मंजुला नायर – responsiblenetism@gmail.com

एखाद्या गोष्टीवर अवलंबून असणं आणि तिचं व्यसन लागणं या दोन्हींमधली नियंत्रणरेषा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. इंटरनेटच्या बाबतीत जर आपण, म्हणजे प्रौढ व्यक्तीच  स्वनियंत्रण किंवा स्वत:साठी नियम घालून घेत नसू, तर आपल्या मुलांनीदेखील त्याचं पालन करावं अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? आज वय र्वष ४  ते किशोरवयीन वयातली मुलं दररोज सरासरी ४ ते ९ तास टीव्ही आणि अन्य स्क्रीन्ससमोर घालवतात,  हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आता तरी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा..  इंटरनेटचं व्यसन या लेखाचा हा भाग १

इंटरनेटला मर्यादा घालणाऱ्या कुठल्याही भौगोलिक सीमा नाहीत, की कुठल्याही विशिष्ट आर्थिक स्तराची पूर्वअट नाही. त्याचा वापर करण्यासाठी आता वयाचीदेखील मर्यादा राहिलेली नाही. सगळी ‘स्मार्ट’ उपकरणं आता हातात बाळगता येत असल्यानं ती अधिक प्रमाणात वापरली जातात. शिवाय त्याच्या वापराबाबत गोपनीयताही राखता येते. इंटरनेटचा वैयक्तिक वापर ही ज्याची-त्याची खासगी बाब झालेली आहे आणि इतरांनी अन्य व्यक्तीच्या अशा खासगी बाबीत डोकावणं अयोग्य समजलं जातं. प्रत्येक नव्या गोष्टीच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू असतातच. मात्र तंत्रज्ञानात मोठय़ा वेगानं प्रगती होत असल्यामुळे दुर्दैवानं त्यातल्या वाईट बाजूच अधिक प्रकर्षांनं समोर येत आहेत, हे सत्य नाकारून चालणार नाही.

स्मार्ट उपकरणांवर सातत्यानं अवलंबून असलेली किमान एक तरी व्यक्ती तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहिली असेल. त्यांचं हे अवलंबून राहण्याचं प्रमाण किंवा त्या स्मार्ट उपकरणाचा वापर कशासाठी केला जातो, या गोष्टी भिन्न व्यक्तींत वेगवेगळ्या असतीलही, पण त्यांचं असं अवलंबून राहणं आपल्या नजरेत आल्यावाचून राहात नाही.

इंटरनेटचा अतिवापर किंवा त्याचं एका समस्येत रूपांतर होणं, हा जगभरात सगळ्याच वयोगटांमध्ये आणि समाजाच्या सगळ्याच स्तरांमध्ये दिसून येणारा एक नवा सामाजिक प्रश्न आहे. आता हा धोका इतक्या मोठय़ा प्रमाणात वाढला आहे, की मानसिक आजारांची नोंद ठेवणाऱ्या ‘डीएसएम-५’ या ‘मॅन्युअल’मध्ये या गोष्टीची ‘आजार’ म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. साध्या-सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर आता इंटरनेटचं व्यसन वैद्यकीय जगतात एक मानसिक आजार म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सुदैवानं आपल्याला हवी असेल, तर याकरता वैद्यकीय मदतही उपलब्ध आहे. आपल्यापैकी सारेचजण आपापल्या स्मार्ट उपकरणांवर आणि त्यावरच्या कुठल्या ना कुठल्या सॉफ्टवेअरवर किंवा संकेतस्थळांवर अवलंबून असतो. मात्र एखाद्या गोष्टीवर अवलंबून असणं आणि तिचं व्यसन लागणं या दोन्हींमधली नियंत्रणरेषा जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण (म्हणजे प्रौढ व्यक्तीच) स्वनियंत्रण किंवा स्वत:साठी नियम घालून घेत नसू, तर आपल्या मुलांनीदेखील त्याचं पालन करावं अशी अपेक्षा कशी ठेवता येईल?

आमचा अनुभव विचाराल, तर अनेक लहान आणि किशोरावस्थेतली मुलं वेगवेगळ्या प्रकारचे ‘स्क्रीन’ आणि इंटरनेटच्या अगदी अधीन झालेली दिसतात. बहुसंख्य पालकांना मात्र अशा प्रकारांबद्दल किंवा त्यावरच्या उपाययोजनांबद्दल काहीच माहिती नसते. मुलांनी मानसिकदृष्टय़ा इंटरनेटवर अवलंबून असण्याबाबतच्या किंवा मुलांना त्यामुळे त्रास होत असल्याबाबतच्या लक्षणांबाबत पालकांमध्ये अजिबात जागरूकता नसल्यामुळे अनेकदा अशी प्रकरणं टोकाला गेल्यावरच आमच्यापर्यंत येतात. या समस्येकरता कुठून मदत मिळू शकेल याबाबतची माहिती तर पालकांना मुळीच नसते. शिवाय आपलं मूल चुकतं आहे, ही गोष्ट मान्य करण्याची पालकांची मुळात मनातून तयारी नसते. आपल्या मुलाला किंवा मुलीला असं व्यसन आहे यावरच त्यांचा विश्वास बसत नाही.

नुकत्याच आमच्या एका नेत्रतज्ज्ञ मित्रानं एका अगदी लहान वयाच्या मुलाबद्दल सांगितलं. या मुलाचं वय अवघं २ र्वष आहे. सातत्यानं मोबाइलचा स्क्रीन पाहिल्यामुळे त्याच्या एका डोळ्याची दृष्टी आता निकामी झाली आहे. जेव्हा जेव्हा हे बाळ रडत असे, तेव्हा त्याचे पालक त्याच्या डोळ्यांच्या अगदी जवळ स्मार्टफोनचा स्क्रीन धरत असत. त्यावर अ‍ॅनिमेशन आणि सोबतीला मोठा आवाजही असे. यामुळे काही काळ बाळाचं लक्ष तिकडं वेधलं जाई आणि ते शांत राही. हळूहळू त्याची एका डोळ्याची नजर कमकुवत होऊ लागली. पालकांच्या ध्यानात हा बदल यायला ३ ते ४ महिने लागले. पण आता काय उपयोग? हल्ली मुलांना ‘सांभाळण्या’साठी स्क्रीन, मोबाइल किंवा टॅब यांसारखी उपकरणं वापरली जातात. ज्यामुळे पालकांना ‘स्वत:साठी’ पुरेसा वेळ मिळतो. आपण सगळीकडे मुलं अशा स्मार्ट उपकरणांना अगदी चिकटलेली असल्याचं बघतो. अगदी त्यांच्या पापण्यांची उघडझापदेखील होत नसते. उपाहारगृहं, विमानतळ, डॉक्टरांचा दवाखाना यांसारख्या ठिकाणी ती इतर कुणाशी एक शब्दही बोलायला तयार नसतात. अगदी बागा आणि खेळाची मैदानं इथंसुद्धा ती मोबाइललाच चिकटलेली असतात. आपल्या स्वत:च्या मुलांबरोबरही वेळ घालवायला वेळ नसण्याइतके पालक ‘बिझी’ झाले आहेत का? आता अंतर्मुख होऊन परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे. आम्ही मुलांबाबत केलेल्या अभ्यासातून काही धक्कादायक निष्कर्ष दिसून आले आहेत. त्यामध्ये लहान मुलं (म्हणजे ४ र्वष ते किशोरवयीन) दररोज सरासरी ४ ते ९ तास स्क्रीनसमोर घालवतात. या स्क्रीनमध्ये टीव्ही आणि अन्य उपकरणांचा समावेश आहे. आम्हाला ही परिस्थिती अत्यंत धोक्याची आहे, असं वाटतं.

वीरेन (नाव बदललेलं आहे) हा एक ११ वर्षांचा मुलगा. त्याला व्हिडीओ गेम्स खेळण्याचं व्यसन लागलं होतं. गमतीसाठी खेळण्यापासून त्याची सुरुवात झाली. हळूहळू हा काळ दिवसाचे १० तास गेम्स खेळण्यापर्यंत वाढला. आमच्याकडे हे प्रकरण आलं, तेव्हा त्याला खाण्यापिण्याची शुद्धही जेमतेमच राहिली होती.  गेमचा रिमोट किंवा मोबाइल मोठय़ा माणसांनी काढून घेतला, तर तो अत्यंत हिंसक  प्रतिक्रिया देऊ लागलेला होता. त्याचे आई-बाबा कामावर जात असल्यामुळे, आजी-आजोबाच त्याची काळजी घेत असत. आजी-आजोबा दोघेही वृद्ध होते. त्यांना तंत्रज्ञानातलं फारसं कळत नव्हतं. त्याचं हे हिंसक वर्तन दिवसेंदिवस वाढू लागलं होतं. पालकांना मात्र या वागण्याबाबत काय करता येईल याची मुळीच कल्पना नव्हती. ही एक तात्पुरती अवस्था आहे, लवकरच वीरेन यातून बाहेर येईल असं त्यांना वाटत होतं. एके दिवशी त्याच्या आजी-आजोबांनी सतत गेम खेळण्यावरून रागावल्यावर त्यानं चक्क त्या दोघांना मारायला सुरुवात केली, आणि हा प्रकार आई-बाबांना सांगितलात, तर आपण आणखी मारू, अशी धमकीही त्यानं आजी-आजोबांना दिली. आजी-आजोबा आता त्याला टरकून राहू लागले. अखेर जोडून आलेल्या एका सुट्टीत आई-बाबा घरी असताना ही बाब उघडकीला आली. वीरेन किती आक्रमक झाला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. तज्ज्ञांची मदत घेणं जरुरीचं आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आमच्याकडे धाव घेतली.

सध्याच्या काळात गेमिंगचं व्यसन मोठय़ा प्रमाणावर दिसून येतं. ‘पबजी’, ‘पोकेमॉन—गो’, ‘फ्री फायर’, ‘कॉल ऑफ डय़ुटी’, यांसारख्या गेम्सचं व्यसन लागलेली अनेक प्रकरणं आमच्याकडे येत असतात. माझं मूल घरातून पळून गेलं तर? किंवा त्यानं स्वत:ला काही इजा करून घेतली तर? किंवा सर्वात वाईट म्हणजे त्याला ओरडलो, तर तो आत्महत्या करेल का?, यासारख्या भीतीच्या सावटामध्ये आजचे पालक जगत असतात. पालकांसाठी हा मोठा कसोटीचा काळ आहे. त्यांनी जागरूक राहिलं पाहिजे.

नुकत्याच आमच्याकडे ‘पॉर्नोग्राफी’चं व्यसन लागलेल्या ३-४ मुलांची अत्यंत गंभीर स्वरूपाची प्रकरणं आली होती. या मुलांच्या मित्रमैत्रिणींनी त्यांच्याशी संवाद साधल्यावर हे व्यसन उघडकीला आलं होतं. इंटरनेटवरची प्रत्येक गोष्ट जरी मोफत आणि सहज प्राप्त होण्याजोगी असली, तरी पालकांनी इंटरनेटचा वापर आणि आपल्या मुलाचं वर्तन यावर लक्ष ठेवलं पाहिजे. या लहान मुलांनी कुठल्या तरी संकेतस्थळावर ‘पॉर्न’ पाहिलं आणि त्यांना ते आवडू लागलं. त्यांची उत्सुकता वाढत गेली आणि हळूहळू त्याचं व्यसनामध्ये रूपांतर झालं. अगदी ८ वर्षांच्या लहान मुलांनीसुद्धा कोणत्या ना कोणत्या ‘ऑनलाइन प्लॅटफॉर्म’वर त्यांच्या वयाला अयोग्य असणारा किंवा पॉर्नोग्राफिक आशय पाहिलेला असतो. इंटरनेटवर कोणत्या गोष्टी असतात, त्यामुळे कोणते धोके पोहोचू शकतात आणि मुलांसाठी अयोग्य काय आहे, हे पालकांनी त्यांना सांगणं सक्तीचं केलं पाहिजे.

अश्लील आशय पाहणं किंवा तो ‘स्टोअर’ करणं बेकायदेशीर तर आहेच, शिवाय या आशयामध्ये कुठल्याही नातेसंबंधात असणाऱ्या चार मूलभूत गोष्टीच अस्तित्वात नसतात. त्या म्हणजे प्रेम, विश्वास, आदर आणि अनुमती. कुठल्याच पॉर्नोग्राफिक संकेतस्थळावर याचं पालन केलेलं दिसत नाही. आपणच स्वत:ला जागरूक केलं पाहिजे आणि आपल्या मुलांनादेखील! बोली भाषेत सांगायचं झालं तर, आपण जर मुलांना याबद्दल जागरूक केलं नाही, तर लवकरच ती नको त्या विषयात ‘पीएच.डी.’ प्राप्त करून बसतील.

वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रीन्स, समाजमाध्यमं, सेल्फी, ऑनलाइन खरेदी, डेटिंग अ‍ॅप्स या सगळ्याचं व्यसन लागणं आता सर्रास दिसू लागलं आहे. यासोबतच समाजमाध्यमांवर आपले ‘फॅन’ गोळा करणं आणि प्रतिक्रिया (कॉमेंट्स) देणं, यातून तत्काळ आनंद मिळवण्याकडे लहान-मोठे सगळ्यांचाच भर दिसतो आहे. असा चटकन आनंद मिळवण्याचं त्यांना व्यसनच लागलेलं आहे. अशा प्रकारच्या व्यसनाची चिन्हं लवकर ओळखणं आणि त्यावर उपाययोजना करणं महत्त्वाचं असतं. या लेखाच्या पुढच्या भागात आपण ही चिन्हं कोणती, त्यामागची कारणं, परिणाम आणि उपाययोजना यांबाबत पाहणारच आहोत.

दरम्यान, वाचकांना एक आवाहन करावंसं वाटतं. आपल्या मुलांनी विशिष्ट वेळच स्क्रीनसमोर असावं, याकरता ते कोणत्या उपाययोजना करतात ते त्यांनी आम्हाला कळवावं.  तुम्ही ज्या ज्या चांगल्या गोष्टी करता, त्या समाजातील इतर पालकांनीही मोठय़ा प्रमाणात कराव्यात याकरता आम्ही जरूर प्रयत्न करू. जर तुम्हाला एखाद्याला मदतीची गरज आहे, असं वाटत असेल, तरीही आमच्या ई-मेल आयडीवर संपर्क साधा. आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू. पालकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मुलांसोबत वेळ घालवला, उपकरणांऐवजी त्यांना अन्य पर्यायी गोष्टी उपलब्ध करून दिल्या, त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊन वेळ घालवला, तर अवाजवी ‘स्क्रीन टाइम’वर नक्कीच नियंत्रण आणता येईल.

नुकताच आम्ही एका शाळेतल्या मुलांशी संवाद साधला. त्या वेळी निष्का या ८ वर्षांच्या लहान मुलीनं सांगितलेलं एक वाक्य डोळ्यांत अंजन घालणारं आहे. निष्का म्हणते, ‘‘आम्हा मुलांना ‘मनोरंजना’ची गरज नाही, आम्हाला गरज आहे ‘संवादाची’!’’

आवाहन

आपल्या मुलांनी विशिष्ट वेळच स्क्रीनसमोर असावं, याकरता ते कोणत्या उपाययोजना करतात ते त्यांनी आम्हाला कळवावं.  निवडक प्रयत्नांना प्रसिद्धी दिली जाईल. तुम्ही ज्या ज्या चांगल्या गोष्टी करता, त्या समाजातील इतर पालकांनीही कराव्यात याकरता आम्ही जरूर प्रयत्न करू. जर तुम्हाला एखाद्याला मदतीची गरज आहे, असं वाटत असेल, तरीही आमच्या व चतुरंगच्या ई-मेल आयडीवर संपर्क साधा.  chaturang@expressindia.com

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी