News Flash

जगणं बदलताना : हटके  विचारांचा ‘थरार’

आजच्या मुलांसमोर करिअरसाठी, करमणुकीसाठी, आयुष्याचा आनंद उपभोगण्यासाठी जितके पर्याय उपलब्ध आहेत

अपर्णा देशपांडे adaparnadeshpande@gmail.com

सगळं नेहमीच्या धाटणीप्रमाणे सुरू असताना आजची स्मार्ट मुलं अचानक काहीतरी नवीनच विचार पुढय़ात मांडतात. त्यांच्या कल्पना ऐकल्या की वाटतं, ‘‘अरे! हे आपल्याला का नाही सुचलं? असंही करता येऊ शकतं की!’’ किंवा वाटतं की हरकत नाही असंही करून बघायला. कधी कधी त्यांचे मार्ग चुकीचे वाटतात, कारण त्यात संभाव्य धोकेही असतात. पण प्रत्येक वेळी तो चुकीचाच आहे असं म्हणणं म्हणजे त्यांच्या सचेतन विचारशक्तीवर आणि सर्जनशीलतेवर अन्याय होईल ना? त्यांच्या हटके  विचारांचा थरार त्यांनाही अनुभवू द्या नि आपणही त्यात सहभागी होऊ या!

व्यवस्थापन क्षेत्रात ‘नाइन डॉट्स प्रॉब्लेम’ ही संकल्पना खूप पूर्वीपासून वापरली जाते. नऊ टिंबांच्या चौकोनाविषयीचं कर्मचाऱ्यांना दिलेलं ‘नाइन डॉट्स प्रॉब्लेम’ हे एक कोडं. त्यात चौकोनी (बॉक्स) आकारातील नऊ टिंबं पेन न उचलता चार सलग रेघांनी जोडायची होती. ते कोडं सोडवणाऱ्यानं त्यात एक त्रिकोण आणि त्याला छेद देणारी चौथी रेघ काढली, जी बाणासारखी सरळ चौकोनाबाहेर दाखवली होती. कोडं सुटलं.. अगदी वेगळ्या प्रकारे.

तिथपासूनच नेहमीच्या पठडीतील मार्गानं न जाता काहीतरी नवीन पद्धती किंवा नवीन विचार मांडण्याला ‘आउट ऑफ द बॉक्स’ असं म्हणण्याची प्रथा सुरू झाली. ही एक सकारात्मक संज्ञा आहे.

धोपट मार्ग बाजूला सारून जे हवं ते साध्य करण्यासाठी नावीन्यपूर्ण, मनोरंजक, तर कधी ‘अतरंगी’ विचार मांडताना ती वापरली जाते. समस्येकडे बघण्याची नवीन मुलांची नजर आपल्यापेक्षा वेगळी आहे. आणि केवळ वेगळी आहे म्हणून ती चुकीचीच असेल असं तर नाही ना? रोजच्या जगण्यातही असे काही प्रसंग किंवा गोष्टी घडत असतात. कधी तंत्रज्ञानाच्या रेटय़ात, तर कधी तरुणाईच्या तल्लख, रसरशीत विचारातून, ज्या मागील पिढीला अचंबित करतात. त्यांच्या दृष्टीनं हे सगळं ‘आउट ऑफ द बॉक्स’ असतं.

‘‘हॅलो आई, आज खूप मोठी असाइन्मेंट पूर्ण करायची आहे. उद्या ‘बॉड मीट’ आहे. (सर्वसामान्यांसाठी – बोर्ड ऑफ डिरेक्टरसह मीटिंग!) आम्ही सगळे आता कॉफीशॉपमध्ये बसून रात्रीतून हे पूर्ण करणार आहोत. जयची मॉम काही स्नॅक्स आणून देणार आहे सगळ्यांसाठी, सो चिल! मी पहाटे चापर्यंत येईन. डोन्ट वरी.. सॅम ड्रॉप करेल मला. उद्या पुन्हा साडेनऊला प्रेझेंटेशन आहे.. हो..हो. सगळे आहेत. नेहमीचं आहे ना हे आता? जेवून झोपा तुम्ही.’’ अंकितानं ऑफिस झाल्यावर रात्री आठला आईला फोन करून हे कळवलं. सुरुवातीला आई-बाबांना हे असं बाहेर बसून ऑफिसचं काम करणं फार विचित्र वाटलं होतं. पण आताशा त्याची सवय होत होती. लग्न होण्याआधीच मी स्वत:ला झोकून देऊन काम करू शकेन, लग्नानंतर मला इतकं जमेल न जमेल, म्हणत अंकिता प्रचंड काम करत होती.

रात्री-अपरात्री  हे असं बाहेर कॅफेत थांबणं कितीसं सुरक्षित आहे, हे बघायला एक दिवस खरंच तिचे आई-बाबा रात्री दोन वाजता कॉफी शॉपवर गेले. तर गाडी दूर पार्क करावी लागली इतकी गर्दी होती. जवळपास सगळेच तिथे काम करत होते. ‘‘काय वेगळंच जग आहे ना आजच्या मुलांचं? यांच्यापुढची आव्हानं आणि त्यांना भिडण्याची त्यांची पद्धत, सगळंच अनोखं आहे.’’ असं म्हणाले होते बाबा. त्यानंतर मात्र ते थोडेसे निश्चिंत झाले. त्यांनी बघितलं, की रात्री जागून अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मध्यरात्रीची स्नॅक सेंटर्स उघडलेली आहेत. तासाभरात वीस-वीस किलो पोह्य़ांचा फडशा पडतो. वसतिगृहात राहाणारी मुलंच तिथे जातात असं नाही. घरी राहाणारी मुलंही काहीतरी वेगळं करण्यातील मजा म्हणून तिथे गर्दी करतात. या तरुण वर्गाला मानगुटीवर बसलेल्या ‘डेड लाइन’चा, कामाचा ताण झेलत सतत स्वत:ला सिद्ध करण्याची कसरत करायची असते. अशा वेळेस वागण्यातील समतोल आणि मेंदू शांत राखण्यासाठी हलक्याफुलक्या वातावरणात सहकारी मित्रांसोबत काम करण्याचा हा तोडगा थोडा वेगळा असेल, पण अगदी चुकीचा कसा म्हणता येईल? आजच्या सळसळत्या तरुणाईसाठी प्रत्येक वेळी दोन अधिक दोन चारच असतील असं नाही.

‘‘पार्थ, केस काप ना रे! केवढं झापरं करून ठेवलंय! दाढी पण कर बाबा. ओंगळवाणं आणि विचित्र वाटतं.’’ बाबा वैतागून म्हणाले. ‘‘अहो, ‘क्रिएटिव्ह टीम’मध्ये आहे मी.  ‘मेन बन’ (सर्वसामान्यांसाठी – पुरुषांचा आंबाडा!) हे आजचं स्टाइल स्टेटमेन्ट आहे माहीतेय का तुम्हाला? तुम्हाला हे असं बघायची सवय नाही.. आणि असं राहिलं की कुणीतरी मोठी व्यक्ती वाटतो मी! फिल्म एडिटिंग, रेकॉर्डिगची कामं मिळायला सोपं जातं. कूल!’’

‘‘कूल काय कूल? तुझं उत्तम काम बोललं पाहिजे. ते नीट नाही झालं, तर ‘बिनपाण्याची’ होईल आपोआपच. हे झावळ पोसल्यानं काम मिळणार आहे का तुला?’’

आई नेहमीसारखं सावरून घेत म्हणाली, ‘‘जाऊ द्या हो. आपल्याला नाही समजणार या मुलांची मानसिकता. काय प्रचंड स्ट्रगल आहे आपण बघतोय ना? काम मिळालं तरच योग्यता सिद्ध करेल ना तो? जीवनशैलीबद्दलच्या आणि राहाण्याच्या आपल्या काळातल्या मान्यताच बरोबर  आणि आताच्या चुकीच्या, असा दुराग्रह करून कसं चालेल?’’

आजच्या मुलांसमोर करिअरसाठी, करमणुकीसाठी, आयुष्याचा आनंद उपभोगण्यासाठी जितके पर्याय उपलब्ध आहेत, तितकीच आव्हानंदेखील आहेत. आपण आपल्या अनुभवानुसार आपल्याच विचारांच्या रिंगणात फेर धरत असतो. मुलांच्या प्रतिक्षिप्त क्रिया, त्यांचं वागणं, प्रतिक्रिया, त्यांची मतं आणि आकांक्षा यांकडे त्यांच्या सुधारित चष्म्यातून बघितलं तर आपल्यालाही त्यांच्याबरोबर भरभरून जगण्याचा आस्वाद घेता येतो.

या एक पाऊल आपल्या रिंगणाबाहेर टाकण्यात कमीपणा न वाटून घेता आपणच आपलं रिंगण मोठं करायला हवं. किंवा त्यांच्या रिंगणात प्रवेश करून तरी बघायला हवं. लीना आणि अमित यांनाही असाच अनुभव आला. त्यांच्या तरुण मुलानं- म्हणजे अद्वैतनं एक प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडला आणि ते उडालेच!

‘‘बाबा, तुमच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये पार्टी देण्याऐवजी आपण मोटारसायकलवरून गोव्याला जाऊ. भन्नाट मज्जा येईल!’’

‘‘वेड लागलं का तुला?’’ आईची अगदी अपेक्षित प्रतिक्रिया.

‘‘आई, बाबांच्या जुन्या अल्बममध्ये बहुतेक सगळेच फोटो बाइकवरचे आहेत. म्हणजे ‘बाइकिंग’ आवडायचं त्यांना. हो ना?’’

‘‘हो. पण तेव्हा मी तरुण होतो.’’

‘‘आत्ताही आहात. तुमचं मोटारसायकल वेड असं दाबून का ठेवता तुम्ही? चला ना, थांबत थांबत जाऊ. जमेल तिथे खाऊ. गोव्याच्या आजूबाजूच्या नव्या जागा शोधू. काय म्हणता?’’ आणि बाबा तयार झाले. काही दिवस सराव करून दोन गाडय़ांवर जेव्हा प्रत्यक्षात ते गेले, तेव्हा एक वेगळंच जग अनुभवायला मिळालं. आईलापण तो अनुभव अत्यंत रोमहर्षक वाटला. आपण आतापर्यंत कधीच स्वप्नातही असा विचार कसा नाही केला याचं त्यांना आश्चर्य वाटलं.

‘‘आई , मी आणि स्नेहा ऋषिकेशला  ‘अ‍ॅनिमल केअर ट्रेनिंग कॅम्प’ला जाऊ?’’ ऋता खूप उत्साहात विचारत होती.

‘‘हे काय नवीनच? शेजारच्या टॉमीला साधं पंधरा मिनिटं फिरायला न्यायचा उल्हास नाही आणि सरळ ऋषिकेश?’’

‘‘तिथले हत्ती आहेत ना, त्यांना खायला देणं, आंघोळ घालणं आणि ऋषिकेश फिरणं, असा कार्यक्रम आहे. किती एक्सायटिंग ना!’’

‘‘तुम्हाला कळत कसं नाही गं.. हा फक्त जाहिरातीचा भाग आहे. आपण आता घरी हत्ती पाळणार आहोत का? असले ट्रेनिंग कोर्स काय कामाचे?’’ आई समजावत म्हणाली. तसा लगेच मोहरा दुसरीकडे वळवत ऋता म्हणाली, ‘‘मग इथेच लोहगडावर ‘नाइट टेन्ट कॅम्प’ला जाऊ? ‘स्टार गेझिंग’ प्रोग्रॅम आहे. आपल्याच ताऱ्यांची, ग्रहांची माहिती नसते आपल्याला.’’

‘‘हो? काहीही! तिथे रात्री तरुण मुलं-मुली खरंच ताऱ्यांचा अभ्यास करणार आहेत?’’

‘‘येस! ताम्हणे मॅडम आणि सर असतील सोबत. तिथेच चुलीवर स्वयंपाक, पत्रावळीवर जेवण.. जाम थ्रिलिंग आहे!’’ ऋता आपली बाजू लावून धरत म्हणाली.

‘‘जाऊ दे गं तिला! दोन वर्षांनी अमेरिकेला जाणार आहे ती. तिथे प्रत्येक कार्यक्रम काय आपल्या परवानगीनंच करणार आहे का? मुलांना स्वत:ला सांभाळत समूहात मिसळणं आलं पाहिजे बघ. पेटीत बंद तर नाही करू शकत ना त्यांना? जा बेटा. जपून राहा आणि सतत संपर्क ठेवा, बस.’’ ऋतानं आनंदानं टाळी दिली बाबांना. पालकांना त्यांच्या काळात हे असं कलंदर आयुष्य जगायला नाही मिळालं, पण या काळातील मुलांसमोर भरभरून जगण्यासाठी अशा असंख्य ‘आउट ऑफ द बॉक्स’ गोष्टी आहेत.

हे सगळं वेगळं आहे, नवीन आहे, पण म्हणून चुकीचं कसं म्हणता येईल? अनेक विषय आणि अनेक नवे सामाजिक बदल, जसं समलैंगिक विवाह, ज्येष्ठांचे ‘लिव्ह इन’ संबंध, तरुण मुलींनी महानगरपालिकेच्या कचरागाडय़ा चालवणं, हे पूर्वीपेक्षा नक्कीच वेगळं आहे. गैर अजिबातच नाही. पिढीगणिक माणसांच्या मानसिकतेत मोकळेपणा येतो. पूर्वी निषिद्ध ठरवलेले विषय चर्चेला येत असतात, सतत मन मारून समाजाला हवं तसं जगण्यापेक्षा आपण जसे आहोत तसं स्वत:ला स्वीकारण्याची हिंमत हळूहळूच रूढ होत असते. प्रत्येक मागच्या पिढीला पुढच्या पिढीच्या काही गोष्टी विचित्र आणि ‘काहीतरीच’ वाटत असतात, कारण तसं काही घडण्याची शक्यताच त्यांनी गृहीत धरलेली नसते. अगदी अलीकडच्या काळात ‘कोविड’ रुग्णांच्या मनोरंजनासाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी गाणं म्हणणं, बऱ्या होत आलेल्या रुग्णांनी गरबा नृत्य करणं, हे नक्कीच वेगळं आणि भावनाप्रधान कृत्य आहे. असं आधी कधी सहसा घडत नव्हतं.

एका कॉलनीतील तरुण मुलांनी गेल्या महिन्यात टाळेबंदीमध्ये एक भन्नाट कल्पना राबवली. तिथल्या सगळ्यात उंच घराच्या गच्चीवरील टाकीवर दोन मोठाले स्क्रीन लावले. आजूबाजूच्या घरातील (मोठय़ा सदनिका नाही, जमिनीवरची छोटी घरं) कुटुंब आपापल्या घराच्या गच्चीत  आले . प्रत्येक घरात अंतर असल्यानं विलगीकरणाचा नियम पाळला गेला होता. सगळ्यांनी एकाच वेळी एकत्र क्रिकेट सामना बघितला. स्टेडियमवर एकत्र जल्लोष करत मॅच बघितल्याचा अवर्णनीय आनंद मिळाला. आहे त्या परिस्थितीत आनंद मिळवण्याची ही कल्पना छान आहे. आउट ऑफ द बॉक्स!

आजच्या तरुणाईची भाषा वेगळी आहे. अचानकच काहीतरी भन्नाट विचारांचं ताट ते आपल्या पुढे वाढून ठेवतात. त्याची चव नक्कीच निराळी असणार. पण न चाखताच बेचव म्हणणं हा अन्याय असेल. नाही का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 1:04 am

Web Title: jagna badaltana tought of today s smart kids
Next Stories
1 पुरुष हृदय बाई : मी गोंधळलेला पुरुष
2 जोतिबांचे लेक  : संस्कारक्षम मनाचं घडणं
3 गद्धेपंचविशी : ‘योगभ्रष्ट’ची दहा वर्ष!
Just Now!
X