01 June 2020

News Flash

पडसाद : ‘मी टाइम’बरोबर थोडय़ा तडजोडीची तयारी हवी

मी आणि माझा नवरा, आम्हाला दोघांनाही वाचनाची आवड. तोच संस्कार आमच्या मुलीवर व्हावा म्हणून आम्ही आग्रही आहोत.

संग्रहित छायाचित्र

‘मोहमायाजाल’ सदरातील मंजुला नायर यांचा ‘इंटरनेटचे व्यसन’ (२ मे) हा लेख वाचला. त्यात त्यांनी पालकांना आवाहन केलं आहे, की तुम्ही तुमच्या मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवण्यासाठी काय करता ते लिहून पाठवा. ते वाचून आम्ही आमच्या परीनं घरी काय प्रयत्न करतो ते कागदावर उतरवल्यावाचून राहावलं नाही.

मला ६ वर्षांची एक मुलगी आहे. ती आमच्या आयुष्यात आली त्या पहिल्या दिवसापासून तिला मोबाइल आणि इंटरनेट यापासून दूर ठेवण्याचा मी कटाक्षानं प्रयत्न करत आले आहे. आताच्या काळात मुलांना या दोन गोष्टींपासून दूर ठेवणं म्हणजे काही तरी विशेष करणं आहे, असं याकडे बघितलं जातं. खरं तर ते एवढं अवघड नाहीये; पण ते साध्य करण्यासाठी प्रत्येक आई-बाबाला आपल्या ‘मी टाइम’बरोबर बरीच तडजोड करावी लागते आणि ती आम्ही स्वखुशीनं करायचं ठरवलं आहे.

मी आणि माझा नवरा, आम्हाला दोघांनाही वाचनाची आवड. तोच संस्कार आमच्या मुलीवर व्हावा म्हणून आम्ही आग्रही आहोत. ती लहान असल्यापासूनच वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं तिच्यासाठी आणणं आणि वेगवेगळ्या गोष्टी तिला सांगणं किंवा वाचून दाखवणं हे आम्ही सातत्यानं करतोय. तिला आता गोष्टी ऐकण्याचं एवढं वेड लागलंय, की एक दिवस गोष्ट ऐकली नाही तर तिला चैन पडत नाही.

मी नोकरी करते. त्यामुळे दिवसातले ९ तास मी तिच्यापासून दूर असते; पण ‘क्वालिटी टाइम’वर माझा विश्वास असल्यानं मी घरी आल्यानंतरचा सगळा वेळ तिचा असतो. त्या वेळात मला स्वयंपाकघरातही शिरावं लागू नये म्हणून स्वयंपाकाला बाई ठेवली आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याचा मला अतिशय आनंद होतो.

आम्ही भारताबाहेर बहारीनमध्ये राहतो. इथली हवा इतकी लहरी आहे, की आम्हाला दररोज घराबाहेर पडून मोकळ्या हवेत जाण्याचं सुख उपभोगता येत नाही; पण जेव्हा हवा चांगली असेल तेव्हा मुलीला बागेत घेऊन गेल्याशिवाय मात्र मी राहात नाही, घरातच नवनवीन खेळ  खेळतो.

मी घरी नसते तेव्हा माझी मुलगी तिच्या आजीजवळ असते. त्यांच्याकडून ती वेगवेगळी गाणी आणि स्तोत्रं शिकली आहे. त्याचप्रमाणे हस्तकला आणि चित्रकलाही. कधी आजीच्या मदतीनं, कधी स्वत:च्या कल्पनेनं, तर कधी ‘यूटय़ूब’वरचे व्हिडीओ बघून ती विविध गोष्टी करत असते. ‘लेगो’ची असंख्य मॉडेल्स ती तिच्या कल्पनेतून बनवत असते.

मी किंवा तिची आजी स्वयंपाकघरातही काही करत असू आणि माझी मुलगी तिथे आली तर लुडबुड करू नको, असं न म्हणता तिला जमतील ती लसूण सोलणं, कढीपत्त्याची पानं सोडवून ठेवणं, भांडी पुसून जागेवर लावणं, अशी छोटी-छोटी कामं करू देतो. ती आजीच्या मदतीनं सोपी सॅलड्स करायला शिकली आहे.

मला स्वत:ला भाषा शिकण्याची आवड आहे. मी जर्मन शिकते. एकदा माझी मुलगी सहज मला म्हणाली, ‘‘आई, मला स्पॅनिश शिकायचंय.’’ तेव्हा ती फक्त पाच वर्षांची होती; पण लहान आहे, आत्ता तिला काय कळतंय असं म्हणून दुर्लक्ष न करता मी माझ्या जर्मन मैत्रिणीची मदत घेतली. तिला स्पॅनिशही येतं, त्यामुळे ती स्पॅनिशमधल्या छोटय़ा-छोटय़ा ऑडिओ क्लिप्स पाठवते. त्या ऐकून माझी मुलगीही थोडं-थोडं स्पॅनिश बोलू लागली आहे. सध्या तिला एकेका वाक्याच्या भाषांतराचा खेळ खेळण्याचं वेड लागलं आहे.

थोडक्यात, मुलांना इंटरनेटपासून दूर ठेवणं फार अवघड नाही; पण त्यासाठी आई-बाबांची आणि घरातल्या प्रत्येकाचीच मुलांबरोबर काही गोष्टी करण्याची तयारी असायला हवी. मुलांबरोबर भरपूर वेळ घालवणं, त्यांचे काही खेळ आपल्याला अर्थशून्य वाटले तरी मुलांना आनंद वाटेल म्हणून खेळणं, त्यांना पुस्तकांच्या दुनियेत नेणं, पालक म्हणून आपली कल्पनाशक्ती वापरून काही नवे मार्ग धुंडाळणं, हे सगळे मुलांना इंटरनेटच्या मोहजालापासून दूर घेऊन जाण्याचे मार्ग आहेत, नाही का?

– श्रेया बापट, बहारीन

कामांचा तक्ता करणं उपयोगी पडलं

‘इंटरनेटचे व्यसन’ (२ मे) हा लेख वाचला. मी ऑस्ट्रेलियात एका शाळेमध्ये शिक्षिका आहे. तिथला माझा इंटरनेट वापराचा अनुभव मी माझ्या मुलाला इंटरनेट कसं, कशासाठी आणि किती काळासाठी वापरायला द्यावं यासाठी वापरला. माझ्या शाळेत मुलांना आपलं एक ‘टाइमटेबल’ बनवायची सवय आहे आणि त्यात खास इंटरनेट किंवा खेळासाठीही वेळ ठेवावा लागतो.

तीच सवय माझ्या मुलालाही आहे. असा तक्ता बनवताना एक अट असते, ती म्हणजे मध्ये सगळ्या गोष्टींना थोडा-थोडा वेळ  द्यायचा. उदाहरणार्थ- अर्धा तास वाचन, अर्धा तास खोली किंवा ‘डेस्क’ आवरणं, अर्धा तास चित्र काढणं आणि मग अर्धा तास इंटरनेट. यामुळे मुलांना कळतं, की बाकीच्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. याशिवाय तुमच्या सगळ्या कामांमध्येही मुलांना सहभागी करून घ्या. थोडा वेळ लागेल काम व्हायला, पण शेवटी आपल्याला पाहिजे ते साध्य होतं.

शिवाय दिवसाच्या शेवटी एक गोष्ट आवर्जून करावी, ती म्हणजे आपण मुलांना विचारायचं, की आज तू ज्या काही गोष्टी केल्यास, त्यात तुला सगळ्यात जास्त काय आवडलं?

वरती सांगितलेला उपाय हा वय वर्षे ७ च्या पुढच्या मुलांसाठी आहे, पण मला असं वाटतं, की ७ वर्षांच्या खालच्या मुलांना जर इंटरनेटची वाईट सवय असेल, तर मग पालकांनी आपलं स्वत:चं आत्मपरीक्षण करायला हवं, नाही का? कारण लहान मुलं अनुकरणप्रिय आणि आज्ञाधारक असतात.

– सुप्रिया संत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:54 am

Web Title: letters to editor chaturang 18052020 dd70
Next Stories
1 फिरता रंगमंच
2 भूमिका बदलताना..
3 जीवन विज्ञान : वाढवा प्रतिकारशक्ती
Just Now!
X