्लेखनीय पुरस्कार आहेत-
* विमेन्स वर्ल्ड अ‍ॅवॉर्ड (२००४) यू. एस. एस. आर. माजी अध्यक्ष मिखााईल गोर्बाचोव्ह यांच्या हस्ते.
* शेव्हविअर द ल लीजन द ऑनर (२००७) तत्कालीन फ्रेंच प्रेसिडेंट निकोलस साकरेझी यांच्या हस्ते
* गोल्ड मेडल फ्रॉम प्रेसिडेंट ऑफ इटली (२०१०) मानवाधिकार चळवळीबद्दल अनेक हालअपेष्टा सोसून वारिसनं जगात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं खरं. परंतु ती फक्त पैसा, कीर्ती, प्रतिष्ठा यातच गुंतून पडली नाही. तिनं एफजीएमसारखा ज्वलंत प्रश्न ऐरणीवर घेतला. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी आणि हक्कांसाठी तिनं कुमक जमवली. मायदेशात शाळा-दवाखाने उभारण्यासाठी तिनं खराखुरा प्रयत्न केला. ही झुंझार मुलगी फक्त आपलं आयुष्य घडवण्यासाठी झुंजली नाही! तिनं एका भीषण प्रथेचा नायनाट करण्यासाठी आवाज उठवला आणि तिनं जिद्दीनं ते स्थान मिळवलं होतं, त्यामुळे जगभरात तिच्या घोषणेचे पडसाद उमटले आणि तिच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळाला. एखादं मोठं कार्य तडीला नेण्यासाठी कधीकधी तुम्हाला स्वत:लाच मोठं बनणं भाग पडतं. परंतु मोठं बनूनही ज्यांचे पाय जमिनीवरच घट्ट रोवलेले राहातात, अशाच व्यक्ती जगासाठी काहीतरी करू शकतात!
(आधार : विकिपीडिया आणि मेहता प्रकाशन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या, राहिला गुप्ता यांच्या ‘एन्स्लेव्हड’ या अनुवादित पुस्तकातील काही भाग, प्रकाशकांच्या परवानगीनं.)

Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक