मुग्धा बखले-पेंडसे

शुभांगी जोशी-अणावकर

Jayjaykar20@gmail.com

डॉ. समीर मित्रगोत्री ‘हार्वर्ड’मध्ये ‘बायोइंजिनीअरिंग’चे प्राध्यापक आहेत. आतापर्यंत त्यांचे ३०० पेक्षा जास्त ‘पेपर’ प्रकाशित झाले आहेत आणि १७० पेक्षा अधिक ‘पेटंट’ त्यांच्या नावावर आहेत. मराठी माध्यमांतून शिकूनही त्यांनी हे यश संपादन केलं. ते सांगतात, ‘‘कोणत्याही संशोधनासाठी आवश्यक गोष्टी असतात कष्ट, महत्त्वाकांक्षा, जिद्द, अभ्यास. त्यावर भर हवा. भाषा शिकवता येते आणि शिकता येते. मराठी भाषा माझ्यासाठी माणसं जोडण्याची भाषा आहे आणि शिकायची भाषा आहे इंग्रजी. भाषेच्या बाबतीत  ‘कम्पार्टमेंटलाइझ’ केलं आणि त्याचा फायदा झाला..’’

मूळचे सोलापूरचे असलेले डॉ. समीर मित्रगोत्री सध्या ‘हार्वर्ड’मध्ये ‘बायोइंजिनीअरिंग’चे प्राध्यापक आहेत. आतापर्यंत त्यांचे ३०० पेक्षा जास्त ‘पेपर’ प्रकाशित झाले आहेत आणि १७० पेक्षा अधिक ‘पेटंट’ त्यांच्या नावावर आहेत. बायोइंजिनीअरिंगशी संलग्न अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये ते विविध पदे भूषवत आहेत आणि अनेक जर्नल्सच्या संपादकीय मंडळांवरही ते कार्यरत आहेत. मुंबईतील यू.डी.सी.टी.मधून बी.केम. केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध ‘एम.आय.टी.’ (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) मधून केमिकल इंजिनीअिरगमध्ये पीएच.डी. केली आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’ येथे ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामधून अकरावी-बारावी होण्यापूर्वी त्यांचे पाचवी ते दहावीचे शिक्षण हरीभाई देवकरण  प्रशालेत झाले व चौथीपर्यंतचे शिक्षण तिथल्याच ‘नूतन मराठी विद्यालय’ येथे झाले. मराठी माध्यमातून शिकण्याच्या त्यांच्या अनुभवावरच्या या गप्पा –

प्रश्न : समीर, सोलापुरात तुमचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मराठीतून झालं. पण आठवीमध्ये जेव्हा फक्त गणित- विज्ञानाच्या अभ्यासाचं माध्यम इंग्रजी झालं, तेव्हा काही अडचणी आल्या होत्या का?

समीर : नाही, फारशा. मुळात तेव्हा दृष्टिकोनच असा होता की आपल्याला जे सांगितलं जातंय, शिकवलं जातंय, ते मन लावून शिकायचं, नीट समजेपर्यंत अभ्यास करायचा. आजूबाजूचं सगळं वातावरण, संभाषण मराठीतच होतं. फक्त शिकवणं आणि प्रश्नपत्रिका लिहिणं इंग्रजीत होतं. मात्र व्याख्या पुस्तकात असल्याने त्या वाचून बऱ्यापैकी पाठ झालेल्या असायच्या.

प्रश्न : शाळेतून ‘दयानंद महाविद्यालया’ मध्ये गेल्यावर, तिथे तर संपूर्ण अभ्यास इंग्रजीतून असणार होता. तेव्हा काही फरक जाणवला का?

समीर : फरक जाणवला तो सामाजिकदृष्टय़ा. म्हणजे झालं असं की, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाची (कॉन्व्हेन्ट) मुलं पहिल्यांदा एकत्र आली. तेव्हा पहिल्यांदा जाणवलं की यांचं इंग्रजी वेगळं आहे. आम्ही विज्ञान, गणित इंग्रजीतून शिकलो तरी विचार मराठीतच करायचो, त्यामुळे आमचं इंग्रजी बोलणं हे मराठीचं भाषांतर केल्यासारखं असायचं.

प्रश्न : त्याचा परिणाम महाविद्यालयामध्ये प्रश्नपत्रिका लिहिताना, वर्गात उत्तरं देताना झाला का, कितपत कठीण गेलं?

समीर : महाविद्यालयाची प्रश्नपत्रिका शाळेपेक्षा वेगळी असते. म्हणजे नुसत्या व्याख्या, फॅक्ट्स यावर गाडी थांबत नाही. मोठी तपशीलवार उत्तरं, स्पष्टीकरणं द्यावी लागतात. विचार करून लिहायला किंवा बोलायला लागलं तर मग विचार मुळात मराठीतच असल्याने सगळं भाषांतर केल्यासारखंच वाटायचं. पण इंग्रजी माध्यमातील मुलं मात्र अस्खलित इंग्रजी बोलायची.

प्रश्न : त्यामुळे न्यूनगंड आला का?

समीर : वेगळेपणा नक्कीच जाणवला. मात्र सगळे मित्र चांगले होते त्यामुळे न्यूनगंड आला नाही. शाळेत, महाविद्यालयामध्ये शिक्षकही मराठीच होते. तेव्हा सगळं संभाषण मराठीतच होत असे. असं वाटायचं की आपली मराठी भाषा माणसं जोडण्याची भाषा आहे आणि शिकायची भाषा आहे इंग्रजी. म्हणजे थोडंसं ‘कम्पार्टमेंटलाइझ’ केल्यासारखं होतं.

प्रश्न : हे तुमच्या लक्षात आल्यानंतर अस्खलितपणे इंग्रजी बोलण्यासाठी काही विशेष प्रयत्न केलेत का?

समीर : नाही, फारसे नाहीत. निदान त्या वेळी तरी नाही. कारण इंग्रजीत बोलता आलं नाही की आम्ही सरळ मराठीत बोलायला सुरुवात करायचो. पण मुंबईला गेल्यावर मात्र ते बदललं.

प्रश्न : हो, कारण तुम्ही मुंबईत यू.डी.सी.टी.ला आलात. तिथे वेगवेगळ्या राज्यांतून मुलं येतात. म्हणजे मराठी मुलं अगदीच कमी. हा बदल कसा काय झेललात?

समीर : हो, तिथे आल्यावर रोजच्या वापरातील मराठीचा वापर खूपच कमी झाला. त्यामुळे तिथं पहिल्यांदा इंग्रजी भाषा रोजच्या जीवनाचा भाग व्हायला लागली. पण तरी अगदी जरूर तेवढंच बोललं जायचं. कारण हिंदीचा पर्याय होताच ना. शिक्षण तर सगळं इंग्रजीमध्येच होतं. तिथे एम.एम. शर्मासारखे प्राध्यापक होते. त्यांची ओघवती भाषा, बोलणं याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. तसं आपल्यालाही यायला पाहिजे असं वाटायला लागलं.

प्रश्न : सेमिनारमध्ये प्रोजेक्टचं सादरीकरण करताना किंवा नंतरही कॅम्पस इंटरव्ह्य़ू, नोकरीच्या मुलाखती देताना काही अडचणी आल्या का?

समीर : अडचणी नाही आल्या. कारण सेमिनारमध्ये कसं, तुम्ही शास्त्रीय संकल्पनाच मांडत असता. त्यामुळे शास्त्रीय नावं, शब्द येत असले की पुरेसं होतं. अर्थात कुणी प्रश्न विचारले की जरा पंचाईत व्हायची. पण हळूहळू त्याची सवय झाली. सुरुवातीची माझी सेमिनारमधील प्रेझन्टेशन्स फार चांगली झाली असतील असं मला वाटत नाही. पण कोणी टीका केल्याचं किंवा कौतुकही केल्याचं आठवत नाही.

प्रश्न : इंग्रजी सुधारणं, वाढवणं यासाठी नेमके प्रयत्न कधीपासून केलेत?

समीर : याच काळात. मी तेव्हा पहिल्यांदा इंग्रजी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. मला, माझ्या मित्रांना अमेरिकेला जाण्यासाठी जी.आर.ई. परीक्षा द्यायची होती. त्यातल्या इंग्रजी सेक्शनसाठी हजारो इंग्रजी शब्द, त्यांचे अर्थ शिकायला लागत. मग त्यातून एक टूम निघाली की ‘इंग्रजी पेपर वाचू या’ म्हणजे शब्दसंग्रह वाढेल. पण खरं सांगायचं तर त्यानंतरही माझा इंग्रजी सेक्शनचा ‘स्कोअर’ मोघमच होता.

प्रश्न : पण तुमचा एकूण ‘स्कोअर’ छानच असणार. कारण यू.डी.सी.टी.मधून तुम्ही पुढच्या शिक्षणासाठी एकदम जगात अग्रगण्य असलेल्या एम.आय.टी.ला  गेलात. आपल्या वाचकांच्या हे निर्देशनास आणून द्यायला हवं की एम.आय.टी.ला प्रवेश मिळवणं हे अजिबातच सोपं नाही. अर्थातच मराठी माध्यमामुळे इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आली नाही. पण पुढे संपूर्ण इंग्रजीच होतं. त्याच्याशी कसं काय जुळवून घेतलं?

समीर : इथे, अमेरिकेत आल्यावर मराठीचा वापर जवळजवळ थांबलाच. शिवाय इथलं इंग्रजी आपल्यापेक्षा वेगळं होतं. त्यामुळे तो वापर, ते संदर्भ, इथले उच्चार शिकायला लागले. या सगळ्याकडे लक्ष देत असताना बोलण्याचा प्रवाह चालू ठेवणं, त्यातच आपले विचार योग्य शब्दात मांडता येणं हेसुद्धा शिकायला लागलं. या सगळ्याला वेळ लागला. कारण इतकं दिवसभर इंग्रजी वापरायची वेळ कधीचआली नव्हती तोपर्यंत. अगदी मुंबईतसुद्धा. ‘टेक्निकल’ बोलायला काही प्रश्न येत नसे. पण त्याच्या बाहेर जाऊन सहज गप्पा वगैरे मारायची सवय हळूहळू होत गेली.

प्रश्न : म्हणूनच कोणत्याही गोष्टीत सरावाला इतकं महत्त्व आहे, नाही का? आणखी एक विचारायचं म्हणजे, अमेरिकी लोकांचा तुमच्याकडे किंवा इतर देशातून आलेल्या इतर विद्यार्थ्यांकडे बघायचा दृष्टिकोन कसा होता?

समीर : मुग्धा, तू स्वत: इथे विद्यार्थिनी म्हणून आली आहेस, त्यामुळे तुला माहीतच आहे की अमेरिकी लोकांचा दृष्टिकोन अगदी चांगलाच असतो. म्हणजे कोणाचं इंग्रजी समजलं नाही, उच्चार समजले नाहीत तर अगदी शांतपणे पुन्हा विचारून समजावून घेणार की तुम्ही काय म्हणताय, कमी लेखणं वगैरे तर फारच दूर.

प्रश्न : मग त्या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे जो इंग्रजीचा भाव/प्रभाव /प्रादुर्भाव आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

समीर : हो, खरं आहे ते दुर्दैवानं. मला पण जाणवलंय ते. माझ्या लहानपणी आणि नंतरसुद्धा. आपल्याकडे काही वेळा ते कमी लेखलं जातं. दुसऱ्या कोणत्याच देशात मला तसं जाणवलं नाही. माझे जपान, चीन आदी देशांतले कितीतरी विद्यार्थी सुरुवातीला इंग्रजी बोलताना अडखळतात. पण त्यामुळे कोणीही बोलीभाषा सोडतील असं मला तरी वाटत नाही. मी युरोपला जातो. तिथेही लोकांना आपापल्या भाषेचा खूप अभिमान आहे. एखादी भाषा बोलल्याने कोणाची किंमत ठरू नये. भाषा हे शेवटी विचार व्यक्त करण्याचं केवळ माध्यम आहे आणि विचाराला जास्त महत्त्व आहे. ते कमी होता कामा नये.

प्रश्न : एम.आय.टी.मधून तुम्ही मग ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’त, नोकरी स्वीकारली? प्राध्यापकांची नोकरी, विद्यार्थी सगळे आंतरराष्ट्रीय, मग कसं जमलं सगळं?

समीर : तोपर्यंत इंग्रजीची चांगलीच सवय झाली होती. त्यामुळे मला स्वत:ला ही नोकरी स्वीकारण्यात काहीच अडचण नव्हती. उलट आता परिस्थिती वेगळी होती. कित्येक विद्यार्थी असे येत होते ज्यांचं इंग्रजी अजिबातच चांगलं नव्हतं. मी स्वत: त्यातून गेलो असल्यानं मला अशा मुलांबद्दल खूपच सहानुभूती असते. ते बोलताना अडखळत असतील तर मी आवर्जून त्यांना सांगतो की, ते काय म्हणतायत ते मला समजतंय. हळूहळू त्यांना आत्मविश्वास येतो. एकुणातच इंग्रजीपेक्षा त्यांना काय म्हणायचंय ते समजून घेण्यावर माझा भर असतो. शिवाय प्रत्येक देशातल्या इंग्रजीचा बाज वेगळा असतो, उच्चार वेगळे असतात. तेही समजून घ्यावे लागतात. माझा एक पीएच.डी. करणारा हुशार विद्यार्थी होता. एकदा तो स्वत:च्या इंग्रजी बोलण्यावर अगदी निराश होऊन माझ्याकडे आला. तेव्हा मी त्याला हेच सांगितलं की संशोधनासाठी आवश्यक गोष्टी काय आहेत – कष्ट, महत्त्वाकांक्षा, जिद्द. त्या तर सगळीकडे सारख्याच असतात. त्यावर भर दे. भाषा येईल तुला हळूहळू. इतक्या मोठय़ा मुलांना आम्ही महत्त्वाकांक्षा, जिद्द नाही शिकवू शकत. भाषा काय, ती शिकवता येते आणि शिकता येते. मी विद्यार्थी असताना एकदा माझ्या प्राध्यापकांबरोबर बऱ्याच विषयांवर चर्चा करत होतो. तेव्हा ते म्हणाले होते, ‘इंग्रजीबद्दल चिंता करू नको. तुम्ही जर आइनस्टाइन असाल तर तुम्ही कोणत्याही भाषेत बोललात तरी लोक ती भाषा शिकून तुम्हाला समजून घेतील.’

प्रश्न : अरे वा! महत्त्वाचा मुद्दा आहे! शेवटी मागे वळून बघताना मराठी माध्यमातून शिकण्यामुळे काही तोटा किंवा फायदा झाला असं वाटतं का?

समीर : मला वाटतं की फायदाच झाला. एक तर आधी म्हटल्याप्रमाणे मला इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती असते, कारण मी स्वत: त्यातून गेलो आहे. शिवाय इंग्रजी ही माझी पहिली भाषा नसल्याने माझं इंग्रजी हे साधं-सोपं असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना समजायला सोप्पं जातं. विशेष करून परदेशी विद्यार्थ्यांना. शेवटी, भाषा हे इतरांपर्यंत पोचण्याचं, त्यांच्याशी संवाद साधण्याचं माध्यम आहे. भाषा सोपी असेल तर हे साधणं सहज शक्य होतं.

समीर, तुमच्या अत्यंत व्यग्र दिनचय्रेतून तुम्ही आमच्याशी बोलण्यासाठी वेळ काढलात यातून तुमचे मराठीवरचं प्रेम जाणवतं. आपल्या गप्पांवरून हे स्पष्ट दिसतंच आहे की मराठी माध्यमामुळे आपल्या यशाला कुठेही बाधा आली नाही. आपण मांडलेली मते, अनुभव आमच्या वाचकांना नक्कीच मार्गदर्शक वाटतील, अशी आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.  ह

अनेक शिक्षणतज्ज्ञ, मनोविकासतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ ‘मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत शिकू द्यावे,’ असे तळमळीने सांगत असतात. मात्र कधी समाजमनाचा रेटा, नातेवाईकांचा दबाव, मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा, तसेच आपला निर्णय चुकणार तर नाही ना याची भीती, इंग्रजी बोलताना आपल्या पाल्याला अडचण येऊ नये, त्याच्यात न्यूनगंड निर्माण होऊ नये, याची चिंता आजच्या पालकांना वाटत असते. त्या कात्रीत सापडलेल्या पालकांना निर्णय घेणे सुकर व्हावे, मातृभाषेतून शिकूनही चांगले करिअर करता येते, याची खात्री पटावी, यासाठी मराठी माध्यमातून शिकलेल्या व विविध क्षेत्रांत सर्वार्थाने यशस्वी असलेल्या व्यक्तींच्या मुलाखतीचं हे सदर दर पंधरवडय़ाने.